कवडसा…भाग ३
पार्वतीला अपेक्षित होता तेवढा सगळा गोंधळ झालाच राघव वरून . ठोसर तर इतके संतापले होते की ‘ आज पासून तो मला मेला !!’ असे त्यांनी जाहीर करून टाकले .
बायजाबाई आणि सासूबाईंनी शांतूला दोष दिला . ‘पांढऱ्या पायाची ‘ वगैरे ..
जावई बापू आणि देविका ला दत्तू गेला होता सोडायला गाडी जुंपून . म्हणून निदान तिच्या सासरी हा विषय पिहोचला नाही याचे पार्वतीला समाधान . उगाच पोरीला टोमणे ऐकायला लागले असते .
सगळे आवरून झाले की पार्वती शांतू कडे गेली . परसात वाळवणाजवळ एकटीच बसली होती ती .
” शांतू , तुला थोडे दिवस आईकडे जायचंय ? ”
” बाहेर मामंजि का चिडले होते आई ?'”
” काही नाही ग ! तू लक्ष नको देऊ . सांग ना . जायचंय का तुला ? ” शांतूचा चेहेरा फुलला होता . सगळ्या घराशी भांडून पार्वती स्वतः शांतूला घेऊन निघाली .
” आली ? नवऱ्याला खाऊन ? ”
शांतूची काकी दारातच ओरडली .
बाहेर आलेल्या आईला बघून शांतू पळत गेली आणि आईला बिलगून हमसाहमशी रडायला लागली .
” या या विहिणबाई ! आपण त्रास घेतलात .”
” का नाही घेणार ? पोरगा गेला पळून , आता ह्या अवदसेला इथे सोडून जाणार !! ” काकी कारवादली .
” नाही नाही जाउबाई . असे नका बोलू . चार दिवस राहील पोरगी , माहेरपण घेऊदे , मग जाईल की .”
” शांतूच्या आई , मला तुमच्याशी एकट्यात बोलायचंय . ” पार्वती कानात कुजबुजली .
” चला मोरी पाशी .”
” हे बघा , आमचा राघव …आता ..”
” ते कळालं विहिनबाई . पण शांतूच्या दोन चुलत बहिणींचे लग्न अजून व्हायचेत . ही अशी इथे राहिली तर त्यांचे लग्न …माझा जीव जळतो हो , पण ……”
” काय उपयोग ? …हा ?… काय उपयोग अशा जीव जळण्याचा जो आपल्याच लेकराचा जीव घेईल ? आपल्या पोरींनी तेच हाल ,अपमान , अवहेलना सहन करायची का ? …मी आले होते चार दिवस पोरीला आईची भेट करवून द्यायला . झोपेत दचकून उठते पोरगी , शोधते आपल्या आईला …तिला काय माहीत , आई कधी नव्हतीच इथे तिच्यासाठी !! ….चल शांतू !! ”
” आपण रागावू नका हो . पण माझा हात दगडाखाली आहे .”
” नुसता हातच नाही , आपणच दगडाखाली रहातोय . पण त्याची जाणीव हवी न , एक इंग्रजी सैन्य आणि एक आपलाच समाज !.दोन्हीकडून गळचेपी . ”
भरल्या घरातून पार्वती शांतूला घेऊन वापस गेली . शांतूने सगळा संवाद ऐकला होता . आपली आई अगतिक आहे , पण आपली ‘ ही ‘ आई खंबीर आहे हे समजलं होता तिला .
रस्त्यात शांतू पाय मुडपून डोके गुढग्यात घालून बसली होती . सोबत आलेला गडी पण शांत होता , सारं काही समजल्यासारखा . रस्त्यात प्रफुल कुमार भेटला . …राघव चा मित्र .
” ए प्रफुल , राघव ची काही खबर कळाली का रे ? ”
” काकी , चिंता नका करू .तो कलकत्त्याला गेलाय .
श्याम बाबूंबरोबर काम करणार आहे . मला सांगत होता मागच्या आठवड्यात . मी निघतो , कुणी बघेल .”
शांतूला वापस आल्यापासून सगळेच तिच्याशी दुजाभाव ठेऊन होते . ठोसर पण वारंवार पार्वतीचा अपमान करत . राघवला तिचीच फूस होती असे त्यांना वाटे . चिंतू , बायजाचा मुलगा , शांतूवर हक्क दाखवायला लागला . त्याची तिच्या कडे बघायची नजर पण बदलली हे पार्वतीने जाणले होते . शांतू न्हाणीघरात गेली असतांना तो मागे मागे गेल्यावर तिने हटकले होते . बायजबाईने खूप गोंधळ घातला होता त्यावर .
