माझी टाचदुखी भाग 11
आधीच्या भागाची लिंक- माझी टाचदुखी भाग 10
माझी टाचदुखी भाग 11
ऑपरेशनमुळे जगण्यात आलेले सगळे बदल स्वीकारून, त्या बदलांसोबत जुळवून घेत दररोजचे रहाटगाडे नेहमीप्रमाणे सुरू झाले. महिना उलटूनही एक दिवस आड ड्रेसिंगचे सत्र सुरूच होते. जखम बरी होण्याची कोणतीच चिन्हे दिसेनात. सुट्टी घेऊन घरी तरी किती दिवस राहणार ? कसाबसा महिना पार पाडला आणि शाळेत जॉईन व्हायचे ठरवले.
जॉईन झाले तो दिवस होता 21 सप्टेंबर 2018. अजिबात न टेकवता येणारी टाच घेऊन मी शाळेत लंगडतच गेले. शाळेतील सगळी चिलीपिली माझ्या भोवती गोळा झाली. खिचडी शिजवणाऱ्या शांताकाकू, मदतनीस मायाबाई, अंगणवाडी सेविका इंगोले मॅडम सगळ्याजणी माझी विचारपूस करू लागल्या.
‘मॅडम शाळेत आल्या’ ही बातमी हळूहळू गावात सर्वत्र पसरली. एकेकजण भेटायला येऊ लागला. सर्वांच्या येण्यात एक जिव्हाळा होता हे खरे असले तरी त्यांचे बोलणे माझ्यासाठी त्रासदायक ठरले. टाचेकडे पाहून उसासे सोडून जवळपास प्रत्येकाने त्याच्या काकामामादादाच्या टाचदुखीची कहाणी सांगितली. कित्येकांच्या कहाणीत तर टाच कधीही दुरुस्त न झाल्याचे उल्लेख आले. आणि सर्वात भयानक उल्लेख पाय कापण्याचा होता.
त्या उल्लेखाने मला हादरवून सोडले. माझ्या दोन्ही मुलांचे चेहरे माझ्या नजरेसमोर तरळून गेले. यदाकदाचित जर माझाही पाय तोडावा लागला तर !! … भयंकर कल्पना …भयंकर त्रास !! आज निदान ह्या लंगड्या पायाने मी हालचाल करू शकते आहे, उद्या पायच नसेल तर काय करू? मला पाय नसलेली, दोन्ही काखेत कुबड्या धरलेली माझीच चित्रे डोळ्यासमोर दिसू लागली.
आधीच मलूल असलेल्या आणि विचारांनी थकलेल्या मनाला आणखीन नवा घोर लागला. रात्रंदिवस तेच ते ‘पाय तोडावा लागला’ हे शब्द कानात घुमू लागले. वजन कमी करण्यासाठी हरेक प्रयत्न करून थकलेली मी त्या भयंकर विचारांच्या गर्तेत अडकून बसल्या जागी वजनाने कितीतरी कमी झाले. अशक्तपणा शरीरात जाणवू लागला. आपण काम करू शकतो ह्या जाणिवेने आलेला उत्साह मागे पडू लागला. मला काहीही करावंसं वाटेना.
मनाचे हे खालीवर होणे तब्येतीला झेपेना. औषधींचा मारा तर अजूनही सुरूच होता. आतापर्यंत शरीराने ताकदीने सहन केलेली औषधे आता शरीरावर वाईट परिणाम करू लागली. सकाळी झोपेतून उठावे तो चेहरा कपाळापासून ते हनुवटीपर्यंत टापुसलेला दिसू लागला. आरसाच बघू नये असे विद्रुप रूप दिसू लागले.
दिवसेंदिवस तब्येत खालावत होती. सतत हसत राहणे, बोलणे, गमती कर णे हा माझा मूळचा स्वभाव त्या काळात फारच चिडका झाला होता. हे नशिबात आलेले अंशतः परावलंबित्व आता कायमस्वरूपी आपली साथ करते की काय ही धास्ती वाटू लागली.
या कठीण काळात माझ्या मनाची होत असलेली घालमेल निलेशना न सांगता कळली. त्यावेळी त्यांनी मला समोर बसवून समजावून सांगितले की आपण भलेही खूप औषधोपचार करू पण जोपर्यंत तुझं मन आशावादीपणाने त्याला साथ देत नाही तोपर्यंत शरीर उपचारांना साथ देऊ शकत नाही. लोकांची तोंडं आपण बांधून ठेवू शकत नाही, पण स्वतःला आवर मात्र घालू शकतो. नेहमी स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न कर. “तू तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी आणि ह्या पोरांसाठी स्वतःला सावर. प्राणायाम कर. चित्त स्थिर कर… आणि यातून बाहेर पड. मला विश्वास आहे की तू पुन्हा पूर्वीसारखी चालू लागशील. सगळंकाही अगदी जसंच्या तसं नीट होईल. फक्त धीर सोडू नकोस.”
खरंतर खूप बोलका असा निलेशचा स्वभाव नाही. त्याची सगळी काळजी, प्रेम त्यांच्या वागण्यातून आपल्याला ओळखावी लागते. अगदी राग सुद्धा बोलून नाही दाखवत कधी. ओळखावाच लागतो. पण त्यादिवशी अगदी मनापासून ते माझ्याशी बोलले, मला धीर दिला. मी मनानं खचते आहे हे जाणवलं असेल त्यांना. कधी कधी बोलावं समोरच्याने असं आपल्याला मनातून वाटत असतं. सदैव समोरच्याला काय वाटतं हे ओळखत बसण्याचे श्रम घेण्याचाही कंटाळा येतोच ना ! कदाचित माझी गरज निलेशना समजून आली असावी. त्यांचं असं शब्दातून धीर देणं फार मोलाचं ठरलं माझ्यासाठी.
मग कितीतरी दिवस त्याच त्या मार्गावरून, त्याच त्या चाकोरीतून जात राहिले. दरम्यान अख्ख्या टाचेवरची जाड कातडी अलगद वेगळी होऊन त्याखाली नवीन कातडी येऊ लागली. सापाने कात टाकावी तशी टाचेनं जुनी कातडी सोडून दिली. आतली नवीन त्वचा अगदी बाळाच्या पायांसारखी नाजुक आणि मऊ होती. जखमेचा व्यास हळूहळू कमी होताना दिसू लागला.. पण कमी होण्याचा वेग मात्र अत्यंत मंद होता.
असे जवळपास तीन महिने गेले. दिवाळी जवळ आली. दिवाळीनंतर जगन्नाथ पुरीला फिरायला जाण्यासाठीचे आमचे रिझर्वेशन चार महिन्यांआधीच झालेले होते. दोन्ही नणंदा, त्यांचे कुटुंब आणि आम्ही असे सगळे पांढरा जण ह्या ट्रिपला जाणार होतो. पण ट्रिपला जायचे तर असा जखमेचा पाय घेऊन कसे जायचे? माझं रिझर्व्हेशन कॅन्सल करून मला माहेरी जाऊ द्या आणि तुम्ही सगळे फिरायला जा असे निलेशना सांगितले. पण मी त्यांच्यासोबत ट्रीपला जाऊ शकेल हा विश्वास त्यांना होता. त्यांनी रिझर्व्हेशन कॅन्सल केलं नाही.
क्रमश:
पुढील भागाची लिंक- माझी टाचदुखी भाग 12 (शेवटचा भाग)
Image by jacqueline macou from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
Pingback: माझी टाचदुखी भाग 12 (शेवटचा भाग) – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: माझी टाचदुखी भाग 12 (शेवटचा भाग) – LekhakOnline – Excellent Marathi Articles