दिवाळी २०२० स्पेशल- ६
लाडू बसले अनारसे हसले लेखिका- गौरी ब्रह्मे
काल आमचे बेसनाचे लाडू बसले, बसले म्हणजे अगदी मस्तपैकी फतकल मारून बसले. इतके बसले की उठायलाच तयार नाहीत. पंख्याखाली ठेवले, वाळवले, परत परत वळले, फ्रिजमध्ये ठेवले तरी काही फरक नाही. आळशी उंडे कुठचे! लाख मिनवताऱ्या केल्या तरी तसूभर सुद्धा उभे राहायला तयार नाहीत. नवशिक्यांनो, एक लक्षात ठेवा, लाडू बसतात आणि अनारसे हसतात. चकली एकतर मऊ पडते नाहीतर कडाकणी होते, करंजी खूळखुळा होते, शेवेला सोऱ्या प्रिय होऊन ती त्यातून बाहेरच येत नाही आणि रव्याचे लाडू फोडायला हातोडी लागते. हे झालं की समजायचं, आपला दिवाळी फराळ टोटल फसलेला आहे. फराळ बनवणाऱ्या सगळ्या बायका, काही पुरुषसुद्धा या सगळ्यातून कधी ना कधी गेलेले असतात. प्रत्येक वेळी प्रत्येक पदार्थ शंभर टक्के जमेलच असं नाही. रेसिपीची कितीही तंत्र सांभाळली तरी कुठे ना कुठे काहीतरी छोटीशी गडबड होते अन पदार्थ फसतो. एकदा माझ्या बहिणीची हातखंडा असलेली चकली फसली. इतकी मऊ पडली की रबराशीही स्पर्धा करेल. बहीण फार नाराज झाली. कधीही न चुकणारी रेसिपी चुकलीच कशी? म्हणून स्वतःला दोष देत बसली. तिच्या लेकीने मात्र मऊ चकल्या आवडीने खाल्ल्या, इतकंच नव्हे तर पुढच्या वर्षी ही दिवाळीत “आई त्या मऊ चकल्या कर ना!” म्हणून तिच्या मागे लागली. एकेक गमती असतात फराळाच्या.
आमच्याकडे लहानपणी गल्लीत सगळ्या घरी सगळ्यांचा फराळ यायचा. अमुक एका काकूंचा फराळ आला की माझा भाऊ विचारायचा, “मग आज किती खूळखुळे आले?” सारण फार न भरलेली करंजी म्हणजे खूळखुळा. फार हसायचो आम्ही. पण त्या निमित्ताने वेगवेगळ्या हातांचे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळायचे. प्रत्येकीच्या हाताची चव निराळी असायची, करण्याची पद्धत वेगळी असायची, रंगरूपही वेगळं असायचं. तेव्हापासून मी मात्र करंजी करताना व्यवस्थित सारण घालते. एक वेळ कमी करंज्या होतात पण ज्या होतात त्या झिरो फिगर न दिसता बाळसेदार दिसतात. ही फराळ वाटपाची पद्धत मला फार आवडायची. बऱ्याचदा एकीचं दुसरीलाही घालून दिलं द्यायचं, पण त्या निमित्ताने एकमेकांच्या हातचं खायला मिळायचं. आमच्या गल्लीत एक मुसलमान कुटुंब होतं. फार चांगल्या स्वभावाच्या होत्या त्या भाभी. त्यांना फराळाचे फारसे पदार्थ यायचे नाहीत. जमेल तितकं करायच्या. माझी आई मात्र आवर्जून त्यांना घरी बनवलेलं फराळाचं ताट द्यायची. ताट परत देताना भाभी त्यात त्यांच्या बागेतली अवीट गोड चवीची केळी घालून द्यायच्या. “ज्यांच्या घरी बनत नाही, अश्या लोकांना आवर्जून फराळ द्यावा”. असा साधा विचार असायचा आईचा. जात, वर्ग, धर्म, या सगळ्या पलीकडे जाऊन तिने विचार करायला शिकवला तो असा.
तर सांगत होते की आमचे बेसनाचे लाडू काल सपशेल फसले. नवऱ्याने येताजाता टोमणेही मारले, “यावर्षी वाटीचमच्यात घेऊन खायचे नवीन प्रकारचे लाडू केले आहेत की काय?” असा राग आला! एकवेळ “चांगला झालाय लाडू पण आईसारखा नाही” हे म्हणलेलं चालेल, पण वाटी चमचा? अपमान! घोर अपमान!
