दिवाळी स्पेशल १
विनूची विकेट लेखिका- अपर्णा देशपांडे
रात्रीची वेळ . भिंतीपाशी काहीतरी हालचाल होत होती . गेल्या काही दिवसांपासून अप्पांना संशय येत होता की कुणीतरी रात्री भिंतीवरून आपल्या घरात येतंय . तशी अजूनतरी चोरी झाली नव्हती , पण चोराला रंगे हात पकडण्यासाठी त्यांनी गोपू ला बोलावले होते . अप्पांचा गोपू वर फार विश्वास . एखाद्या खास एजंट ला कामगिरी सोपवावी तश्या थाटात अप्पांनी गोपुला इथे नेमले होते .
गोपु देखील लगेच जॅकेट , गॉगल आणि दुर्बीण घेऊन तयारीत आला होता . 007 ला लाजवेल अशी कामगिरी करण्याच्या आवेशात ! जेम्स बॉण्ड ने बघीतला असता तर आपला राजीनामा दिला असता इयन फ्लेमिंग्स कडे . बाबारे , तू ‘बॉण्ड ‘ ला सोड आणि ‘ गोपु ‘ वर लिही म्हणून !
तसा गोपु पण काही कमी बहाद्दर नव्हता . जेव्हा गावातील दामू आण्णा ला शंका होती की आपला जावाई नामदेव याचं त्या चंचल चमेली बरोबर ‘ आहे ‘ , तेव्हा त्यांनी गोपुलाच नेमले होते खास माहिती काढायला . तेव्हा पठ्ठ्या पूर्ण कित्येक तास चमेलीच्या घराच्या छपरावर जाऊन लपला होता . दोन कौलं बाजूला सरकवून खाली वाकून नजर लावून बसला होता .
नामदेव आलाच नाही , बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला तिथेच झोप लागली , तोल गेला आणि महाराज दाणकन खाली पडले होते . मग खुद्द चमेलीनेच फटके मारून पळवला होता तिथून . इतका बहाद्दर होता हा देशी जेम्स बॉण्ड !
आता अप्पांच्या सांगण्यावरून गोपु भिंतीपाशी दबा घरून बसला होता . रात्रीच्या अंधारात तोंडाला फडके बांधलेल्या अवस्थेत कुणीतरी भिंतीवरून धप्पकन आत उडी टाकली , तशी गोपूने त्याची मानगूट पकडली , आणि आता मोठ्याने बोंबलणार इतक्यात त्याचे तोंड दाबल्या गेले …
” ओरडू नको बे !! मीच आहे , मी ! “
” मी म्हणजे कोण ? ” बावचळलेला गोपू .
” नालायका , मी ! विनू ! ….आणि तू इथे काय करतोय इतक्या रात्री ? “
” हात लेका , तू ? …” गोपु मोठ्याने बोलणार इतक्यात …
” हळू बोल न रे !! ” विनू ने पुन्हा त्याचे तोंड दाबले .
आतील लाईट लागला होता , म्हणजे अप्पा उठले असणार .
” गोपु , आला कारे चोर ? “
” नाही अप्पा ! मी आहे इथे , काळजी नका करू . विनू झोपलाय आत . तुम्हीपण झोपा .”
आपला मोर्चा विनू कडे वळवून पूर्ण आवेशात म्हणाला ,
” मला माहितेय तू कुठून येतोयस ते . अप्पांना कळाले ना तर तुझ्या आधी माझी चटणी करतील ते .” आपल्याला गावातील सगळ्यांचं सगळं माहीत असतं ह्या भ्रमात असे गोपु .
” तुला माहितेय ? कुठून येतोय … सांग बरं ! “
” विन्या , महिताय मला की तुझी विकेट पडलीये . उस्ताद च्या मालू ला भेटायला गेला होतास न ? ….. सगळं बघतोय मी . काय काय गिफ्ट देत असतोस तिला . तुला म्हणालो होतो , माझ्या सोबत फलटण ला चल , तर नाही !! मालू बसलीय न डोक्यात ! “
“…….”
