शोध (एक रहस्य कथा )- भाग २

पहिल्या भागाची लिंक–  शोध (एक रहस्य कथा )- भाग १ 

” सतीश , तू तिला शेवटचं केव्हा बघितलं? “

” सकाळी मी ऑफिस ला जातांना ती घरीच होती . सुट्टी घेतलीये , दुपारी आईकडे जाऊन येते म्हणाली. संध्याकाळी पाच ला तिथून आईकडून निघतांना तिने मला फोन केला होता . मी रात्री नऊ ला घरी आलो ,तेव्हा ती घरीच होती  . आम्ही जेवण केलं , मी थकून दहा ला झोपलो . सकाळी साडेपाचला बघितलं तर ती घरात नव्हती . लागलीच मला पोलिसांचा फोन आला ….”

सतीश ला हुंदके आवरत नव्हते .

” म्हणजे तुमचा काहीही वाद झाला नाही “

” अजिबात नाही . आणि तुला तर माहितेय ती कशी आहे …..होती ….

कधी चुकून वाद झाला जरी ,तरी तिथेच माफी मागून मोकळी !! काही बाकी ठेवतच नव्हती “

” मला खुनाची शंका येतीये .”

” काहीतरीच काय …इतक्या पापभिरू बाईचा खून कोणी का करेल ? “

….तिने आदल्या दिवशी रात्री बघितलेले दृश्य सांगितले .

” ती गाडी ओळखीची आहे तुझ्या ? ” सतीश च्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं .

” नाही रे .. तसं अंतर बरच आहे , नाहीतर नंबर टिपून घेतला असता . “

” चल , इं. राव ला सांगू .”   सतीश चा ताण थोडा निवळला सारखे वाटले तिला .

दोघे पोलीस स्टेशन ला गेले . इं . राव कुणाशीतरी बोलत होते..….काळजी करू नका साहेब ! , आम्ही आहोत ना ! असं काहीसं बोलत होते .

हे दोघे तिथे गेले , त्यांनी मान वर करूनही पाहिलंही नाही . बराच वेळ गेला . शेवटी आभा मध्ये बोलली ..

” सर ,”

” तुम्ही बसा मॅडम , जरा वेळ लागेल ” इं .राव उठले.

तासभर झाला तरी ते वापस आलेच नाहीत . उलट निरोप आला की ते कुठल्या तरी केस साठी बाहेर गेलेत .

हे सगळं फार निराशाजनक होतं.

दोघे वापस सतिशकडे आले . त्यांनि स्मिता च्या वस्तू शोधायला सुरुवात केली . कपाट , ड्रॉवर , तिची पर्स ..

तिच्या पर्स मध्ये एक पावती सापडली .डॉ चं प्रीसक्रिप्शन ,आणि लॉकर च्या चाव्या .

” ही  आमच्या जिमच्या लॉकर ची चावी आहे . ” आभा म्हणाली .

दोघे जिम मध्ये गेले . तिने सहज आल्यासारखे दाखवले . आभा आणि स्मिता चे लॉकर लागूनच होते . तिने स्मिताच्या चावीने तिचे लॉकर उघडले .

त्यात दोन पत्र होते ….कुण्या सारंग दीक्षित चे ….आभाला खूप आश्चर्य वाटले . सतीश चा  पण विश्वासच बसेना , ते प्रेमपत्र होते .

पत्रातल्या प्रमाणे स्मिता आणि सारंग दीक्षित  गेल्या दोन वर्षा पासून भेटत होते . आणि त्यात कुठल्या तरी इन्शुरन्स चा नुसता उल्लेख होता .

सतीश ने ते लॉकर बारकाईने तपासले . त्यात मोजे , wrist band , एक नॅपकिन ..अशा वस्तू होत्या .

“कोण आहे हा सारंग दीक्षित ? तुमच्या ऑफिस मध्ये किंवा संबंधित इतर ऑफिस मध्ये आहे का कुणी ?”

” नाही रे ! माझा विश्वास नाही बसतए , स्मिता ,आणि दुसरा कुणी ? नाही नाही , मला नाही वाटत .ती तुझ्या शिवाय कधीच कुणाच विषयी बोलत नसे .  आणि सतीश ,

आजच्या  डिजिटल युगाच्या काळात प्रेम पत्र ? थोडंस विचित्र नाहीये का ? …तिचा फोन असेल न घरी ? तू बघितलास का ? “

” फोन? स्मिताचा फोन नाहीये ग घरी .काहीच सुचत नाहीये  . डोकं ठण ठण करतंय .ती नाही हे पटतच नाहीये मनाला . अशी कशी गेली मला सोडून ?”

” सावर सतीश ” ती म्हणाली .

आभा घरी आली . आधी तिने एक कप कडक कॉफी करून घेतली  .

तिच्या मनाला हे पटतच नव्हते की स्मिता सारखी धीट , खंबीर स्त्री आत्महत्या करेल . हा इन्स्पेक्टर राव बरोबर माणूस नाहीये . दुसऱ्या एखादया ऑफिसर कडे द्यावी का केस ? सतीश ला सांगावे ..

