दिवाळी २०२० स्पेशल- ९

आतड्याची माया                            लेखिका- विनया पिंपळे

उमाने घाईघाईने मनूला लागणारं सगळं सामान घरासमोरच्या व्हरांड्यात आठवणीने आणून ठेवलं आणि ग्रीलच्या दरवाज्याला कुलूप लावून आत पुन्हा एकदा नजर फिरवली. मनुसाठी पोळी भाजीचा एक डबा, ताट, पाण्याची बॉटल, शाळेतून आल्यावर शाळेचे कपडे बदलून घालायला एक साधा कॉटनचा गुलाबी फ्रॉक आणि खेळायला थोडीफार खेळणी इत्यादी वस्तू व्हरंडयाच्या एका कोपऱ्यात नीट मांडून ठेवलेल्या दिसल्या. मग मनातून ‘हुश्श !’ करत तिने अंगणातली स्कुटी फाटकाबाहेर नेली. फाटकाची कडी लावून घेतली आणि स्कुटीवर स्वार होऊन भरार वेगाने ऑफिसच्या दिशेने गाडी दामटवली.

स्कुटीच्या वेगात झरझर मागे जाणारी दृश्ये तिला दिसत होतीही आणि नाहीही. डोक्यात विचार वेगळेच. ‘आज शाळेतून घरी आल्यावर मनूला आपण ऑफिसमधून घरी पोचेपर्यंत चारेक तास एकटीला रहावं लागणार. हे मनाशीच आठवून तिचे डोळे नकळत ओले झाले. पण दुसरा काहीच पर्याय नव्हता ना ! या नवीन घरात येऊन त्यांना जेमतेम दोनेक महिने झाले असतील. किती हौसेने आणि हट्टाने घर बांधले होते तिने ! म्हणजे मनोजचे आणि तिचे स्वतःचे घर नव्हतेच असे नाही; पण ते होते खेड्यात. तिथून इथे शहरात ऑफिसला येणं म्हणजे तीस अधिक तीस असं साठ किलोमीटरचं जाणंयेणं. मनोजला त्याच्या कामानिमित्त चारपाच दिवसातून एकदा चारपाच दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागायचे. त्यामुळे घर कुठेही असलं तरी तो सहज मॅनेज करू शकायचा. पण उमाची दगदगच व्हायची. ‘बरं एकवेळ ही होणारी दगदग आपण सहन करू पण पोरीच्या शिक्षणाचं काय?’ तिला मनातच वाटायचं आणि त्यातूनच शहरात घर बांधण्याचा तिचा हट्ट जन्माला आला.

मग तिच्या हट्टापुढे नमतं घेऊन गेल्या वर्षभरात मनोजनं शहरात एक छानशी जागा पाहून छोटंसं पण टुमदार घर बांधलं. केवढा मोठा कार्यक्रम केला दोघांनी वास्तूशांतीचा ! अख्खं गाव जेवायला बोलावलं. घरभर जिकडेतिकडे चकचकीत टाईल्स, रंगीत सुशोभित भिंती, घरातूनच गच्चीवर जायला असणारा जिना, बसाउठायला एक हॉल आणि त्यापुढे बाकदार नक्षीअसलेल्या जाळीच्या खिडक्यांचा व्हरांडा आणि त्या व्हरांड्याला तसल्याच नक्षीदार जाळीचा दरवाजा. वास्तुशांतीच्या कार्यक्रमात आलेली गावाकडची मंडळी सगळं काही भारी कौतुकाने न्याहाळत होती. मनोजचं आणि सूनबाईचं भरभरून कौतुक करत होती.

