माझी टाचदुखी भाग 12 (शेवटचा भाग)

आधीच्या भागाची लिंक- माझी टाचदुखी भाग 11
माझी टाचदुखी भाग 12 (शेवटचा भाग)
ट्रीपला जाण्यापूर्वी एकदा राठोड डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा असे मला वाटत होते.   त्यानुसार डॉक्टरांकडे गेले असता ड्रेसिंगच्या वेळी लक्षात आले की पुन्हा जखमेवर पांढरा थर चढला आहे. तो थर पुन्हा एकदा डॉक्टरांनी खरवडून काढला.
ट्रिपला जाऊ की नको असं डॉक्टरांना विचारलं तेव्हा त्यांनी ‘काहीच हरकत नाही’ असे सांगितले. दिवाळी झाली आणि आम्ही ट्रिपची तयारी केली. तेव्हा आठवणीने जखमेच्या ड्रेसिंगचं सर्व साहित्य सोबत घेतलं. मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जखमेचं ड्रेसिंग करत असू. प्रत्येक ड्रेसिंगच्या वेळी जखमेचा घेर कमी होतोय की नाही हे बघायला मी उत्सुक असे. कायम जखमेवर बांधलेल्या पट्टीखाली असणारी त्वचा कोवळी झाल्यासारखी वाटत होती. पट्टीच्या आतली आणि जखमेभोवतिची त्वचा सारखी खाजवत राही. ती खाज सुद्धा फार जेरीस आणत असे.
जगन्नाथ पुरीची ट्रिप सर्वार्थाने मला त्याच त्या वातावरणातून बाहेर काढायला उपयोगी ठरली. मनसोक्त भटकंती, देवदर्शन, एकत्र कुटुंबासह घालवलेला वेळ ह्यामुळे मनावर एक सकारात्मक परिणाम झाला. त्याहीवेळी टाच टेकवून चालणे मला अशक्य होते. मी गमतीत मलाच ‘दीड पायांची बाई’ म्हणायचे.
पुरी येथील समुद्राच्या काठावर गेलेलो असताना मात्र मन अगदी भरून आलं. इतरांसारखं मला त्या पाण्यात बिनधास्त उतरता येत नव्हतं. खेळता येत नव्हतं. सासूबाई आणि मी तिथल्या रेतीवर खुर्च्या टाकून नुसतं पाण्याकडे बघत होतो. त्याहीवेळी माझ्या पायाच्या जखमेला रेतीचे बारीक कण चिटकू नयेत म्हणून मी प्लास्टिक बांधून ठेवलेले होते. वयाच्या 36 व्या वर्षी गणपतीपुळे येथे मी पहिल्यांदा समुद्र प्रत्यक्ष अनुभवला होता. पुरीला गेलो त्यावेळी मी दुसऱ्यांदा समुद्र अनुभवत होते आणि इतक्या जवळ असलेल्या समुद्रात मला पायही घालता येत नव्हता. त्यावेळी मी मनातून जगन्नाथाला प्रार्थना करत होते की ‘बाबारे तू असशीलच इथे कुठेतरी तर मला बघ. ह्या समुद्राच्या काठावर बसलेल्या आणि त्यात पायही न घालू शकणारे, त्या पाण्याच्या स्पर्शाला आसुसलेले माझे मन बघ. समोर खिदळत असलेल्या असंख्य लोकांसारखा सामान्य पाय असण्याची एक साधी इच्छा आहे. मला पाण्यात पाय घालून बसायचे आहे. तू आहेसच तर हे एवढे जरूर ऐक.’
ट्रिपहुन घरी आल्यावर पायात हळूहळू सुधारणा होती. त्यावेळी  सहा वर्षांची असलेली निलू आपल्या मैत्रिणीला कौतुकाने सांगताना मी ऐकलं-“देख, मेरी मम्मी का पैर अब अच्छा हो गया है।”
मुलं बोलत नाहीत फार, पण अंतर्मनात मात्र आपली काळजी करत राहतात. आता आपली आई पूर्वीसारखी होईल याचा आनंद मुलांच्या मनात होता तो चेहऱ्यावरही दिसू लागला.
