सखी…

सखी…

आज क्लिनिक ला नक्की उशीर होणार.. नव्हे तो मीच करणार..
का?

अहो का काय विचारताय.. ही माझी darling बायको सकाळी सकाळी अशी अचानक बाथरूम पाशी आली.. बरं नेहमी प्रमाणे मी मुद्दाम टॉssssवेल अशी आरोळी ही दिली नव्हती..
हिनंच दारं वाजवलं.. दार किलकिलं करून मी हात बाहेर नेला.. टॉवेल घ्यायला… पण एक मुलायम स्पर्श अनुभवला..

थांबा… भलतेसलते विचार करू नका… आमची ही चं तिचा हात हातात देऊन लाजत होती..
मी पटकन तोंड ही दाराबाहेर काढलं.. आणि एकदा खात्री करून घेतली..
हीच.. आपणहून पुढाकार घेत होती… मग मी ही संधी नं सोडता तिला आत खेचली.. शॉवर चालूच होता..

चिंब भिजलो…  त्या पाण्याच्या पावसात आणि प्रेमात ही.. मग अचानक ही हळवी झाली कि काय अशी शंका आली..

पन्नाशी पार झेंडे लावलेला मी .. चांगला 25 पावसाळ्यांचा अनुभव.. आणि अचानक माझी मुमताज माझ्या कुशीत शिरून रडायला लागली…
ही पहिल्यांदा अशीच धुंद होऊन मिठीत आली होती.. मधुचंद्राच्या रात्री आणि मग अश्शीचं हळवी झाली होती .. घरच्यांची आठवण आली म्हणून…

मला वाटलं.. सध्या सासूबाई “नरम गरम “असतात म्हणून हे रडू आलं असेल…
पण नाही हिने हळूच ‘ती ‘ गोष्ट सांगितली… (अहो… थांबा इतक्यात अभिनंदन करू नका.. म्हणजे गोष्ट एकासाठी आंनदाचीचं असते पण तरीही.. )

आणि पुन्हा गंगा जमुना सुरु झाल्या… मग कसंबसं तिला थोपटत, कुरवाळत समजावलं..
पण पुढच्याच क्षणी हिचा ‘पारा ‘ धोनीच्या सिक्सर सारखा स्टेडियम के बाहर गया…

खरंच… शपथेवर सांगतो…
आज मला माझ्या तीर्थरुपांची प्रचंड आठवण आली..
मला बदडून बदडून शिकायला लावल्याबद्दल..
आणि स्त्री रोग तज्ञ व्हायला भाग पाडल्याबद्दल..
तर आमच्या सौ. चे आता मूड स्विंगस चालू झाले होते… आणि ती एका नाजूक वळणावर येऊन थांबली होती..

रजोनिवृत्तीच्या…

आज तिला खरी गरज “माझी ” होती.. एक मित्र, सखा, नवरा आणि या सगळ्यापेक्षा जास्त एक “बाप ” म्हणून…

मी ही तिचा हात हलकेच हातात घेतला.. आणि म्हणालो..
एक सखी (मासिक पाळी )गेली म्हणून काय बिघडलं… हा सखा तर आहेचं कि हक्काचा…

स्त्री च्या भाव विश्वात ही सखी खूप महत्वाची असते… चार दिवस भेटायला येते.. पण सगळे हट्ट पुरवून घेते.. थकलेल्या शरीराला हक्काची विश्रांती देते.. आणि जेव्हा तिच्या  कायमच्या जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र एक विचित्र पोकळी मनात तयार होते..

हीच ती वेळ असते.. बायकोतल्या सखीला जपायची.. तिचं लहरी वागणं समजून उमजून घ्यायची… हे ज्याला हाताळायला जमेल त्याला तिच्या अवेळी  रागाचा पारा आपोआप खाली आणता येईल.. आणि घरातली शांतता ही..

Image by Ralf Kunze from Pixabay 

3 thoughts on “सखी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!