आता ह्या नवीन घरापासून ऑफिस फक्त नऊ किलोमीटर दूर होतं. म्हणजे फार फार तर दहा पंधरा मिनिटांचा रस्ता. शिवाय मनूला चांगल्या शाळेत टाकलं होतं हाही फायदाच. नाही म्हणायला नवं बांधलेलं घर ज्या एरियात होतं तो अजून फारसा डेव्हलप झालेला नव्हता. तुरळक घरे बांधून झाली होती. काही अर्धवट झालेली होती. काही प्लॉटस अजूनही तसेच रिकामे होते. त्यांच्या घराच्या आजूबाजूला एकही घर सद्ध्या नव्हते. जी घरे होती ती नजरेच्या टप्प्यात पण थोडी लांबच होती. शेजारी म्हणून नव्हते कोणी. त्यामुळे मनोजची ड्युटी बाहेरगावी असताना मनुंचं शेड्युल कसं सांभाळायचं हा एक प्रश्नच होता. मग ह्या नवीन घरात सासूबाईंनीही त्यांच्यासोबत रहावं असं ठरलं. सासूबाई मात्र नाखूष होत्या. खरंतर त्यांचं सगळं आयुष्य त्या खेडेगावात एकत्र कुटुंबात गेलेलं. मनोज लहान असतानाच त्याचे बाबा गेले. मग त्या मोठ्या आणि लहान दिराच्या गोतावळ्यात मनोजला घेऊन राहिल्या. पुढे प्रत्येकाची मुलं मोठी झाली. कुणी शेतात रमलं, कुणी धंद्यात. मनोज मात्र शिकून सवरून नोकरीला लागला. एकत्र कुटुंबातल्या पोरीसोरी एकेक करत सासरी गेल्या, मुलांची लग्ने होऊन नवीन सुना घरात आल्या. मग ह्या नवीन सुनांना असा एकत्र राबता काही झेपेना. भांडणं वगैरे न करता सगळे राजीखुशी वेगवेगळे रहायला लागले. वेगळे झाले म्हणजे काय स्वयंपाक आणि इतर कामं ज्याची त्याची ज्याच्या त्याच्या घरात होऊ लागली. पण नव्हाळीच्या भाज्यांची, नवीन काही खायला केलं त्याची देवाणघेवाण व्हायचीच. वाढदिवस, सणवार तर एकत्र ठरलेलेच. एका घरच्या पाहुण्याला तीन ठिकाणी पाहुणचार होऊ लागला. मनाने वेगळं कुणी झालंच नव्हतं. छान गप्पाटप्पा होत. आवश्यकतेनुसार एकत्र येऊन आणि गरजेनुसार वेगळं राहून सगळं सुरळीत सुरू होतं.

मनु लहान असेपर्यंत हे असं ठीकच चाललं  सगळं. पण तिला शाळेत टाकण्याचा प्रश्न आला तेव्हा मात्र शहरात शिफ्ट होणे किती गरजेचे आहे हे उमा वारंवार पटवून देऊ लागली. सासूबाईंच्याने मात्र गाव आणि गावातलं घर सोडवेना. ‘तुम्ही जा शहरात मी आपली गावातच राहीन’ हे त्यांचं म्हणणं मात्र मनोजनं ऐकलं नाही.

शेवटी उमा, मनोज, मनु आणि साधनाताई असं चार माणसांचं छोटंसं कुटुंब त्या नवीन घरात शिफ्ट झालं.

उमा आणि मनोज दोघेही लवकरच नवीन जागेत रुळली. जास्त दुरून अपडाऊन करण्याचा त्रास वाचल्याने उमाची पाठदुखीही जरा कमी झाली. मनुला इकडे घराजवळ कुणी दोस्त मित्र नसल्याने सुरुवातीला कंटाळा आला, पण शाळा सुरू झाली तशी ती सुद्धा नवीन रुटीनमध्ये छान सेट झाली.

प्रश्न उरला फक्त साधनाताईंचा. त्यांना उठसूट शेजारी जाण्याची, गप्पा करण्याची सवय. गावात संध्याकाळी वयस्कर बायामाणसं विठोबाच्या मंदिरात हरिपाठ घ्यायला यायच्या. त्यातही त्यांचा वेळ मस्त जाई. इथे मात्र त्यांची चांगलीच गोची झाली. जवळपास कुणाचेही घर नाही. नजरेला दिसतील अशा घरांशी घरोबाच काय साधी तोंडओळख देखील नाही. गावात कसे ओळखीचा असो नसो दारावरून कुणी चालले तरी साधी हाक मारून पंधरा मिनिटे सहज गप्पांमध्ये काढता येतात. इथे ती सुद्धा सोय नाही. उलट अनोळखी लोकांशी जराही बोलायचं नाही ही दक्षता घ्यावी लागते.

