दिवाळी २०२० स्पेशल- ११

हळदीचं बेट                           लेखिका- अपर्णा देशपांडे       

मागील वर्षी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप  ‘व्हायरल’  झाला होता . आईवडील  आपल्या छोट्याश्या पाच सहा वर्षाच्या मुलाला खोटं खोटं रागवताएत किंवा मारल्याचा अभिनय करत आहेत …..आणि एक जेमतेम चालायला लागलेली , अजून बोलता न येणारी चिमुरडी आपल्या अनाकलनीय भाषेत (??) बडबड करत आपल्या वडिलांना रागवतेय . अगदी रागारागाने हातवारे करत ओरडतेय .

तिच्या चिमुकल्या हातांनी बाबांना ढकलतेय ……..तिला दादाला वाचवायचय , घरात कुठलाही आक्रस्ताळेपणा , नकोय …..हवंय फक्त निरामय प्रेम !

हे असं घरोघरी घडतं .

कुठून येते ही भावनिक ताकद? ही काळजी? खुद्द  आईवडिलांशी  जाऊन भिडण्याची उर्मी ?

याचं कारण  म्हणजे तिला  जन्मजात मिळालेले  कोमल ह्रदय , लगेच वितळणारं लोण्यासारखं मन आणि तिथे  ठासून भरलेली अपार माया .

ती  प्रसंगी  आई वडीलांमधील साकव होते , तर कधी ते आणि आपल्या भावातील  एक नाजूक पण तरीही खंबीर दुवा .  बाबांच्या आवाजावरून ती त्यांची मनस्थिती ओळखते .  त्यांच्या डोळ्यात  खोलवर लपवलेलं पाणी ही न शोधताच दिसतं तिला .

आईच्या मनातील चलबिचल , तिचे मानसिक ,  भावनिक   आंदोलनं ह्याचा नुसता साक्षीदार न होता आईचा भावनिक आधार बनते ती . आईच्या अनेक  दृश्य अदृश्य जखमांवरचं लेपण !!  ……तिचं  आणि साऱ्या घराचंच हळदीचं बेट !!

असं हळदीचं बेट प्रत्येक घरात असावच .  हळदी मध्ये असलेली जखम भरायची ताकद निसर्गाने मुलीमध्ये दिलीये . एका उनाड अवखळ काहीश्या बेफिकिरीत वावरणाऱ्या तरुणाचं  एका कोमल हृदयी , आणि हळव्या बापात रूपांतर करणारी ही कन्या आपल्या आईची एक  संवेदनशील साथी असते .

आईच्या अंशाचा हा कोवळा कोंबच पुढे   एका  वेलीत रूपांतरित होऊन तिचा कायमचा  मानसिक आधार बनतो .

घरातील मुलगा मग तो कोणत्याही वयातील असुदेत  ,  त्याच्यासाठी घरातील मुलगी ही त्याची बचावाची ढाल असते . त्याच्या खोड्या सावरत त्याला बाबांच्या कोपापासून वाचवत  आणि मग  निवांत शांतपणे त्याच्या चुका दाखवत त्याला मायेचं पांघरून घालणारं  हे बहिणीचं प्रेम मिळायला प्रत्येकाला एक बहीण असावी लागते .

……मात्र  मुलामुळे वंश वाढतो  , आई वडिलांचं नाव राखला जातं ह्या तद्दन निरर्थक समजावरून कित्येक पिढ्यात मुलीच्या जन्मावर वरवंटा फिरवल्या  जातोय .

ऑलिम्पिक मध्ये अपयशाची भळभळणारी जखम भरून दोन मेडल मिळवून देणाऱ्या  पी.व्ही सिंधू आणि साक्षी मलिक ह्यांनी देशा बरोबर आपल्या आई वडिलांचं  , आपल्या खानदानाचं नाव पार उंचावलंच न? देशाला ऑलिम्पिक मधून रिकाम्या हाताने वापस येण्याच्या नामुष्कीतून ह्या हळदीच्या बेटांनीच तर वाचवलं .

