कवडसा…भाग २

आधीच्या भागाची लिंक- कवडसा…भाग १

रात्री निजानीज झाल्यावर मागील दारावर हलकी टकटक झाली . पार्वती जागीच होती . हळूच उठून तिने दरवाजा उघडला . शांतू  आत्याबाई जवळ झोपली होती . मधेच उठून आईच्या आठवणीने रडू यायचं तिला .

” कुठे होतास राघव ? आण्णा तुझ्याबद्दल विचारत होते . ”

” त्यांनी कधीतरी विचारले का मला काय पाहिजे ? आता कुठे आहे  म्हणून काय विचाराएत !!!  ” राघवने संतापाने म्हटले .

हे नेहेमीचेच झाले होते . राघव आणि अण्णा यांचे विचार कुठेच जुळणारे न्हवते . राघवचे काका सदाशिवराव  हे फलटण ची शेती सांभाळत . त्यांच्याशी मात्र राघव मनातील सगळं बोलायचा . काका आधी इंग्रजांच्या सैन्यात होते . पण पारतंत्र्याची जाणीव झाली आणि काकांनी नोकरी सोडली . ते राघव ला देशप्रमाचे धडे देत .

” चल जेवायला . मी वाढते .”

” तू जाऊन झोप , मला भूक नाही .”

” राघव , तू शांतू शी बोलत जा रे जरा .”

” तुम्ही आणलीय तिला ,आता तुम्हीच निस्तरा . माझा काही संबंध नाही !!”

” अरे , घरातील एक व्यक्ती म्हणून तरी बोल !”

” ………..”

त्याने शांतपणे वळकटी टाकली आणि आडवा पडला . पार्वतीला खूप चिंता वाटू लागली . ठोंबरेनि फक्त जगरहाटी पाळायची ह्या जिद्दीपायी दोन जीवांचे आयुष्य पणालालावले होते .

पहाटेच दत्तूकाकांनी चूल पेटवली होती . गोदाबाईंनी  चवरी भरून दूध आणले होते गोपाळ काकाकडून .

पार्वती पडवीत गेली …..

..राघव तिथे नव्हता . एक कागद होता ,ज्यावर लिहिले होते , ‘ मी चाललोय . कधी पुन्हा पुण्यास आलो तर नक्की भेटेन .’

राघव ची चिठ्ठी वाचून पार्वती मटकन खाली बसली . त्याचं हे वागणं तिच्यासाठी अनपेक्षित नव्हतं . कधी न कधी हा स्फोट होईल हे वाटतच होते , पण इतक्या लवकर ? तिने तो कागद पदरात लपवला . सगळीकडचे कंदील मालवले . ती आत्याबाईंच्या खोलीपाशी आली . दारात उभं राहून शांत झोपलेल्या शांतूकडे बघत उभी राहिली …तशीच …बाहेर अंधार होता आणि मनात काळोख . काय सांगू ह्या बाळाला …बाळच ते.  निष्पाप …ज्याला स्वतःच्या अस्तित्वाची अजून जाणीवही नाही ..अश्राप ….चार सडकी टाळकी ठरवतात की हा जीव आता यातनामय जगात प्रवेश करेल ….एवढं सुख ? ….बघवत नाहीये …करून टाका याच्या आयुष्याचा लिलाव !!!

डोळे दाटले , तिला समोरचं दिसेनासं झालं …तशी ती तिथून हलली . सडा सारवण करून तुळशी पुढे रांगोळी काढली . पडवीत राजा राममोहन रॉय यांची तसबीर होती . तिच्या लहानपणी तिच्या आईने दिलेली . त्यांच्या विचाराने प्रेरित झालेली तिची आई आठवली तीला . सूर्याने डोळे उघडले होते आणि वरून प्रकाशाचा एक कवडसा पडला होता , बरोबर तसबिरी वरच .

शांतू उठली . पुन्हा लुगडे सुटले होते . पार्वतीने शांतपणे तिचे लुगडे नीट करून दिले . तिला हसायला आलं . नऊवारी लहान मुलींना सावरत नाही म्हणून लांबी कमी करुन मिळते .मुलगी मोठी होई पर्यंत थांबायची तयारी  नाही …..त्यापेक्षा कापड  कापणे सोपे ना ! ती विशादाने हसली .

” सासूबाई , मी मदत करिन तुम्हाला स्वयंपाक घरात . आलेच न्हाणीघरात जाऊन लगेच . ”

” तू मदत करणार ? अगो , काय  काय येते तुला ?”

” न्याहारीला धिरडे आणि चिंचेची चटणी . जेवणाला ..अ …”

” एवढे येते तुला ? अरे वा ? पण तू ना , मला खोबरे खोवून दे हो ! ”

शांतू  स्नानाला गेली . आणि पुनः पार्वतीचे विचारचक्र सुरू झाले

काय उत्तर द्यायचे ह्या पोरीला आणि देशमान्यांना ?