उमा दररोज दहाला जाणार सहाला येणार. मनोज कधी दिवस दिवस बाहेर राहणार तर कधी दिवस दिवस घरात. मनु दुपारी दोनला घरी यायची तेव्हापासून तर संध्याकाळी उमा येईपर्यंत आजीच्या मागे तिची पिरपिर. मला हे हवंय, मला ते हवंय, आज असं शिकवलं, आज तसं शिकवलं, अमुक मॅम खूपच फन्नी आहेत आणि तमुक फारच स्ट्रिक्ट. शाळेतून आल्यावर हातपाय धुवून कपडे बदलून जेवणखावण करताना मनूच्या हजारो गोष्टी आजीला ऐकवून झालेल्या असत. सगळ्यांचं सगळं बस्तान व्यवस्थित बसलं होतं. फक्त साधनाताईंची हल्ली चिडचिड होऊ लागलेली. पोराच्या ह्या नवीन घरातल्या संसारात आपलं काही स्थानच नाहीय असं त्यांना प्रकर्षाने जाणवू लागलं.

का कोण जाणे पण हल्ली त्या थोडं विचित्र वागू लागल्या. मुद्दामच. आणि तेही मनोज घरी नसताना. उमाला आधी पोळ्या करून घेऊ द्यायच्या आणि नंतर आपण आपल्यासाठी भाकरी थापून घ्यायची. मग पोळ्या उरल्या तर त्यासाठी उमाला दोष देत कुरबुर करायची. किंवा उमानं स्वतःहुन त्यांच्यासाठी भाकरी केली तर ‘आज नको होती मला भाकरी.’ असं म्हणत मुद्दाम पोळी खायची. ‘आज तुमच्यासाठी भाकरी करू की पोळी?’ असं उमानं विचारलं त्यादिवशी तर रडून वगैरे फारच तमाशा केलेला त्यांनी. उमा उलटून बोलत नसे. हे असं सगळं वागणं दिवसेंदिवस वाढू लागलं. उमा घरातून ऑफिसला जायला निघणार की ह्यांचं सुरू होई-‘हं ओटा राहिलाय आवरायचा…आणि बाई चालल्या गाडीवर बसून फुर्रर्र. मागे हक्काची घरगडी आहेच सासू सगळा आवा आवरायला.’ उमा ऐकून न ऐकल्यासारखं करी अन दुसऱ्या दिवशी नेटाने पटापट कामं उरकून ओटाही आवरून ठेवत असे. पण मग ‘कपडे भिजवायचे राहिले.’ ‘रांगोळी काढलीच नाही.’ खरकटं पाणी नेऊन टाकलं नाही’ ‘सोडून ठेवलेल्या कपड्यांची घडीच केली नाही’ इत्यादी इत्यादी अनेक कारणांवरून त्यांची बडबड सुरूच रहात असे. मनोज घरात असताना मात्र त्या बऱ्यापैकी शांत असत.

त्यादिवशी रविवार होता. मनोज घरी नव्हताच. असंच कुठल्याशा कारणावरून त्यांचं बिनसलेलं. बोलता बोलता म्हणाल्या-“माझीच अडगळ झालीय तुम्हाला संसारात. एकदा मी डोळे मिटले की मग रहाल सुखात, आनंदात.” हे असं सारखं सारखं मरणाधरणाच्या गोष्टी ऐकून ऐकून उमाचं डोकंच उठलं. “वेळीअवेळी असं भलतंसलतं नका बोलत जाऊ आई.”- समजावणीच्या सुरात असलं तरी ती पहिल्यांदाच त्यांना असं उलटून बोलली. त्या आणखी चिडल्या. म्हणाल्या-“आता तू शिकव मला कसं वागायचं ते. तेवढंच राहिलंय. माझ्या मायबापानं थोडीच वळण लावलंय मला.”

“मायबापापर्यंत जाण्याची काहीच गरज नाहीय आई. थोडं समजून घ्या. तुम्ही असं अभद्र बोलत राहता. मनोज बाहेरगावी असला की मला मग काळजी वाटत राहते.”

“हो हो. तुला काळजी वाटणारच. मला थोडीच वाटते. तुझा नवरा ना तो. माझा कोणीच नाही. रस्त्यावरून उचलूनच आणलंय नं मी त्याला.”

“असं काहीही काय बोलताय आई. अभद्र बोलू नका इतकंच म्हंटलंय मी.”

