माझी टाचदुखी भाग 6
आधीच्या भागाची लिंक– माझी टाचदुखी- ५
माझी टाचदुखी भाग 6
त्या रात्री मंगरुळ ते वाशिम हा 1 तासाचा रस्ता संपता संपत नव्हता.
‘आपण पुन्हा डॉक्टर राठोड ह्यांनाच पाय दाखवणार आहोत.’ इतकेच मला निलेशने सांगितले आणि नंतर रस्ताभर आम्ही दोघेही गप्प होतो. आता पुढे काय ह्याची काळजी लागून होती. डॉक्टर रत्नपारखी ह्यांनी निश्चितच निलेशला परिस्थितीच्या गंभीरतेची जाणीव करून दिली होती. निलेश ड्रायव्हिंग करताना विचारात होते आणि मी माझ्या दुखण्यात. माझे दुखणे मला कसलाच विचार करू देत नव्हते.
सिक्युरा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टर राठोड ह्यांनी मला टाचेत इंजेक्शन दिले त्यांच्याच स्वतःच्या वेगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला डॉक्टर रत्नपारखी ह्यांनी दिला होता. डॉक्टर राठोड ह्यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलसमोर गाडी उभी करून निलेश आत गेले त्यावेळी रात्रीचे साडेनऊ/ पावणेदहा वाजले असावेत. डॉक्टर हॉस्पिटलच्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घरी गेलेले होते. रिसेप्शनवर निलेशला डॉक्टर दवाखान्यात नसल्याचे आणि ‘आता उद्या सकाळी 11 वाजता या’ असे सांगण्यात आले. निलेशने मात्र माझी परिस्थिती सांगत आपले म्हणणे लावून धरले आणि ‘आत्ता या क्षणी मी पेशन्टला ऍडमिट करतो’ असे सांगून डॉक्टर साहेबांना खाली बोलवण्यास भाग पाडले. सरतेशेवटी ‘डॉक्टर साहेब दहा पंधरा मिनिटात येतील’ असा निरोप मिळाला तेव्हा निलेशने गाडीजवळ येऊन आधार देत मला गाडीतून उतरवून दवाखान्याच्या पायऱ्या चढवत नेले.
दवाखान्याच्या पायऱ्या चढणे म्हणजे एक दिव्य पार पाडण्यासारखे होते. टाच मला टेकवता येणे दूरच साधा धक्काही टाचेला सहन होत नव्हता… आणि अशा परिस्थितीत दहा ते पंधरा पायऱ्या चढायच्या होत्या. निलेशच्या गळ्यात हात टाकून शरीराचा अर्धा भार त्याच्यावर टाकत आणि दुसऱ्या हाताने पायऱ्यांच्या बाजूने बसवलेल्या स्टीलच्या दांड्यांना धरून धरून कसेबसे मी वेटिंग हॉलपर्यंत पोचले. तिथे बसून डॉक्टर साहेबांची वाट बघत थांबलेलो असताना दवाखान्यातील आजूबाजूची ऍडमिट असलेली माणसे, त्यांचे नातेवाईक, दवाखान्यातील इतर स्टाफ ह्यापैकी कोणीनाकोणी येऊन माझा पाय पाहून चेहऱ्यावर आत्यंतिक कीव आणून विचारपूस करू लागले.
कधी कधी आपल्याला कुणीही काहीही विचारू किंवा बोलू नये असे वाटत असते आणि नेमके त्याचवेळी आपल्याला प्रश्न विचारले जातात. डॉक्टरची वाट बघत वेटिंग रूममध्ये काढलेला तो अर्धा तास फार कठीण आणि काळजीने भरलेला होता.
शेवटी एकदाचे डॉक्टर साहेब खाली आले आणि आम्हाला आत ओपीडीमध्ये बोलावले. माझा पाय, त्यावरची सूज, टाचेखाली आलेला पिवळा फुगारा आणि सोबत असलेली फाईल ह्या सगळ्या गोष्टींवरून त्यांच्या सगळे लक्षात आले असले तरी त्यांनी मला माझ्या दुखण्याबद्दल विचारले.
आज हे सगळं लिहीत असताना मला एक गोष्ट आवर्जून आठवते आहे. माझ्या पायाच्या दुखण्याबद्दल डॉक्टरांना सांगत असताना माझ्या डोळ्यांना अखंड धारा लागलेल्या होत्या, वेदनांची जाणीव एक क्षणभर सुद्धा विश्रांती घेत नव्हती आणि घेऊही देत नव्हती, हजार शंकांनी मन भरलेले होते आणि मी सगळं सांगून शेवटी डॉक्टरांना म्हणाले-“मी तीन दिवस झाले अजिबात झोपले नाहीये डॉक्टर….”