खरंतर लाडू हा फसण्याचा पदार्थ नाही, बेसनाचा लाडू तर नाहीच नाही. याच करणामुळे बेसनाच्या लाडवाला मी आतापर्यंत माझा बेस्ट फ्रेंड मानत होते. जो फसवत नाही, ऐनवेळी कामी येतो, ज्याच्यावर सहज विश्वास टाकू शकतो तोच घट्ट मित्र असतो ना? वर्षातून अधूनमधून अनेकदा मी या बेस्ट फ्रेंडला अगदी सहज सुद्धा भेटते. कारण घरी तो सर्वांना आवडतो. दिवाळीच्या फराळाची सुरुवातही कायम त्यानेच करते कारण तो कधी दगा देत नाही. एकदा का लाडू जमले की आत्मविश्वास वाढतो आणि पुढचा फराळ करणं सोपं होऊन जातं. अश्या या माझ्या सख्ख्या मित्राने काल मला पहिल्यांदा अगदी नामोहरम केलं.
काय झालं असेल? नक्की काय चुकलं असेल? यावर विचार करत बसण्यापेक्षा आता यावर उपाय काय करता येईल?याचा विचार केला. त्यामुळे नाराजी झटकून माझ्या सासूबाईंनाच उपाय विचारला. पदार्थ बिघडल्यावर काय करायचं हे या अनुभवी बायका हुकुमी सांगू शकतात. यू ट्यूब, फेसबुकवरचे रेसिपी ग्रुप्स कृती सांगतील पण पदार्थाची डागडुजी ही अनुभवी आज्या, आया, माम्याच सांगू शकतील. अनुभव मोठा शिक्षक असतो. सासूबाईंनी एक नामी उपाय सांगितलं. आजारी माणसाकडे फक्त एकदा बघून औषध सांगणारे डॉकटर सांगतात तसं लाडू बघून त्या म्हणाल्या “तुझं तूप जास्त झालंय. अजून थोडं पीठ भाजून घाल. प्रमाणात साखर घाल आणि परत सगळं एकत्र करून परत लाडू वळ. व्यवस्थित होतील बघ.” तसा सोपा उपाय होता. मी तातडीने केला आणि जादू झाल्यासारखे माझे लाडू पसरट न होता एकदम व्यवस्थित गोलगरगरीत झाले. माझा बेस्ट फ्रेंड परत मला भेटला.
डागडुजी केलेला कोणताही पदार्थ परत पहिल्यासारखा होत नाही म्हणतात. ठीकच आहे ते, पण लाडका मित्र परत भेटण्यासारखा दुसरा आनंदही नाही. मैत्रीतही अनेकदा असे होते. भांडण होतं, नाती तुटतात, परत जोडली जातात. परत जोडलेली नाती ही आधीसारखीच सुंदर असतात का? कदाचित नाही. पण तिला वेगळे आयाम नक्की मिळतात. नातं पूर्ण हरवून जाण्यापेक्षा हे नव्याने जोडलेलं नातं मैत्री आणखी फुलवतं, घट्ट करतं. “यावर्षी भांडलास, रुसलास, मनासारखा जमला नाहीस पण पुढच्या वर्षी परत घट्ट बांधणार आहे बरं का तुला” मी माझ्या बेस्ट फ्रेंडला यावर्षी सांगितलंय. आमचे उत्तम डागडुजी झालेले लाडू माझ्याकडे बघून (खरेखुरे) हसतायत.
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
वाह! मस्तच 👌👌
माझे सुद्धा केलेले लाडू यंदा बसले मग मी नुसत बेसन भाजून घातलं मग ते सारखं तोंडात चिकटत होते.शेवटी ते सगळे लाडू परत मोडले त्यात परत थोड तूप घातलं चांगल भाजल मग फ्रीज ला ठेवलं मग मस्त लाडू झाले .😄
👍👍
धन्यवाद
माझे सुद्धा केलेले बेसन लाडू यंदा बसले मग मी नुसत बेसन भाजून घातलं मग ते सारखं तोंडात चिकटत होते.शेवटी ते सगळे लाडू परत मोडले त्यात परत थोड तूप घातलं चांगल भाजल मग फ्रीज ला ठेवलं मग मस्त लाडू झाले .😄