1857 च्या उठवानंतर साऱ्या देशाला जाग आली होती . खूप मोठ्या संख्येने  तरुण  स्वातंत्र्याच्या चळवळीत उड्या घेत होते . राघव देखील आज ना उद्या जाणारच हे तिला माहीत होते . तिच्या आवाक्यात असते तर तीही गेली असती . पण आता ह्या जीवाची जबाबदारी ….

आज यात्रेला गेलेली सगळी मंडळी वापस येतील . सासूबाई , शंकर काका , बायजा काकी , चिंतू ,  जावई बापू गंगाधरराव आणि आपली देविका . लग्नानंतर काही दिवसांनी मुद्दाम सगळे गेले होते देवदर्शन करायला .राघव नाहीच म्हणून अडून बसला ,नाहीतर आपण ,शांतू आणि ठोसर सगळे जाणार होतो .

काय सांगायचं सगळ्यांना ?

” सासू बाई s …सासूबाई  s …” शांतू दबक्या आवाजात हाक मारत होती . तिने लगबगीने जाऊन तिला नऊवारी नेसून दिली .

” शांतू , तू मला आईच म्हण . आणि हे बघ , साधी पाचवारी नसतेस का ? त्या चित्रातल्या बाईसारखी ?”

” अय्यो ! काय म्हणतील सगळे ?”

” मी आहे ना . मी सांगेन त्यांना . ही बघ मी कापुनच टाकते ही इथून थोडी .तू गोल साडीच नेस . खरं तर परकर पोलकंच नसावे ..पण ते नंतर बघू .आत्ता तू गोल साडी नेस . आणिक एक , आता दुपारी सगळी मंडळी येतील वापस . बायजा काकू आणि आमच्या सासूबाई म्हणजे तुझी आजे सासू ह्या थोड्या फटकळ आहेत . मनाला लावून घेऊ नकोस हो .”

” शांतुने समजल्यासारखी मान हलवली .”

” दत्तू s s ” आतून आत्याबाईंनी आवाज दिला .

दत्तू धावला . ” मला ऊन खायला बाहेर आणून ठेव जरा . मधल्या अंगणात बसते ऊन ऊन .” दत्तू आणि गोदाबाईनी खुर्चीसकट त्यांना बाहेर आणले .

सकाळचे शेताचे काम आटोपून ठोसर वापस आले . ओसरीवरूनच त्यांना शांतू दिसली ….कर्कश्य आवाजात ते ओरडले  ”  राघवच्या आई !!!! पार्वती बाई !!! हा काय माज आहे ???”

शांतू थरथर कापत दारा आड गेली .

” तुमची ही हिम्मत ? आता नवे वारे वाहणार का ठोसरांच्या वाड्यात ?अब्रू ठेऊन वागा जरा !! ”

” काय झाले कळाले नाही आम्हास .”

” अस्सं ? आता हे आम्ही सांगणार ?”

” पोर लहान आहे . लुगडं सावरत नाही . मीच सुचवलं . माफी असावी …आत्या बाई , तुम्ही सांगा

न . ”

” जाऊदे रे गजानन . लहान आहे ती . न्हाण आलं की नेसेल लुगडं .”

आज आत्याबाईंमूळे विषय वाढला नाही . पण पार्वतीचा मात्र संताप झाला ………

राघव ला एकच बहीण . देविका . बाराव्या वर्षीच तिचे लग्न लावायला निघाले होते , एका विधुराशी , तीस वर्षाच्या . तेव्हा पार्वतीने अक्षरशः पाय पकडले होते ठोसरांचे . रड रड रडली होती .अन्न सोडले होते .तेव्हा मोठे भाऊजी सदाशिवराव आणि धाकले भाऊजी मध्ये पडले म्हणून !!!

नंतर तिच्या नशिबाने चांगलं घर मिळालं ……

स्वतःच्या पोटच्या पोरीची माया नाही यांना !! हे काय शांतू ला समजून घेणार !!!!

क्रमश:

Image by Luidmila Kot from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

11 thoughts on “कवडसा…भाग २

  • October 13, 2020 at 8:24 pm
    Permalink

    Mast junya kalatil gosht … interesting

    Reply
    • October 14, 2020 at 10:41 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • October 14, 2020 at 1:58 am
    Permalink

    डोळे पाणावतात वाचताना

    Reply
    • October 14, 2020 at 10:41 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
    • September 2, 2021 at 10:06 am
      Permalink

      खूप छान…, जुन्या काळात गेल्या सारखे वाटले…पुढच्या भागाची उत्सुकता निर्माण झाली…👌👍

      Reply
      • September 12, 2021 at 1:35 pm
        Permalink

        स्त्रीयाची मानसिक आंदोलने भावस्पर्शी

        Reply
        • September 21, 2021 at 6:04 am
          Permalink

          वेगळा विषय आहे कथेचा.

          Reply
    • September 21, 2021 at 6:02 am
      Permalink

      वेगळा विषय आहे कथेचा.

      Reply
  • September 7, 2021 at 9:36 am
    Permalink

    Next part ahe ka? Disat nahi

    Reply
  • Pingback: कवडसा…भाग १ – LekhakOnline – Excellent Marathi Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!