” इकडे बिचाऱ्या अप्पांना वाटतंय की कुणी चोर येत असतो भिंतीवरून . ..पण काय रे , रोज अशा कोलांट उड्या मारतोएस , भेटली का मालू ? “
” नाही न यार ! त्या सांड उस्तादने तिला आत तिच्या खोलीत बंद केलय म्हणे . बाहेर येऊच देत नाही . किती दिवस झाले मी तरसतोय . काहीतरी कर न यार ! मला भेटायचंय तिला . जय , इस विरु को उसकी बसंती से मिला दो . “
” ए s गप्प बस ! इकडे अप्पा अन तिकडे तो पहेलवान कुटतील मला . तुला काय जातंय डायलॉग
मारायला !! “
” गोप्या , तूच ना रे आता ह्या वयात मला सोबतीला . तूच ना माझा खरा मित्र !! ” विनू लोणी लावत होता .
” बास बास ! रूलाएगा क्या ? सांगतो , पण माझे म्हणणे पूर्णपणे ऐकायचे . आपल्याच मनाचे करायचे नाही . ऐक तर !!! “
गोपाल च्या कुरापती डोक्यातून प्लॅन तयार झाला होता .
******** दिगंबर( डेबू ) पहेलवान आपल्या आखाड्यात मोठी खुर्ची टाकून बसले होते . दोन्ही बाजुने दोन शिष्य तेल लावून मालिश करत होते .
धिप्पाड डेबू उस्ताद ला मालिश करणारे देखील तितकेच ताकदीचे लागत . रुंद आडवे शरीर , गच्च झुपकेदार मिश्या आणि मूसळा ला लाजवतील असे दंड . दुसरीतच शाळेला रामराम , सगळी ताकद पहेलवानीतच अशी गत होती .
आपल्या दहावी पास , टरबूजा प्रमाणे फुगलेल्या , गेल्या पाच वर्षांपासून बी . ए . फर्स्ट ईअर ची लक्ष्मण रेषा न ओलांडलेल्या लाडक्या लेकीला म्हणजे मालूला आपल्याही पेक्षा मोठा पहेलवान नवरा मिळावा ही त्यांची इच्छा होती , पण पहेलवाणीन बाईंचा , म्हणजे शालू ताईंचा याला जोरदार विरोध होता . मागच्याच आठवड्यातील गोष्ट …….
शालूताई स्वयंपाक घरात होत्या . तश्या त्या तिथेच जास्त असत कारण उस्तादजींचा आहार !! सकाळी अर्धा लिटर दूध , पावकिलो बदाम , आठ दहा अंडी ,आणि दुपारी जेवणाला …….यादी मोठी होती ….
तर त्या स्वयपाक करत असतांना उस्ताद तिथे आले .
” मालुताई , “
” ईश्श !! तुम्ही का ताई म्हणताय ?”
” अग हो , पण ते ….कधी …असं ….”
” शालू म्हणा नं ! किती गोड वाटतं ! “
” शा sलू ! ….शा sलू ! ‘ …इतक्यात मालू तिथे आली तसा उस्ताद नि सावरून घेत खोकलण्याचा आवाज काढला .
” बरं झालं मालू तू आलीस . आम्ही तुझ्या लग्नाचेच बोलत होतो ….”
… कसली लाजली मालू !!
” अग , लाजतेस काय ? कुणाशी लावून देतायत तुझं लग्न , हे तरी विचार ! ! ” शालू ताई खेकसल्या , तशी मालू स्वप्नातून सत्यात उतरलेल्या अप्सरेसारखी आपले बटनासारखे डोळे घेऊन उस्ताद कडे बघू लागली .
” तुझ्या आईचं काय ऐकतीस माले !!
