पार्टनर
“त्या येड्याच्या कोण प्रेमात पडेल, त्याची बायको फसलीये तेवढी पुरे.”
” प्रेम अन त्या झिपरीवर, छया ! काहीही काय? ”
अशी एकमेकांविषयी टोकाची मतं असलेल्या दोन व्यक्ती, एकमेकांसमोर बसल्या होत्या. . . . एसबी रोडचं पॅव्हेलिअन मॉलचं फूड कोर्ट. . . . दोघांच्या रुलनुसार मोबाईल बाजूला ठेवलेले.
नेहमीची चहा अन बनमस्काची ऑर्डर पुढयात.
” काय सांगतोस, . . . जॉब गेला तुझा, . . . असा कसा गेला, अचानक . . . .थोडंफार काम करायचंस ना रे, . . . . नाही जमत काम तर किमान तसं नाटक तरी करायचं ना.”
” तुला चेष्टा सुचतेय, बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड आहे दरवर्षी मला.”
” तरीपण गेलाच ना . . . जाऊ दे . . . नवीन शोध. . . . . .आता घराच्या हप्त्याचं काय ? ”
” होईल मॅनेज दोन तीन महिने.”
” आणि घरखर्च ?”
” तेही होईल कसंही, बघू, . . . . . आई ऍडमिट आहे तिचा खर्च महत्वाचा आहे.”
” लागेल तर सांग , मी देईन , मी ही केलीय थोडीफार सेविंग. काळजी करू नको.”
तेवढ्या वाक्यानंही तो थोडा रिलॅक्स झाला.
” हं, तु कधी चाललीस बंगलोरला ? तुझ्या कलेजीला भेटायला . . . .”
” अरे, काळीजच येतंय नेक्स्ट वीक, पुण्यात.”
” तोवर जरा ब्युटीशीयन कडे जाऊन ये. . . . . अशाच अवतारात जाऊ नकोस, भेटायला त्याला.”
” तू गप हां गबाळ्या, . . तो मरतो माझ्यावर, . . मला गरज नाही ब्युटीशीयनची.”
” अरे तो हॅन्डसम हिरो, . . . तू कुठं. . . . पण जाऊ दे नकोच जाउस ब्युटीशीयनकडे, . . . उगाच तुला ओळखलंच नाहीतर काय घ्या.”
या वाक्यावर मात्र त्याला फटका पडला.
आता दोघे बनमस्कात गुंतले. तसं म्हटलं तर ते काहीच बोलत नव्हते, . . . . . .
पण चहा सोबतची निशब्दता, खूप काही बडबडत होती.
फार काही नाही, . . . पण एकमेकांना न बोलताच सूचना देणं सुरू होतं. . . . . . . दोघांचं आपापलं परिपुर्ण जीवन होतं. . . कधीतरी, व्यावसायिक कारणावरून भेटणं होत होतं. एकच बनमस्का हावऱ्यासारखे वाटून, भांडून खाण्याइतपत सहज मैत्र होतं. . . . . आणी पार्टनरशिपही.
हो, . . . ते दोघे एका छोट्याशा डिजाईन कन्सल्टन्सीत एकमेकांचे पार्टनर होते. म्हणावं असं इन्कम नव्हतं अजून. पण कन्सल्टन्सीच्या मार्केटिंग वर जास्त लक्ष दिलं तर हळूहळू गाडी रुळावर आली असती. आणि आज तिलाही हेच सुचवायचं होतं. पण एवढा हायसॅलरीड जॉब गेल्याच्या धक्क्यातून त्याला सावरायला वेळ द्यायला हवा, म्हणून ती थांबली.
चहा संपला होता…. आणि पार्टनरशिप साठी ठरलेला वेळही.
“आईची काळजी घे……”
जाता जाता तिनं, त्याच्याकडे न पाहताच , त्याच्या पाठीत थाप टाकली, . . . . त्यानंही मागे वळून बाय म्हणण्याची तसदी घेतली नाही. . . .. .
अन दोघे आपापल्या नेमस्त मार्गांवर मार्गस्थ झाले.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
पुढच्या वीकेंडला ठरल्याप्रमाणे काळीज पुण्यात उतरलं, . . . नाही म्हणता म्हणता ती चांगलीच नटून गेली होती. काळीज विरघळलं अगदी.
धमाल वीकएंड झाला तिचा, . . .पहाटे सिंहगड, . . .दुपारी खंडाळा लॉंगड्राईव्ह . . . . सी सी डी . . . काही संयम सुटण्याचे क्षण, काही संयम शिकण्याचे क्षण, आणि बरंच काही, . . . . .
शनिवार संपला.
रात्री aquaris वर पार्टी होती, कलेजीच्या कंपनीची. पुण्यातल्या हेड ऑफिसमधले सगळे सिनिअर्स आणि कलीग्ज. . . ग्लासांचा कीणकिणाट . . . . . कॉंटिनेंटल मेनुजचा दरवळ. . . . . मंद प्रकाशातले कपल डान्स.
‘ती’ चं काळीज. . . सेन्टर ऑफ attraction होतं सगळ्यांचं. त्याची वूड बी असल्याने तिलाही मान देणं चालू होतं सतत. ‘ती’ अगदी भारावून जायची वेळ. . . . . टॉप ऑफ द वर्ल्ड का काय म्हणतात तशी भावना मनात. तिचं गॉजस् दिसणं, तिला प्रत्येकाच्या नजरेत जाणवत होतं.
