दिवाळी २०२० स्पेशल- ५
नयना लेखिका- मानसी जोशी
“नाही… मी खरंच खून नाही केला. मला… मला … यातलं काहीच माहिती नाही. मी आणि रोहित भेटणार होतो, म्हणून मी तिथे गेले होते. मी खरंच खून नाही केला. मी तिथे गेले तेव्हा खून आधीच झाला होता.” नयना रडत रडत बोलत होती.
“हे बघा मॅडम, तुमचं रोहित वर प्रेम होतं पण त्याने तुम्हाला नकार दिला कारण त्याचं अंजलीवर प्रेम होतं, म्हणून तुम्ही त्याला ठार मारलंत. अंजली मॅडमनी उघड उघड तुमच्यावर संशय घेतला आहे. खुनाच्या ठिकाणी तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. रेड हॅन्ड पकडलं आहे आम्ही तुम्हाला. शिकल्या सवरलेल्या दिसताय, रेड हॅन्डचा अर्थ कळतो ना तुम्हाला? नक्की आम्हाला मूर्ख समजता की स्वतःला अतिहुशार, अगदी साधी भोळी असण्याचं नाटक करताय. सब इन्स्पेक्टर रचना गोंधळेकर आवाज चढवून बोलत होत्या. तेवढ्यात इन्स्पेक्टर समीर तिथे आला.
काय गडबड आहे गोंधळेकर मॅडम कशासाठी आरडाओरडा चालला आहे.
“सर, ‘ओपन अँड शट’ केस आहे. पण मान्य करायला तयार नाहीत मॅडम.”
समीरने लॉक अप मध्ये बसलेल्या नयना कडे नजर टाकली. एक २३/२४ वर्षांची मुलगी भेदरलेल्या अवस्थेत बसून होती. तिच्या डोळ्यात भीती पलीकडे काहीच दिसत नव्हतं. समीरने तिची केस फाईल तपासली. सगळे साक्षी पुरावे खून नयनानेच केला असल्याचं ओरडून ओरडून सांगत होते. पण अनेकदा दिसतं तसं नसतं, याची समीरला कल्पना होती. शिवाय नयनाच्या डोळ्यातली भीती पाहून त्याचं मन तिला गुन्हेगार ठरवायला परवानगी देत नव्हतं.
समीर लॉक अप मध्ये गेला. नयना समोर बसून म्हणाला, “जे काही झालं ते मला सगळं शांतपणे आणि सविस्तर सांगाल? तुम्ही खून केलेला नाही ना? मग घाबरता कशाला? तुम्ही जर मला सगळं व्यवस्थित सांगितलंत, तर मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकेन. तुम्ही नुसतंच, ‘मी खून नाही केला’ असं म्हणून रडत राहिलात, तर तुम्हाला कोणीच मदत नाही करू शकणार.”
समीरच्या बोलण्यामुळे नयनाला थोडा धीर आला. तिच्या मनातली भीती कमी झाली. ती जरा सावरून बसली. समीरने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला. त्यावेळी पहिल्यांदा तिने डोळे वर करून समीरकडे बघितले. तिला त्याच्याबद्दल विश्वास वाटू लागला.
गुन्हेगाराला बोलतं करण्यात समीर हुशार होता. डोळ्यांची भाषा त्याला बरोबर समजायची. माणूस खोटं बोलू शकतो पण माणसाचे डोळे नाही खोटं बोलू शकत. मनातले विचार, भावना डोळ्यातून प्रगट होत असतात. त्यामुळे जर समोरचा माणूस तुमच्याकडे विश्वासाच्या नजरेने बघत असेल, तर तो तुमच्याजवळ त्याच्या मनातलं बोलणार हे नक्की, हे त्याचं गृहितक आजवर खरं ठरलं होतं.
पाणी प्यायल्यावर नयनाला जरा हुशारी आली आणि तिने बोलायला सुरुवात केली.
