कवडसा…भाग १

” सासूबाई , मी पण जाऊ खेळायला ? ” शांतू नि विचारलं .

” जा बाई , मनसोक्त खेळून ये . आपल्याच परस दारी बरं ! बाहेर नको जाऊस . आणि हो , हे मुरमुरे पण घेऊन जा .सगळ्यांना वाट हं .”   पार्वती बाई म्हणाल्या . छोटीशी शांतू लुगडं सांभाळत खेळायला गेली . तिच्या त्या अल्लड रुपाकडे पाहून पार्वतीबाईला भरून आलं . अवघी अकरा वर्षांची पोर  . गोंडस , गोबऱ्या गाळाची . काळेशार  केस , आणि कपाळावर सुरेख चंद्रकोर .  आज महिना झाला , राघव चं  लग्न होऊन .   कीतीही इच्छा असली तरीही आपण हे लग्न थांबवू शकलो नाही . राघव ही तयार न्हवता . का ही अगतिकता ? का एकाच्या आयुष्यातील इतके महत्वाचे निर्णय कुणा दुसऱ्या माणसाने घ्यायचे ?  विशेषतः  स्त्रीयांच्या आयुष्याचे ? स्वप्न , इच्छा हळुवार भावना यांचा कोळसा करायचा जाळून .  यांत्रिक पणे शेंगा फोडताना पार्वतिबाईच्या  मनात विचारांचं काहूर उठलं होतं .

पार्वती बाई …………….

बाई कसली , अवघी बत्तीशीतली पार्वती . .. . तेराव्या वर्षी लग्न करून ती ठोसरांकडे आली आली होती . आणि पंधराव्या वर्षीच तिला राघव झालेला होता .

मुलींच्या शिक्षणासाठी सुधारक मंडळी जीवाचं रान करत होते , तो काळ . हरिपाठ , ज्ञानेश्वरी , हरिविजय हे सगळं ऐकायला आईसोबत मंदिरात जायची चिमुकली पार्वती तेव्हा आपणही हे वाचावं आणि इतर बायकांना वाचून दाखवावं असं तीव्रपणे वाटायचं तिला . त्यामुळे तिला शिक्षणाची खूप ओढ वाटायची . रमाबाई आणि सवित्रीबाईंच्या शाळेत जाऊन अक्षरं गिरवायला शिकली होती ती . ती आई चं बोट धरून लपत लपत शाळेत  जायची .  रस्त्यात टॉक टॉक आवाज करत जाणारा घोडा आणि त्यावर स्वार इंग्रजी शिपाई दिसला की तिला धडकी भरायची ,  पण तरीही शिकायच्या ओढीने जायचीच पार्वती . तिच्या आईला कोण आनंद झाला होता , पहिल्यांदा पोरीला लिहितांना पाहून . तिच्या हातात असतं तर इंगजी शाळेत घातलं असतं पोरीला .

पण कर्मठ बापूसाहेब देवकरांसमोर ( पार्वतीचे वडील ) कोणाचेच चालत नसे . घरात आणि पूर्ण गावात बापूसाहेबांचा फार दरारा होता .

एक दिवस पार्वती ओव्या मधील अक्षरे जुळवून वाचत असताना बापूसाहेब कुठल्याशा उर्मिने आत आले , आईला बाहेर बोलावलं . हळू हळू ते काहीतरी बोलत होते .पार्वतीला नीट कळाले नाही . आईच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या . आई काही बोलणार तेव्हा बापूसाहेबांनी बास !!! असा हात वर केला होता ,उग्र चेहेऱ्याने .

आपल्या आईला कशाचे तरी खूप वाईट वाटलय एवढं तिला नक्की कळालं . आत येऊन तिने आईला विचारलं तर आई नि मायेनी तिला पोटाशी धरलं आणि म्हणाली ,  ” पारू , तुझं लग्न करायचं म्हणतायत  ग ”

” म्हणजे यमी गेली तशी मला पण जावं लागेल ?”

आणि आईचा बांध फुटला  होता….

पार्वती ला जग कळायच्या आतच तिचं  लग्न गजानन ठोसर यांच्याशी लावल्या गेले होते  .  हे काही नवीन न्हवतं समाजाला . पाळण्यात मुलगी असतांनाच तिचं लग्न कुणातरी पोराशी ठरवणारा समाज  तो . मग मुलींची मानसिकता सुध्दा तशीच होती . तेरा वर्षा पेक्षा मोठी मुलगी अविवाहित दिसली की महापातक  वाटत असे . पार्वतीच्या मैत्रिणी नर्मदा , हिराबाई , यमुना सगळ्यांचे लग्न झाले होते  . मुलींच्या मताला कुठे कीम्मत होती  ,…..नव्हे , मुलींना मत असु शकतं हेच कदाचित मान्य न्हवतं . पण सावित्रीबाई शाळेत येणाऱ्या बायकांना खूप छान समजावून सांगत . मुळातच पुरोगामी विचारांची पार्वतीची आई त्यामुळे आणखीनच प्रगत  मतांची बनली होती .

