रुसवा फसवा… 😜
अहो.. ऐकलं का? आजी लाडात येऊन म्हणाल्या..
ऐकतोय.. तुझंच. .. आजोबा दुर्लक्ष करत ..
गप रे (मोठी जाऊबाई जवळपास नाही याची खात्री करत ही एकेरी वर आली 😜🤣) आजीबाई चिरकल्या..
ए.. गप रे काय म्हणतेस… मी वहिनीला नांव सांगीन… आजोबा खोटं खोटं धमकावत म्हणाले..
आजीबाई नी डायरेक्ट रुसवास्त्र काढलं…
अहाहाहा… आलाय मोठ्ठा शहाणा…रुसलीये मी..
तुझं हल्ली माझ्याकडे लक्षच नसतं… नै आठवडा झाला बघतीये.. माझी कंबर दुखतीये पण सकाळी नेमका तुझा टॉमी तुला बोलवायला येतो… मग जातोस पळून.. त्या मॉर्निंग वॉक ला….
आजोबा ही कुरकुरले…
ए… एकतर त्याचं नांव टॉमी नाहीये… टेमगिरे आहे..
आणि त्याच्या कुत्र्याचं नांव टॉमी आहे…
आणि तुझी कंबर मी नेहमीच चेपून देतो… नं चुकता..
तेवढाच काय तो चान्स मिळतो.. 😜
आजींचा रुसवा फुसका बार झाला .. 😉🤭🤭
गप रे… आचरट कुठला… आता दुसरी पिढी हाताशी आली आणि वय पाहिलंत का आपलं?
यंदा सत्तरी पार करताय … विसरलास का..? तिनं लटक्या रागात विचारलं..
साने आजोबा आणि मोघे आज्जी यांनी नुकतंच म्हणजे सात महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं
आणि नातवंड दोघांचीही कॉलेजात होती..
पोरं परदेशीं.. नातवंड आणि साने आजोबा यांचा मुक्काम पुण्यात… त्यांना मोठी वहिनी होती.. मोठी म्हणजे 2 वर्षांनी.. पण आजोबांची ‘ही ‘गेली ऐन साठीत आणि मोठा भाऊ गेला पासष्ठीत… मग या वयात मुलं बाळ परदेशीं असलेल्या सख्ख्या वहिनीला त्यांनी घरी आणलं.. मोठ्या बहिणीच्या मायेनं सांभाळत होते..
त्यातच त्यांना भेटली रमणी … त्यांच्या गेलेल्या मित्राची बायको… रमणी मोघे… वय 65.. गोरीपान चाफेकळी नाकाची, ठेंगणी आणि सुखवस्तू बांध्याची..
आणि हॊ.. गोड गळ्याची बरं का.. …. ती पूर्वी नाशिकला असे… तिथेच एका कार्यक्रमात ही दोघे भेटली आणि चक्क प्रेमात पडली पण आढेवेढे घेत बसली…
मग साने काकांच्या धाकट्या नातवानं हे सूत जुळवलं आणि या सत्तरीतल्या आजोबांचा पुन्हा नवरोबा झाला आणि गोड मोघे आज्जी नवरी बाई… मुलांना येणं शक्यच नव्हतं… आणि बाकीचे नातेवाईक बोलावून ही येणाऱ्यातले नव्हते..
मग त्यांना सासूबाई कोण? तर मोठी वहिनी .. कुसुम वहिनी… थोडीशी सावळी, मध्यम उंचीची आणि तब्येतीने सुदृढ .. नाक भज्यासारखं मोठं…
आणि आता ह्या वयात दोघी जावांचं भांडण झालं..
तशा त्या सारख्याच रुसत होत्या आपल्या मोघे आज्जींवर
कारण क्षुल्लक… पेपर आला की मोघे आज्जींना.. म्हणजे आपल्या कुमुद ला तो व्यवस्थित स्टेपल करून ताजा ताजा वाचायचा असायचा… नी शब्दकोड्याची मालकी पण तिचीच हवी… झालं.. हाच काय तो विरंगुळा होता मोठ्या वहिनीला… आणि पेपर च्या जमतील तितक्या घड्या घालायची सवय…
मग जुंपलं सकाळी सकाळी… या दोन ‘जून’ ( नवं कसं म्हणणार 🙄🤭) तरुणींच…
त्यात अजून एक शिरस्ता आला.. घरात वहिनी असतील तर नवऱ्याला अहो जाहो करायच… मान द्यायचा… आणि
सकाळी लवकर उठून त्यांची (वहिनी आणि नवरोबा ) काफी (बरोबर वाचलंत… कॉफी नै काफी )करायची..