“रोहित, मी आणि अंजली एकाच कंपनीमध्ये काम करतो. मी आणि अंजली अगदी अकरावीपासूनच्या मैत्रिणी. कॅम्पस मधून आमचं एकत्रच सिलेक्शन झालं. खूप खुश होतो आम्ही. ऑफिसमध्येही आम्ही एकाच टीममध्ये होतो. रोहित आम्हाला सिनिअर. रोहितची आणि माझी पटकन मैत्री झाली. त्याला अंजली आवडायची, पण अंजलीच्या मनात काय आहे याचा त्याला थांगपत्ता लागत नव्हता. मी सुद्धा अंजलीला आडून आडून विचारायचा प्रयत्न केला होता, पण मलाही ती काहीच सांगत नव्हती. तरीही मला तिच्या वागण्यावरून तरी असं वाटत होतं की तिलाही रोहित आवडतो. म्हणून आम्ही एक prank करायचा ठरवला. याबद्दल फक्त मला आणि रोहितला माहिती होतं. यामध्ये मी रोहितच्या प्रेमात पडलेय असं अंजलीला भासवायचं आणि तिचं खरं मत जाणून घ्यायचं असं ठरलं होतं. या प्लॅन मध्ये आम्ही यशस्वी झालो. रोहित आणि अंजलीचं जमलं. मग मी सहज गंमत म्हणून हाच prank पुढे कॅन्टीन्यु करायचं ठरवलं. अंजली माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिला रोहितसाठी त्रास दिला आता थोडा त्रास रोहितला पण देऊया असं म्हणून मी मुद्दाम गंमत म्हणून त्याला मेसेजेस करायचे. त्या दिवशी मी रोहितला सगळं खरं खरं सांगायला भेटणार होते. कारण त्याचदिवशी मला दुसऱ्या प्रोजेक्टसाठी बंगलोर ऑफिसला जाणार का म्हणून ऑफिसमधून विचारलं होतं. सो बंगलोरला जायचा निर्णय घेण्यापूर्वी मला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. मी तिथे गेले तेव्हा बघितलं एका माणसाने रोहितच्या पोटात सुरा खुपसला, मी घाबरून किंचाळले तो माणूस माझ्याकडे वळणार तेवढ्यात अम्ब्युलन्सचा आवाज आला आणि तो पळून गेला. मी रोहितजवळ जाऊन त्याच्या पोटातला सुरा काढायचा प्रयत्न केला, तेवढ्यात मला कोणीतरी बघितलं आणि त्या माणसाने पोलिसांना फोन केला. मी सुरा काढत होते. मी का मारेन त्याला? आणि माझं त्याच्यावर प्रेम होतं असं जरी म्हटलं, तरी मी अंजलीला मारलं असतं, रोहितला नाही.” एवढं सगळं एका दमात बोलून नयना रडू लागली.
समीरने पुन्हा तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. त्याच्या हातातला ग्लास घेऊन तिने घटाघटा पाणी पिऊन टाकलं.
दोन दिवसानी रोहितच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला. रिपोर्ट पाहून समीर गालातल्या गालात हसला. या दोन दिवसात नयनाचे आई, वडील, ऑफिसमधले सहकारी, अंजली, इतर मित्रमैत्रिणींशी बोलून समीरने तिच्याबद्दल बरीच माहिती गोळा केली होती.
“काय झालं सर, हसताय का तुम्ही? त्या पोरीनेच मारलं ना रोहितला?” गोंधळेकर.
“गोंधळेकर मॅडम, किती घाई हो तुम्हाला. न्यायाधीश झाला असता, तर एका हिअरिंग मध्येच केस संपवली असती तुम्ही.” समीर हसत म्हणाला.
“सर भरपूर वर्ष काढली आहेत या नोकरीत. हवालदार गोंधळेकर पासून सब इन्स्पेक्टर पोस्टपर्यंत पोचेपर्यंतचा बराच अनुभव आहे गाठीशी. गुन्हेगार ओळखण्यात चूक नाही होणार माझी.” गोंधळेकर मॅडम.
“पण यावेळी झालेय”
“काय? ती पोरगी खुनी नाही?”
“नाही”
“कशावरून?”
“पोस्टमार्टम रिपोर्टनुसार!”
“म्हणजे..
“पोस्टमार्टम रिपोर्टनुसार खूनी राईट हँडेड आहे आणि नयना लेफ्ट हँडेड. तिला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हाही ती तिच्या डाव्या हाताने सुरा काढायचा प्रयत्न करत होती. मी चौकशी करत असताना तिला पाणी दिलं तेव्हाच हा मुद्दा माझ्या लक्षात आला होता. तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या अर्थात हे सिद्ध करणारे पुरावे तिच्याजवळ नव्हते, पण म्हणून ती गुन्हेगार होत नाही. तिने सांगितलेली एकमेव गोष्ट कन्फर्म करता आली की त्या वेळेला एक अम्ब्युलन्स तिथून गेली. पण ही गोष्ट तिला निर्दोष सिद्ध करायला पुरेशी नव्हती. त्यामुळे मी पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघत होतो.”