“इतकंच म्हंटलस पण त्यामागचं सगळं म्हणणं कळलं हो मला. तुला नकोय ना मी घरात !… आजच जाते बघ कशी. आहे माझं घर मला. ह्या तुझ्या घरात एरवीही नाहीच करमत मला.”

“तुझं माझं असं कधी म्हंटलं मी? हे आपलं घर आहे ना?”

“हं… म्हणे आपलं. मी केला होता का हट्ट हे घर बांधायचा?…मला तर तेच माझं घर वाटतंय. तुलाच तिथे परकं वाटत होतं. तुझ्याच मनात नव्हतं त्या घरात रहायचं.”

“परकं वाटायचा प्रश्न नव्हता आई. सात वर्षे कुठलीच तक्रार न करता राहिलेच की मी तिथल्या गोतावळ्यात. पण माझं ऑफिस, मनोजचं वेळीअवेळी घरी येणं आणि मुख्य म्हणजे मनुची शाळा. सगळं तिथून मॅनेज करणं कठीण होऊ लागलं दिवसेंदिवस. तुम्ही घरात असता, तुम्हाला नाही कळत बाहेर काय चाललंय, जग कुठं चाललंय.”

झालं. उमाने इतकं बोलायचा अवकाश की साधनाताईंनी बॅगच भरायला घेतली. उमाने परोपरीने त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण नाही बधल्या त्या. बॅग भरून घुश्शातच तिला म्हणाल्या- “मला बस स्टँडवर पोचव आत्ताच्या आत्ता मला माझ्या घरी जायचंय.”

उमा त्यांना सोडून देणार नव्हती खरंतर. पण त्या इतक्या हट्टाला पेटलेल्या होत्या की तिने पोचवलं नसतं तर त्या स्वतःच पायी चालत गेल्या असत्या. मग तिने नाईलाज म्हणून त्यांना स्टँडवर पोचवलं. योग्य त्या बसमध्ये बसवलं. आठवणीने मोठ्या चुलत सासऱ्याना फोन करून कळवलं.

हे सगळं घडलं पण एकही फोन मनोजला करता आला नाही. मनोज कामावर गेलेला असताना त्याला फोन करून डिस्टर्ब केलेलं आवडत नसे. त्याला फोनचं तसंही फारसं कौतुक नव्हतंच. आणि त्यामुळे तिथे तो फारसा बोलतही नसे.

आपल्या आई आणि बायकोमध्ये असलेला सूक्ष्म ताण त्याला कधी जाणवलाच नाही असं नाही. पण ‘दोघींचं दोघींनाच निस्तरू द्यावं. उगाच मध्ये मध्ये करू नये.’ हे तंत्र त्याने पहिल्यापासून अवलंबलेलं होतं. उमाने सासूबाईंविषयीच्या तक्रारी कधी त्याला ऐकवल्या नाही आणि आईनेही सूनबाईला त्याच्यासमोर कधी त्रास दिला नाही. कुणाचीही बाजू वगैरे घेण्याचा त्यामुळे कधी प्रश्नच आला नाही आणि म्हणूनच भांडण कधी विकोपाला गेलं नव्हतं.

आता मात्र मनोजला हे कळवणं फार गरजेचं होतं. पण त्यादिवशी फोन केल्यावर ‘कामात आहे सद्ध्या. नंतर बोलू.’ इतकं सांगून त्याने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने सुट्टी घेणं उमाला जमणार नव्हतं. आता मनुची सर्वात जास्त काळजी तिला वाटू लागली.  उद्या मनूला ऑफिसमध्ये सोबत नेताही येणार नाही आणि शाळेत पाठवू तर घरी आल्यावर तिच्याजवळ कोणी नाही. जेमतेम सहा वर्षांची पोर कशी राहील? एवढं मोठं घर ह्या छोट्याशा जिवाच्या भरवशावर कसं टाकून द्यायचं? मनोज घरी असतानाचे दिवस सोडले तर हा आता नेहमीसाठीचाच प्रश्न झाला होता. बरं नेहमीसाठीचा प्रश्न  म्हंटल्यावर मनुला सांभाळायला एखादी बाई शोधली असती. पण आत्ता यावेळी बाई कुठून आणायची? सगळंच अवघड होऊन बसलं.

