वरण-भात…
मंदारची आई मंदार बारा वर्षांचा असतानाच जग सोडून निघून गेली…
त्यानंतर मंदार आणि त्याचे बाबा दोघेच राहायचे…
त्याच्या आईने केलेला गरम गरम गोडं वरण-भात त्याला खूप आवडायचा…
गोडं वरण असलं की तो भाजीचं नावही घ्यायचा नाही…
आई गेल्यावर मात्र आईच्या वरण भाताची उणीव आईइतकीच जाणवू लागली…
पण काय करणार..इलाज नव्हता…
दुपारी आणि रात्री स्वयंपाकवाल्या काकू स्वयंपाक करून जात असे…
मंदार आणि बाबा आपापल्या वेळेप्रमाणे जेऊन घेत असे…
गोडं वरण, वाफाळता भात, तुपाची धार, लिंबाची फोड…
आणि आईची ‘मंदार जेवायला चल’ अशी प्रेमळ हाक..सगळं काही फक्त आठवणीपुरतंच मर्यादीत राहिलं होतं…
दिवसामागून दिवस चालले होते…
मंदार आता मोठा झाला होता…
बाबा पण रिटायर्ड झाले होते…
ते कधी कधी आईसारखाच वरण भात करायचे..लेकाला आवडतो म्हणून…
मंदार मुकाट्याने जेवायचा पण आईच्या हाताची ‘ती’ चव काही लागायची नाही…
बाबांनी आता मंदारच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरवात केली होती…
असंच एकदा ओळखीतलंच स्थळ आलं…
बाबांनी मुलीची चौकशी केली…
सगळ्याच दृष्टीने ती मंदारसाठी बाबांना साजेशी वाटली…
त्यांनी पुढे जायचं ठरवलं…
मुलीच्या बाबांना फोन केला…
सगळं बोलून झालं…
माणसं तशी थोडीफार ओळखीची असल्याने मुलीच्या बाबांनी मंदारच्या बाबांना येत्या रविवारी घरी जेवायला यायचा आग्रह केला…
मंदारचे बाबा ‘नाही’ म्हणू शकले नाहीत…
संध्याकाळी सगळं मंदारच्या कानावर घातलं…
त्याला जरा ऑक्वर्डच वाटलंं…
पहिल्यांदाच जायचं त्यांच्या घरी आणि ते सुद्धा जेवायलाच…
पण बाबांपुढे बोलायची टाप नव्हती…
ओके बाबा..जाऊ रविवारी त्यांच्याकडे..नो प्रॉब्लेम…
दोनच दिवसांनी रविवार आला…
सकाळचं सगळं आवरून अकराच्या दरम्यान बाबा आणि मंदार मुलीच्या घरी पोचले…
मुलीच्या आई-बाबांनी अतिशय आनंदाने स्वागत केलं…
मधुरा..पाहुणे आले गं.. पाणी आणतेस ना…
‘हो बाबा आले’….मधुराचा मधुर आवाज ऐकून मंदारचे कान सुखावले…
मधुरा पाणी घेऊन आली…
गोरी, नाजूक, सुंदर, साधासा पंजाबी ड्रेस, हसरा चेहरा…
मंदारची स्वारी खुश…
मंदारच्या बाबांनीच सांगितलं होतं..जशी नेहमी घरात असतेस तशीच राहा..उगीच साडी वगैरे फॉर्मलिटी नकोच…
मधुरा पाणी देऊन आत गेली…
इकडे गप्पा चालू झाल्या…
सरबत वगैरे नकोच..डायरेक्ट जेऊच..असं सांगितल्यामुळे मधुरा परत स्वयंपाकघरातून बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता…
साधारण पाऊण वाजला आणि मधुराची आई म्हणाली..चला, बसायचं का जेवायला?
हो असं उत्तर आलं आणि मधुराने जेवणाची पानं घ्यायला सुरवात केली…
तिचं ते दिसणं, घरातला वावर आणि काम करण्याची पद्धत सगळंच मंदारला आवडू लागलं होतं…
सगळं वाढून झालं..मंदार, बाबा, मधुराचे बाबा जेवायला बसले…
मधुराची आई म्हणाली..सावकाश होऊद्या..जेवण साधंच आहे आणि मुख्य म्हणजे मधुराने स्वयंपाक केलाय…
वरण भात, पोळी भाजी आणि खीर…
पानात वाढलेली लिंबाची फोड वरण भातावर पिळून मंदारने पहिला घास घेतला…
आणि…
आणि त्याला त्याच्या आईच्या हातच्या वरण भाताची आठवण झाली…
अगदी तसंच वरण..वाफाळता भात आणि तीच चव…
आ हा हा…
मंदार मनोमन सुखावला…
मनसोक्त जेवला…
हात धुवून सोफ्यावर बसला…
आणि म्हणाला…
‘काका, मला मुलगी पसंत आहे, मधुराला पण मी पसंत असलो तर पुढे जायला काहीच हरकत नाही’
मुलगी फिक्स्ड आणि वरण भातही फिक्स्ड…
आयुष्यभरासाठी………….
© Ashwini R. Athavale
Image by mohamed Hassan from Pixabay
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021
वा…वा…मस्तच …!!
Thank you!!
👍
Thank you!!
किती गोड!🤗
Thank you!!
Sadhishi pan mast gosht,varanbhatasarkhi…
Thank you!!
मस्त
👌👌