समीरच्या हुशारीचं गोंधळेकर मॅडमना कौतुक वाटलं आणि किंचितसी असूया पण वाटली. त्यांचं अंतर्मन मात्र नयनाला निर्दोष म्हणायची परवानगी देत नव्हतं. आपल्या अनुभवी नजरेला कोणीतरी चॅलेंज दिलं आहे ही कल्पनाच त्यांना बेचैन करत होती.
कोर्टामधून नयनाची निर्दोष मुक्तता झाली. समीरने या प्रकरणात नयनाला भरपूर मदत केली. नयना आणि समीरमध्ये हळूहळू छान मैत्रीचं नातं निर्माण झालं. सगळं सुरळीत चाललं होतं, अस्वस्थ होत्या त्या रचना गोंधळेकर मॅडम. का कुणास ठाऊक नयना बद्दल त्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. नक्की अनुभवी नजरेने धोका खाल्लेला आहे की समीरच्या नजरेने, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता. आडून आडून त्यांनी समीरला नयना पासून लांब रहायचा सल्ला देण्याचा प्रयत्नही केला होता पण समीरला एकतर ते कळलं नव्हतं किंवा त्याने कळूनही दुर्लक्ष केलं होतं.
नयनाने आता नवीन ऑफिस जॉईन केलं होतं. सगळं काही विसरून नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली होती. वस्तुस्थिती कळल्यावर अंजलीनेही तिची माफी मागितली होती पण त्या दोघींच्या मैत्रीत अंतर पडलं, ते कायमचंच!
हळूहळू नयना आपल्या नवीन आयुष्यात स्थिरावत होती. समीरच्या मदतीने आयुष्यातल्या त्या दुर्घटनेला विसरण्याचा प्रयत्न करत होती. या सगळ्या प्रकरणात नकळतपणे अंजली तिच्यापासून दुरावली होती, खरंतर ती अंजलीपासून दुरावली होती, पण आयुष्यातल्या मैत्रीच्या नात्याची कमी समीरने पूर्ण केली होती.
नयना आता पूर्णपणे सावरली होती. झाल्या घटनेला दीड वर्ष होऊन गेलं होतं.
एक दिवस सकाळी अचानक नयनाच्या घरी पोलीस आले. त्यात गोंधळेकर मॅडमही होत्या. नयना ऑफिसला जायच्या तयारीत होती. अचानक आलेले पोलीस पाहून तिला धक्का बसला.
“नयना मॅडम, इन्स्पेक्टर समीर कुठाय?”
“म्हणजे, मला काय माहिती?”
“काल रात्री तुम्ही एकत्रच होतात नयना मॅडम.”
“हो. आम्ही एकत्रच होतो, पण रात्री अकराच्या दरम्यान समीरने मला घरी सोडलं आणि तो त्याच्या घरी गेला.”
“समीर सर त्यांच्या घरी गेलेच नाहीयेत.”
“मला नाही माहिती. मी… मी…फोन करते त्याला…. असं म्हणत नयनाने फोन हातात घेतला.”
“फोन लागत नाहीये त्यांचा. म्हणून तर आलोय आम्ही इथे.”
“अहो फोन लागत नाही यात नयनाचा काय दोष?” नयनाच्या वडिलांनी विचारले.
“नाही दोष काहीच नाही पण शेवटी समीर सर तुमच्या नयना बरोबरच दिसले होते.” पोलीस
“हो. बरोबर आहे, म्हणून मी त्याला गायब केलं असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर ते पूर्णतः चूक आहे. मुळात मी असं का करेन? उलट हे सगळं ऐकून मलाच मोठा धक्का बसला आहे. काल मला प्रमोशन मिळालं. मी खूप खुश होते कारण या प्रमोशननंतर लवकरच मला अमेरिकेला जायची संधी मिळणार आहे. मी समीरला फोन करून ही गुड न्यूज दिली. तो संध्याकाळी फ्री होता म्हणून त्याला ट्रीट द्यायचं ठरलं. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी आम्ही भेटलो मस्त हिंडलो. रात्री एकत्र डिनर केलं आणि मग समीरने मला घरी सोडलं. त्यानंतर तो कुठे गेला मला काहीच माहिती नाही.”
