करंट ……

रविवार दुपारचं जेवण करून जरा लवंडलो होतो. मोठ्ठा आ वासून, डोळ्यातून पाणी येईपर्यंत आळस देऊन झाला होता. दोन तीन आळोखे पिळोखे देऊन झाले होते. झोप येत असल्याची जवळजवळ सगळी लक्षणं शरीरानं दाखवून झाली होती. अन आपल्याला कुणावर अन्याय करणं जमतंच नाही. त्यामुळं  डोळ्याना मी डोळ्यातूनच खुणावले, “होऊन जाऊ द्या.” अन अष्टांग शिथिल केलं.

घोरण्याचा पहिला आलाप घेतलाच असेल की रातकिडे कण्हत असल्याचा भास झाला. डोळ्यांना ताकास तूर न लागू देता…. माझ्या उजव्या किंवा डाव्या हाताने चाचपत मोबाईल उचलला. डोळे झाकूनच स्क्रिनवर अंगठा फिरवला, अन कानाला लावायच्या आत,

“आली का लाईट ?” असा काहीतरी आवाज आला.

समोरचा इतका उच्च रवात बोलत होता, की बीड किंवा उस्मानाबाद वरून थेट, मुंबईपर्यंत हाक यावी, असं काहीतरी वाटत होतं. खरंतर अशा दुपारच्या वामकुक्षीच्या वेळी, सुंदर आवाजाच्या, कर्ज देणाऱ्या कुबेरकन्यांचे फोन असतात. बऱ्याचदा असह्य झालेली झोप, थोडावेळ थोपवूनही मी संवाद साधलाय. अजिबात नको असतानाही,….. किती मिळू शकतं कर्ज, …. व्याजदर काय, अशा रुक्ष चर्चा,……. डोळ्यावरच्या दुपारच्या जेवणामुळं आलेल्या धुंदीसोबत, त्या मधाळ आवाजाचं लोणचं, मी तोंडी नव्हे तर कानी लावत झोपी गेलोय. माझं घोरणं ऐकून, करिअर मध्ये धडपडणाऱ्या त्या कन्येची, एकूणच पुरुषजातीविषयीची घृणा वाढली असणार यात शंका नाही.

पण हा फोन वेगळा होता. मोठा आवाज …… खरखरणारं बॅकग्राउंड, ……. फोन चटकन कानापासून चार इंच दूर गेला, अन बोललो,

“काय झालं ?”

“न्हाई म्हणलं, लाईट पाठावली हुती, पोचली का ?” आता थोडा आवाज मऊ झाला. पण आसपास मोकळ्या शेतातला, घोंगावणारा वाऱ्याचा आवाज येत होता.

आता लाईट हा पाठवायचा आयटम आहे हे पहिल्यांदाच ऐकत होतो. मी देवगड वरून हापूस मागवले होते. ते अजून आले नव्हते. सावंत फोन करणार होते, निघाले की. पण हा कोण, वेगळाच आवाज येतोय. वेगळंच पाठवतोय.

” अहो, कोण बोलताय तुम्ही? अन कुठून बोलताय ?”

“मोटे बोलतोय सायेब, ….. धोंडिबा मोटे”

“कुठून बोलताय?” मी पार वैतागलो होतो.

“खांडे पारगाव ……. तर”

अरे कोण हा मोटे, मला कशाला फोन लावलाय ? मी उठुनच बसलो.

पलीकडून मोठमोठ्यांदा तो काहीतरी सांगतच होता. मनातल्या मनात भ ची बाराखडी मोजत, अन आवाजात सौजन्याचा आव आणत मी पुन्हा फोन कानाला लावला अन म्हटलं,

” हे पहा, तुम्ही चुकीच्या माणसाला फोन लावलाय.” ….खरंतर चुकीच्या वेळीही लावला होता.

“आवो न्हाय सायब, मी बरूबर लावलाय. फकस्त तेवढं सांगा की, पोचली का लाईट.”

मी फोन कट केला. तरीही एकदा एसी कडे पाहून घेतलं, सुरू होता…… लाईट होती.

बस्स झालं, ….. आधीच बायकोशी सकाळी सकाळी, बटाटे वडे करायचं चॅलेंज घेऊन फसलो होतो. घाम निघाला होता अगदी. बटाटे वड्यात नक्की कशाची चव उतरते, हे नीट समजलं होतं. त्यात हा लाईट पाठवतोय म्हणे. आणि तेही अंधेरी वेस्टच्या गॅलॅक्सी अपार्टमेंट मध्ये …… पाठव बाबा पाठव ….. पॅक करून पाठव.

