माझी टाचदुखी भाग 7

आधीच्या भागाची लिंक– माझी टाचदुखी भाग 6
माझी टाचदुखी भाग 7
डोळे बंद असण्याचा काळ एखाद्या सेकंदाचा असावा असं वाटलं. जणूकाही त्या एका सेकंदात एखादे जादूचे फूल किंवा मोरपीस अंगावरून फिरले आहे आणि त्या जादूने अंगातील सगळ्या दुखऱ्या जाणीवा खोडून पुसून काढल्या आहेत असे वाटले.
डोळे उघडले त्यावेळी मी पुन्हा हॉस्पिटलमधील माझ्या खोलीतील बेडवर पडलेले होते. निलेश सर्वांना ऑपरेशन व्यवस्थित झाल्याबद्दल सांगत होते. त्यांच्या आवाजाने माझे जडावलेले डोळे किंचित भानावर येऊ लागले. गेल्या दहा बारा दिवसात हळूहळू वाढत गेलेली दुखण्याची संगत आता अजिबात जाणवत नव्हती. मी पायाकडे पाहिले तेव्हा पांढऱ्या पट्टीत घट्ट गुंडाळलेला पाय मला दिसला. त्यातली सगळी ठसठस डॉक्टरांनी काढून टाकली असल्याने मला जरा हुशारी जाणवू लागली. आता मला खायला प्यायला चालणार होते. निलेशनेही किती वेळचे काहीही खाल्ले नव्हते.
त्याने खाली जाऊन माझ्यासाठी चहा आणि बिस्किटे आणली. थोड्याच वेळात अण्णा दवाखान्यात पोचले. त्यांनी स्वतः बनवलेला चिवडा माझ्यासाठी आणला होता आणि काही सफरचंदं आणली होती. चहा-बिस्किटे, चिवडा आणि सफरचंद खाऊन मी पुन्हा डोळे लावून घेतले. मला पुन्हा झोप लागली.
दुपारी तीनच्या सुमारास मला खालच्या मजल्यावर नेण्यात आले. तिथे पुन्हा एकदा पायाच्या जखमेचे ड्रेसिंग करण्यात आले. मला पाय जवळ घेता येत नसल्याने खालून टाच कशी दिसते हे बघता येत नव्हते. पण ड्रेसिंग करताना ज्यांना ज्यांना टाच दिसत होती त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच काहितरी मला जाणवायचे. ते नक्की काय होते हे मला कितीतरी दिवसांनंतर कळले.
ड्रेसिंग झाल्यानंतर डॉक्टरांनी स्वतः येऊन काही सूचना दिल्या. आणखी दोन दिवसांनी ड्रेसिंगसाठी परत यायला सांगितले. काही औषधी लिहून दिल्या. दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमधील औषधी निलेशने आणल्या आणि आदल्या रात्रीप्रमाणे दोन कंपाऊंडरने  मला उचलून गाडीत आणून घातले.
अण्णा, मी आणि निलेश आम्ही तिघेही घरी आलो तो दिवस होता 26 ऑगस्ट 2018. गाडीमध्ये खाली पाय सोडून बसल्याने घरी येईपर्यंत पायावर पुन्हा सूज आली. पण दुखणे कमी असल्याने मला त्याचे काहीही वाटले नाही.
जेवून, औषधी घेऊन त्या दिवशी रात्री खूप दिवसांनी मी अगदी पूर्वीसारखी निवांत झोपले.
पण हे निवांतपण मला फार काळ लाभणार नव्हते हे कुठे ठाऊक होते??… अज्ञानात सुख असते असे म्हणतात ते काही खोटे नाही. माझा पाय आता पूर्णपणे बरा झाला आहे हे माझे अज्ञानच नव्हते का??… अजून काय काय मला सहन करायचे होते हे मला ठाऊक नसणे हेही माझे अज्ञानच होते ना !…
मी त्यावेळी सुखी होते एवढेच मला आत्ता आठवते. आणि ह्या भाबड्या सुखाचे कारण  माझ्या पायाची ठणक थांबणे यासारखे क्षुल्लक होते हेही मला आत्ता जाणवते.
काही काही जाणीवा फार नंतर आपल्याला होतात. त्यातलीच ही एक. आत्तापर्यंतचे दुखणे म्हणजे हिमनगाचे टोक होते. अजून फार काही घडायचे होते…
क्रमश:
Image by jacqueline macou from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

3 thoughts on “माझी टाचदुखी भाग 7

  • September 30, 2020 at 4:53 am
    Permalink

    Anubhaw ani katha donhi utkanthawardhak ahet. Pan bhag matra khup ch chote asatat. 🙁 agadi lagech kramash: yeta..

    Reply
  • September 30, 2020 at 5:25 am
    Permalink

    तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.🙂

    तुम्ही केलेली सूचना लक्षात घेतली आहे. पण एकूणच माझा व्याप आणि व्यस्तता ध्यानात घेता फार मोठे पसरट भाग लिहिणे माझ्यासाठी कठीण होऊन बसते आणि त्यातली उत्कंठा कायम ठेवणे हेही अवघड होते. टाचदुखीच्या ह्या अनुभवाने किती टप्प्यांवर माझे साधेसरळ अंदाज खोडून काढले हे ध्यानात घेऊन त्यानुसार सगळे मी लिहिले आहे.

    आपण हे उत्सुकतेने दररोज वाचत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

    Reply
  • Pingback: माझी टाचदुखी भाग 6 – LekhakOnline – Excellent Marathi Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!