पूर्ण जखम बरी होऊन ड्रेसिंगशिवाय वावरता येण्यासाठी एकूण पाच महिने जावे लागले. जखम बरी होऊनही टाच मात्र टेकवता येत नव्हतीच. टाचेची नवीन त्वचा निबर होईपर्यंत मला अलगत टाच टेकवावी लागत होती. टाच पूर्ण बरी होऊनही माझा पाय तिरपा पडत होता. चालीत फरक पडला होता. सगळं पूर्ववत व्हायला एक वर्ष जावं लागलं. दरम्यान दवाखाने, औषधी यांचा धसकाच घेतलेला असल्याने पुन्हा कोणत्याही तक्रारीसाठी मला दवाखान्यात जाणे जीवावर येऊ लागले.
आणि इतकं सगळं होऊनही टाचदुखी मात्र ‘जैसे थे’ होतीच.
मग शेवटी अजून एक उपाय म्हणून आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवले. सुरुवातीला औषधी घेतल्या पण फार फरक पडला नाही. आयुर्वेदात ‘अग्निकर्म’ नावाची एक उपचार पद्धती आहे. ती करून पाहिली आणि आश्चर्य म्हणजे ‘कोणे एकेकाळी माझी टाच दुखत होती’ हेही मी आता विसरले आहे.
टाचदुखी पूर्णपणे थांबलेली असली तरी मन मात्र त्या दुखऱ्या आठवणीत अडकून पडल्याचं मला सतत जाणवत होतं. शिवाय आपला अनुभव ह्याच दुखण्याने बेजार असलेल्या कितीतरी जणांना मार्गदर्शक ठरेल असं वाटू लागलं. त्यातून हे सगळं लिहून काढावं असं मनात आलं आणि माझ्या टाचदुखीची ही कथा लिहून पूर्ण झाली.
ह्या संपूर्ण दुखण्यात कैक किलोमीटरच्या अंतरावरून माझी सतत सोबत करणाऱ्या डॉ. अनुजा वळसंगे ह्या मैत्रिणीची मला मोलाची मदत झाली. जेव्हा माझ्या आजूबाजूला धीर खचवणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती त्या काळात डॉ अनुजाने मला सतत पॉझिटिव्ह राहण्यास मदत केली. तिच्या उल्लेखशिवाय ही कथा अपूर्ण आहे.
माझ्या माहेरचे ग्रामदैवत असलेल्या बालाजीने आपली लेकबाळ  अधू होण्यापासून वाचवली हा माझा दृढ विश्वास आहे.
शेवटी इतकेच सांगेन की शरीरातले कोणतेच दुखणे अगदी हलक्यात घेऊ नका. याचा अर्थ दरवेळी लगेचच दवाखान्यात पळा असा नसला तरी सजग रहा असा मात्र नक्कीच आहे. उत्तम आरोग्य आणि धडधाकट शरीराने आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो आणि सोबतच सर्वांना आनंदी ठेवू शकतो. इतरांना सुखी ठेवण्याच्या नादात स्वतःकडे केलेले दुर्लक्ष आपल्याला तर भोवतेच पण आपल्यासोबत संपूर्ण कुटुंबाला सोसावे लागते.
आज मागे वळून पहाते तेव्हा मला प्रकर्षाने जाणवते की माझ्या टाचदुखीने मला खूप यातना दिल्या आहेत हे खरंय पण रसरसून जगण्याची किंमत सुद्धा मला ह्या दुखण्यानेच दाखवली. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि समतोल आहार हे माझ्या दैनंदिनीचे अविभाज्य भाग झाले आहेत.
माझी टाचदुखी आता माझ्यासाठी निव्वळ एक दु:स्वप्न म्हणून उरले आहे.
Image by jacqueline macou from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

One thought on “माझी टाचदुखी भाग 12 (शेवटचा भाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!