माझी टाचदुखी भाग 8
ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी-म्हणजे 27 ऑगस्टला राखीपौर्णिमेचा सण होता. मुलांना आणि निलेशना सुट्टी होती. अण्णा संध्याकाळी परत जाण्यासाठी निघणार होते. त्या सकाळी सासूबाईंची नेहमीच्या कामांची धावपळ गडबड सुरू असताना कामवाल्या मावशी गंगाबाई घाईघाईत आल्या. त्यांच्या एका हाताला पट्टी गुंडाळलेली होती आणि चेहऱ्यावर वेदना. हातावरची पट्टी काढून त्याखाली साधारण पाच इंच लांबीची खोल ओरबडलेली जखम आईंना दाखवत गंगाबाईने सांगितले- “साहेबांच्या घरचं कुत्रं चावलं काकू…आता आजपासून मी येत नाही..”
झालं… माझं तर सगळं अवसानच गळालं. आता सगळंच्या सगळं काम एकट्या आईंवर पडणार ! संकटे अशी एकावर एक का येतात? आपली कोणीतरी परीक्षा घेतंय असं वाटून गेलं.
त्या दिवशी धुणी, भांडी, पूजा, स्वयंपाक इत्यादी कामे आईंना करावी लागली. घरातील बारीकसारीक कामं निलेश आणि मुलांनी मिळून केली. कामं करता येतील अशी माझी अवस्थाच नसल्याने मी एका जागी बसून होते. पण घरातील सर्वांचे असे हाल बघून मला काय हवं नको ते कुणाला सांगायला, हातात मागायला माझे मन होत नव्हते.
नेहमी घरभर गरगर फिरून कामे करणारी मी, क्षणाचीतरी उसंत मिळावी म्हणून धपडणारी वैतागणारी मी, निवांततेच्या अपेक्षेत शनिवार रविवारची आतुरतेने वाट बघणारी मी त्या दिवशी एकटी एकाच जागी बसून होते. अख्खे घर काम करीत असताना मी बसून होते. सणाचा दिवस होता आणि मी बसून होते. किती किती सल आपण बाळगतो आतल्या आत ! किती किती सवय होते आपल्याला आपल्या दमवून टाकणाऱ्या चक्राची ! दमताना ते चक्र नकोसे होते आणि असे अचानक थांबल्यावर तोच वेग परत हवाहवासा वाटू लागतो. आपले मन खरंच विचित्र वागते नेहमी. हातात असलेले काहीही आपल्याला नको असते आणि हातातून निसटू पाहणारी प्रत्येक वस्तू आपण घट्ट धरू बघतो. कमाल असते आपली, आपल्या मनाची !
वॉशएरियात जाण्यापूर्वी प्रत्येक वेळी मला पायाला प्लास्टिक बॅग बांधून घ्यावी लागणार होती. पाय पाण्यात अजिबात घालायला चालणार नाही अशी डॉक्टरांची सक्त ताकीद होती. दुसराच दिवस असल्याने पायाची अवस्था नाजुक होती. पाय खाली सोडून बसण्याची मनाई होती. पाचेक मिनिटं सुद्धा खाली पाय सोडून बसलं की सूज यायची. सगळं अगदी कठीण होऊन बसलं होतं. त्या दिवशी गरम पाण्याने माझं मीच स्पंजिंग करून अंघोळ केल्याप्रमाणे अंग स्वच्छ करून घेतलं तरी मला स्वच्छ वाटेना. पण इलाज नव्हता. सकाळसंध्याकाळ जेवणाआधी आणि जेवणानंतर एकूण पाच पाच गोळ्या एकदम मला घ्याव्या लागणार होत्या. काही दिवसांपूर्वी ठणठणीत बरी असणारी मी असा पाय घेऊन एका जागी बसले होते. मूठभर औषधी-गोळ्या खात होते. मी कितीही गोळ्या खायला, औषधी घ्यायला तयार होते… मला लवकर बरे व्हायचे होते. अगदी पूर्वीसारखे व्हायचे होते. मला घरभर फिरायचे होते. मला गिरकी घ्यायची होती. मला पूर्वीसारखे काम करून थकायचे होते…
पण… ते सध्यातरी शक्य नव्हते. सद्ध्या ‘आता पुढे काय?’ ह्या एकाच प्रश्नाच्या उत्तराचा शोध मला थकवत होता.
क्रमश:
पुढील भागाची लिंक– माझी टाचदुखी भाग ९
Image by jacqueline macou from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
पुढे काय ची उत्सुकता लागून राहते…. पण तुम्हाला एक विनंती आहे… भाग थोडे मोठे लिहा ना…वाचताना लगेचच संपून जातात..
Pingback: माझी टाचदुखी भाग ९ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: माझी टाचदुखी भाग ९ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: माझी टाचदुखी भाग ९ – LekhakOnline – Excellent Marathi Articles