” जरा ऐकता का ?”
” काय ? बोला पट्कन . ”
” आजकाल मला चिंतू चे वागणे बरोबर वाटत नाही . वयात आलेला पोरगा आहे ..
तिचं बोलणं मधेच तोडून ठोसर म्हणाले ,
” तुमच्या लाडक्या लेकीला आवरा आधी ! मोठ्याच्या मध्ये तिने यायचंच नाही . तिथेच रहायचं आत्याबाईंच्या खोलीत . नाहीतर द्या पाठवून !!”
दारावर थाप पडली म्हणून दत्तू पळाला . प्रफुल होता …घाबरलेला …..
” काय झालं प्रफुल ? ”
” आण्णा …ते …कलकत्त्याला …
आपल्या तरुणांवर गोळीबार झालाय …त्यात राघवही होता …बहुतेक तो …..”
ठोसर पुतळ्या सारखे थिजून बसले .पार्वती ला भोवळ आली . बायजाबाईने मात्र तोंड उघडले .
” म्हणाले मी ,अपेशी आहे ही !! काढा तिला बाहेर !! माझ्या पोरावर बोट दाखवलस न ? घे आता !! ”
” शांत व्हा जाउबाई ! राघव विषयी पक्की बातमी आली नाही अजून ! ही वेळ नाही असं बोलायची !! ”
ताडकन उठून ठोसर ओरडले ,
” अवदसा आणलीय घरात !! कुठाय ती ?”
” खबरदार तिला कुणी काही बोलाल तर !! राघव नको नको म्हणत असतांना आपणच करवले ना त्याचे लग्न ? तेही आपल्याच फायद्यासाठी ? त्या पोरीला का दोष लावता ?”
” सगळ्यांचे मूळ इथेच आहे . तुमच्याच जवळ . सुधारक जातीची कीड आहे ही पार्वतीबाई . धर्म भ्रष्ट करेल आपला . समाजाला गरज नाही तुमच्यासारख्या लोकांची .”
” मी काय म्हणते ..”
” बा s s स !! आवाज बंद !!” लाल बुंद चेहेरा करून ठोसर गर्जले .
” मी ..”
” निघा इथून !! तुम्ही आणि ती लेक !! आम्ही समर्थ आहोत , आमचे बघायला .”
” आई , काय झालं ? ” कावरीबावरी शांतू विचारत होती .
पार्वती विचारात होती . म्हणाली ,” इकडून बोलणे झाले ….माझी इथे गरज नाही ग , तुझी …तर …”
रात्रभर ती शांतूला पोटाशी घेऊन मनाचे कढ ,आतल्या भावना दाबत होती ती . चंद्रप्रकाशा चा कवडसा पडला होता …तिच्या पायाजवळ …. त्या प्रकाशात तिला लख्ख दिसत होते . आपली खरी गरज कोणाला आहे ? आणि …राघव जिवंत असेल ? का .. नशिबात काय मांडलंय देवा !! इथे …ह्या समाजात शांतूची परवड ….मातेरं …
पहाटे तांबडं फुटायच्या आत ती उठली . भरून ठेवलेलं बोचकं उचललं . शांतू ला उठवलं …तिचा हात धरून ती निघाली केशवराय यांच्या आश्रमात . ह्या समाजापासून दूर जीथे ..जिथे शांतूला शिकता येईल , जगता एक माणूस म्हणून !!
आश्रमात अनेक परितक्त्यांना तिची गरज होती . शांतू पण आता घेणार होती सारं अवकाश कवेत .
पार्वती आणि शांतू निघाल्या होत्या प्रकाश्याच्या वाटेवर जातांना राजा राममोहन राय च्या तसबीरीला नमस्कार करून .
समाप्त
Image by Luidmila Kot from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
खूपच आवडली ही कथा
👌👌👌👌
Thanks
धन्यवाद
खूपच छान! निःशब्द
धन्यवाद
वाह वाह
धन्यवाद
Khup ch chan ahe hi katha
धन्यवाद
खूपचं छान 👌👌
आशेचा किरण दाखविणारी कथा
जगात अश्या कितीतरी शांतु आहेत.सगळीना पार्वती मिळत असेल का?
जगात अश्या कितीतरी शांतु आहेत.सगळीना पार्वती मिळत असेल का?