असा नवरा बघितलाय मी तुझ्या साठी !! विचार कोण ? “
” कोण ? “
” तो आपल्या कळंज गावचा यंदाचा
‘ फोलाद केसरी’ ढालेचा मानकरी नाही का , तो ! “
” आन लग्न झालं ना , की त्या ढालेचे तुकडे करून वरणात कुस्करून खात जा नवरा बायको !! ” शालू बाई आवेशात म्हणाल्या . “आपलं दोन मजली घर दिसतंय ते तुझ्या आजोबांनी बांधलंय . नाहीतर
हे s s……जेवण करायचं आन हात पुसायचे ××××ला . नुसतं खायचं आन कुस्त्या करायच्या . हॅ s s !!! ते तालिमितले पोरं, वर्ष वर्ष फिस देत नाहीत . आन ह्ये! त्यांना हे खायला घाल , ते खायला घाल. किती लाड !! “
आता उस्ताद खवळले . ” सारखं काय माझ्या पोरांवर घसरते तू ? आता आठ दिवस झाले , कुठं काय आणलं खायला ? “
” ओहोहोहो !! ते तर आत्ता आपले फ्रीज खराब झाले म्हणून ! नाहीतर , येरे लखु बदाम दूध घे , येरे नाऱ्या हे ओले खोबरे खा !
खिशात नाही दमड्या आन बदाम खा रे बाबड्या !!! ” शालू बाईंची नेहमीची बडबड .
” मी सांगितलंय फ्रिज बद्दल , आज पोरं घेऊन जातील दुरुस्तीला .”
” ते स्थळाचं मनावर घ्या जरा. ” उस्ताद म्हणाले , पण
मालूने काहीच प्रतिक्रिया दिली नाही .
बोलून काहीच उपयोग नाही असे बघून
उस्ताद तिथून निघून गेले .
एकंदर परिस्थिती चा अंदाज आल्याने मालू ने आई जवळ तोंड उघडले . तिला विनू कसा आवडतो , तो कापड मीलमध्ये सुपरवायझर आहे …वगैरे . आई ने ताबडतोब ही बातमी उस्ताद ला सांगितली . मग काय महाराजा , उस्ताद शांतपणे उठले , मालूला बोलावलं ,
वरून शांत आतून खळबळ आशा अवस्थेत तिला वरच्या खोलीत जायला सांगितलं . आता सांगितल्या शिवाय खाली यायचे नाही अशी ताकीद पण दिली आणि वर आपल्या एका पट्टशिष्याला पहाऱ्याला उभे केले .
मालूच्या लक्षात आले की आपल्या बी. बी .सी . लंडन मातोश्रींनी बातमी पिताश्रीं पर्यंत पोचोवलेली आहे .
********* आपल्या देसी 007 ने ( गोपुने ) मालू च्या घराचा , बाहेरील आखाड्याचा नीट अभ्यास केला . ओसामा बिन लादेन च्या वेळेस आबोटाबाद ची काय माहिती काढली असेल अमेरिकेने , त्याही पेक्षा जास्त माहिती गोपू ने गोळा केली .
शेवटी त्याच्या मित्राच्या प्रेमाचा प्रश्न होता . आखाड्याच्या बाजूला एक मोठे गुलमोहोराचे झाड होते . त्याची एक जाड फांदी मालूच्या खोली जवळून जात होती.
रात्री दोन वाजता आपला जेम्स बॉण्ड आणि अधीर विनू गुलमोराच्या झाडाखाली आले . गोपु ने शिडी आणली होती . शिडी झाडाला टेकवून
त्याने विनूला त्या जाड फांदीपर्यंत पोचवले . सगळं प्लॅन प्रमाणे होत होतं . विनू फांदीवर चढला की गोपूने शिडी काढून घेतली . विनूने अंगठा उंचावून खूण केली तसा गोपू वापस निघाला .
विनू ने फांदीवरून अलगद कठड्यावर उडी टाकली . काही मिनिटं तिथेच शांत बसून राहिला . गुढग्यावर चालत तो दरवाजापर्यंत येणार इतक्यात समोर बघतो तर बाबू लोखंडे !!! उस्ताद चा लाडका शिष्य आणि विनूचा 36 आकड्याचा ‘मित्र’ !