उमानं काहीतरी मनाशीच विचार केला आणि मनूला जवळ बोलावून दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर एकटीने कसं रहायचं वगैरे सूचना समजावून सांगितल्या. सोमवार एकदाचा निभला की झालं. मंगळवारी मनोज घरी असणारच होता. सहा वर्षांची एवढीशी पोर मनु- सगळं समजून घेतलं तिने आणि एकदाही कुरकुर केली नाही. फक्त- “माझी सोनू बाहुली बाहेरच्या व्हरांड्यात आठवणीने ठेवशील माझ्यासाठी. तिच्याशीच गप्पा करेन मी.” असं अगदी समजूतदारपणे म्हणाली आणि आपल्या खेळात गुंग झाली. उमाला नवल वाटलं ! किती पटकन बदलत्या वातावरणाशी जुळवून घेतात मुलं ! खायला आणि खेळायला मिळालं की कसलीच खळखळ नसते. नाहीतर आपल्यासारखी आईंसारखी मोठी माणसं, की ज्यांना सगळं असूनही अजून काहीतरी हवं असतं. मनुच्या समजूतदारपणाने तिचे डोळेच भरून आले एकदम. थोडं अपराधीही वाटलं. आज नोकरी करत नसते तर दिवसरात्र चोवीस तास मनुच्या दिमतीत राहता आलं असतं. तिला एकटीला ठेवण्याची अशी वेळच आली नसती. बरं थोडं लक्ष ठेवा म्हणून सांगायला कुणी शेजारीही नव्हतं.

ऑफिसच्या आवारात स्कुटी उभी करून तोंडाला बांधलेला स्कार्फ सोडवून घेत तिनं हलकेच डोळे पुसले. साहेबांच्या केबिनमध्ये ठेवलेल्या मस्टरवर सही करायला टेबलजवळ गेली. सही करताना मनगटावरच्या घड्याळात एक नजर टाकली, दहा पाच झाले होते. सुट्टीविषयी बोलू की नको, बोलू की नको ह्या विचारांच्या तंद्रीत असताना साहेबांनीच तिला विचारलं-“पाटील मॅडम, काय झालं? काही हवंय का?”

“अं…हो… नाही… म्हणजे मला सुट्टी हवी होती.”- ती अजिजीने म्हणाली.

“मॅडम, गेल्याच महिन्यात तुम्ही सलग पाच दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. याही महिन्यात दोन झाल्या आहेत.”

“हो… पण आज जरा अर्जंट काम आहे.”- तिचा आवाज अधिकच हळवा झाला.

“हं… पण तुम्हाला माहीत आहे ना सोमवारी किती काम असतं ते. एकवेळ उद्या सुट्टी घ्या पण आज नको.”

साहेबांच्या नकाराने तिचा चेहरा फिकुटला. उदास होत

ती केबिनमधून निघून आपल्या टेबलकडे जायला वळली तेवढ्यात- “मॅडम…”

साहेबांनी तिला आवाज दिला. तिने मागे वळून पाहिले तर-” ठिकाय तुम्ही अर्धा दिवसाची रजा टाका. शक्य तितकं काम पूर्ण करून तीन वाजता तुम्ही जाऊ शकता.”

तेवढ्यानेही तिला किती बरं वाटलं. तीनला सुट्टी म्हणजे फारतर सव्वातीन होतील घरी पोचायला. मनूला फार एकटं रहावं लागणार नाही. मनोजही हातातलं काम पूर्ण करून आज रात्री परतणार होता.

मग टेबलावरच्या फाईलींमध्ये तिने डोकं  खुपसण्याआधी मनोजला एकदा फोन लावला. खरंतर त्यालाही मनातून मनुची काळजी वाटत असणार. पण आवाजात तसे काही न दाखवता तो तिला धीर देता झाला. तिनं आपल्याला अर्ध्या दिवसाची रजा मिळाल्याचं तिला कळवलं तेव्हा तोही थोडा आश्वस्त झाल्याचं तिला जाणवलं.

एकेक फाईल नजरेखालून घालताना तिला कधी एकदा तीन वाजतात असं वाटू लागलं. घड्याळाचे काटे फार हळूहळू फिरताहेत असंही वाटत होतं.

