दिवाळी २०२० स्पेशल- ३

समांतर          लेखिका- पूजा खाडे पाठक

खराळवाडीचा बोर्ड दिसला तसा आनंदच्या गाडीचा वेग कमी झाला. त्याने गाडी बाजूला पार्क केली आणि गाडीतून उतरला. डोळ्यांवर काळा गॉगल चढवला. वस्ती तशी बकालच होती. तो निघणार इतक्यात त्याला काहीतरी लक्षात आलं. त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि आतली पिशवी घेतली.


खोलीवर पत्रे चढवून वाढवलेले मजले, गुलाबी निळे रंग दिलेल्या खोल्या, खोल्यांच्या बाहेर ठेवलेले निळे ड्रम, बाहेरच भांडी, कपडे धूत बसलेल्या बायका, मधूनच वहाणारं छोटंसं गटार, अधूनमधून फिरणारी आणि लाळघोटेपणाने शेपटी हलवणारी कुत्री. लोक तिथेच गप्पा मारत होते, मधूनच एकमेकांना शिव्या देत होते आणि तिथेच पचापच थुंकत होते. सगळ्यालाच दारिद्रतेचा रंग चढलेला. सगळेच त्या बकाल, किळसवाण्या घाणीत आनंदाने जगणारे. आनंदाने की बधिरतेने हा प्रश्न त्यांना कधीच पडणार नव्हता.

एका काळपट, अंधाऱ्या दुकानात तो डोकावला. एक म्हातारा तिथे दात कोरत बसला होता. दुकानाला जीर्ण निळा रंग होता आणि त्याचे पोपडे निघाले होते. समोरच असलेल्या काचेच्या बरणीत दाण्याचे लाडू, क्रीमरोल, कसलीतरी बिस्कीट ठेवली होती. चारदोन निरमा, पार्ले जी, शाम्पूच्या सुट्या पुड्यांची माळ  आणि लटकणारी थोडीफार लाल पिवळ्या बॉबीची पाकिटं सोडून तिथे काहीही नव्हतं. समोरच असलेला जुन्या पद्धतीचा तराजू करकरत होता.

“शिर्पे कुठे राहतात ?” त्याने त्या वातावरणाला अजिबात न शोभणाऱ्या सौम्य शब्दात विचारले. “नाय मैत” म्हातारा दृष्टी न वळवता म्हणाला.

आता काय करावं? इतक्या दूर, इतके द्राविडी प्राणायाम करून आलो ते यासाठी? बरं, दोन चारशे झोपड्यांच्या वस्तीत शोधणार तरी कसं?

“शाम्पूच्या पुड्या द्या दोन” आवाज आला तशी त्याची तंद्री तुटली. म्हाताऱ्याने उठत शेंपूच्या दोन पुड्या त्या गाऊन घातलेल्या बाईच्यासमोर टाकल्या. “बघा ना शिर्पे, कोणाला माहित असतील तर .. ” तो परत एकदा म्हणाला. “कोण पायजे तुमाला?” गाऊनवालीने आश्चर्याने विचारले. “शिर्पे” तो म्हणाला. “आवो शिरपिन बाई असल, बाकी कुनी नई शिर्पे हिकडं. ” बाई म्हणाली. “हो हो बाईच आहेत. कुठे राहतात त्या?” त्याने विचारले.

“अस्स जा, त्या समोर तिकडं लाल साडी दिसतीये ना, तितन लेफ्ट घ्या. समोर एक प्लाष्टिक चा कारखाना हाय एका खोलीत, वास यील लांबनच. तिथंच शेवटची खोली, संडासाच्या बाजूची.” बाई म्हणाली.

हे सगळं सोडून आत्ताच्या आत्ता पळून जावंस वाटलं त्याला. पण आता कदाचित खूप उशीर झाला होता.

तो एकएक पाऊल पुढे टाकू लागला…

“खूप वर्षांनी ही लॉकर्स उघडताय तुम्ही!” बँकेचे मॅनेजर म्हणाले. तो नुसता हसला. लॉकर उघडून आत बघितले तर आत पिवळे पडलेले काही कागद आणि पावत्या होत्या.

“कल्याण बालकाश्रम”

त्याच्या प्रश्नांची बरीच उत्तरे त्या दोन अक्षरात दडली  होती.