हा एक अनपेक्षित धक्का होता .
मालूच्या खोली समोर बाबू खुर्चीत पेंगत होते . गोपु ने विनूला बऱ्याच शक्यता सांगून त्यावर उपाय सांगितले होते .
मालू जागेवर नसेल तर काय करायचं , शालुकाकी अचानक आल्या तर काय वगैरे .…
पण कुणी पहेलवान सामोरा आला तर काय करायचं ह्याची रंगीत तालीम नव्हती झाली .
आता इथपर्यंत येऊन आपल्या मालूची भेट हा होऊ देणार नाही ह्या विचाराने विनू चिडला .
मग त्याने गोपु गुरुजींनी सांगितलेला एक उपाय अमलात आणला . कठड्याच्या बाजूने खिडकी होती . तिथे जाऊन त्याने ” म्या s व , म्या s व ” आवाज करायला सुरुवात केली . असे त्याने ह्या आधी मालूला बोलावण्या करता केले होते .
मालू जागी झाली . तिने हळूच दार उघडले . तिला असे झोपेतून उठून आलेली बघितल्यावर विनूला प्रेमाचे भरते आले , पण शेवटी ती पहेलवानाची मुलगीच .
तिने लुकड्या विनूची कॉलर पकडली … त्याला जवळजवळ उचलूनच आत ओढला ….पण फरफटत आत जातांना
विनूच्या पायाचा धक्का खुर्चीतल्या बाबू ला लागला ….बाबू उठला…..पण तेव्हढ्यात मालूने चपळाईने दरवाजा लावला ….
विनू भीतीने थरथर कापत होता…..एव्हढी मालू त्याच्या समोर असून त्याला काहीच सुचले नाही . त्याने तिच्यासाठी चांदीचे पैंजण , आणि झुमके आणले होते . ते पाहून आनंदाने मालूनेच येऊन त्याला मिठी मारली .
तत्क्षणी विनूला तिच्या अवाढव्य विस्ताराची आणि स्वतःच्या तोकड्या ‘पहेलवानीची’ कल्पना आली .
मालूच्या मिठीत गुदमरत असतांनाच दारावर थाप ऐकू आली .
” मालू बाई , तुम्ही ठीक आहात न ? “
त्याने विचारले .
” हो बाबू , तुम्ही बाहेर आहात की नाही हे पाहण्यासाठी दार उघडले होते .” ती हे म्हणतांनाच तिचा वजनदार पाय विनू च्या पायावर पडला आणि विनू जिवाच्या आकांताने ओरडला .
झालं !!!!!
सगळ्या घरात लाईट्स लागले , बाबू ने दारावर बुक्क्या मारत ओरडायला सुरुवात केली .
विनू ला भीतीने भोवळ येत होती , मालू मात्र शांत होती . तिने घराच्या आतल्या बाजूचे दार उघडले ….विनू कोपऱ्यात नुसताच उभा होता .
मालू त्याच्या कानात कुजबुजली .
” इथून पायरीवरून खाली उतर . डाव्या हाताला कोठीघर आहे . तिथे एखाद्या धान्याच्या डब्यात लप . मी तुला बाहेर काढीन , तोपर्यंत तिथेच रहा . जा आता लवकर .”
विनू खाली पळाला .
मालूने शांत पणे कठड्याकडील दार उघडले ” काय रे बाबू ? का दार बडवतोय ? साप चावला का ? “
” नाही , आत कोणी चोर घुसलाय बहुतेक मी आवाज ऐकला . “
तो पर्यंत विनू खाली निघाला होता .
पायऱ्या उतरून खाली येतो तर समोर खुद्द उस्ताद !!! घराच्या आतील आखाड्यात उभे राहून वरच्या खोली कडे बघत पाठमोरे उभे !!
” काय रे गणोबा !! काय गडबड चालू आहे ? ” उस्ताद चा पहाडी आवाज .
