जाग

सकाळी सकाळी जाग आली. डोक्यावरचं पांघरूण बाजूला करून घड्याळ पाहिलं- पावणे पाच !
रविवार असल्याने अलार्म वाजणार नसतो तरीही जाग येतेच. रविवारच्या यादीत बरीचशी सटरफटर कामं असतात. आजही आहेत. अंथरुणात लोळत पडावंसं वाटतंय… पण नको.. उशीर होईल…आणि मग आळस आपला ताबा घेईल.
अंगावरचं पांघरूण बाजूला केलं. त्याची घडी करतांना बेडरुममधेच असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर काढून ठेवलेलं पुस्तक दिसलं…आज वाचायचंय … रविवारच्या यादीत हे ही एक काम आहेच… हे काम आहे?…
असो…
झाडाझुड, साफसफाई आवराआवर, आंघोळ करून येईपर्यंत पोरं आणि नवरा उठलाय. सगळ्यांना सुट्टी एन्जॉय करायचीय.
“आई आज नाश्त्याला काहीतरी वेगळं..”
पोरगा असंच म्हणणार हे माहीत होतं. इडलीसाठी काल रात्रीच पीठ तयार करून ठेवलं होतं.
इडली-सांबर, चटणी तयार करून डायनिंग टेबलवर ठेवणार…तेवढ्यात लहान्या चिरंजीवांची फर्माईश – “मला इडली नको आई…डोसा हवाय.”
याची ही नाटकं ठाऊकच असतात…पण भोंगा नकोसा वाटतो. शिवाय पोटात काहीतरी गेलं पाहिजे. त्याने उपाशी नको रहायला… म्हणून वाटीभर उरलेल्या पिठाचा डोसा लावला… आणि एकीकडे चहा-दूध ठेवलं..
गरम गरम चहाचा एक घोट कसलीतरी ऊर्जा पसरवत पोटात उतरतो… आहा !! उठल्यापासूनचा आपण एन्जॉय केलेला हा पहिला क्षण !!… बाकी इडली वगैरे काहीही खावंसं वाटतच नाही… उगाच अंग जड पडल्यासारखं होतं…पण दुपारी एकच्या ठोक्याशिवाय रामरगाड्यातून सुटका नसते.. म्हणून नाश्ता टाळावाच. चहा मात्र घ्यावा. कामाचा असतो तो…दिलोदिमाग तरोताजा करणारा.. “वाह… उस्ताद..!”
“अरे हुजूर .. वाह ताज बोलीये…!”
खुदकन हसू येतं. जुन्या जाहिराती अजूनही आठवतात… अजून काय काय आठवतं?.… अं… बरंच काही…स्पेशली सुट्टी आहे म्हणून मज्जा करत घालवलेले रविवार.…! पण आता नको…आठवणींनी काही पोट भरत नाही. मंदा येईल थोड्याच वेळात. कामवाली असली तरी आपली बॉस असल्यासारखी वागते ती. नवरा म्हणतो- “कशाला ऐकून घेतेस तू तिची बडबड?….कामवाल्या बाईला आपला धाक हवा.. इथे उलटंचय. ती येईल आणि घाई करेल म्हणून तुझीच गडबड !”
आता मंदावर कसला डोंबल्याचा दाखवायचा धाक ! कॉलोनीतल्या अजून तीन घरांनी मंदाकडे रिझर्वेशन करून ठेवलंय. तनका आला तर देईल बया सोडून माझं घर आणि जाईल दुसऱ्या घरी… इथं मलाच पुन्हा धुणी-भांडी घासत बसावं लागेल. तेव्हा नवरा थोडीच येणार आहे करू लागायला… अहं… मंदावर धाक जमवण आपल्याला परवडणार नाही..
…..
दुपार झालीय. एक वाजलाय. जेवणं आटोपलीयेत. ओटाबीटा स्वच्छ आवरून भांडे बाहेर नेऊन ठेवलेयत. ते संध्याकाळी घासायचेत. मंदा फक्त एकवेळ येते. ती सकाळी येऊन गेलीय. वर वाळत घातलेले गच्चीवरचे कपडे खाली आणले… बाहेरच्या  कपाटात नीट घड्या घालून लावून ठेवले. हुश्श !! आता संध्याकाळी साडेचार पर्यंत सुटका. ड्रेसिंगटेबलावरच्या पुस्तकाची आठवण झाली…पण… आताच नको. सकाळपासून घरातल्या घरात फिरून फिरून आणि गॅसजवळ उभं राहून पाय दुखतायत. पाठ लागून आल्या सारखी झालीय…
आता बेडरूममधल्या कुलरचा गोंगाट लक्ष वेधून घेतोय… थंडगार  गोंगाट !… पाय बेडरूमकडे वळतात… नवरा,पोरं हातपाय पसरून झोपलीयेत… त्यांच्यात जरा जागा मिळवून अंग झोकून दिलं… डोळा कधी लागला कळलंच नाही…
……
संध्याकाळ. साडेचारला उठायचं तर पाचला जाग आली. एवढे का थकलो होतो आपण !!…आता किती उशीर होईल आपल्याला !…खरं तर संध्याकाळचा अलार्म लावून ठेवायला हवा होता. दळण निवडायचंय, भांडी घासायचीत, चहा-पाणी, दुपारचा नाश्ता, संध्याकाळची झाडाझुड आणि पुन्हा स्वयंपाक करायला गॅसजवळ हजेरी लावायचीय… अहं… पुढच्या रविवारी नाही इतक्या वेळ झोपायचं…
……
रात्र !! उद्या सोमवार. घड्याळाच्या काट्यासोबत धावायचंय. अर्धी तयारी आजच करून ठेवायचीय.
भाज्या चिरून फ्रिजमध्ये ठेवल्या. पोरांचे बूट- मोजे, टाय,आय-कार्ड शोधून टेबलवर काढून ठेवलेत. आणखी जे काही करता येईल ते केलं…
गॅस सिलेंडरचं बटन आठवणीने बंद केलं. बेडरूम जवळ केली. आंघोळीच्या वेळी धुवून, टॉवेलने पुसून घेतलेले अर्धवट ओले तस्सेच गुंडाळून वर बुचडा बांधलेले केस मोकळे केले… वर वर विंचरले.. येईल तशी आडवीतिडवी वेणी पाडली… कंगवा ठेवतांना पुन्हा पुस्तक दिसलं…
आजही वाचायचं राहूनच गेलं…
जाऊ दे. पुढच्या रविवारी वाचू !!…… ते काय आवश्यक काम थोडंच आहे…
Image by mohamed Hassan from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

10 thoughts on “जाग

    • October 28, 2020 at 4:37 pm
      Permalink

      छान च आहे पण आता जाग घरातल्या बाकीच्यांना यायची गरज आहे..

      Reply
      • November 7, 2020 at 9:38 am
        Permalink

        होय 🙂

        Reply
  • October 28, 2020 at 5:21 pm
    Permalink

    authentic

    Reply
    • November 7, 2020 at 7:51 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • November 4, 2020 at 6:35 pm
    Permalink

    प्रत्येक गृहिणीची कथा

    Reply
    • November 7, 2020 at 7:50 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • November 7, 2020 at 9:37 am
    Permalink

    धन्यवाद 🙂

    Reply
  • November 17, 2020 at 12:52 pm
    Permalink

    विनयताई, कृपया तुमचा number मला wa कराल का? 9881304289 वर.
    गौरी ब्रह्मे

    Reply

Leave a Reply to Anya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!