शोध (एक रहस्य कथा )- भाग १

रात्रीची सगळी आवरसावर  आटोपली . अमीत ची फ्लाईट पहाटे चारची असल्याने तो घरून रात्री दिड ला निघाला होता . आता जवळपास दोन वाजले होते .आभा गॅलरी चे दार लावायला गेली . पाचव्या मजल्यावरून शांत रस्ता छान वाटत होता . गार हवेची झुळूक आली ,आणि तिचा कोमेजलेला जीव सुखावला .

दोन हात कठड्यावर टेकवून ती सगळी कडे पाहू लागली . दिवसभर भणभणलेला रस्ता आता सुनसान झाला होता .

तिच्या बिल्डिंग च्या उजव्या बाजूने एक शंभर मीटर वर मोठ्ठा पूल होता , नुकताच पूर्ण होऊन वापरा साठी खुला केलेला ….ह्यावेळी तिकडून येणारी वाहतूक पण नव्हती . ती राहात होती त्या शांती अपार्टमेंट चा वॉचमन गेट जवळ एक खाट टाकायच्या प्रयत्नात होता .

पुलावरचे लाईट्स म्हणजे पुलाला नेकलेस घातल्यासारखे  दिसत होते.

ती एकटक नजरेने पुलाकडे बघत होती . मध्ये एक इमारत होती , ज्याचा काही भाग आडवा आल्याने पुलाचा  हा नेकलेस संपुर्ण दिसत नसे . एक पांढऱ्या रंगाची सेदान गाडी तिथे येऊन थांबली . आतून दोघेजण पाय मोकळे करायला उतरले . तेही तिच्याच सारखे पुलाच्या कठड्याला टेकून थोडा वेळ उभे राहिले , आणि पाच सात मिनिटात गाडी निघून गेली .

आभा ने पण गॅलरीतील फोल्डिंग खुर्ची उचलून भिंतीशी टेकून ठेवली,  आणि दरवाजा बंद करून ती आत आली..

सकाळी अतिशय घाईत तिने स्वतः चं आवरलं , डबा घेतला , रुख्मिणी कडे चाव्या दिल्या आणि निघाली .

खाली रस्त्यावर  बघते तर ही गर्दी !

कशाची गर्दी म्हणून वॉचमन ला विचारलं तर  कळाले की पुलावरून एका महिलेने उडी मारून आत्महत्या केली होती .

” केव्हा झालं हे ? “

” रात्री मेमसाब , दोन च्या आसपास म्हणतायत पोलीस “

आभा हबकली .रात्री दोन ला तर मी … Oh No !!! मी तेव्हा होते की गॅलरीत ..

तिने घड्याळात बघितले , आधीच उशीर झाला होता …

” रिक्षा !!” ती निघाली . …काय आयुष्य झालंय आपलं ..एक महिला ..माहीत नाही बिचारी कुठल्या मानसिक अवस्थेत असेल …तिने आपलं जीवन संपवलय आणि आपण !!  ..पाठ वळवून ऑफिसला  निघालो !! तिला स्वतः ची कीव आली . …..तिचे पार्थिव तिथेच असेल ,की नेले असेल ..

ती ऑफिस ला पोहोचली .बसची वाट न बघता रिक्षा केल्याने तशी वेळेतच होती . ऑफिस मध्ये कुजबुज सुरू होती . तिने देवेन पटेल ला विचारले

” काय झालं देवेन ? काही घडलंय का ?”

” ते ..काल …स्मिता ने ..”

” काय ?? नीट बोल न !!”

” काल स्मिता ने आत्महत्या केली “

” काय?” आभा भोवळ आल्यासारखी मटकन खुर्चीत कोसळली .

काही क्षण तिला कशाचीच जाणीव नसल्यागत झालं. आणि मग

तिचे  डोळे वाहू लागले …

” तिने नवीन पुला वरून …” कुणीतरी पुटपुटला

“………”  आभा निःशब्द.

” हो , तुझ्या घराजवळच्या ..”

आभा ला घेरी आली , तीचा तोल गेला , आणि ती टेबलावर कलंडली . .

जाई ने पट्कन पाणी आणून चेहेऱ्यावर शिंपडले …..आभा सावरली .

तिने ताबडतोब रजा टाकली आणि ऑफिस सोडलं . पुन्हा रिक्षा पकडली ….तिचं डोकं बधिर झालं होतं . काल स्मिता ऑफिस ला आली नव्हती .कालच रात्री तिने असं करावं?…रात्री ..मी जागीच होते , म्हणजे स्मिता तिथे पुलावर आली होती ? जीव द्यायला ? का? मला शंका आली असती तर मी थांबवू शकले असते  तिला …तिने आपला मोबाईल चेक केला . स्मिताचा काही मेसेज , काही निरोप , फोटो …काहीही नव्हतं . फक्त मी एक दिवस मस्त दांडी मारून घरी बसणार असा मेसेज होता ,बस !