“त्यानंतर तो कुठेच गेला नाही. त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन तुझ्या घराजवळचं आहे. त्यांनंतर त्याचा फोन बंद झाला.”
“हो. त्याने मला सोडलं तेव्हा त्याच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. त्याचवेळी शेजारच्या काकूंनी आम्हाला बघितलं होतं. तुम्ही त्यांना विचारू शकता. मी खरंच सांगतेय तो मला सोडून इथून निघून गेला होता.”
“ती चौकशी आम्ही करूच पण लक्षात ठेवा जोपर्यंत इन्स्पेक्टर समीरबद्दल माहिती मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून कुठेही जाऊ शकत नाही.” गोंधळेकर मॅडम म्हणाल्या.
“मी कुठे जाणार मॅडम? समीर म्हणजे सर्वस्व होतं माझं. मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही माझ्यावर पण तुमच्यापेक्षा समीरची जास्त काळजी मला वाटतेय. पण मला खात्री आहे तो अगदी सुखरूप असेल, त्याला काहीही होणार नाही. त्याने लग्नाचं वचन दिलं आहे मला. तो मला सोडून कुठेही जाणार नाही.” नयना.
“लग्न? तुझ्याशी?” गोंधळेकर मॅडमना हा दुसरा धक्का होता.
“का, आश्चर्य वाटायला काय झालं?” नयनाच्या बाबांनी विचारलं.
“अं… नाही काही नाही मला वाटत होतं, यांच्यात फक्त मैत्री आहे. ठीक आहे निघते मी.”
दोन दिवसांनंतर समीरच्या अपघाताची बातमी आली. मुंबई हायवेजवळच्या एका दरीत त्याची गाडी आणि प्रेत मिळालं. तसं नयनावर संशय घ्यायचा काहीच प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की एवढ्या रात्री समीर शहराबाहेर कशासाठी गेला होता? नयनाच्या म्हणण्यानुसार त्याच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. गोंधळेकर मॅडमचं मन मात्र हा अपघात मानायला तयार होत नव्हतं. राहून राहून त्यांना यामध्ये घातपाताचा संशय येत होता.
समीरच्या केसची फाईल अपघाताची केस म्हणून बंद करण्यात आली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही काहीच निष्पन्न न झाल्याने गोंधळेकर मॅडमना काहीच करता आलं नाही. नयनावर संशय घ्यावा तर, तिच्याविरुद्ध एकही पुरावा हातात नव्हता. शिवाय ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी ती घरीच होती. तसंही मागच्या वेळेस सगळे पुरावे हातात असून ती सुटली होती. यावेळेस तर सगळा डाव तिच्या हातात होता. पण नयना नसेल, तर कोण? पोलिसांना काय कमी शत्रू असतात, पण तरीही मनात नयना बद्दलच संशय का येतोय? खरोखरच हा अपघात आहे आणि आपण नयनाला चुकीचं समजतोय की नयनानेच त्याला मारलं, पण ती का मारेल? समीर तर लग्न करणार होता तिच्याशी, अर्थात हे नयना सांगतेय, ती सांगते म्हणून हे खरं कसं मानायचं? विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती पण निष्पन्न काहीच होत नव्हतं.
“या घटनेला जवळपास सहा महिने होऊन गेले. एक दिवस गोंधळेकर मॅडमना नयनाचा फोन आला, “तुम्हाला जो संशय आहे त्याबद्दल महत्वाचं बोलायचं आहे. आत्ता मला एम.जी.रोड वरच्या गणपती मंदिराजवळ भेटायला जमेल? मी आहे तिथे थोडा वेळ. माहिती नाही नंतर भेटता येईल की नाही. शक्य असेल तर भेटा.” एवढं बोलून नयनाने फोन कट केला.
गोंधळेकर मॅडम विचारात पडल्या. नयना नक्की काय सांगणार आहे आणि एम.जी.रोड वरच्या गणपती मंदिराजवळ तर सामसूम असते. आत्ता तिथे जावं का, ती मला तर काही करणार नाही? स्टेशनमध्ये कोणाला सांगू का, नको.. कदाचित इथलाच कोणी गुन्हेगार असेल तर? जे काही असेल ते असेल, पण आत्ता तिथे जायला हवं हे नक्की. ती नयना विश्वासाच्या लायक नाही वाटत, पण काय सांगावं कदाचित समीरची थिअरी बरोबर असेल. ती निरपराध असेल आणि मी उगाचच पूर्वग्रहदूषित नजरेने तिच्याकडे बघत असेन. काहीही असलं, तरी सावध रहायला हवं.