रात्र भर आभाला नीट झोप लागली नाही . रात्री अकरा वाजता सतीश चा फोन आला .

” आभा ,  स्मिताच्या कपाटात एक pen drive सापडलाय . त्यात आमचे बरेच जुने जुने फोटोज आहेत ,आणि काही एका दुसऱ्याच माणसाबरोबर आहेत … उद्या तू बघ . तुझ्या ओळखीचा वाटतोय का ..”

दुसऱ्या दिवशी आभा ऑफिस नंतर स्मिता कडे गेली .  आता कुणीच पाहुणे राहिले नव्हते .फक्त सतिशची आई होती . आभा ला पेन ड्राईव्ह हवा होता . सतीश घरी नव्हता .

” काकू , सतीश कुठे आहे ?  “

”  बरं झालं तू आलीस ,  सतीश काल रात्रीपासुन घरीच  आला नाहीये.

” काल पासून घरीच आला नाही ? तुम्ही फोन केला का ? “

” फोन लागत नाहीये ग . त्याच्या मित्रांकडे बघतेस का आभा ? मला तर कुणाचीच ओळख नाहीये . त्याने स्वतः चं काही बरंवाईट तर …”

” मी बघते काकू ,काळजी करू नका . नाहीतर दुपारी पोलिसांत कळवावे लागेल …….बरं ..त्याने काही ठेवलंय का मला द्यायला ? “

हो म्हणून काकूंनी पेन ड्राईव्ह दिला.   आभा घरी आली आणि PD लॅपटॉप ला लावला . त्यात स्मिता आणि सतीश चे बरेच फोटो होते . सिंगापूर ट्रिप , पहिली   ऍनिवर्सरी , बरेच …..आणि शेवटच्या फोल्डर मध्ये …तिचे जवळीक दाखवणारे फोटो होते ….हा कोण ? दुसऱ्याच माणसाबरोबर ?….ते फोटो अश्लील नव्हते , पण कुण्या परक्या माणसाबरोबर कोणती बाई त्याच्या कमरेवर हात ठेवून फोटो काढेल ? जवळ चिटकून गालाला गाल लावून …

आभाचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना . कुठेतरी काहीतरी चुकतंय …

आभा  B.S.C. L.L.B  होती . ह्या कंपनीत येण्या आधी दोन वर्षे तिने सिनियर ऍडव्होकेट  देशमुख सरांकडे वकिली केली होती . त्यामुळे त्यांच्याकडे ती शिकली होती  की ..

‘ चित्र तसं नाही बघायचं जे लोक आपल्याला दाखवतात . आपण परिस्थिती नुसार  आपल्या नजरेतून चित्राचे अवलोकन करायचं असतं ‘

तिचे ठाम मत झाले की कुणीतरी स्मिताच्या खुनाला मुद्दाम आत्महत्या दाखवायचा प्रयत्न करतोय . कोण आणि का ?

तिने घाईघाईत जेवण उरकले , आणि नीता ला फोन केला . नीता एक फोटोग्राफर, इमेज डेव्हलपर , ग्राफिक डिझायनर होती  . पोलिसांना सायबर क्राईम सेल ला फ्रीलान्सर म्हणून मदत पण करायची . लगेच सतिशच्या घरी फोन केला . अजूनही सतिशचा पत्ता नव्हता  .

नीता तिचा सगळा सेटअप घेऊनच आली . आभा ने तिला सगळी हकीकत सांगितली . ते सांगताना सुद्धा तिला भरून येत होतं . तिने स्मिता आणि सतीश चे भरपूर फोटो निताजवळ दिले , ज्यामुळे तिला इमेजेस चा तुलनात्मक अभ्यास सोपा होणार होता .

” ओह ,वाईट आहे हे सगळं . पहिली गोष्ट म्हणजे त्या इन्स्पेक्टर राव वर अजिबात विश्वास ठेवू नका . एक नंबर लालची माणूस आहे .शक्य झालं तर इन्स्पेक्टर तुषार देव कडे केस देता येते का बघा . अतिशय धडाडीचा आणि सच्चा ऑफिसर आहे .” नीता ने लॅपटॉप सुरु करत म्हटलं.

तिने तो पेन ड्राईव्ह आपल्या लॅपटॉप ला लावला . काही टेस्टिंग केले . इमेज री बिल्डिंग चेक केले आणि तासभरात  समाधानाने आभा कडे पाहिलं .

” गेल्या  आठवड्यात घाई घाईने हे फोटो शॉप केले आहे . चेहेरा स्वॅप करणे आता छोटे मुलं पण करू शकतात . हा फोटो ओरिजनल कुणाचा होता हे  पण मी सांगू शकते ,फक्त मला दोन दिवस दे. ह्या फोटोतल्या माणसाला आत्ताच शोधुयात आपण ”  नीता म्हणाली .

क्रमश:

Image by Gerd Altmann from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

11 thoughts on “शोध (एक रहस्य कथा )- भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!