तिला आज पहिल्यांदा तीव्रतेने जाणवलं की बाईने नोकरी करणं खरंच कठीण असतं. घरातून आपल्या माणसांची खरीखुरी साथ लागते. आपण कितीही आव आणला तरी माणसासारखं सगळं वाऱ्यावर सोडून नाही देता येत. का करतो आपण इतका आटापिटा ?… किती चांगली श्रीमंत ठिकाणं चालून आली होती आपल्याला !… पण बऱ्याच जणांना नोकरी करणारी बायको नको होती. किंवा ज्यांना चालणार होती त्यांना  तिच्या नोकरीची फारशी गरज नव्हती. म्हणजे कधीही ‘तू नोकरी सोड.’ असं म्हणू शकणारा मुलगा तिलाही नकोच होता.

मग मनोजचं ठिकाण तिला आवडून गेलं. खेड्यात राहूनही जिद्दीने शिकलेला, स्वबळावर नोकरी मिळवलेला आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी नोकरी करणारी बायको हवी असणारा. त्याच्या आयुष्यात आपल्याइतकंच आपल्या कमावतेपणाचंही कौतुक असलं पाहिजे ह्या एकाच इच्छेच्या पुर्ततेखातर तिने मनोजशी लग्न केलं. आणि सातेक वर्षे त्याच्या बरोबर गावातल्या घरात काढलीही. आता गरज आणि आवड म्हणून स्वतःचं घर बांधलं तर हे असं सगळं अवघड होऊन बसलं.

एकेक फाईल हाताखालून जात होती खरं पण त्यातली कामं यांत्रिकतेने, सरावल्यासारखी होत होती. सद्ध्या मन आणि मेंदूची फारकत झाल्यासारखं झालं होतं. मन कधी घड्याळाच्या काट्याबरोबर वर्तमानात तर कधी एकेक प्रसंग आठवत भूतकाळात यथेच्छ फिरत होतं.

दीड वाजता मधली डबा खाण्याची सुट्टी झाली तेव्हा तिला पर्समधला डबा काढून जेवायची इच्छाच झाली नाही. दोन सव्वा दोनला मनू घरी येईल. तिच्या दप्तराच्या पहिल्या खणात ग्रीलच्या दरवाज्याला लावलेल्या कुलुपाची किल्ली काल रात्रीच ठेवली होती तिने. आणि दप्तरात किल्ली ठेवण्याआधी कुलूप उघडण्याचा सरावही करून घेतला होता चारपाच वेळा. आणि कुलूप उघडताना चुकून किल्ली ग्रीलच्या दरवाज्याचा आतल्या बाजूला हातातून पडू देऊ नकोस म्हणून सूचनाही देऊन झाली होती. सहा वर्षाच्या त्या छोट्याशा जीवाने सगळं नीट ऐकून समजून घेतलं होतं. आणि आईला नीट प्रात्यक्षिकही करून दाखवलं होतं.

पुन्हा घड्याळात नजर टाकली तर दोन वाजले होते. ‘घरी जाण्याची सुट्टी व्हायला अजून एक तासाचा अवकाश !’ तिनं मनात म्हंटलं आणि पुन्हा स्वतःला कामात गुंतवलं.

फार फार युगे लोटल्यासारखा तो एक तास कसाबसा संपला. निघण्यापूर्वी आवरून करायची अशी तयारी फारशी नव्हतीच आज. अर्ध्या रजेचा एक अर्ज तिने आधीच खरडून ठेवला होता. तो साहेबांच्या केबिनमध्ये नेऊन दिला. आणि त्यांची परमिशन घेऊन बाहेर आली.

गाडीला नव्हे आपल्यालाच पंख हवे होते असं तिला वाटलं. उद्याचं उद्या बघता येईल. पण आज मनुजवळ तिला लवकरात लवकर पोचायचं होतं. आजूबाजूला शेजार नसताना, जवळ कोणी मोठं माणूस नसताना पोर कशी राहिली असेल, काय करत असेल ह्या काळजीने तिचं मन मलूल झालं होतं. मनुची ओढ तिच्या उजव्या हाताच्या मनगटाला स्कुटीचा स्पीड वाढवायला बाध्य करत होती.

