माझी टाचदुखी भाग 10
आधीच्या भागाची लिंक- माझी टाचदुखी भाग ९
माझी टाचदुखी भाग 10
आठ दहा दिवसांच्या गॅपनंतर कामवाल्या मावशी गंगूबाई पुन्हा कामावर येऊ लागल्या ही त्यातल्या त्यात जरा दिलासा देणारी गोष्ट घडली. पण दरम्यानच्या काळात कामांचा अत्यधिक ताण येऊन आईंची तब्येत मात्र बिघडली. त्यांचे गुडघे दुखू लागले. मान पाठ आणि कम्बर सारेच लागून येऊ लागले. दुखण्याने त्यांना तापही आला. त्यांना दवाखान्यात न्यावे लागले.
एकातून दुसरे दुसर्यातून तिसरे दुखणे ! जणूकाही दुखण्याच्या चिंध्या एकात एक गुंतून होत्या आणि एकेक करत बाजूला काढाव्या तर टोकाला टोक जुळून हळूहळू साऱ्याच बाहेर पडत होत्या.
एव्हाना बेडवर बसल्या बसल्या करता येण्याजोगी कामे करायला मी सुरुवात केली होती. मुलांची शक्य ती शाळेची तयारी करणे, कपड्यांच्या घड्या करणे, भाज्या निवडणे, धान्य निवडणे ही कामे करता येणे मला शक्य होते पण फार वेळपर्यंत उभे राहणे शक्य नव्हते म्हणून निलेशला सांगून एक गॅस शेगडी आणि सिलेंडर किचनच्या एका कोपऱ्यात खाली ठेवून घेतले. खाली बसून पोळ्या करायला सुरुवात केली. भाज्याना फोडणी देण्याचे काम निलेशने सांभाळले.
ह्याच काळात घरात महालक्ष्मीचा सण होऊन गेला. सणाची सगळी पूर्वतयारी आईंनी एकटीने केली होती त्यामुळेही त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. दरवर्षी आनंदाने उत्साहाने सण साजरा करणारी मी त्या वर्षी जरा त्रासलेच होते. दरवर्षी गौरीविसर्जनाच्या दिवशी गल्लीतील सर्व शेजारच्याना आणि ओळखीतील सर्व मित्रपरिवाराना महाप्रसादास बोलावण्याची रीत माझ्या घरी आहे. ‘यंदा आपण कुणालाही न बोलावता घरच्या घरीच सण साजरा करू’ असे माझे म्हणणे आईंनी मनावर घेतले नाही. काहिही झाले तरी सणवार उत्साहात साजरे झालेच पाहिजे ह्या त्यांच्या अट्टहासाचा मी त्यावेळी फार मनस्ताप करून घेतला.
दरवर्षी गौरीगणपतीच्या सणाला माझे मोठे दिर, जाउबाई आणि त्यांची मुलगी आठ दिवसांसाठी आमच्याकडे येतात. त्यावर्षीही असेच आम्ही सगळे एकत्र येऊन सण साजरा करत होतो पण त्यात माझा सहभाग मात्र नेहमीसारखा नव्हता. ऑपरेशन होऊन वीसेक दिवस झाले असतील. औषध गोळ्यांचा मारा सुरूच होता. ड्रेसिंग करताना दिवसेंदिवस जखम जास्तीत जास्त चिघळलेली दिसू लागली. दुखणारी टाच सांभाळून कामे सुरू केली असली तरी चित्त काही त्यात लागत नव्हते. सगळे चित्त नुसते टाचेत होते.
गॅसजवळ पोळ्या करण्याकरिता बसलं की डावा पाय जवळ घेऊन आणि उजवा पाय सरळ ठेवून बसावे लागे. पायावरील पट्टीचा भाग सोडून समोरची बोटे आणि अंगठा तेवढा दिसत. दहा मिनिटे उभं राहिलं तरी बोटे टम्म सुजून येत. खाली बसून लाटण्याने मान पाठ एक होई.
दरवर्षीप्रमाणे सजवलेल्या मखरात उभ्या असलेल्या काठपदराच्या साडीत शोभून दिसणाऱ्या गौराईकडे पाहून डोळ्यात पाणी आणून “माझ्या घरच्या लक्ष्मीला उभं राहू दे” म्हणत आर्जवणाऱ्या आईंचा चेहरा मला आठवतो. भलेही ‘सासूसून’ ह्या नात्यातले टिपिकल ताण आम्हा दोघींमध्ये नेहमीच होते, आहेत… पण आम्हा दोघींमधला विसंवाद विकोपाला कधीही गेला नाही हे त्या क्षणी मला जाणवले. तो विकोपाला न जाण्याचं कारण मला त्या प्रसंगात दिसून आलं.
प्रत्येक नात्याचं असं असतं. बरेचदा ते तुम्हाला एकाच बाजूने दिसत असतं. त्याच नात्याची दुसरी बाजू एखाद्या अलवार क्षणी अचानक तुमच्यापुढे येते आणि तुम्हाला त्या नात्याचा खरा अर्थ सांगते.
त्या दिवशी गौराईच्या समोर हात जोडून माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आईंची छबी अजूनही कधी कधी माझ्या नजरेसमोर येते. आम्हा दोघींच्या नात्यातील एक नाजूक पण यापूर्वी कधीही न दिसलेली वीण मला त्या दिवशी दिसली. भले त्या प्रार्थनेमागे स्वतःच्या मुलाच्या संसाराची काळजी असेल, नातवांच्या भविष्याची काळजी असेल पण किंचित धूसर का होईना मला माझ्यासाठी असणारी काळजीही जाणवलीच. आणि त्यांना वाटणाऱ्या काळजीने मला ह्यातून बाहेर येण्यासाठी बळ दिलं असंही म्हणता येईलच.
मग गौरीचा सण आम्ही त्याहिवर्षी धुमधडाक्यात साजरा केला. नेहमीप्रमाणे गौरी विसर्जनाच्या दिवशी आसपासच्या, ओळखीतल्या सर्वांना महाप्रसादाकरिता बोलावले. त्याच दिवशी टाचेच्या रेग्युलर चेकपसाठी डॉक्टरांनी बोलावलेले असल्याने निलेश आणि मी वाशिमला जाऊन आलो. जवळपास दहा दिवसांच्या गॅपनंतर डॉक्टर जखम पहात होते. ओल्या जखमेवर चढलेला पांढरा थर खरवडून काढावा लागेल असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय नवीन पेशी तयार होत नाहीत आणि जखम ओलीच रहाते हेही समजावून सांगितले. कोणतीही भूल न देता जखम खरवडली जात असतानाच्या वेदना अजूनही मनात घर करून आहेत.
आम्ही दुपारपर्यंत घरी आलो तेव्हा महाप्रसादाचा स्वयंपाक सुरू होता. नुकत्याच कोरलेल्या दुखऱ्या टाचेच्या पायावर उभं राहून 100 लोकांच्या स्वयंपाकाच्या तयारीत मदत करायला मी सुरुवात केली. तो माझा त्रागा होता, ती माझी चिडचिड होती, की इतरांप्रमाणे मलाही उभं राहता येतं हे दाखवण्याची केविलवाणी धडपड होती कोण जाणे?
क्रमश:
पुढील भागाची लिंक- माझी टाचदुखी भाग 11
Image by jacqueline macou from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
Pingback: माझी टाचदुखी भाग 11 – LekhakOnline – Excellent Marathi Articles