पाच हजार रुपये “चारल्यानंतर” आज शेवटी ती जुनी खोली उघडली. “ए पटापट शोध बाबा ९५ वाली फाईल. एकतर नोंद केलेली नाहीये.” दबक्या कुजबुजीनंतर कपाटाची दारं करकरू लागली. त्या काळसर खोलीत उजेड वरवर तरंगत होता. धुळकट , कुबट, लाकडी वास असणाऱ्या त्या खोलीत अनेक आयुष्याची उलगडलेली आणि न उलगडलेली गुपितं , अनंत कथा व्यथा दडल्या होत्या. प्रत्येक पानामागे एका जीवाची देवाणघेवाणीची नोंद होती. कितीतरी धाग्यांचे जंजाळ त्या खोलीत पसरल्याचा त्याला भास झाला.

“नर्मदा शिर्पे, खराळवाडी. इतकंच कळलंय साहेब.” कारकून म्हणाला.

काही न बोलता जास्तीचे शंभर त्याच्या खिशात कोंबून तो निघाला ते थेट घरी.

“येऊ का रे आत?” त्याला आवाज आला तशी त्याची तंद्री भंगली. “ये ना .. ” म्हणत तो उठून बसला. “काही झालंय का? बिझनेसचं टेन्शन आहे का तुला? हल्ली बोलत नाहीस तू फार .. काय झालय?” आईने विचारले. त्याने आईकडे पाहिले.

साठीच्या आत बाहेर असलेली त्याची आई. पोक्त , गोरटेली , रुबाबदार! सगळ्या बिझनेसचा लेखाजोगा एकहाती ठेवलेली. बाबांइतकीच कर्तबगार.

प्रश्न त्याच्याही मनात होते.

आपले आईवडील इतके वयस्कर कसे? आपण त्यांच्यासारखे का दिसत नाही? आपण बाळ असतानाचा  एकही फोटो घरात कसा नाही? या सगळ्या गोरटेल्या लोकांमध्ये आपण असे गहूवर्णीय कसे निपजलो?

पण आता या प्रश्नांची उत्तरं तो स्वतः शोधणार होता.

ती गाऊनवाली बाई म्हणाली तसं प्लास्टिकचा वास नाकात शिरला. गल्लीच्या शेवटी सार्वजनिक संडासचा बोर्ड होता. त्याच्या अलीकडची शेवटची खोली. उजवीकडच्या खोलीबाहेर उंबऱ्यात म्हातारा बसलाय एक. ते असेल का घर ?

एक एक पाउल पुढे पडू लागले.

तो त्याच्या मुळांजवळ आला होता. झाड कितीही वाढले तरी मुळांबद्दल त्याला कायम माया असतेच. आपण कोण आहोत, कुठून आलोय आणि कशापासून बनलीय, कोणापासून बनलोय .. हे माहित असणे फार महत्वाचे असते. त्यात बरीच उत्तरे दडलेली असतात.

We must know our roots !

आपली पाळमूळ इथं रुजली आहेत? ह्या घाणीत? त्याच्या मनात आलं. तो स्वतःच्याच विचारांवर चपापला. पण शेवटी ते मनात येऊन गेले होते.
 
म्हणजे आपण दत्तक गेलो नसतो तर आज आपण इथे …

त्या शेवटच्या खोलीत तो डोकावला. अंधारलेल्या खोलीत स्टोव्ह आणि रॉकेलचा वास येत होता. “शिर्पे?” त्याने विचारले. “समोरे बगा, ते टवका उडालेले लाकडी दार” आतून आवाज आला.

तो सांगितलेल्या दारापाशी गेला. दार बंद होतं. तो बराच वेळ उभा राहिला. सगळे जग त्याच्याभोवती फिरत होते पण तो स्तब्ध उभा होता. तो पूर्णपणे थांबला होता आणि  गोठून गेला होता. असा किती वेळ तो उभा राहिला काय माहिती?अचानक मागून आवाज आला “कोन पायजे ?” तसा तो मागे वळला.

चाळिशीतली, मध्यम बांध्याची, हिरवी चॉकलेटी जॉर्जेटची साडी आणि त्यावर लाल ब्लाउज, तेलकट केसात मधूनच दिसलेली चंदेरी बट, नाकात चमकी आणि कानात असंख्य सुम्पली. दात मिश्रीने काळे झालेले.  अशा अवतारात डोळ्यांवरचे ऊन अडवत, तोंड फिस्कारून ती बाई त्याच्याकडे बघत होती.

