ओझं…
चंपीची करोना टेस्ट पॉजिटीव्ह आली आणि घरातल्या निम्म्या लोकांच्या मनात “आता तरी ब्याद टळेल” अशी आशा तयार झाली. लगोलग अम्ब्युलन्स आली आणि खोकून बेजार झालेली , तापजलेली चंपी आत जाऊन बसली. डोळे भरून तिने ते घर बघून घेतले. ते तिचं घर होतं कि नाही माहित नाही. तिच्या आईचं मात्र होतं. कधी कोणे काळी तिचा बाप इथेच, याच अंगणात भल्या पहाटे तिला सोडून निघून गेला होता.
पण ते तिच्या आईचं घर तरी कसं ? आई तर कधीच मेली होती तिची. तिला जन्माला घातल्यावर. ती याच घरात राहायची इतकं चंपीला माहित होतं. तेव्हापासून चंपी याच घरात राहत होती. २ वेळच्या भाताला जड नव्हती ती. घरातल्या मधल्या मुलीची लेक म्हणून तिला कोणी काही कमी केलं नाही. पण …
—
“सिस्टर , कनवलजन ची हिस्टरी आहे , बघितलं नाही का तुम्ही ? काय हो, गोळ्या बघू तुमच्या कोणत्या चालू आहेत ते ?” तिथल्या नर्स ने चंपीला विचारले. “गोळ्या घेत नाही आता .. ” तेवढं बोलल्यानेही चंपीला धाप लागली. “मावशी अहो फिट येतात ना तुम्हाला ? त्याच्या कोणत्या गोळ्या आहेत ?” नर्स ने पुन्हा कानाजवळ मोठ्यांदा विचारले .. चंपी काहीच बोलली नाही. “कधीपासून येतात तुम्हाला फिट ??” नर्स ने पुन्हा विचारले ..
कधीपासून ???
—
“भडव्यानं अफू खाऊ घातली पोरीला .. झोपवून ठेवायचा दिवसभर अफू घालून .. शेजारच्या म्हातारीची पोरगी त्याच गावात दिलीये , त्यांच्या पाव्हण्यानं सांगितलं आम्हाला .. भाडखाव न भैनीला मारलं आन हि अशी खुळी करून सोडली पोरीला .. ” मामा मोठ्मोठाने ओरडून सांगत होता कोणालातरी .. चंपी चुलीसमोर बसली होती .. “खा ग , तू नको लक्ष देऊ .. ” तिची आजी चंपीला म्हणाली .. चंपी गरम भाकरी आणि कालवण खाऊ लागली .. तिच्या नाकाडोळ्यातून पाणी येऊ लागलं ..
“नाक पूस कि बये .. ” धाकटी मामी म्हणाली .. चंपी तशीच तिच्या तोंडाकडे बघत बसली .. तिच्या गळणाऱ्या नाकाची किळस वाटून धाकटी मामी उठून पलीकडे जाऊन बसली .. मग आजी स्वतः पुढे झाली आणि पदराने तिचं नाक पुसलं .. “इतक्याश्या लेकराची कसली घान वाटतीये .. काय कधी गु मूत काढनारच नै कि काय स्वतः चा पोरट्यांचा .. ” आजी तोंडात पुटपुटली ..
“आत्या , वर्सा – दोन वर्सात पदर यील पोरीला .. किती दिवस बांधून ठेवणार पदराशी .. तुमि काय जल्माला पुरणार हाय का तिच्या .. ” धाकटी मामी म्हणाली ..
“तिचे ४ घास जड नाय ना घराला .. आमी कायबी करून वाढवू तिला .. तू बग तुज सगळं .. ” आजी पदरात तोंड लपवत म्हणाली ..
—
अनंत च्या घराची बेल वाजली .. अनंता ,म्हणजे चंपीचा सक्खा मोठा मावसभाऊ .. अनंत च्या बायकोने, मंजूने दार उघडलं ..
दारात चंपी उभी होती ..
“या चंपी वन्स. अहो, चंपी वन्स आल्यात” मंजू इतकं बोलून आत निघून गेली. अनंत बाहेर आला. “काय म्हणते चंपी ? सोबत कोण आलंय आज ?”
“आज ना एकटीच आले मी बस नि” जाड भिंगाचा चष्मा सावरत चंपी म्हणाली.
“एकटी ? अगं चंपी त्रास होतो ना तुला,फिट येतात ना, मग कशाला फिरायचं एकटीने ?” अनंत म्हणाला. त्यावर खुळी चंपी फक्त फिदीफिदी हसली.
इतक्यात मंजू तरा तरा बाहेर आली आणि रागारागाने तिच्याकडे बघू लागली.
“हे बघ ना अनंता , अरे मागच्या आठवड्यात अशीच फिट आली आणि अंगावर चहा पडला गरम .. ” चंपी सांगू लागली.