एम.जी.रोड वरच्या गणपती मंदिराचा परिसर म्हणजे तसा सामसुमच. एकेकाळी प्रचंड रहदारी असणारा हा रस्ता पलीकडच्या नदीवर पूल बांधला गेल्यामुळे अगदीच सामसूम झाला होता. गोंधळेकर मॅडम तिथे पोचल्या तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. त्यांनी नयनाला फोन लावला पण तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज लागत होता. नयनाला काही झालं तर नसेल? मनात आलेल्या शंकेला दूर करत, त्यांनी आजूबाजूला नयनाला शोधायला सुरुवात केली. अर्धा तास वाट बघितल्यावर त्या तिथून जायला निघाल्या. तेवढ्यात त्यांना नयनाने हाक मारली.
“ही काय पद्धत झाली नयना? तू इथेच आहेस म्हणून सांगितलं होतंस ना मला? अर्धा तास झाला मी इथे वाट बघत्येय तुझी आणि तू….”
“हो, हो, हो किती बोलताय? पण मला माहिती आहे आज तुम्ही इथे बोलायला नाही तर ऐकायला आलाय, बरोबर ना?”
“हो, बोल काय कळलं आहे तुला? आणि हा मुद्द्याचं बोल, तुझी ड्रामेबाजी ऐकायला वेळ नाही मला. आधीच अर्धा तास फुकट गेलाय.”
“बरं, ठीक आहे. मी पण मुद्द्याचंच बोलणार आहे. त्यासाठीच तर बोलावलं तुम्हाला. खरं तर मी इथेच होते तरीही अर्धा तास वाट बघायला लावली तुम्हाला. कारण तुमच्यासोबत इतर कोणी नाही याची खात्री करून घ्यायची होती मला.”
“काय? तू वेडी आहेस का? मला वाटत होतं मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करतेय. पण नाही तू खरोखरच विक्षिप्त मुलगी आहेस. मला तर सुरुवातीपासूनच तू कधी पटली नाहीस. समीरला मी आडून आडून तुझ्यापासून लांब राहायला सुचवत होते पण मूर्खासारखा प्रेमात पडला तुझ्या आणि….”
“ओ गोंधळेकर बाई, किती बोलताय? तुमच्या बडबडीला कंटाळूनच तुमच्या नवऱ्याने घटस्फोट दिला असेल तुम्हाला…”
“नयना….”
“ओरडू नका, तुम्ही माझ्याबद्दल वाट्टेल ते बोलताय ते मी सहन करायचं आणि मी तुमच्याबद्दल अवाक्षरही काढायचं नाही?”
“हे बघ नयना… ठीक आहे, चुकलं माझं, बरं सांग काय सांगायचं आहे?”
“समीरला का मारलंत तुम्ही?”
“काय? मी? मी का मारेन समीरला?”
“नाही मारलंत तुम्ही?”
“हे बघ नयना काहीतरी मूर्खासारखं बरळू नकोस, माझंच चुकलं, इथे यायलाच नको होतं मी”, असं म्हणून गोंधळेकर मॅडम जायला निघाल्या.
“थांबा, तुमचं काहीच चुकलेलं नाही. इन फॅक्ट तुम्ही नेहमीच बरोबर होता.”
“म्हणजे?”
“म्हणजे वाघाचे पंजे….”
“नयना, तू सांगणार आहेस की जाऊ मी?”