भारताची पहिली गुप्तचर अधिकारी लेफ्टनंट गेनेवी लालजी हिचे आजोबा आणि वडील हे देखील सैन्यातच होते .

आपल्या कुटुंबातील तिसरी पिढी होत घराण्याचं आणि देशाचं नाव करणारी ही कन्या !!

अशा कन्या रत्नांचीच   उदाहरणं द्यायची झाली तर अगणित कन्यका आहेत ज्यांनी आपल्या घरण्यासोबत देशाला सन्मान मिळवून दिला .

शैक्षणिक क्षेत्रातही  कायम मुली बाजी मारतात ते त्यांच्यातील अंगभूत चिकाटी , मेहनतीची तयारी आणि प्रचंड सकारात्मकता  ह्यामुळे .

*अनुवंश शास्त्रीय भाषेत बोलायचं तर निसर्गाने काही हक्क स्वतः कडे राखून ठेवले आहेत* . *चिंपंझी आणि माणसं ह्यांच्या जिनोम मध्ये फक्त १.२% चाच फरक आहे . पण तेव्हढ्याच फरकामुळे निसर्गाने मानवाला कुठल्याकुठे नेवून पोचवलय . मानवाच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीत त्यामुळे आमूलाग्र बदल झाले .

अशीच किमया निसर्गाने मुलगा आणि मुलगी ह्यांच्या बाबतीत केली आहे . *ह्या दोन शब्दांमध्ये जरी एका वेलांटीचाच फरक असला तरी मेंदू रचना , त्याचा वापर आणि हार्मोन्स ह्यात तफावत असल्याने मुली मुलांपेक्षा अनेक बाबतीत जन्मतःच वेगळ्या असतात* .

*हे वेगळेपण मेंदूच्या प्रतिक्षिप्त क्रिया , परिस्थिती चे वेगवेगळे आकलन अथवा निर्णय शक्ती अशा अनेक बाबीमध्ये आढळून येते . ह्याचा सखोल अभ्यास झाल्यावर काही ठोकताळे बांधण्यात आले* .

३ ते ४ वयोगटातील काही बालके एका हॉल मध्ये खेळत होते .  हॉल बाहेर एका बाजूला त्यांचे पालक आणि दुसरीकडे रंगबिरंगी आकर्षक खेळणी ठेवण्यात आली .  सगळ्या मुलांना एकाच वेळी बाहेर सोडण्यात आले . त्यावेळी  जवळपास सगळ्या मुली  इकडेतिकडे न बघता आपल्या पालकांकडे धावल्या …पण  अपवाद वगळता मुलगे मात्र  खेळण्याकडे धावले .

आणखी अनेक प्रयोगात असे आढळून आले की सहा महिन्यांच्या बाळांसमोर काही आकर्षक वस्तू ठेवल्यास मुलं चटकन त्याकडे आकर्षित होतात , पण *मुली मात्र आधी वस्तू देणाऱ्याचा चेहरा वाचणं पसंद करतात* . एकूणच मुलींना भावनांची जाणीव लवकर होते .

मुली एका वेळेला अनेक क्रिया करून संतुलन राखून प्रत्येक काम नीट पूर्ण करू शकतात . मुलं खूप एककल्ली असतात . एका कामात लक्ष केंद्रित केलं की आजुबाजुला घडणाऱ्या इतर गोष्टींकडे गरज असूनही त्यांचं लक्ष जात नाही .

(मुलांची बलस्थानं , शक्तीस्थानं वेगळी आहेत . इथे मुलांना कमी लेखण्याचा मुळीच उद्देश नाही , फक्त मुलींना कायम दुय्यम स्थान मिळण्यामागची भूमिका किती चुकीची आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे . )

मग  जर  कन्यारत्न इतकं  प्रभावी ,  मेहनती  , कर्तृत्ववान  आणि शिवाय मोहक आणि मधाळ प्रेमाची कुपी आहे तर मग ती  काही कुटुंबात नकोशी का असते? अजूनही काही ठिकाणी मुली

‘नकुशा’  का आहेत ?  एक निसर्गदत्त शारीरिक ताकद सोडली ( आता तर त्यालाही अनेक जणी अपवाद आहेत)  तर पुरुषांपेक्षा कुठेही  कमी नसणाऱ्या आणि अनेकदा काकणभर सरसच असणाऱ्या ह्या जातीला  का नाकारल्या जातं?