खरंतर किती साधी गोष्ट असते झोप म्हणजे!… आणि तरीही किती महत्वाची असते ! ज्याला झोप मिळत नाही त्याला तिचे महत्व कळू शकते. त्या रात्री राठोड डॉक्टरांच्या ओपीडित पायाचे भयंकर दुखणे घेऊन बसलेली असताना सुध्दा माझ्या झोपेबद्दल डॉक्टरांशी बोलावं असं मला का वाटलं?… प्रचंड ठसठसण्याची भयंकर दुखरी जाणीव घेऊन क्षणनक्षण मोजत काढलेले 72 तास ज्याने भोगले आहेत तोच हे जाणू शकतो की तहान, भूक शरीरासाठी जेवढी महत्वाची तेवढीच झोपसुद्धा महत्वाचीच.
चांगली गाढ झोप मिळाल्याशिवाय मी चांगला विचार करूच शकत नव्हते. मला कुठल्याच जाणीवा त्यावेळी शरीरात नको होत्या. शरीर आणि मन दोन्हीही थकलेले होते. आणि दोन्हीना विश्रांती मिळण्याची चिन्हे दूरवरही दिसेनात….
मला झोप हवी होती.. गाढ झोप..
घरून निघताना एक सफरचंद खाल्लेलं असल्याने डॉक्टरांनी त्या रात्री पायाचे ऑपरेशन करता येणार नाही असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ऑपरेशन करू असे सांगून त्यांनी कंपाऊंडरला रात्रीसाठी द्यावयाची औषधी आणि इंजेक्शन्सची माहीती सांगितली.
ऍडमिट पेशन्टसाठीच्या खोल्या दुसऱ्या मजल्यावर होत्या आणि लिफ्टची सोय नव्हती. तिथल्याच दोन कंपाऊंडर्सने मला अक्षरशः उचलून वरच्या मजल्यावर मला देण्यात आलेल्या खोलीतील बेडवर नेले. त्या क्षणी मला माझी अवस्था फार फार दयनीय झाल्याचे जाणवले.
तब्येतीची चौकशी करणारे नातेवाईकांचे फोन कॉल्स सुरूच होते. सर्वांशी बोलून झाल्यावर शेजारच्या मैत्रिणीने सोबत दिलेला डबा आम्ही खाल्ला. नंतर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आणि एक इंजेक्शन मला देण्यात आले. मग सकाळ होण्याची वाट बघत छताकडे नजर लावून तिथल्या बेडवर मी पडून राहिले. अर्धवट जाग आणि अर्धवट गुंगी अशा अवस्थेत ती रात्र संपली. पायतील ठणक पूर्णपणे थांबलेली नसली तरी तिचा जोर मला आदल्या रात्रीपेक्षा कमी जाणवत होता. त्यामुळेही असेल कदाचित पण मला अधूनमधून झोप लागत होती आणि परत जाग येत होती.
सकाळी पुन्हा औषधींचा अंमल उतरला आणि ठणक वाढू लागली. ऑपरेशन होण्यापूर्वी मला काहीही खायचे अथवा प्यायचे नव्हते. मी नऊ वाजण्याची वाट बघत बेडवर पडून होते.
अशातच अण्णांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोन आला. ते माझ्या काळजीने मला भेटण्यासाठी म्हणून घरून निघाले सुद्धा होते. त्यांना वाशीममध्ये पोचायला एक वाजणार होता. निलेश माझी काळजी करत माझ्या आजूबाजूला होतेच. घरी आईला, मुलांना फोन करणे, इकडे माझी काळजी करणे आणि येणारे कॉल्स अटेंड करत प्रत्येकाला तेच ते सांगणे असे सगळे निलेशच सांभाळत होते.
असे करता करता नऊ वाजले. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर आणण्यात आले. माझ्या बेडवरून स्ट्रेचरवर मोठया कष्टाने मला शिफ्ट होता आले.
थोड्याच वेळात माझ्या पायाचे ऑपरेशन होणार होते, टाचेला चीर देण्यात येणार होती आणि तरीही मला अजिबात भीती म्हणून वाटत नव्हती. मला स्वतःचीच कमाल वाटत होती. ऑपरेशन म्हंटलं की किती धडकी भरते ! पण तसे माझ्या बाबतीत घडले नव्हते. मला लवकरात लवकर दुखण्यातून बाहेर यायचे होते… आणि ऑपरेशन झाल्यावर लगेचच माझे दुखणे थांबणार होते इतकेच मला कळले होते… पण तो निव्वळ भाबडा आशावाद होता !
ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यावर एका हातात सलाईन टोचण्यात आले. पायाला कसलंतरी औषध फासण्यात आल्याची जाणीव झाली आणि नंतर अलगद डोळे बंद झाले.
क्रमश:
पुढील भागाची लिंक– माझी टाचदुखी भाग 7
Image by jacqueline macou from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
Pingback: माझी टाचदुखी भाग 7 – LekhakOnline – Excellent Marathi Articles