पार्वती च्या आईने तिला सांगितले होते , ” पारू माय , आपल्या बायांचं जगणं बाईच सुधारू शकते  बघ . बाईचं मन बाईनच ओळखावं . बाप्याला नाही कळायचं ते . तुझी सून येईल न , बस तिचं मन ओळख . लेक असेल तर तिला चांगलं जगू दे . आपल्या वाट्याला आलं ते अजून पोरींच्या वाट्याला नको माय . ”

पार्वती शेंगा हातात तशाच ठेवून हे सगळं आठवत होती .

” ठेवला का ग चहा चुलीवर ? ” आतून आत्यांचा आवाज आला . तिने उत्तर दिले नाही

” पार्वती ? ए s पार्वती s ” पुन्हा तोच चिडका आवाज .

” हो ठेवलाय . देईल गोदा बाई

आणून . ” ” जा ग गोदा , चहा नेऊन दे आत्याबाईंना .”

ह्या गोदा बाई देखील लहानपणीच लग्न होऊन सासरी गेल्या होत्या . नवऱ्याने दुसरी बायको करून आणली आणि जेमतेम सहा महिन्यांच्या संसारातून गोदा बाई बाहेर फेकले गेली होती .

‘ नवऱ्याने टाकलेली ‘ म्हणजे गिधाडांच भक्ष्य . ठोसरांनी तेवढं मात्र चांगलं केलं . गोदाबाईला आपल्याकडे आश्रय दिला . तेव्हाची कोवळी पोर ती , जिथे प्रेम मिळालं तिथे इमान ठेऊन राहिली . तिचा आवाज गोड होता . भजनं छान म्हणायची  गोदा . पार्वती पण खूप प्रेमाने वागवायची गोदाला .

” हे सुटलं सासूबाई ” एवढूसा चेहेरा करून  शांतू आली होती . हातात लुगड्याचा बोचका धरून .

” ये बाळ . मी देते नीट करून . राघव दिसला का तुला सकाळ पासून ? ” तिचा ओचा नीट करत पार्वती ने विचारले .

” सकाळी मामंजिने  कुठे पाठवले होते ते अजून नाही आले . ”

” शांतू , लग्न झाल्यापासून राघव तुझ्याशी बोलला का ग काही ? ”

” नाही ,  ‘परीक्षा आहे न , खूप अभ्यास असतो मला ‘  इतकंच म्हणाले .” ती राघव ची नक्कल करत म्हणाली .

पार्वतीला खूप हसू आलं .

” नकला मस्त करते हं तू .”

” मला  गाईचा , वासराचा , बकरीचा , बैलगाडीचा आवाज काढता येतो . दाखवू ? ”

पार्वती हसली . ” हो S दाखव .”

शांतू ने इतके छान आवाज काढले , पार्वतीला खूप आवडलं . गोदाबाई पण

ओट्यावर येऊन बसली . ” किती साजरी पोर आहे अक्का . तुमची लेकीची हौस पण पूर्ण होते आता .”  दोघीही हसल्या .   दत्तू काका कंदील घेऊन आले होते .

” मोठ्याक्का , काचा साफ करून आणल्यात . तेल घालून एक ओसरीवर ठेवतो , एक लादनीत . परसदारी अडणी घातलीये . मला बुवाचं कीर्तन ऐकायला जायचंय ….आक्का , धाकलं मालक आलं का जी ? ”

” इकडच्यानी राघव ला कुठे पाठवलय का ? ” पार्वती ने विचारलं .

” हा जी . ते बॅरिस्टर साहेबांकडे काही काम होतं म्हणत होते . ”

पार्वतीला राघवची खूप चिंता वाटायची .  राघवला सरकारी नोकरी करायची न्हवती .  त्याला  स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घ्यायचा होता . पण ठोसर आग्रही होते . आपली दीडशे एकर जमीन जपायची असेल तर इंग्रजांशी सलोख्याने वागावं , दप्तरी नोकरी करावी ह्या मताचे  होते गजानन ठोसर . अति हट्टाने राघवचे लग्न त्यांनी देशमानेंच्या शांतूशी लावून दिले कारण देशमाने सरकारी वखारीत अधिकारी होते .

” दत्तू ! ठेव घंगाळं मोरीवर . गरम पाणी आणून ठेव .” ठोसर आले होते .

” राघव नाही आला अजून ?” त्यांनी जरबी आवाजात विचारले .

” इकडणच पाठवले होते ना ? बॅरिस्टर साहेबांकडे ? ”

” ते काम तर दुपारीच झाले !! त्यानंतर कुठे गेला तो ? गेला का कुठल्या सभेला ? का पत्रकं वाटत फिरतोय गुपचूप ? ”

” दिवेलागणी झाली हो , काळजी वाटतेय .”

” सूनबाईंना बोललाय का काही ? ”

” तो नाही बोलत तिच्याशी . आणि फारच अजाण आहे हो पोर . मी काय म्हणते , तिला जरा दोन वर्षे …”

” सूनबाईंच्या मातोश्री काही म्हणत नाही , तुम्हासंच का वाटते असे ? आता हेच त्यांचे घर !! ”

इतक्या  लहान पोरीला असं आईपासून तोडून पार्वतीला भयंकर अपराधी वाटे .

क्रमश:

पुढील भागाची लिंक- कवडसा…भाग २

Image by Luidmila Kot from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

10 thoughts on “कवडसा…भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!