उद्या आई बाबांची अन कलेजीची भेट होणार होती. तसे ते आधी भेटले होतेच. पण उद्या फॉर्मल डिसिजन होणार होता, इतकंच. पण उगाच मनात हलकी धाकधूक सुरू होती.
का …. कुणास ठाऊक ?
पण लग्नाळू मुलीसारखी ती धडधड तिला आवडली नाही. आजतागायत आयुष्यातले तिचे सर्व निर्णय तिनेच घेतले होते. त्यामुळं ही हुरहूर तिला मनापासून पटली नाही. उगाच परावलंबी असल्यासारखं वाटून गेलं. पण काही मिनिटंच. पुढच्या काही मिनिटात तिनं स्वतःला सावरलं होतं. तिच्या निर्णयाला आई बाबा पाठिंबा देतील ही तिला खात्री होती. पण तिचं लग्न जवळजवळ ठरल्यासारखं असुनही, त्यांच्यासाठी तो काळजीचा विषय होता. त्यांची काळजी तिला लवकरात लवकर दूर करायची होती. तिचं ‘काळीज’ तिला कधीही अंतर देणार नाही, हे ही तिला पक्कं ठाऊक होतं. ती त्याला त्याच्या कलीग्ज सोबत एन्जॉय करताना डोळे भरून पहात होती.
पण . . . . . . अजूनही पण उरलाच होता. का ते समजत नव्हतं.
नक्की काय होत होतं, तेही माहीत नव्हतं? आतून अचानक पोकळ वाटू लागलं होतं मन. . . . पाय पार्टीतून दूर ओढत असल्याची जाणीव तिला होउ लागली. हे नक्की काय होतं, हे तिला समजण्या पलीकडं होतं सगळं. तिनं आधीही दोन तीन वेळा अशा पार्ट्या तिच्या कलेजीसोबत एन्जॉय केल्या होत्या. पण आज काहीतरी वेगळं होत होतं.
तो मित्रांसोबत गप्पात रंगलाय पाहून ‘ती’ बोट क्लब कडे आली. बोटी खडकवासल्याच्या पाण्यावर हेलकावे खात होत्या अन तिचं मनही.
‘ती’चं मन थाऱ्यावर नव्हतं. पार्टीत मन लागत नव्हतं. काय करावं आई बाबांना फोन करावा का? इतक्या रात्री. . . . . .
मनाचा हिय्या करून ‘ती’ने घरी फोन लावून पाहिला. पण तिचं नेटवर्क नव्हतं. आता घालमेल अजून वाढली. काय होतंय काही समजेना. इतक्या सुंदर वातावरणात ती अस्वस्थ होती ? का? तिलाच समजत नव्हतं. ‘काळीज’ पार्टीत रमलं होतं. इतक्यात स्वारी घरी निघेल असं लक्षण नव्हतं. . . . . .
पण ही हुरहूर कसली हे मात्र समजत नव्हतं. . . . एक जागी मन लागत नव्हतं.
श्वास अडकावा इतका कंठ रुद्ध झाला, . . . . . . कुठेतरी तिची गरज होती. आई बाबांची काळजी वाटू लागली. आता तिला राहवेना . . .
जवळजवळ तीन वाजत आले, तेव्हा कुठं पार्टीची निरवानीरव झाली. आता तिलाच कार ड्राईव्ह करणं भाग होतं. खडकवासला सोडून पुढं आल्यावर फोनचे मेसेजेस वाजू लागले. तिनं ड्राइविंग वर लक्ष केंद्रित केलं. कलेजीला त्याच्या हॉटेलवर सोडून ती भरधाव घरी निघाली.. . .
डोक्यात विचार सुरूच होते, नक्की काय होतं जे आपल्याला अस्वस्थ करत होतं. . . . . .
ही कोणती भावनिक जबाबदारी होती. . . .
तिचा ऍक्सीलरेटर वाढला. . .
सगळं ऑल वेल असताना, तिला काय अस्वस्थ करून गेलं होतं. . . .
कदाचित आई बाबा . . . त्यांचा मिस कॉल पण चेक नाही केला बापरे . . . . . . .
तिच्या डोक्यात काहीतरी विचार आला अन तिने कार बाजूला पार्क केली. घाईघाईने मोबाइल पाहू लागली.
कित्येक ग्रुप्सचे भाराभर मेसेजेस पार करत ती बरीच खाली आली अन . . . . . . .
“त्या” चा मेसेज होता, रात्री बारानंतरचा . . . . . .
“पार्टनर, आई गेली”
भावनांची ही पार्टनरशीप लक्षातच नाही आली.
Image by Gerd Altmann from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Mast !!
झक्कास
अशी भावनिक पार्टनरशिप खूप सुंदर असते
मोठ्ठा भावनिक आधार असतो…..
वाह वाह जबरदस्त
Speechless 🙄
Solid
एकदम मस्तं
Mastch
वाह कमाल 👌🏻👍🏻
Dhanywad mitrano !
सहज… सुंदर..
Superbb👌👌
jabardast
झक्कास 👌👌👌
वाह
Heart touching…… Writing….. Mastach ahe