“इतकं लागलंय तर कशाला फिरताय वन्स ?” अनंताच्या बायकोने रागातच विचारले. यावर खुळी चंपी पुन्हा फिदीफिदी हसली. कुठूनतरी हे प्रश्न म्हणजे लोकांना तिच्याबद्दल वाटणारी काळजी इतकं च माहित होतं तिला. असं कोणी काही बोललं कि आपली पण कोणाला तरी काळजी आहे, आपण हि कोणासाठी तरी महत्वाचे आहोत, असं वाटायचं तिला. आपणही कसं सगळं सहन करतो, कसं इतरांसारखं जगतो, हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करायची ती खुळी चंपी.
“अहो वन्स दर पंधरा दिवसांनी चक्कर असते तुमची आणि दरवेळी हे लागलं ते लागलं सांगता , आता आमची पण काय वय राहिली आहेत का तुमची आजारपणं काढायची ? आम्हीही किती पळापळ करणार , साठीला आलो कि आम्हीपण… इतकं बरं नसतं तर घरात बसायचं , स्वतः ची काळजी स्वतः घ्यायची .. आम्ही धडके असून ते उगाच उंडारत बसत नाही .. कशाला उगाच त्रास द्यायचा दुसऱ्याला ? काही झालं कि हे लगेच गाडी घेऊन तिथे यायला तयार , परवा बीपी वाढलं यांचं, सासूबाईंची तब्येत खराब झाली तर. तिथं घर आहे, नोकर चाकर आहेत, तिथं हि माणसं आहेत च कि. आज इथे उद्या तिथे कशाला उगाच फिरत बसता ? आम्हाला सगळ्यांना टेन्शन उगाच डोक्याला. बास बै मला नाही होत सहन .. ” म्हणून अनंत ची बायको मटकन खालीच बसली ..
“मंजू .. ए काय होतंय तुला .. मंजू .. ” अनंत हाका मारत होता .. मंजूने बोललेले शब्द हळूहळू चंपीच्या मेंदूत शिरत होते .. ती तशीच बधिरपणे समोर बघत बसली .. आजूबाजूला लोकांचा गराडा वाढ्लेलाही तिला कळलं नाही .. मंजूच्या मुलाची नजर मात्र तिला भेदत आरपार गेली .. चिरत गेली ..
मंजू ला सौम्य हृदयविकाराचा झटका येऊन गेला आणि चंपीसाठी अनंता च घर कायमचं बंद झालं ..
—
आज चंपीला फारच धाप लागत होती .. दवाखान्यातल्या कोणीतरी फोनवर व्हिडियो कॉल लावून दिला होता .. तिचे आजोबा झोपल्या जागेवरून चम्पिकडे बघत होते .. मामा आणि मामी “लवकर बरे व्हा” म्हणत होते..
किती खोटं होतं ते सगळं ! तिला माहित होतं , घरी गेल्यावर परत तिची रवानगी अडगळीच्या स्वच्छ केलेल्या खोलीत होणार , तिची भाचरं तिला आजूबाजूला कोणी नसताना “खुळी चंपी खुळी चंपी” करून चिडवणार .. मोठी सून समोर ताट दाणकन आपटणार. ती टीव्ही बघायला बाहेर आली कि टीव्ही बंद होणार. तिला चक्कर आली कि कोणीतरी पडवीत नेऊन झोपवणार. पुन्हा मेली बोली तर आतून तिला आणण म्हणजे .. शिवाय ती खोली वापरता येणार नाही ते वेगळं च .. त्यापेक्षा जे काय ते पडवीत होऊ दे ..
काही वेळातच चंपीचा श्वास लागला .. समोर आधी कोणी आलं असेल तर तिचा बाप. दुधासाठी रडणाऱ्या पोरीला अफू खायला घालून निजवून ठेवणारा तिचा बाप .. मग न बघितलेली आई .. जराशी तिच्यासारखी .. जराशी मावशीसारखी .. जराशी आजीसारखी ..
आजोबा .. काठीने मारणारे .. पण तिच्यासाठी लागले म्हंटल कि खिशातली थैली पुढे करणारे .. मामा .. त्याचं काय अस्तित्व होतं ? आरपार बघायचा तो आपल्याला ! आणि मामी पण!
आजी .. हो, ती खूप मायाळू होती .. भावंडं .. तिला सांभाळून घेणारी .. बऱ्याच काळापर्यंत सांभाळून घेणारी .. मग ओझं च झालो आपण ..
आपण एक ओझं म्हणून जन्माला आलो .. बापाला ओझं झालो .. आज नाही .. आज आपण इथेच मरायचं ..
—
“दुपारी ४ वाजता गेल्या त्या. कोव्हीड पॉजिटीव्ह असल्याने बॉडी देता येणार नाही. तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल” इतका निरोप मिळाला आणि मामाच्या मोठ्या सुनेने गळा काढला .. “बरं झालं सगळं परस्पर उरकलं .. दहावा नको कि बारावा नको कि चौदावा नको .. गेली बाई ब्याद एकदाची .. ” रडता रडता तिच्या डोक्यात येत होतं .. पण अश्रू थांबत नव्हते .. तासभर तरी रडायला हवं ना !
शेवटी आपलं झालं असलं तरी आपल्या मढ्याचं ओझं मात्र चंपीने कोणाला उचलू दिल नाही ..
पूजा खाडे पाठक
Latest posts by Pooja Pathak (see all)
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
काटा आला
आई गं!
😒😒
sad …