अगदी अलिकडच्या काळापर्यंत मुलींना अत्यंत कमी लेखणारी , मुलींच्या विरुद्ध असणारी समाज  रचना आणि अतिशय सोप्याने होऊ शकणारी  गर्भलिंग चाचणी ची सोय ……आणि त्याचा पूर्ण गैरवापर करून घेण्याची अपप्रवृत्ती ह्यामुळे स्त्री भ्रूण हत्येत प्रचंड वाढ झाली . पर्यायाने बाल लिंग गुणोत्तर पार कोलमडले . मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या प्रचंड घटली आणि विवाह व्यवस्थेचा  आणि समाजस्वास्थ्याचा पाया ढासळला . अशाने समाज विकृती आणखीनच वाढते .

तळागाळातील अशिक्षित समाजातच हे चित्र पाहायला मिळत होतं  असं नाही तर अनेक ठिकाणी सधन सुशिक्षित समाज देखील ह्या अपकृत्यात मागे नव्हता .

शेवटी सरकारला ह्या बाबतीत अनेक कायदे करावे लागले . मुलीच्या सुरक्षेसाठी , शिक्षणासाठी अनेक योजना  आखाव्या लागल्या .

आता गर्भलिंग चाचणी पूर्णपणे बेकायदेशीर आहे . ह्या बाबतीत जागरूकता आणण्यासाठी अनेक योजना  बनवल्या आहेत . राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य  विभागा तर्फे  www.amchimulgi.gov  ही वेबसाईट उपलब्ध आहे . 1800- 3456746 ही एक टोल फ्री हेल्पलाईन बनवली आहे , जिथे आपण अशा डॉक्टर आणि हॉस्पिटल ची तक्रार करू शकतो जिथे  अवैध गर्भलिंग निदान केल्या जाते . PCPNDT  (प्री कनसेप्शन प्री नेटल       डायगनोग्स्टिक टेक्निक )   ह्या कायद्याअंतर्गत   त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तरतूद आहे , आणि अशी खबर देणारांसाठी बक्षीस योजना पण आहे .

आपल्या अवतीभवती  कुटुंबात देखील अगदीच स्त्रीभ्रूण हत्या जरी होत नसली तरीही  ‘मुलाची आस’ ही असतेच . मग त्यापायी आधी दोन मुली असतील तरी तिसऱ्यांदा मुलाच्या अपेक्षेपायी  आईला बाळंतपण सोसावे लागते . दुर्दैव म्हणजे ती आई  स्वतःच मुली ऐवजी  फक्त मुलगा होण्यासाठी अत्यंत केविलवाणे उपाय करत असते हे वास्तव आहे .

मुलींच्या जन्मापासून , शिक्षणापासून त्यांना नाकारल्या जाणाऱ्या अनेक मूलभूत हक्कांसाठी लढावं लागणं हे अतिशय किडक्या समाजाचं लक्षण आहे .  एका सुदृढ समाजाच्या सर्वांगीण वाढीसाठी आजही ह्या का बाबी जोखड बनून खीळ घालतात ? *का हा लिंगभेद इतका हावी झाला  की त्यासाठी  सुधारकांच्या पिढ्या न पिढ्या खर्ची पडल्या पण समाजाचा एक हिस्सा अजूनही त्याच बेड्यात अडकून आहे ?*

*मुलगा असावा ,  ही इच्छा असणं ह्यात काहीच  गैर नाही* , *पण मुलगाच असावा ही इच्छा का असते* *ह्यामागील कारणे बघितल्यास काही गोष्टी प्रामुख्याने समोर येतात* .

ह्यातील एक प्रमुख कारण म्हणजे  ***मुलगा हाच  म्हातारपणाची लाठी  असतो हा समज .

