नजरबंदी…

पाटलांच्या चौसोपी वाड्यावरच्या फुलांच्या माळा अजून उतरल्या नव्हत्या. पाहुण्या रावळ्यांची वर्दळ अजूनही तशीच होती लग्नघरात. दहा – पाच पोरं आरडा ओरडा करत या खोलीतून त्या खोलीत पळत होती. कोणाच्या तरी मांडीवर आपलं वर्षा – दीड वर्षाचं पोर टेकवून त्याची आई “खेळवा जरा” म्हणून आत सैपाकाचं बघायला गेली होती. आजूबाजूचे दोन चार म्हातारे कोतारे त्याला चुटक्या वाजवून , टाळ्या वाजवून दाखवत होते आणि खणाची कुंची घातलेलं आणि गाला कपाळावर टिळा लावलेलं ते बाळ खुदुखुदू हसत होतं.

नवरा मुलगा त्याच्या चार दोन टुकार टाळक्यांमध्ये बसला होता. कुजबुज कुजबुज आणि ख्याख्या करून कानांना कानठळ्या बसत होत्या. आबा आणि अप्पा जमेल तितक्या रागात अधून मधून त्या टोळक्याकडे नजर टाकत होते.

दारातल्या कडुलिंबाच्या बांधलेल्या झोक्यावर पोरी झोका घेत होत्या. उगाच काही वयस्कर माणसं राजकारणावर गप्पा मारता मारता “आय पोरीनो , उतरा खाली . ए कुणाची ग तू ? त्या सुमीची दिसती हि आगाऊ कार्टी. सांगू का तुज्या आईला होय ग” म्हणून उगाच धाक देत होते.

चहाचा दुसरा राउंड होऊन गेला होता. सकाळचे नऊ वाजत आले होते. सगळ्यांच्या पोटात कावळे गुरगुरायला लागले होते.

स्वयंपाकघरातून पोह्यांचा चमचमीत वास आला तशी सगळ्यांचीच नजर तिकडे वळली. आतून बांगड्यांची नाजूक किणकिण आणि दबक्या आवाजातली कुजबुज ऐकू येत होती. मध्येच हसण्या खिदळण्याचे आवाज आणि भांड्यांचे आवाज एकमेकात मिसळून जात होते.

“सांग कि वयनींना नाश्ता द्यायला , कसली भूक लागलीये अजून किती वेळ लावणार” त्याचा एक मित्र कानात बोलला. “गपे सुश्या , काय हावरटपना लावलाय” दुसरा मित्र म्हणाला. “भूक लागलीये हिकडं … ” तो जोरात ओरडला तसा स्वयंपाकघरातला आवाज एकदम बंद झाला. सगळे बोलायचे बंद झाले. “काय ते बेणं .. ” पुटपुटत अप्पा त्याच्याकडे रागाने बघू लागले.  त्याने सरळ दुर्लक्ष केलं. कोणाचं लक्ष नाही असं बघून त्याने किंचित झुकून आत बघितलं. तिचे फक्त मेंदी लावलेले पाय तेवढे दिसत होते. यावरून ती नक्की चुलीपाशी बसलेली असणार. म्हणजे पोहे .. ?

तो तिच्या पायांवरच्या लालचुटुक मेंदीकडे आणि ठसठशीत जोडव्यानकडे बघत राहिला तसा जोरात काठी आपटल्याचा आवाज आला. सगळे अचानक दचकले. “काठी … पडली .. ” म्हणत आबांनी काठी उचलली तरी ती का पडली (कि पाडली?) गेली होती हे आबांचे रागीट डोळे बघून त्याला लगेच कळलं. त्याने झटकन मान फिरवली.

“नाश्ता मिळायचा का आज ??” काकांचा खणखणीत आवाज आला आणि एक एक करून त्याची काकू, वहिनी , आत्या सगळ्या हातात डिश घेऊन बाहेर आल्या. “अहो घ्या, अहो घ्या तुम्ही, अहो घ्या घ्या लाजताय कसले .. ” “अरारारा भूक लागून कावळे पार झोपले पोटातले” , “शेव आना शेव ssss ” अशा अनेक आवाजांनी हॉल दणाणून गेला. त्याच्या वहिनीने त्याच्या हातात पोहे दिले. “कडीपता मिरची काढलिये भावजी.” म्हणून हातात डिश दिली. त्याने गपचूप हातात डिश घेतली. आणि पोहे तोंडे घालायच्या अगदी एक क्षण आधी स्वयंपाकघराकडे नजर टाकली. “ती न्हाई येनार” वहिनी हळूच गालातल्या गालात हसत म्हणाली. “का ?” त्याने पटकन विचारलं. वहिनीने हसू आवरत तोंडाला पदर लावला. “काय तरी ! काय लगीच गोड वाटुना झालं काय भावजी अन्न” म्हणत वहिनी हसत निघून गेली.

त्याची नजर राहून राहून आत जात होती. खरंतर ती त्याला पूर्ण दिसली असती तर त्याची नजर इतकी भिरभिरती नसती. पण तिचे दिसणारे लालचुटुक नाजूक पाय आणि जोडवी सतत त्याचं लक्ष वेधून घेत होती.