मग नाश्ता, पथ्याचा स्वैपाक तो ही अंघोळ देवपूजा करून, आणि मोठा पिंप भरून ठेवायचा कोमट पाण्याचा दिवसभरा साठी… आणि हॊ जेवायला रोज नवं नवं…
आता ह्या वयात हे असले सासुरवास कसे हॊ सहन करणार आपली नाजुका.. मग काय केली भुणभुण नवऱ्याला…
नवी नवी बायको… ऐकायला नक्को… काय करता..
मग साने आजोबांनी शक्कल लढवली होती.. ते डबा आणायचे दुपारचा … तिघांचा .. बायकोला त्रास नको म्हणून..
वहिनींना कमी दिसायचं… त्यामुळे डबा खपून जायचा..
पण नेमकी आज खाणावळीला सुट्टी आणि ताई वहिनी म्हणाल्या आज जरा पुऱ्या कर… मसाले भात अळूची भाजी आणि थोड्या भज्या तळ… हॊ..
झालं.
आज्जीची धरली होती कंबर…
आजोबा खोलीत आले… आणि म्हणाले… तू काही काळजी करू नकोस… मी करतो स्वैपाक..
पण वहिनीचं मन नको दुखवायला… माझ्यासाठी या घरासाठी ती आजवर खूप राबलीये…
आजी ही म्हणाल्या… अहो मला काय सांगताय… मी काही शत्रू नहीं त्यांची… आणि ह्या वयातले रुसवे फसवेच असतात ते काय मनावर घ्यायचे… चला मी जी मदत करते… म्हणत दोघेजण लुटूलुटू चालत स्वैपाक घरात आले. मग आजोबा लागले कामाला… आज्जी बसल्या बाजुला… सगळी तयारी करून देत होत्या .
एक एक सूचना देत… सगळा स्वैपाक सुरेख झाला…
इथे वहिनी बाई गुपचूप डोकावून गेल्या होत्या… डोळ्याला पदर लावून वाट पाहत बसल्या…
इकडे पान वाढलं आणि त्यांना हाक मारली..
कुसुम वहिनी जेवल्या…. तृप्त झाल्या…
आणि म्हणाल्या..
भावजी… कधी तरी तुमच्यासारखं आमच्या ह्यांनी मला नुसतं विचारलं जरी असतं ना… की बाई गं काय दुखतंय, खुपतंय? देऊ का अर्धा कप चहा? तरी बरं वाटलं असतं हॊ..
पण हिने नशीब काढलं.
तुम्हीच रांधलात ना आजचा स्वैपाक? कळलं मला
हिच्या हाताची चव कळलिये मला…
दुपारी ही डबा येतो… पण रात्रीचा स्वैपाक ही करते .. त्यामुळेच रात्री मी जास्त जेवते .
नाही हॊ बोलायची आमच्या जाऊ बाईला काही मी आता…
तिच ही पोरवय आहे का.. आता नाचवायला…?
अस म्हणून गंगा जमुना गळा भेट घेऊन संगम झाला..
आजवर धरला रुसवा कारण माझा रुसवा काढणार कुणी भेटलच नाही हॊ… कायम इतरांच्या रुसव्याचा काय तो मान… पण आजपासून सगळं घर हिच्या हवाली करते हॊ..
अस म्हणून किल्ल्या आणून दिल्या..
मोघे आज्जींना पण भरून आलं..
नको हॊ जाऊबाई… आणि हा हक्काचा मोठेपणा तुम्हीच मिरवा.. आणि अशाच हक्कानी रुसा ….
दोन्ही म्हाताऱ्या गोड हसल्या…
असे रुसवे फसवे तुम्हालाही लाभो… 🤭😉😉
Image by Sabine van Erp from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
👍खूप छान
कित्ती गोड 💛💛💛
👌👌👌
👌🤗
😘😘😍😍 thank u soo much
Khupch god hota rusva..👌👌
खुपच गोड झालीय कथा
कित्ती गोड
Thank u all😘😍