” काही नाही उस्ताद !! सगळं ठीक!! “
पाणी पाणी अवस्थेत विनू एक एक पाऊल मांजराच्या पावलाने टाकत ओटा ओलांडत होता , इतक्यात उस्ताद वळले . मांजर मागे लागल्यावर उंदराने बीळ गाठावे तशा चपळाईने विनू कोठीघरात गेला . तिथे नुसता राडा होता . हाताला कपाटासारखे काही लागले म्हणून त्याने उघडले तर ते बंद पडलेले मोठे फ्रीज होते . अंग मुडपून विनू त्यात बसला ,आणि दार लावून घेतले .
******** सकाळीच अप्पांचा निरोप आला होता , विनू त्याच्या खोलीत नसल्याचे त्यांना कळाले होते . गोपाल ला दुकान उघडायच्या आधीच तातडीने बोलावले होते .
” अप्पा , विनू घरात नाहीये ? “
” वेड्याचं सोंग घेऊ नकोस . आत्ताच्या आत्ता घेऊन ये त्याला . नाहीतर तुझ्या बा ला सांगतो की तू दुकानातील वस्तू त्या सुताराच्या विद्याला देत असतोस , तेही फुकटात !!! “
“आयला ! ब्लॅकमेल अप्पा ? ” गोपु ओरडला .
“निघा आता “
***** चार हट्टे कट्टे पहेलवान मिळून कोठीघरातील फ्रीज उचलून दुरुस्तीला नेट होते .
” उस्तादजी , जड लागतोय फ्रीज . “
” गाढवांनो ! कसरत करा , कसरत ! चौघात मिळून एक फ्रीज नाही उचलता येत ? म्हणे कुस्तीगीर !! “
आत विनूचा पार खुळखुळा झाला होता . सगळ्या अंगाला रग लागली होती . त्याला पहाटे पहाटे फ्रिजमध्येच झोप लागली होती . आणि अचानक फ्रिज उचलल्या गेले होते .
त्याच्या छोट्याश्या मेंदूला ताण देत तो आपण नेमके कुठे आहोत ह्याचा अंदाज येई पर्यंतच तो पुन्हाअडकला होता .
आतून ओरडावे तर सरळ सरळ सशाला कोल्ह्या पुढे टाकल्या सारखे झाले असते . त्याने खिशाला हात लावून मोबाईल असल्याची खात्री केली . पण आता इथून बोलायची चोरी .
” थांबा . अरे नाथा , त्या दरवाजाला कुलूप लाव रे . नाहीतर टेम्पो मध्ये भरतांना दरवाजा उघडेल . “
…..हा आवाज उस्तादजींचा . ..बाप रे! हे आता फ्रिज लॉक करत आहेत !!
मालू , तुझ्या प्रेमात माझा होतोय उकडलेला आलू……असा विचार करत विनू दुखरे अंग घेऊन तसाच बसून राहिला .
प्रचंड उलथापालथ करत फ्रिज आधी टेम्पो , मग खड्डेमय रस्त्यातून मेकॅनिक कडे पोहोचला . बाहेरचा आवाज शांत होई पर्यंत विनू फ्रिज च्या मागील एकमेव सूक्ष्म छिद्रातून श्वास घेत होता . नंतर त्याने आपण अडगळीच्या जागी आहोत असा अंदाज घेऊन विनू ला फोन लावला .
” अरे कुठाय तू विन्या ? “
” आधी मला इथून बाहेर काढ ! “
” ओहो ! रात्रभर मालू सोबत ? त्याच झाडावरून ये की खाली! “
” कानाखाली आवाज काढतो तुझ्या!! ..मी…मी इथे आहे …कुठे…माहीत नाही..