काळजी आणि ओढ मनात घेऊन वाऱ्यावर स्वार झाल्यासारखी स्कुटीचा उजवा कान पिरगाळत उमाने घराचा रस्ता चाकाखालून घातला. दुरून घर दिसू लागलं तसतशी ती अधीर होत होती. शेवटी एकदाची फाटकाजवळ पोचली तर आतून मनु कुणाशीतरी बोलत असल्याचा आवाज तिला आला. काळजात धस्सकन होऊन तिने कान देऊन ऐकलं तर मनु तिच्या आजीशी गप्पा मारत असल्याचं तिला ऐकू आलं. आपण आलोय हे त्या दोघींना कळावं म्हणून गाडीचा हॉर्न तिने जोरजोरात वाजवला. हॉर्न ऐकून मघाशी बाहेर काढून ठेवलेला घरी वापरायचा गुलाबी फ्रॉक घातलेली मनु धावत पळत फाटक उघडायला आली अन खुश होत म्हणाली- “आई, आज तू लवकर कशीकाय आलीस? तू तर सहा वाजता येतेस ना?”

“तुझ्या काळजीने आले बेटा. जेवलीस का तू?”

तिचा प्रश्न ऐकूनही त्याकडे फार लक्ष न देता उत्साहाने मनु तिला म्हणाली-“आज ना गंमतच झाली आई. मी शाळेतून घरी आल्यावर ना आजी दारातच बसलेली होती माझी वाट बघत. तिच्याकडे किल्लीच नव्हती ना घराची.” – बोलताना मनुचे हातवारे सुरू होते-“मग मीच दप्तरातून किल्ली काढली आणि कुलूप सुद्धा मीच उघडलं. आज्जी शाब्बास म्हणाली मला.”

उमाला मनातून खूप भरून आलं. पण स्वतःला सावरत ती म्हणाली-“अजून काय काय मज्जा केली मग तू?”

“मी ना मस्तपैकी पोटभर जेवले अंगणातल्या झाडांखाली बसून. मला पिकनिकला आल्यासारखं वाटलं आज. आजीलाही म्हंटलं मी की तू सुद्धा जेव माझ्यासोबत. तर ती थांबलीय तुझ्यासाठी…”

“माझ्यासाठी?… पण मी तर डबा खाऊन आलेय ऑफिसातून.”

उमाने मनूला असं सांगितलं तेवढ्यात साधनाताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या-“मनु… आईला म्हणावं डबा घरी विसरल्यावर ऑफिसमध्ये कसाकाय खाल्लास?”

‘अरेच्या !… निघताना पर्समध्ये घेऊ म्हणून ग्रीलच्या दरवाज्याबाहेर पायरीवर ठेवलेला डबा तर आपण तिथेच विसरलो’- उमाला आठवलं. आणि ऑफिसात जेवायची इच्छाच नसल्याने डबा घरी विसरल्याचं आपल्याला कळलं सुद्धा नाही.

उमाने पर्समधून आतल्या घराची किल्ली काढली. दार उघडलं आणि त्या तिघीही घरात आल्या. मग मनुची नेहमीप्रमाणे आजीशी अखंड बडबड सुरू झाली.

उमा हातपाय धुवून किचनमध्ये आली. तोपर्यंत डायनिंग टेबलवर दोन पानं साधनाताईंनी वाढून घेतलेली तिला दिसली. मग त्या दिवशी एकमेकींशी फार काही न बोलता त्या दोघी सोबत बसून जेवल्या.

जेवताना नेहमी बोलतो तितकं आवश्यक आणि जुजबी ‘हा… हं… हे दे… ते घ्या… पोळी वाढू का…’ असे संवाद त्यांच्यात घडले. मनातून मात्र दोघीही एकमेकींशी भरभरून बोलत होत्या. हे फक्त त्यांच्यातील मौनाला कळत होतं.

त्या दिवशी उमाचे डोळे कृतज्ञतेने सारखे भरून येत होते.

Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

5 thoughts on “दिवाळी २०२० स्पेशल- ९

  • November 19, 2020 at 3:04 am
    Permalink

    छान कथा सर्व नोकरी करणार्या महिलांना आयुष्यात एकदातरी असा अनुभव आला असेल मी पण हे अनुभवले आहे

    Reply
    • November 19, 2020 at 9:37 am
      Permalink

      धन्यवाद 🙂

      Reply
  • November 21, 2020 at 1:23 pm
    Permalink

    Sundar 👌👌👌

    Reply
  • January 5, 2021 at 9:57 am
    Permalink

    माझे पण डोळे भरून आले .. छानच

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!