“शिर्पे?” त्याच्या घसा कोरडा पडला होता.

“हा मीच, काय काम हाय?” उत्तर आले.

तिथेच बसून ढसाढसा रडावे असे वाटले त्याला. का? कशासाठी माहित नाही पण त्याच्या डोळ्यांच्या कडा लालेलाल झाल्या.

“काम म्हणजे .. तुम्हाला भेटायचं होतं .. ” तो अडखळत म्हणाला..

“आत या” तिने दार उघडलं. त्या खोलीत एका बाजूला मोरी, त्यात बादलीभर पाणी आणि तांब्या, त्याला जुनाट पिवळा पडदा , गॅस, फळकुटावर दहा बारा बरण्या, लोखंडी खाट आणि खुंटीला टांगलेले कपडे.

तिने पायांवर पाणी घेऊन त्याला ग्लासात पाणी आणून दिलं.

“बोला साहेब” ती म्हणाली आणि त्याला कससंच झालं.

“मी कल्याण बालकाश्रम मधून आलोय.” तो तिचा अंदाज घेत म्हणाला. “बर मग?” तिने विचारले. “तिथून इथला पत्ता मिळाला म्हणून आलोय” तो पुन्हा म्हणाला. त्याला हवे असलेले हावभाव तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. ती प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती.

“मला तुम्ही आश्रमात सोडलं होतं. २५ वर्षांपूर्वी.” तो सरळ स्वच्छ भाषेत म्हणाला. तिला काही क्षण काहीच कळलं नाही आणि अचानक ती सुन्न झाली आणि मटकन खाली बसली.

बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. तो तिच्याकडे आणि ती त्याच्याकडे अधून मधून फक्त चोरटी नजर टाकत होते.

“तू माझी आई आहेस .. ” कडू औषध गिळावे तसे गपकन सांगून टाकले.

तिचे डोळे गोठून गेले होते. पोटात कालवाकालव सुरु होती. तिने त्याच्याकडे बघितले. तिच्यासारखाच गहू वर्ण, मजबूत शरीरयष्टी असलेला तिचा मुलगा. जो तिने २५ वर्षांपूर्वी स्वतःपासून स्वेच्छेने वेगळा केला होता, तो आज तिच्यासमोर बसला होता.

खोलीत जीवघेणी शांतता नांदत होती.

“क .. कस कळलं .. म्हणजे हितला पत्ता .. ” तिने जड आवाजात विचारले .. “काढला शोधून .. ” तो कडवटपणे म्हणाला ..

त्या तेवढ्या वेळात ते दोघे एक समांतर आयुष्य जगत होते. तो तिथे, तिचा मुलगा म्हणून असता तर आत्ता काय करीत असता? तिच्याशी काय बोलत असता? किती शिकला असता? त्या दोघांच्याही मनात मागची २५ वर्षे झर्रकन निघून गेली. त्याला ती लहानपणी खेळवताना दिसू लागली, शाळेत सोडताना दिसू लागली, झोपवताना दिसू लागली .. आणि तिला तो ..

पण आत्ता दोघे नदीच्या एका समांतर किनाऱ्यावर उभे होते जिथून एकमेकांना फक्त बघता येते. ते रस्ते कधीही एक होत नाहीत.

खूप वेळाने तो उठला. “मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण मला मी कोण आहे, कुठला आहे, कोणाचा आहे, हे सगळं शोधायचं होतं, माझ्यासाठीच .. म्हणून हे सगळं .. ” तो म्हणाला. हातातली पिशवी खाली ठेवली .. “हे तुझ्या .. तुमच्यासाठी .. ” म्हणून तो वळला आणि बाहेर पडला. काही उललेल्या नेणिवेच्या जखमा उघड्या करत. परत कधीही न वळण्यासाठी…

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

2 thoughts on “दिवाळी २०२० स्पेशल- ३

  • November 13, 2020 at 7:48 pm
    Permalink

    👌🏻👌🏻👌🏻

    Reply
  • November 17, 2020 at 1:16 pm
    Permalink

    घाटातून वळणं घेताना, अचानक नवा view किंवा नवा प्रदेश नजरेसमोर यावा, तशी आहे कथा…… सुंदर !

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!