“सांगते. समीर आणि मी, खूप प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर अगदी आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं. खरंतर माझंच चुकलं. त्याच्यापासून लांब रहायला हवं होतं. पण कळलंच नाही मला मी कधी आणि कशी गुंतत गेले त्याच्यात! त्या दिवशी आम्ही एकत्र डिनर करत होतो. जेवल्यानंतर आम्ही अजून एक वाईन मागवली. वेटर वाईन सर्व्ह करत असताना चुकून थोडी वाईन समीरच्या अंगावर सांडली. तो वॉशरूम मध्ये जाऊन आला. त्यानंतर आम्ही मस्त वाईन पीत होतो. समीर नेहमीच वाईन सावकाश आस्वाद घेत पितो, आय मिन प्यायचा. त्या दिवशीही निवांतच होता. मी झटक्यात वाईन संपवली तेवढ्यात मला माझ्या आईचा फोन आला. ती आजीच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी गेली होती. फोनवर तिने सांगितलं की आजीच्या घरी चोरी झाली आहे. ती खूप घाबरली होती. मी समीरला सगळं सांगितलं आणि म्हटलं, “तू वाईन संपव तोपर्यंत मी बिल देते आपण लगेच निघुया. माझी आजी सारगावला रहाते. हायवेवरून लेफ्ट घेतला की सुनसान घाटरस्ता. तिथे पोचायला फारफार तर पाऊण तास. माझ्या घरापासून हायवे 10 मिनिटांच्या अंतरावर ट्राफिक लागण्याची शक्यता जवळपास शून्य. आम्ही हॉटेलमधून निघालो, बाहेर आल्यावर मी बाबांना फोन लावायचा प्रयत्न केला पण बाबा फोन उचलत नव्हते. मग मी समीरला म्हटलं तू मला घरी सोड आणि पुढे हो. मी आणि बाबा फोर व्हीलर घेऊन येतो. समीरने मला घरी सोडलं आणि तो सारगावला गेला आणि वाटेत त्याचा अपघात झाला.”
“झालं? संपलं? हे सांगायला बोलावलं होतंस तू मला? तुमच्या डेटची स्टोरी ऐकण्यात काडीचा इंटरेस्ट नाही मला”, गोंधळेकर मॅडम चिडून म्हणाल्या.
गोंधळेकर मॅडम! खूप घाई असते हो तुम्हाला. सांगतेय ना मी सगळं. आता मात्र शांतपणे ऐका.
सुरुवातीला तुम्हाला वाटत होतं ना मी रोहितला मारलं?
“हो”
“मग बरोबरच होतं तुमचं! मीच मारलं रोहितला. काय करणार त्याने फक्त माझा वापर करून घेतला होता आणि काम झाल्यावर तांदुळातल्या खड्यासारखं मला दूर केलं त्याने. हो मी अंजलीला जळवण्यासाठी प्रेमाचं नाटक केलं त्याच्यासोबत, पण मी खरोखरच त्याच्या प्रेमात पडले. शरीरानेही आम्ही काही प्रमाणात जवळ आलो होतो. त्या रात्री त्याच्यावर सर्वस्व उधळून द्यायला तयार होते मी. पण तो शुद्धीवर आला आणि दूर झाला माझ्यापासून. हा सगळा अपमान नाही सहन झाला मला म्हणून मारलं त्याला, संपवलं कायमचं! त्यानंतर खूप शांतता मिळाली मला.”
रोहित प्रकरणात गोंधळेकर मॅडमना नयनावर संशय होताच पण तरीही ती हे सर्व ज्या पद्धतीने सांगत होती ते बघून त्यांना प्रचंड धक्का बसला पण त्यांना समीरबद्दल जाणून घ्यायचं असल्यामुळे त्या शांतपणे सगळं ऐकत होत्या.
“तुम्हाला सांगू मॅडम, लहानपणी मला एक भाऊ होता. मुलगा म्हणून खूप लाड झाले त्याचे मला कायमच दुर्लक्षित केलं जायचं. पण माझा भाऊ खूप चांगला होता. माझ्यावर खूप प्रेम करायचा मी पण त्याच्यावर खूप प्रेम करायचे, पण एक दिवस त्याला ताप आला. मेंदूज्वर होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि परत आणलंच नाही. तो सोडून गेला आम्हाला. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा एकमेव माणूस मला सोडून गेला. मी खूप दुःखी झाले. पण त्या घटनेनंतर मात्र आई, बाबा, आजी सगळे माझ्यावर भरभरून प्रेम करायला लागले. मला जीवापाड जपू लागले, तेव्हा मला कळलं आपल्याला दुःख देणारा आपला भाऊ होता. तो गेल्यावर आपल्या आयुष्यात सुखच सुख आलं आहे. याचा अर्थ आपल्याला दुःख देणारी व्यक्तीच नसेल, तर दुःख उरणारच नाही. त्यांनतर मला दुःख देणारा रोहित… त्याला संपवल्यावर तर खूपच समाधान मिळालं. मुख्य म्हणजे माझ्या डोळ्यासमोर त्याचं आणि अंजलीचं फुलणारं नातं बघायचं दुःख माझ्या नशिबी आलं नाही.”