“या या बाळूकाका !” इतक्यात आवाज आला. मुलाच्या हाताला धरून बाळूकाका एक एक पाऊल टाकत आत आले. ते आले तसे त्याचे बाबा, आणि आबाही उभे राहिले. कोणीतरी पटकन खुर्ची आणली. हा मात्र शुंभासारखा तसाच बसून होता. आबांनी त्याला दोनदा डोळ्यांनी दटावलं पण इतक्या लोकांमध्ये आबा कसले वराडतात ! म्हणून तो निवांत बसून राहिला.

“काय म्हणता बाळूकाका ? वळखलं का मला ?” आत्या तोंडभर हसू घेऊन त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. “तू बाबी … ” बाळूकाका थरथरता हात वर घेत म्हणाले. “अरे वा वळखलं कि बाळुकाकांनी मला” म्हंटल्यावर सगळे एकदम कौतुकाने बाळुकाकांकडे बघत हसले. त्यांचं बोळकभर हसू उगाच निरागस वाटलं.  “बाळूकाका हे मात्र बेस केलं तुमी युन .. आता तुम्हीच मोठे जानते म्हणायचे आम्हाला , न्हाय का!” आप्पा म्हणाले. “बरं का सोन्या, हे आमचे बाळूकाका ! आबा लहान होते तेव्हा आपल्याकडे शेताची  राखण करायला होते. आम्ही एकत्र जेवायचो. रात्री मळा राखायचो , आम्हाला खांद्यावर घेऊन बाळूकाका जत्रेतले पालखी दाखवायचे.. काय रे सुन्या ! आठवतंय का !” आप्पा जवळच चड्डी सावरत असलेल्या कुण्या सोन्याला उगाच मांडीवर घेत हसत म्हणाले.

त्यानंतर लहानपणीच्या गप्पांची मैफिल रंगली. त्यात लहानपणीच्या गमतीजमती , त्यात आत्याने घातलेली भर, आणि सगळ्या पाटलांचं ठो ठो हसणं. त्याच्या दादाला आठवत होते बाळूकाका पण ते मुलासोबत निघून गेले तेव्हा हा फारच लहान होता त्यामुळे हे कोण बाळूकाका कि कोण त्यात त्याला काही इंट्रेष्ट नव्हता. त्याच लक्ष आपलं आत – जोडवी अन पाय !

इतक्यात आतून चहा आला, आणि वाडगा. “बाबांना चावनार न्हाईत पोहे” .. म्हणाला. वहिनी काही बोलणार इतक्यात आतून नाजूक आवाज आला. “तांदळाची उकड हाय. माज्या आजोबांना आवडायची तशी केलीये, आवडल त्यास्नी”

अप्पा आणि आबा एकमेकांकडे बघून हसले. त्याच्या आईने तितक्यात पटकन देवघराकडे नजर टाकली. तिने नजरेनेच आभार मानले असतील का ? काय माहित!

खाणं पिणं उरकून बाळूकाका निघाले तसं त्याच्या आईने त्यांना अडवलं. “सुनबाईस्नी भेटून तरी जावा कि!” त्या म्हणाल्या. “जा ग , तिला घेऊन ये .. आणि सोबतच कानात काही पुट्पुट झाली. मोठ्या सुनबाई मान डोलावून आत गेल्या”

काही मिनिटातच डोक्यावर पदर घेतलेली लहानी बाहेर आली. बाळुकाकांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. “आवडली बरं का मला उकड !” हाताचा मोर नाचवत ते म्हणाले तेव्हा सगळे रीतिरिवाज बाजूला,या ठेवून ती खुदकन हसली. तो तिच्याकडे बघत होताच. मोहून गेल्यासारखा.

बाळूकाका निघाले तसं लहानीने त्यांना अडवलं .. “नमस्कार करतो !” म्हणत डोक्यावरचा पदर नेटका केला. तिचं तिला कसं कळलं माहित नाही पण त्याला इतक्या गराड्यातून तिला शोधायला लागलं नाही. थेट तो उभा होता तिथे तिची नजर गेली.

“येताय ना ?!!” ची एकच नजर ! अर्रर्रर्र !

नमस्कार करून उठताना त्याने तिच्याकडे आणि तिने त्याच्याकडे बघितलं. “उठा आता, सगळे बघताहेत” ची तिची एकच नजर. हि कसली नजरेची भाषा आपल्याला समजायला लागली ? त्याने फक्त हलकेच मान डोलावली आणि उठला.

“बरं का , बाकी बायकोच्या नजरेच्या धाकात राहायची परंपरा मोडली नाही पट्ठ्याने!” आबा म्हणाले आणि सगळं घर हसण्यात बुडून गेलं. दोन जण सोडून. त्यांचे फक्त डोळे हसत होते! हि त्यांची नवीन भाषा होती!

पूजा खाडे पाठक

Image by Sofie Zbořilová from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

3 thoughts on “नजरबंदी…

  • October 2, 2020 at 7:07 pm
    Permalink

    किती गोड आहे कथा.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!