हे  खरच असं  असलं असतं तर वृद्धधश्रम ओसंडून वाहिले नसते . खरच किती टक्के मुलं आईवडिलांना प्रेमाने सांभाळत असतील .

शिवाय  मुलं परदेशी आणि म्हातारे आईवडील इथे  भारतात एकटे  असे असंख्य जोडपे त्यांच्या ह्या लाठीविनाच तर जगत आहेत .

मुलगा असूनही मुलगीच आईवडिलांना आधार देते असे अनेक बोलके उदाहरणं  पण आपण पहात नाही का ? *ह्याचा अर्थ प्रेमाने आईवडिलांना सांभाळणारे मुलं नाहीत असं मुळीच नाही* , *पण फक्त मूलगेच  ही जबाबदारी  पेलतात असं म्हणणं नक्कीच चुकीचं आहे* .

आता तर अपत्य मुलगा असो अथवा मुलगी , आई वडिलांना त्यांनी सांभाळच पाहिजे ह्या बाबतीत कायदा पण झाला आहे .

ह्या  बाबतीत एक किस्सा सांगण्यासारखा आहे ….

*एका कुटुंबातील वडिलांचं निधन झालं* . *घरातील मोठा शिकलेला आणि विवाहित मुलगा दुसऱ्याच दिवशी  आईकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आपल्या  अशिक्षीत  बहिणीसमोर  शेती आणि घराचे कागदपत्रं ठेवले* . *बहिणीने सगळा हक्क सोडावा अशी मागणी त्यात केली होती.* . *बहीणने कागदावर सही केली आणि खाडकन भावाच्या मुस्काटात ठेवून दिली* . *आईची पिशवी उचलली , तिचा हात धरून  तिला आपल्या सोबत नेताना वळून वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून म्हणाली* ,  ” *दुसराही मुलगाच पाहिजे होता न तुम्हाला*?”

दुसरा एक समज म्हणजे

**आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तरक्रियेचा अधिकार फक्त मुलांना असतो  आणि मुलाच्या हातून  ते घडल्यासच मोक्ष प्राप्ती होते . ( मृत्यू नंतर चे जग पूर्णपणे अनभिज्ञ असतांना केवळ भीतीपोटी  किंवा मुक्तीच्या  समजुती पोटी हा विचार बळावला असावा.)

ह्या एक संवेदनशील विषय आहे आणि फार तुरळक ठिकाणी  मुली असा विधी पार पडतांना दिसतात . अन्यथा जावई मंडळी कडून हे कार्य करवले जाते .

साधारण  चाळीस वर्षांपूर्वी चा एक अनुभव एक ज्येष्ठ मंडळींनी सांगितला . घरात आईचं निधन झालं …..एक मुलगा इंग्लंड ला …त्याने कळवून टाकलं ….उरकून घ्या ! ……इथला दूसरा मुलगा …..घराचा ‘कुलदीपक’  ……बाहेरून आला …..पूर्णपणे शुद्ध गेलेल्या तर्र अवस्थेत. घरात विधवा बहीण होती , जी आईचं सगळं करायची. सगळे लोक ताटकळले ले….करता पुरुषच अग्नी देणार….ती ताडकन उठून म्हणाली , ” आई चं  आणि घराचं जबाबदारीनं , प्रेमानं  करणाऱ्या व्यक्तीस  ‘कर्ता’ म्हणतात ! मी करणार सगळे विधी ! “…..आणि तिने ते केले . आज ह्या गोष्टीचं कदाचित इतकं नवल वाटणार नाही , पण त्या काळात हे धाडस दुर्मिळ होतं .

तिसरा आणि महत्वाचा  मुद्दा आहे  **संपत्ती आणि मालमत्ता वाटणी विषयी .  अनेक पिढ्या जीवापाड जपत आलेली वडिलोपार्जित मालमत्ता  सगळ्या अपत्यात समान वाटली जाते .