स्मिता ने ..आत्महत्या ?? छे !  शक्यच नाही …….पण … का ?

रोज भेटत होतो , कधीतरी काहीतरी तर बोलली असती …..आजकाल सतीश थोडा चिडचिड करतो म्हणाली . गेल्या आठवड्यात त्यांचं बरंच भांडण झालं होतं , पण..आत्महत्या?

आभा चं कोसळणं सहाजिकच होतं . आभा आणि स्मिता बाल मैत्रिणी . अगदी जिवलग .सगळं शिक्षण सोबत सोबत झालं . प्रत्येक गोष्ट विचारून ,सांगून करणार . आभाचा नवरा ,अमित , त्याला सुद्धा आधी स्मिता भेटली होती . दोघींचं एकमेकींशिवाय जमतच नसे . त्या माहेरी देखील बऱ्याचदा सोबत जात . शेजारी शेजारीच होतं माहेर….

आणि खूप मोठा योगायोग म्हणजे नोकरी पण एकाच कंपनीत !

……….रिक्षा स्मिताच्या घरासमोर थांबली .  तिचा नवरा सतीश आर्किटेक्ट होता . त्याचं आणि स्मिताचं नातं तसं खूप छान होतं . .फक्त आताशा जरा किरकिर करतो , परस्पर पैशाचे  व्यवहार करत असतो म्हणाली , इतकंच .

सतीश विमनस्क अवस्थेत  स्मिताच्या पार्थिवा जवळ बसला होता .  आभा ला पाहून त्याचा बांध फुटला …….

पोलीस आले होते . त्यांनी आभाला काहीच विचारले नाही , पण तिचा पत्ता आणि फोन नंबर मात्र घेतला  .

दुपारी आभा घरी आली . तिला हे पटतच नव्हतं की स्मिता सारखी कणखर बाई अशी आत्महत्या करेल . सगळं कसं भकास , भयाण वाटत होतं .तिने गॅलरी चा दरवाजा उघडला ,सहज नजर पुलाकडे गेली आणि तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला ..काल ..रात्री ती गाडी ….बरोबर त्याच वेळेला तिथे होती …आधी आपल्या कसं लक्षात आलं नाही …..तेही बरोबरच म्हणा ,

स्मिता च्या बाबतीत अशा काही विचित्र शंका येण्याचं कारणही नव्हतं .

तिला इन्स्पेक्टर राव चा फोन आला . त्यांना काही माहिती हवी होती .

‘ तुम्ही मृत व्यक्तीला केव्हा पासून ओळखता ?”

” सर , प्लिज ‘मृत ‘ न म्हणता स्मिता म्हणा न …. गेले अठ्ठावीस वर्षे ओळखते .”

” त्यांचे कुणाशी काही भांडण …

कोण कोण मित्र मंडळी …

काही कर्ज वगैरे …

नेहेमीचे प्रश्न , नेहीमीच्याच  कोरड्या पद्धतीने …

का माहीत नाही , पण तिने इन्स्पेक्टर ला पुलावरच्या  ‘ त्या ‘ गाडीबद्दल सांगितलेच नाही .   ….कुणाजवळ तरी खूप रडावे असे तिला वाटत होते म्हणून तिने अमितला कॉल केला .

”  हाय सोनू , कशी आहेस ? आणि चक्क ह्यावेळी फोन ? Everything ok? “

” अमित ,  तुला काल परवा स्मिताचा काही मेसेज , निरोप आला होता ?”

” नाही ग , का ?”

“स्मिता इस नो मोअर !! “

” अग बरियेस ना? काय बोलतेस ?”

” हो …तिने आपल्या पुलावरून उडी टाकली म्हणे .”

” Impossible!! Just just impossible !!  मी कालच सतीश शी बोललो . थोडासा वैतागलेला  होता , पण स्मिताबद्दल तक्रार नव्हती . स्मिता तर सुटीवर होती न काल? “

” हो काल रजा होती तिची . खूप रजा शिल्लक आहेत , कंटाळा आला ,म्हणून .”

” अरे जीव का देईल ती , सतीश शी बोल , मी पण फोन करतो त्याला . बापरे ! हे काय भयानक घडलं . अनबिलीवेबल !! “

अमित शी बोलल्यावर आभाच्या मनात पक्क झालं ,की ती आत्महत्या नाहीच . सकाळी अगदी लवकर ती स्मिताकडे गेली . घरात बरेच नातेवाईक होते . त्यातल्या बऱ्याच जणांशी आभाची ओळख होती . पण सतिशशी बोलणं आवश्यक होतं .

क्रमश:

Image by Gerd Altmann from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

11 thoughts on “शोध (एक रहस्य कथा )- भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!