चरफडत उठलो, इडियट बॉक्स समोर जाऊन बसलो. तिथंही स्वदेस लागला होता. तिकडे शाहरुखखानसुद्धा, नासा मधून येऊन, गावात वीज आणण्यासाठी धडपडत होता. पुन्हा वीज.

मी पुन्हा फोन चेक केला. ट्रूकॉलर वर नाव दिसत होतं.

“D. Mote ”

म्हणजे धोंडिबा मोटे, म्हणजे माणूस बरोबर होता. नंबर चुकीचा लागला होता. एखादा आकडा चुकला की संपलं सगळं. त्यात खेड्यातला माणूस. उगाच दया येऊ लागली. पुन्हा समजावून सांगू असा विचार येऊ लागला. केला डायल……

जुन्या तारखात्यासारखा कडकटकड असा आवाज येत, फोन डायल होत होता. जुन्या चित्रपटात, काहीही झालं की अजितने , मोना डार्लिंग , च्या पालुपदावर यावं, तसा फोन उचलताच पलीकडून आवाज आला,

“हां बोला सायब, पोचली का लाईट ?”

मी कपाळावर हात मारून घेतला. इतका पेशन्स मी बायकोसमोरही ठेवु शकत नाही.

“माझं ऐका, ……. तुम्ही नक्की कोणता नंबर डायल केलात?”

” आवो तुमचाच म्हणं …… ”

असं म्हणत त्यानं पूर्ण नंबर धाडधाड मराठीत बोलून दाखवला. माझं ट्रूकॉलर वरचं नावही सांगितलं. आता मला खात्री झाली, कुणीतरी फिरकी घेतोय. मी आता फायनल फोन कट केला.

तोवर चार वाजले होते. माझा कॉलेजचा मित्र येणार होता.

संज्या …… तो इलेक्ट्रिकल अन मी मेकॅनिकल इंजिनिअर.

दोघे रुमपार्टनर, …… होस्टेलमध्येही आणि बेकारीतही. म्हणजे कॉलेजमधल्या एम एटी पासून ते आजच्या सेदानकार पर्यंतचे सोबती.

गॅलरीत जाऊन खाली डोकावून आलो. गेस्ट कार पार्किंग रिकामं आहे का, ते चेक केलं. बरोब्बर सव्वाचारला बेल वाजली. मुंबईत पंधरा मिनिटं लेट म्हणजेच वेळेचा पक्का, तसा तो पोचला. मी घाईत टी शर्ट घालत दार उघडलं…… तर हा दारात चक्क आडवा. उभा नव्हे आडवाच.

कण्हत , चरफडत उठत होता.

त्याला उठवून आत आणलं. खरंतर दुपारची वेळ होती, त्यामुळं त्यानं पडण्याचं तसं काहीच कारण नव्हतं. म्हणजे कधीतरी ओकेजनली घेणारा संज्या संध्याकाळी सातच्या आधी घेईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पाण्याचा ग्लास देताना, दोनदा वास घेऊन झाला. पण काहीही पुरावा सापडत नव्हता.

तो अजून थरथरतच होता. मागे जिन्यात आपटून हलकी जखम झाली होती. ही हळद घेऊन आली. खरचटलेल्या ठिकाणी हळद भरून त्याच्या वेदनेने होणारे, चेहऱ्यातले व्हेरिअशन्स आम्ही पहात होतो.थोडा शांत झाल्यावर विषय काढला,

“काय झालं रे, ….. कसा पडलास ?”

मित्राची इज्जत जाऊ नये इतपत हळू आवाजात बोललो तर हा डाफरला,

“अरे ती बेल चेक कर एकदा, ……. स्विच मध्ये करंट येतोय, …… केवढा झटका लागला मला.”

“काहीही काय बोलतोय ?” असं म्हणत मी पटकन उठलो, अन स्वतःचीच बेल , अगदी न पाहता वाजवून दाखवली.

“असा कसा हात लावतोय डायरेक्ट …… आधी टेस्टर आण.”

त्याच्यातला इलेक्ट्रिकल इंजिनिअर जागा झाला होता. त्यानं हट्टाने माझ्याकडून टेस्टर घेऊन चेक केलं. …. नो करंट.

“अरे वाजवून बघ बेल.”

“नको, परत झटका लागला तर सरळ वर पाठवशील मला.”

तोवर हिने फक्कड चहा बनवून आणला होता. मी कपाला हात लावणार, इतक्यात माझा फोन पुन्हा कण्हला. कप ठेवून आधी फोन उचलला.

“पोचली ना लाईट, …… लागला का करंट, …….. ओ, बोला ना सायब, ……….. गप का झाले तुम्ही …….. बोला की.”

यावेळी आवाज वाढला होता.

मी फोन कट केला.

माझा खर्रकन उतरलेला चेहरा पहात, संज्या बोलला,

” काय रे, काय झालं ?  कोण होतं ?”

