माझी टाचदुखी भाग ९
आधीच्या भागाची लिंक– माझी टाचदुखी भाग 8
माझी टाचदुखी भाग 8
रक्षाबंधनच्या दिवशी संध्याकाळी अण्णा परत गेले. दुसऱ्या दिवसापासून घरातील दिवसभराची सगळी धावपळ माझ्याशिवाय पुन्हा सुरू झाली. निलेश आणि सासूबाई दोघांनी मिळून स्वयंपाकघर आणि मुलांची तयारी ही कामं सांभाळली असली तरी निलेश आणि मुले शाळेत गेल्यावर इतर कामांचा ताण सासूबाईंवर येऊन पडला. त्यावेळी त्यांचे वय सत्तर. मुळातच कामाची सवय असलेले शरीर होते म्हणून ठीक त्या निदान उभं राहू शकत होत्या. नाहीतर काय हाल झाले असते याचा विचारही करवत नाही.
अशा परिस्थितीत मला भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली. आधीच कामांची भरमार आणि त्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे चहापाणी करणे. सासूबाईंवर आणखी ओझे पडू लागले. बरं समोरच्याला ‘तू येऊ नको’ तरी कसे म्हणावे हा प्रश्न पडायचा.
ज्याला जसे माहीत होईल त्याचा तसा फोन येई. भेटायला येणारे आणि फोन कॉल्सवर बोलणारे. पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा सगळी स्टोरी रिपीट होत असे.
मला एका गोष्टीची गंमत वाटे, म्हणजे अजूनही वाटते की- सगळं होऊन गेल्यावर येणाऱ्यांपैकी किमान 95 टक्के लोक मला म्हणाले ‘इंजेक्शन घेण्याआधी मला विचारलं असतं ना तर मी घेऊच दिलं नसतं.’ मग मला आणखीनच अपराध्यासारखं वाटत राही. माझं मन स्वतःलाच खात राही की खरच आपण हा शहाणपणा कुणालाही न विचारता का केला? आणि ह्या ‘का?’ ला काहीच निश्चित असे उत्तर नव्हते. त्यावर चर्चा करणेही खरेतर फार गरजेचे नव्हते आणि तरीही येणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडून मला ही बोचरी जाणीव करून देण्यात आली हे सत्य आहे.
माझा दिनक्रम कमालीचा बदलून गेला होता. बाळंतीण बाईसारखं मला सगळं हातात मिळत होतं. काही गोष्टींकरिता माझी मी उठत होते. वॉकरच्या सहाय्याने फक्त आठ दहा पावलं टाकणं शक्य होत होतं. तेवढ्यानेही श्रम जाणवत असत, थकवा येत असे. प्रत्येकदा पायाला प्लास्टिक बॅग बांधून मगच वॉश एरियात जाणे ही तर सवयच लावून घ्यावी लागणार होती. आता पूर्वीसारखा मला पटकन पाण्यात पाय घालता येणार नव्हता. अंघोळ करताना सुद्धा ऑपरेशन झालेला पाय बाजूला एखाद्या पाटावर आडवा ठेवून विचित्र पोझमध्ये अंघोळ करावी लागत होती. पाण्याचा ओघळ सुद्धा बांधलेल्या टाचेकडे जाऊन पट्टी ओली होऊ नये याकरिता विशेष लक्ष द्यावं लागत होतं.
ह्या नवीन सवयींची ओळख होण्यात दोन दिवस गेले आणि आम्ही तिसऱ्या दिवशी ड्रेसिंगसाठी परत वाशीमला गेलो. एव्हाना पायाभोवती दोन दिवसांपासून गुंडाळलेल्या पांढऱ्या पट्टीवर खालच्या बाजूने रक्ताचा भलामोठा ठिपका दिसू लागला होता. पट्टीच्या आतील पूर्ण त्वचा आणखी कचकच करू लागली. जखमेच्या जागेवर चिकचिक जाणवून फार फार त्रासदायक वाटू लागलं.
ऑपरेशननंतर चारपाच दिवसात मला बरे वाटेल आणि पूर्वीसारखे चालता येईल अशी माझी समजूत असताना दहा दिवस झाले तरी दर दोन दिवसांनी ड्रेसिंगसाठी वाशीमला जावे लागत होते.
तीन ते चार वेळा वाशीमला ड्रेसिंग केल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला इथून पुढे गावातीलच डॉक्टरकडे ड्रेसिंग करायला सांगितले. पंधरा दिवसांची औषधी लिहून दिली. दररोज गोळ्या औषधी घेतल्याने अंगात उष्णता वाढली. सतत घामेजलेले अंग राहू लागले. फुल स्पीडवरील फॅन खाली बसूनही उष्णतेने येणारी अस्वस्थता जाणवत रहायची. तळहात तळपाय दोन्हींची आग आग व्हायची.
गावातील रत्नपारखी डॉक्टरांकडे चार पाच वेळा ड्रेसिंगसाठी आम्ही गेलो असू. त्यानंतर ड्रेसिंगसाठी आवश्यक असणारे सामान त्यांनी आम्हाला लिहून दिले आणि घरीच जखमेचे ड्रेसिंग सुरू झाले.
ज्या दिवशी पहिल्यांदा जखमेचे ड्रेसिंग घरी केले त्यादिवशी रात्री मला झोप लागू शकली नाही. आजपर्यंत न पाहिलेली जखम त्यादिवशी मी पहिल्यांदा पाहिली होती…
साधारण चार सेंटीमीटर व्यास असणारी गोल आणि खोल जखम ! अंगठ्याची हालचाल केली तर टाचेतील मांस हलताना दिसू शकेल अशी जखम ! कंच ओली रक्ताळलेली सतत पाणी झरवणारी चिकचिक जखम ! ती जखम जेवढी टाचेला झालेली होती त्यापेक्षा कितीतरी मोठी जखम मनावर झाली. आपण आता यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही हे मनावर ठसलं. आपण कायमचे पंगू झालो आहोत अशी असहाय जाणीव निर्माण झाली… आणि आता धाय मोकलून रडावे असे वाटू लागले.
क्रमश:
Image by jacqueline macou from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
खर तर अस बोलू शकत नाही खूप छान लिहिले आहे कारण ही वेदने ची कहाणी आहे त्यात मुख्य म्हणजे आपण स्त्रिया सगळे अंगावर काढतो ह्या चुकीची गोष्ट आहे ह्यातून पुढच्या la ठेच मागचा शहाणा झाला तर ठीक. आत्ता कश्या आहात काळजी घ्या
आत्ता मी एकदम बरी आहे. टाचदुखी पूर्णपणे बंद झाली आहे.
तुम्ही फार मन लावून वाचलंत आणि काळजीने विचारलंत.
धन्यवाद 🙂
Mala don varshpurvi aatlya tondache galoo jhale hote. Tevha asech operation karun roj dressing karave lagat hote. Te athvale tari kata yeto majhya angavar.
खरे आहे.
दुखणे बरे झाल्यावरही आधीच्या वेदना विसरता येत नाहीत.
Pingback: माझी टाचदुखी भाग 10 – LekhakOnline – Excellent Marathi Articles