” चढली कारे तुला ? की मालू उतरली नाहीये अजून! “
” हरामखोरा , मी फ्रिज मध्ये आहे! “
” आईस्क्रीम खातोएस ? “
” विन्या , फोनची बॅटरी मरतेय रे ! मी फ्रिज मध्ये लपलोय. जे आता कुण्या मेकॅनिक कडे आहे . …मला सोडव रे दोस्ता . “
” मालू पण आहे का तुझ्या सोबत ? “
विनू उत्तर देऊ शकला नाही , बॅटरी गुल झाली होती . पण विनूच्या प्रश्नाची त्याला कीव आली . मालू ? ह्या फ्रिज मध्ये ? आणि तो फिसकन हसला . त्याच्या डोळ्यासमोर चित्र आले…हत्तीचं पिल्लू मालू…अशी फ्रिज मध्ये …आणि तो भान विसरून हसला .
” कोण आहे फ्रिज मध्ये? ….पाटील साहेब , ओ साहेब! कुणी आहे फ्रिज मध्ये! ” बाहेरून आवाज आला .
‘ अच्छा ! म्हणजे पाटील च्या दुकानात आहे मी ! ‘ विनूला हायसं वाटलं .
******* विनू आणि गोपाल तळ्याच्या काठावर बसले होते .
” यार , तू सोडवलंस मला . “
” तुझ्या सुटकेसाठी कळकट कपडे घालून गॅरेज मध्ये गेलो . चोरून ड्रॉवर मधल्या किल्ल्या बघितल्या ,आणि गुपचूप तुला बाहेर काढले . “
” अप्पा ना सांगू नकोस रे ! “
” खरं सांगू ? अप्पांनीच मला पहेलवानकडे जा म्हणून सांगितले . तुझा फोन तर उशिरा आला . “
” काय ? पण …..त्यांना कसे समजले ..”
” त्यांना तो आपला राजेंद्र आणि संजू भेटले होते ….”
” त्यांचा इथे काय संबंध ? “
” तू आतापर्यंत मालूला भारी भारी भेटवस्तू दिल्यात न? सोन्याचे कानातले , चांदीचे दागिने , हो न ? “
” हो s , तुला तर माहितेय ना ! त्याचं काय इतकं? माझं प्रेम आहे तिच्यावर ! “
” तिचे आहे तुझ्यावर ?”
” हो s ! ती माझ्यासोबत पळून जायला तयार आहे . “
” तोंड बघ आरशात ! हेच तिने राजेंद्र आणि संजूलाही सांगितले होते . विनू , रात्री बाबू पहेलवान पहाऱ्याला होता ?..बरोबर?….मालूने दार उघडले?…तुझ्याकडून गिफ्ट घेतल्या……मग बाबूने दार बडवून आवाज करून तुला पळवले ? “
” हो! हो!! तुला कसे माहीत? ……लवकर पुढे बोल न बाबा!! “
” राजेंद्र आणि संजू , बावळट ! तेही मालूच्या नादात त्याला म्हणजे बाबूला भारी परफ्यूम , टी शर्ट , अन काय काय देत असत ….रात्री मालूला भेटायला जात तेव्हा बरं का!…. ….मालू आणि तो पहारेकरी बाबू यांचेच सेटिंग आहे !!!!
अप्पांना। राजेंद्र आणि संजू भेटले तेव्हा त्यांनीच सगळे सांगितले .तिने दुसऱ्या कुणाचे प्रेमाने नाव घेतले की उस्ताद बाबूलाच पहाऱ्याला बसवतात. आणि त्यांना दोघांना तेच हवे असते ….हेही सांगितले त्यांनी अप्पांना . अन तू ! येडा समजतोय ..की…..”
” बास गोप्या , बास . आता अजून जखमेवर मीठ चोळू नकोस . “
विनूचा चेहरा प्रेमभंग झालेल्या मजनू पेक्षाही केविलवाणा झाला होता .
दोघे घरी पोहोचले तेव्हा अप्पा शांतपणे वाट बघत होते .
” काय जेम्स बॉण्ड 007 ? सापडला का चोर भिंतीवरून आत उड्या मारणारा ? ” खट्याळपणे अप्पा म्हणाले , तसा विनू तोंड लपवून आत पळाला .
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Very entertaining
Hahaha… Mast ch. वेगळाच हलका फुलका विषय.
पण ही स्टोरी लिंक cover page वर दिसत नाहीय