असाही व्हॅलेंटाईन दिवस…
काल व्हॅलेंटाईन दिवस, त्यातून रविवार. तरीही बायकोला सबंध दिवस काम होते. टाळता न येण्यासारखे. मग मी आणि कन्या दोघांनीच तो दिवस मुंबईच्या काळा घोडा फेस्टिव्हलला जाऊन साजरा करायचा निर्णय घेतला होता!
आदल्या भरगच्च दिवसानंतर थकून झोपलेली ती उठलीच सकाळी सडे नऊ वाजता. पण आमचा प्लान पक्का होता. तिच्या आणि माझ्या रविवारी आळसावलेल्या वेगाने हळू हळू तयार होत आम्ही निघालो. टोपी, गॉगल, पाण्याची बाटली, तिच्या ब्यागेत तिच्या आईने भरून दिलेला खाऊ असा सरंजाम होता. आज गाडी वगैरे घरीच ठेऊन मी तिला बेस्ट बस ने नेणार होतो. ती म्हणाली ” मला तुझ्याबरोबर असा लॉन्ग जर्नी आवडतो”. आम्ही निघुन बस स्टॉपवर आलो. रविवार असल्याने बस तशी रिकामी होती. आम्ही दिवसाचा पास विकत घेतला. बस निघाली.
ती बस स्कूल बस आणि मी त्यातील सवंगड़ी असल्यासारखे ती मला एक एक गेम शिकवत होती. ते शिकून खेळताना न समजल्याने मी हरलो तर ” बाबा तो ट्रायल गेम होता. आता नीट खेळ!” असे म्हणत मला मोटिव्हेट करत होती. मग बस स्टॉपवर लिहिलेली मराठी नावे वाचणे, ब्लू आणि ग्रीन बोर्ड वाचून एकमेकांना चापट्या मारणे असे खेळ खेळत आम्ही ऑपेरा हाउसला पोहोचलो. गिरगावात आल्यावर तिला घरी जायचेच असते आणि मराठमोळे पदार्थ खायचे असतात. मग तेथील प्रसिद्ध हॉटेलातील जगप्रसिद्ध मिसळ, साबुदाणा वडा खावून आम्ही घरी पोचलो. रविवारी बहुतेक मुले बाहेर गेली होती. थोडावेळ थांबून आम्ही फेस्टिव्हलला निघालो. परत तिकीट न काढता “पास आहे” असे सांगून बस मधून जाण्याचे तिला प्रचंड कौतुक वाटत होते.
बस मधून उतरून, प्रचंड लाईन पार करून आम्ही फेस्टिवलच्या जागेत प्रवेश केला. प्रेमाला उधाण आलेली तरुणाई लाल रंगाने न्हाऊन निघाली होती. प्रचंड गर्दीतही शिस्तबद्ध अयोजनामुळे मजा येत होती. कन्या विस्फारलेल्या डोळ्यांनी तेथील कलेचे विविध आविष्कार पाहून आनंदी होत होती. मला प्रश्न विचारात होती. व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने तिथे जमलेल्या बहुसंख्य प्रेमळ जोड्यांमध्ये आमची “लडीवाळ” जोडी खुपच उठून दिसत होती! मग खूप फोटो काढले. सर्व स्टॉल, कलेचे आविष्कार ह्यांचा आनंद घेतला. तिथेही एका स्टॉलवर तिला आईची आठवण झाली. ” बाबा आई असल्या पॅटर्नच्या वस्तू वापरते. आपण तिला व्हॅलेंटाईन डे सीक्रेट आणि सरप्राइज गिफ्ट घेऊया का?” मला कल्पना आवडली. मग आम्हा दोघांतर्फे प्रत्येकी एक अशी दोन गिफ्ट आम्ही विकत घेतली. त्या गिफ्टपेक्षाही त्यातील सीक्रेट आणि सरप्राइज एलीमेंटमुळे अतिशय आनंदी झालेला कन्येचा चेहरा गिफ्टच्या किंमतीच्या करोडोपट आनंद मला तिथेच देऊन गेला! गर्दीमुळे आम्ही लाईव्ह इव्हेंट मात्र टाळले. पण त्या रंगीबेरंगी दुनियेच्या काही तासांच्या सफरीत कन्या खूप खुश झाली.
परतीच्या प्रवासात सूर्य कलला होता. रविवार असूनही रस्त्यावर वाहतूक प्रचंड होती. टोपी, गॉगल आता गळून पडले होते. पाण्याची बाटली अर्धवट संपली होती. हाजिअलीच्या समुद्रावरून येणारा सुसाट वारा दिवसभर असणाऱ्या वावटळीत, उडणाऱ्या धुळीत भर टाकत होता. माझा दंड धरून बाहेर एकटक बघत असलेल्या कन्येचे डोळे पेंगु लागले. मग हळूच माझ्या मांडीवर डोके ठेवून ती निर्धास्तपणे गाढ झोपी गेली. मी तिच्या दमलेल्या पण प्रसन्न चेहर्याकडे पहात विचार करत होतो की हा विश्वास, हा आनंद, ही एकत्र केलेली मजा, हे लहान लहान सुखाचे क्षण हेच बाप आणि मुलीचे प्रेम नाही का? त्या प्रेमाचा आविष्कार करायला फक्त वेळ खर्च किंवा खरे तर गुंतवावा लागतो. हे निर्व्याज प्रेम इतर कशाचीच अपेक्षा ठेवत नाही.
घर जवळ आल्यावर झोपेतून उठून आईला सरप्राइज गिफ्ट द्यायला आसूसलेली कन्या घरी पोचली. आईला दिलेले गिफ्ट आईने उघडून मनापासून केलेल्या कौतुकाने आणि आईने मायेने घेतलेल्या पापीने तिचा दिवस सार्थकी लागला. पोरीने मारलेल्या मिठितून बायको आनंदाने माझ्याकडे पहात होती. त्या दोघींचा आनंद हाच माझ्यासाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट होता. संत व्हॅलेंटाईन आकाशातून ” सुखी रहा. असेच प्रेम करा” असा आशिर्वाद आम्हाला देत होता! एक अविस्मरणीय व्हॅलेंटाईन डे संपत होता….मनात कायमचा रेंगाळण्यासाठी……मंदार जोग
Image by Achim Scholty from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
बढिया
👌🏻👌🏻
खूपच सुंदर 👌👌 बाप लेकीचं हे बॉंडिंग जबरदस्त असतं..
अप्रतिम 👌👌
व्वा! काय मस्त नातं आहे वडील मुलीचं. ग्रेटच लिखाणही खूप सुंदर.