गोंधळेकर मॅडम हे सगळं ऐकून थक्क झाल्या होत्या. आता त्यांना नयनाची भीती वाटायला लागली होती. पण तिने अजूनही समीरबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. जे सांगितलं होतं त्यात विशेष असं काहीच नव्हतं. नयना बोलतच होती. तिला थांबवत त्या म्हणाल्या, “तू मला समीरच्या मृत्यूबद्दल सांगणार होतीस.”
“अरे हो, तुम्हाला माझं पूर्वायुष्य जाणून घेण्यात काहीच इंटरेस्ट नसेल ना? तुम्ही तर समीरसाठी इथे आला आहात. सांगते आता या स्टोरीचा क्लायमॅक्स.. ऐका ज्यासाठी तुम्ही इथे आलात, माझी बडबड ऐकलीत तो क्षण आता आला आहे….
“समीर आणि माझं नातं छान बहरत होतं, पण अचानक समीरला माझा संशय यायला लागला होता. त्याला वाटायला लागलं होतं की मीच रोहितला मारलं आहे. अर्थात उघडउघड कधी बोलला नाही हे, पण मी ambidextrous आहे हे त्याला कळलं होतं. मी उजवा आणि डावा हात अतिशय सफाईने वापरू शकते आणि हे कोणालाच माहिती नाही अगदी माझ्या आई वडिलांनाही! पण समीर पडला हुशार इन्स्पेक्टर, त्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटणं शक्य नव्हतं. त्या दिवशी आम्ही डिनरला गेलो होतो, तेव्हा अचानक समीरचा टेबलवरचा महागड्या कॅडल स्टँडला धक्का लागला. आता तो अचानक लागला की त्याने मुद्दाम केलं ते मला माहिती नाही. पण, तो कॅडल स्टॅण्ड मी पटकन उजव्या हाताने पकडला. तेव्हा समीर मला म्हणाला, “अरे वा! तू उजव्या हाताने पण व्यवस्थित पकडू शकतेस! तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आता समीर नक्की रोहित प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार! तो आज ना उद्या माझ्याविरुद्ध पुरावे शोधणार! आणि ज्या दिवशी रोहितचा खून मीच केला आहे याबद्दल त्याची खात्री पटेल, त्यादिवशी तो माझ्याशी ब्रेक अप करणार आणि तेवढ्यावरच थांबणार नाही, तर तो मला नक्की अटक करणार! मग काय? मग माझ्या आयुष्यात दुःख येणार. पण मला दुःखी नाही व्हायचं, यासाठी एकच उपाय होता माझ्याकडे, दुःखाचं मूळच संपवायचं म्हणून मी मारलं माझ्या समीरला! पण त्याला मारल्यावर मला खूपच दुःख झालं आहे, त्याच्या आठवणी बेचैन करतात मला!
बोलता बोलता नयना भावुक झाली होती. गोंधळेकर मॅडमचं डोकं सुन्न झालं होतं. पण तरीही हिम्मत करून त्यांनी विचारलं, “तू समीरला कसं मारलंस?”
“सांगते! समीरला आज ना उद्या सत्य कळणार याची मला खात्री पटली होती म्हणून मी त्यावरचा उपाय शोधून आधीच माझ्या पर्समध्ये ठेवला होता. खरंतर त्या दिवशी मला कोणताही फोन आलेला नव्हता मी समीरसमोर सगळं नाटक केलं होतं.