2005 पासून बनलेल्या कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीला मुलांबरोबरच समान हिस्सा मिळतो . त्यात जर  फक्त मुलीच असतील तर ती मालमत्ता मुलिंना मिळून पर्यायाने  मुलिंच्या सासरी म्हणजे परक्या घरात जाते . इतक्या पिढीच्या स्वामीत्वच्या भावनेला  असा तडा जाऊ नये म्हणून किमान एकतरी मुलगा असावा ही भावना प्रबळ होत असावी .

ह्या कन्या अपत्याच्या बाबत उदासीनता असण्यातला  आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे **मुलीच्या संरक्षणाची प्रचंड मोठी जबाबदारी .

बरबटलेल्या विकृत समाजापासून मुलीला वाचवण्याची पालकांची धडपड त्यांना खाल्ला घास अंगी लागू देत नाही . मुलीला आपल्या पायावर स्वतंत्रपणे उभे करायचे , सगळ्या आव्हानांना तोंड देण्या लायक बनवायचे आणि त्यातूनही तिच्या सुरक्षेसाठी सतत एक टांगती तलवार घेऊन वावरायचे . हा ताण मात्र दिवसागणिक वाढतच जातोय . त्याला सामोरे जाण्यापेक्षा  अखेरीस   काहीवेळेला मुलगाच  असलेला बरा ह्या विचारांवर शिक्कामोर्तब होते .

ह्या बाबतीत आई आणि मुलीतील पारदर्शकता  अत्यंत महत्वाची आहे .

मुलीने आईजवळ प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने सांगणं गरजेचं आहे . आईकडूनही तितकाच मोकळा संवाद अपेक्षित आहे . मग अनेक रंगीत प्रलोभनाला चटकन बळी पडणाऱ्या मुलींना वेळेत सावरायला आई आणि कुटुंब त्वरित मदतीला येऊ शकतात . मुली अनेकदा संकोचाने त्यांच्या समस्या बोलूनच दाखवत नाहीत आणि कुटुंबाला कळेपर्यंत बऱ्याच वेळा उशीर झालेला असतो .

** मुलीच्या लग्नासाठी लागणार हुंडा आणि एकूण खर्च हे देखील ‘मुलगी नको’  म्हणण्या मागील एक कारण . महाराष्ट्रात ह्याबाबतीत प्रचंड जागृती झाली असली तरी अनेक राज्यात हुंड्याचं स्वरूप फार भयानक आहे . मुलीच्या जन्मापासूनच तिच्या लग्नासाठी पै पै जोडून हुंडा जमवला जातो . मग मुलाच्या लग्नात त्याची सगळी भरपाई करत त्याही पेक्षा जास्त मोठी  ‘वसूली’  केल्या जाते . अशाने हे एक कधीही न संपणारं दुष्टचक्र कधी भेदल्याच जात नाही .

** मुलीला शिकवून आणि तिच्यात गुंतवणूक करून काय फायदा …ती शेवटी लग्न करून जाणार …..मग त्याचा परतावा कसा मिळणार ? असा प्रश्न करणारे महाभाग आजही आहेत . अशी माणसं आपल्या मुलाचे संगोपन आणि  शिक्षण देखील एक  खूप फायदा देणारी   “”इन्व्हेस्टमेंट”” म्हणूनच करत असणार . मग त्यांची ही गुंतवणूक कशी चुकीची होती याचा प्रत्यय त्यांना येईपर्यंत  खूप उशीर झाला असतो . अशा वेळी त्यांची अशिक्षित  मुलगी आपल्या आई वडिलांचा आधार बनते पण तिच्या ह्या त्यागाची खरी किंमत कळण्याची त्यांची कुवतच नसते . असती तर त्यांनी आधीच  तिच्या शिक्षणासाठी योग्य पाऊले उचलली असती .

**मुलीचं आर्थिक स्वावलंबन हा देखील अतिशय कळीचा मुद्दा आहे .

लहान गावात आणि कामगार वर्गात हा प्रश्न फार भयानक रूप धारण करतो .

मुलीला सासरी कितीही यातना असल्या तरीही तिचं आर्थिक परावलंबीतत्व   म्हणजे जगण्याचा हक्क नाकारण्या सारखच आहे .