” धोंडिबा…………..  धोंडिबा मोटे.”

” काय्य !!!! …… कसं शक्य आहे ? …………. म्हणजे कोण आहे हा ?”

संज्याच्या चेहऱ्यावर, आश्चर्य मावत नव्हतं, …… काय्य म्हणत किंचाळताना, चहा हिंदकळला त्याचा.

” तू ओळखतोस त्याला, ……. ” मी थंडपणे, निर्विकारपणे म्हणालो.

” मी कशाला ओळखू, मला काय माहीत, कोण हा धोंडिबा गेनू मोटे ?”

संज्या काहीतरी सावरत होता, अन सावरता सावरता पूर्ण नाव सांगून फसला.

मी थेट त्याच्या डोळ्यात पाहू लागलो. संज्या गार पडला. माझ्याशी खोटं बोलणं त्याला शक्य नव्हतं.

त्यानं चहा संपवून, कप खाली ठेवला. एक मोठा सुस्कारा सोडत बोलू लागला.

“खरं सांगू का , …….. हा महावितरणचा जॉब म्हणजे वैतागवाडी रे…….. नोकरीच सोडिन काही दिवसांनी.”

“काय झालं, …… ते नीट सांग….”

“अरे हा मोटे, खांडे पारगावचा, ……. माझ्याच बीड सबडिव्हिजन मध्ये येतं ते गाव. कुठून नंबर मिळवला, अन फोन करून हैराण केलं नुसतं. ……….. अगदी रात्रीही फोन करायचा. खूप वैताग दिला………….”

माझ्या नजरेतले प्रश्न अजून संपले नव्हते.

“काही नाही रे, याच बिल थकलं म्हणून, कनेक्शन कापलं आमच्या लोकांनी. …….. . त्याचा टोमॅटो ऐन भरात होता. पाणी देणं आवश्यक होतं. मला फोन करून करून कळवळायचा. …… बिल इतकं मोठं होतं की मी काही करू शकत नव्हतो. मग हा आकडा टाकायला लागला. आमच्या लोकांनी दोनतीन वेळा फोटो काढले. …… माझ्याकडे कम्प्लेन्ट आली. मी दिला पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांना सांगून फोनमधलं सिम काढून घेतलं. पोलिसांनी त्याला फोडलं. त्याचं सिमही काही दिवसांनी तोडून टाकलं.”

“सिम नाही तोडलं, पोलिसांनी ….. त्याच्या नंबर वरूनच फोन आला होता …… ” असं म्हणत मी तो नंबर सांगितला. संज्यालाही तो पाठ होता बहुतेक.

“कसं शक्य आहे, अरे मीच तोडलंय ते सिम  पोलिसांसमोर, …… अजून दहा दिवसही झाले नाहीत……. हे कसं शक्य आहे. हेच प्रकरण मिटवायला मुंबईत, प्रकाशगडवर आलो होतो……..”

त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत, त्याचा फोन वाजला. वहिनींचा होता बहुतेक.

” हं , …… बोल ग……..”

” ……………..”

“काय बोलतेय, वेड लागलंय का तुला ? ………. ”

संज्या ताडकन उभाच राहिला , पुन्हा ओरडू लागला.

“अग धोंडीबाच्या आत्महत्येचं प्रकरण मिटवायला तर आलोय ना इकडे, ………. काय्य ?……… माझा नंबर लागत नाही म्हणून, तू त्याला इथला नंबर दिलास. नक्की धोंडीबाच होता का ? …………. अगं, चार दिवसांपूर्वी तर अग्नी दिलाय, अजून दहावा व्हायचाय त्याचा.””……..”

संज्या सोफ्यात जवळजवळ धाडकन कोसळलाच. पुटपुटत राहिला, “ड्रायव्हरही घरी आला होता, त्यानंही ओळखलं रे त्याला………”

©बीआरपवा

Image by analogicus from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

10 thoughts on “करंट ……

  • October 7, 2020 at 9:39 am
    Permalink

    जबरदस्त

    Reply
  • October 8, 2020 at 9:24 am
    Permalink

    धन्यवाद ,🙏

    Reply
    • December 13, 2020 at 5:29 pm
      Permalink

      अय्यो… शेवट भीतिदायक..

      Reply
  • October 8, 2020 at 10:47 am
    Permalink

    बापरे….. जबराट…. करंट बसला…
    🙄🙄🙄 वाचूनच 👌👌👌👌

    Reply
  • October 8, 2020 at 2:33 pm
    Permalink

    बाप रे… पाणीच आलं डोळ्यात 😢

    Reply
  • November 5, 2020 at 4:28 pm
    Permalink

    bharich katha

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!