माझ्या पर्समध्ये एका अशा ड्रॅगची बाटली होती, जो ड्रॅग दिल्यावर 1 तासाच्या आत माणसाची शुद्ध हरपते आणि 6 तासांपेक्षा जास्त वेळ जर त्यांचा अँटी डोस दिला नाही तर, माणूस मरण पावतो. मेल्यावरही साधारणतः 6 तासांनी या ड्रॅगचा अंमल शरीरातून पूर्णपणे नष्ट होतो. त्या दिवशी समीरच्या अंगावर वाईन चुकून सांडली नव्हती, तर मी पाय मध्ये घातल्यामुळे वेटर अडखळला आणि समीरच्या अंगावर थोडी वाईन सांडली. समीर वॉश रूममध्ये गेला तेव्हा त्याच्या वाईनमध्ये मी ड्रॅगचे 4 ड्रॉप टाकले. हे किती ड्रॉप टाकायचे याचं पण एक कॅल्क्युलेशन असतं. 4 ड्रॉपच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे साधारणतः 40 मिनिटात ड्रॅगचा प्रभाव शरीरावर पडायला सुरुवात होते. त्यामुळे अर्ध्या तासात समीर त्या निर्जन रस्त्याला पोचणं आवश्यक होतं. हॉटेलपासून माझं घर अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर. ट्राफिक लागलं तर फार फार तर 15 मिनिटं. माझ्या घरापासून हाय वे 10 मिनिटांच्या अंतरावर ट्राफिकची शक्यता अगदीच कमी, जवळपास नाहीच. हायवेपासून 10 मिनिटांवर सारगावचा टर्न आणि पुढे निर्जन, काळोखी दरीचा रस्ता. सगळं गणित परफेक्ट होतं. अडचण होती ती पोस्टमार्टम मध्ये ड्रॅग मिळण्याची. म्हणून मी गाडीवर बसल्यावर माझ्या फोनचं नेटवर्क गेलं असं सांगून बाबांना फोन करायला समीरचा फोन घेतला. घराजवळ आल्यावर त्याचा फोन फ्लाईट मोडवर टाकला जेणेकरून त्याच्या फोनचं शेवटचं लोकेशन माझ्या घराजवळ होतं असं दिसेल. घराच्या गेटबाहेर मी समीरला बाबांना जागं करण्यासाठी हॉर्न वाजायला सांगितला. हॉर्नचा आवाज ऐकून शेजारच्या काकू खिडकीतून बघणार याची खात्री होती मला. पुढे सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे झालं पण समीरला मारून मी सुखी नाही झाले उलट मी खूप दुःखी असल्यासारखं वाटतंय मला!”
गोंधळेकर मॅडम सुन्न झाल्या होत्या. नयना एक मानसिक रुग्ण होती. तिचं असं बाहेर राहणं अनेकांसाठी धोकादायक ठरू शकतं या विचाराने त्या भानावर आल्या आणि नयनाला म्हणाल्या, “अजूनही तू सरेंडर करू शकतेस. मी तुला मदत करते.”
“नाही…. नयना ओरडून म्हणाली. मी इथे फक्त तुम्हाला फॅक्टस सांगायला बोलावलं. ते पण समीरच्या मृत्यूनंतर माझ्या मनावर जे ओझं आहे, ते मला उतरवायचं होतं. दुःख देणाऱ्यांना मारून सुखी होता येत नाही, हे कळलं आहे मला. यापुढे मी कोणालाही मारणार नाही. मी हा देश सोडून चालले आहे. प्रमोशन नंतर मला ऑफिसकडून अमेरिकेला जायची संधी मिळाली आहे. ती मला गमवायची नाही, खरंतर गमवायची नव्हती म्हणून मी समीरला मारलं. आज रात्रीच माझी फ्लाईट आहे. आणि हो मला एक्सपोज करायचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण आत्ता ऑन रेकॉर्ड मी सिटी मॉल मध्ये शॉपिंग करतेय. माझी गाडीही त्यांच्या पार्किंगमध्ये आहे. शिवाय माझ्याविरुद्ध तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही. त्यामुळे मी जे काही बोलले ते विसरून जा. एवढं बोलून नयना तिथून निघून गेली. गोंधळेकर मॅडम हताशपणे कितीतरी वेळ तिथे उभ्या होत्या. आज त्यांच्या नजरेसमोर एक अपराधी गुन्ह्यांची कबुली देऊनही अटक न होता मोकाट फिरणार होता. पुढे किती बळी जातील या कल्पनेने त्या अस्वस्थ झाल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली, “इन्स्पेक्टर समीरच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर सब-इन्स्पेक्टर गोंधळेकर यांची त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या.” प्लेनमध्ये मोबाईलवरची ही न्यूज बघून नयना गालातल्या गालात हसत होती.
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021
Baap re .. thrilling
Mastt.. khilavun thevnari…👌👌
Bapre.. Kharch shevat parynt kahi andaj yet nahi..hech story ch yash ahe👌👌. Chan lihile 👌😊
अफलातून