मुलीच्या  सुरक्षित आयुष्यासाठी लग्नाच्या वेळी काही अनामत सासर कडून तिच्या नावावर होण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे . ह्याला हुंड्याचं स्वरूप न येता सासर कडून तिला दिल्या जाणारा विश्वास ह्या रुपात त्याकडे बघण्याची गरज आहे .

शहरात पुढारलेल्या समाजात  सुदैवाने हे चित्र सुखावह आहे . इथे मुलीला शैक्षणिक आणि आर्थिक स्वावलंबन आहे .  इथली मुलगी धीट , महत्वाकांक्षी  आणि  पालकांची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहे .

पण मग इथले धोकेही वेगळ्याच स्तरावरचे आहेत . वागण्याचे  पूर्ण स्वातंत्र्य , हातात पैसा ,स्वतःची अत्यंत ठाम मतं यामुळे स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यामधील पुसत रेषा ….. हा एक वेगळाच चिंतेचा विषय आहे .

मुलगी ही जन्मजात सहनशीलता घेऊन आलेली असते . तिच्या आयुष्यातील  त्रासदायक  बोचऱ्या गोष्टींना ती सहजपणे तोंड देते .  दर महिन्याला नैसर्गिकरित्या येणारी पाळी ही कितीही वेदनादायी असली तरीही तिच्या कडून कर्तव्य पूर्तीत ती कुचराई करत नाही .

समाजातील टवाळखोर , कपड्यावरून होणारी टिंगल , गर्दीत होणारे किळसवाणे स्पर्श , आणि तिच्या कार्यक्षेत्रात  होणारे शोषण !

हे कमी अधिक प्रत्येक मुलीच्या वाट्याला येतेच येते! त्यात आता प्रचंड काळजी करायला लावणारा विषय म्हणजे बालिकांचे लैगिक शोषण आणि त्यापायी होणाऱ्या बालिकांच्या हत्या !

तिच्या आत्मसंमानाला पार चुरगाळून टाकणाऱ्या ह्या समाजाला कसा आवर घालायचा?

पण त्यातूनही मुली उठतात ,  मनावरील आणि शरीरावरील ओरखडे सांधत पुन्हा चिवटपणे लढा देण्यासाठी उभ्या रहातात कारण त्यांच्यात असलेला चिवट आशावाद  !

खरं तर इतरांच्या जखमांना  भरून काढण्याची ताकद असणारी ही हळदीची बेटं किती हळुवारपणे जोपासली गेली पाहिजेत . त्यासाठी प्रचंड समाज प्रबोधनाची गरज आहे .

पण हे इतकं सोपं सरळ समीकरण नाही . आता तर विकृत गुन्हेगारी विरुद्ध कायदा , त्याची अंमलबजावणी हे शब्द बुळबुळीत बोथट  अर्थहीन वाटतात .

आजच्या तरुण मातांनी आपल्या अपत्यांशी मोकळा संवाद साधत काही बाबी  प्रकर्षाने त्यांच्या मनावर बिंबवायला हव्या . मुलगा मुलगी भेद हा फक्त शारीरिक पातळीवरच ठेवून एकमेकांना अत्यंत आदराने वागवण्याची गरज वारंवार विशद करावी .

मुलींना असणाऱ्या   अडचणींवर घरात खुला संवाद घडावा .

समाजातील कुठल्याही स्त्रीचा किंवा व्यक्तीचा आपल्या कडून अनादर होता कामा नये हे  बाळकडू आपल्या अपत्यास आवर्जून पाजले गेलेच पाहिजे .

समाज बदलण्याची ताकद आई मध्ये आहे . ती आई सक्षम होण्यासाठी ही आपली कोवळी हळदीची बेटं  जीवापाड जपल्या गेलीच पाहिजेत . तेव्हाच

आपले अपत्य निरोगी निर्लेप मनाचे व्हावे ही गरज जास्त मोठी होईल मग ते अपत्य मुलगा असो वा मुलगी .

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

One thought on “दिवाळी २०२० स्पेशल- ११

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!