माझी टाचदुखी- ५

आधीच्या भागाची लिंक– माझी टाचदुखी- ४
माझी टाचदुखी भाग 5
25 ऑगस्ट 2018. ह्या दिवसाची खरंतर किंचितही आठवण होऊ नये असे मनापासून वाटते. पण काही गोष्टी सहजासहजी आपल्या स्मरणातून जाणाऱ्या नसतातच.
भयंकर, प्रचंड, अतीव किंवा आणखी काही, कोणत्याही शब्दाने वर्णन करता येणार नाही अशी ठसठस टाचेतून वरच्या दिशेने धडका देत होती. मुलं आणि निलेश शाळेत जाईपर्यंत मी कसाबसा धीर धरला. त्यानंतर ओरडून ओरडून रडणे सुरू झाले. खरंतर हे असे आवाज करून ओरडुन रडणे भरल्या घरात शोभत नाही हे मला कळत का नव्हते? असे करू नये हे पूर्णपणे कळत असूनही माझे माझ्यावर नियंत्रण राहत नव्हते. डॉक्टरांनी अजून दोन दिवस थांबायला सांगितले आहे पण ते दोन दिवस मी कसे काढणार हे माझे मलाच कळत नव्हते.
टाचेतून येणारी ठणक फार थकवत होती. काहीतरी धारदार शस्त्र घेऊन स्वतःची टाच कापून काढुया असे अघोरी विचार मनात येत होते. सुरुवातीला पाऊल, नंतर घोट्यापर्यंत असणारी सूज त्या दिवशी आणखी वरपर्यंत चढलेली दिसत होती.
आणि हळूहळू एक फुगारा इंजेक्शन दिलेल्या जागेवर जाणवू लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो फुगारा चांगलाच गरगरीत होऊन पिवळसर दिसू लागला. ठणकेची तीव्रता वाढत होती ते एक वेगळेच.
संध्याकाळी निलेश घरी आल्यावर त्यांनी हा प्रकार पाहिला. फाईलवरील नंबर घेऊन डॉ तोष्णीवाल ह्यांच्या दवाखान्यात फोन करून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. डॉक्टर तोष्णीवाल हे अर्थोपेडिक डॉक्टर असले तरी सर्जन नव्हते. त्यामुळे त्यांनी उद्या दवाखान्यात या बाहेरुन सर्जन बोलावून आपण टाचेला चीर देऊ म्हणून सांगितले. आणि सद्ध्या लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमधील इंजेक्शन स्थानिक डॉक्टरकडून टोचून घ्या म्हणून सांगितले.
लगेचच आम्ही स्थानिक दवाखान्यात (डॉ रत्नपारखी) धाव घेतली. त्यावेळी मुलांना घरी एकटं ठेवून निलेश आणि सासूबाई दोघेही माझ्यासोबत आले. तिथल्या वेटिंगरूममध्ये बसल्यानंतर येणाराजाणारा प्रत्येक जण माझ्या पायाकडे पाहून काय झाले म्हणून विचारू लागला. माझ्याने काहीही बोलवेना. माझी गंभीर परिस्थिती पाहून कंपाऊंडरने मला आधी आत पाठवले.
माझ्या पायाकडे बघून डॉक्टर रत्नपारखी ह्यांनी इंजेक्शन न देता मला बाहेर बसायला सांगितले, आणि फक्त निलेश व सासूबाई ह्यांना आत बसवून घेत त्यांच्याशी ह्या दुखण्याबद्दल संवाद साधला.
डॉक्टर रत्नपारखी ह्यांच्याशी बोलणे झाल्यावर आम्ही घरी येताना रस्त्यातच निलेशने मला आत्ताच्या आत्ता आपण वाशीमला जाणार असल्याचे सांगितले. घरी आल्यावर गाडीतून उतरून घरात जाण्याचे कष्ट माझ्याने होऊच शकले नाही. वाशीमच्या डॉक्टरची फाईल, रात्रीच्या मुक्कामासाठी अंथरूण पांघरूण आणि इतर कपड्यांची बॅग भरून निलेशने गाडीत टाकली.
ही सगळी घाई सुरू असताना गाडीतच बसल्या बसल्या मला सारखे फोन येणे सुरू होते. बाबा, भाऊ, वहिनी, नणंद सर्वांना काळजी वाटत होती. शेजारच्याही मैत्रिणी गाडीभोवती गोळा झाल्या.
माझी रडपड तसेच घरात निलेश आणि आईंची तयारीची धावपळ सुरू असताना शेजारच्या सविता नावाच्या मैत्रिणीने दोन व्यक्तींच्या जेवणाचा डबा आणून दिला. मला एकदम भरून आले. कधी कधी आपण आपल्याही नकळत कुठेतरी पुण्य पेरून ठेवलेले असते. ते आपल्याला संकटाच्या वेळी कसे कामात पडते ह्याचा अनुभव त्या दिवशी आला. भराभर सगळं सामान भरून निघण्याच्या तयारीत असताना मला आईंनी एक सफरचंद खायला दिले आणि गुरूमहाराजांची उदी कपाळाला लावून दिली. ‘सगळं ठीक होईल’ असं म्हणताना त्यांचा स्वतःचा आवाज सुद्धा काळजीने भरलेला जाणवत होता. शेवटी आम्ही वाशीमला जाण्यासाठी निघालो.
क्रमश:
पुढील भागाची लिंक– माझी टाचदुखी- ५
Image by jacqueline macou from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

2 thoughts on “माझी टाचदुखी- ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!