दिवाळी २०२० स्पेशल- १२

हार                                       लेखिका- पूजा खाडे पाठक

“बांगड्या हव्यात” ती अडखळत म्हणाली. “पहिल्या मजल्यावरच्या दुसऱ्या काउंटर वर जा” काउंटर वरचा माणूस हात दाखवत म्हणाला. खरंतर ती सगळी अवघडून च गेली होती . आतून ताजमहालासारखे दिसणारे , गारेगार पांढरेशुभ्र दालन. राजवाडा च जणू! सगळीकडे एकसारख्या अंजिरी साड्या नेसलेल्या आणि अंबाडा घातलेल्या बायका दागिने दाखवत होत्या. काय ती मोठमोठाली मंगळसूत्र अन काय ते सेट! एकीकडे चांदीचा पूर्ण डायनिंग सेट काढला होता, ते बघून तिचा उर धपापलाच! “यापेक्षा सांगलीचा पेढीवरचा सोनार बरा” तिच्या मनात आलं. पण करणार काय ? एकुलती एक लाडकी नणंद , तिची हौस! पहिल्या मजल्यावर बांगड्यांच्या काउंटरवर ते आले आणि एक जण  बांगड्या  दाखवू लागली. किती ते प्रकार! जाळीच्या,  डिझाईन वाल्या , रंगीबेरंगी नक्षी असणाऱ्या! ती एक एक बांगडी हातात घेऊन बघू लागली. आता तिला तिच्या हातातल्या बांगड्या एकदम कळकट्ट वाटू लागल्या. काळसर पडलेल्या आणि रोजच्या कामांनी पार चेम्बुन गेलेल्या. काउंटर वरची बाई उत्साहाने एकेक सेट दाखवत होती. “जेवणाची  वेळ होत आली. परत जाऊन स्वयंपाक उरकायचा आहे. नशीब कुकर तरी लावून आले. चिंटू ला भूक लागेल तोवर. आई करायला जातील आणि उगाच उद्योग ठेवतील. या दागिने दाखवण्याच्या बाईच्या घरी कोण कोण असेल ? हिच्या घरी कोण करत असेल स्वयंपाक? बिचारीला किती काम करावं लागत असेल!” ती स्वतः शीच मनातल्या मनात बोलू लागली.  ४ तोळ्यांच्या बांगड्यांची खरेदी झाली, आणि सगळे काउंटर ला आले. काउंटर वर येताना अगदी अचानक च तिला अगदी नाजूक, तरीही फार सुंदर सोन्याचा हार दिसला. तिची पावलं आपोआप थांबली तिथे. दोन पदरी नाजूक चैन छान एकमेकात गोवून तो हार तयार झाला होता.  गेल्या दहा वर्षात तिने कधीच  हट्ट म्हणून केला नव्हता पण आज मात्र हा हार  आपल्याकडे हवाच असं तिला वाटलं.  पण ते आत्ता शक्य नाही हेही तिला माहित होतं. डोळे बघून तो हार तिने मनात साठवून घेतला , आणि समोर बघितलं तर नवरा तिच्याकडेच बघत होता. तिने  पटकन नजर खाली वळवली. “काय वाटलं असेल यांना ? एक ती नणंद , तिचं सोडून हिला स्वतः चिच हौस करायची आहे असं वाटलं असेल का ? काय तरी मी हावरट .. शी ..  ” स्वतः च्या विचारात ती काउंटर ला आली. “मी , बिल देऊन  येतो,तुम्ही  पुढे व्हा. ” नवरा म्हणाला तशा त्या दोघी बाहेर पडल्या. “कित्ती छान आहेत ना ग वहिनी बांगड्या ! मला खूप  आवडल्या!” नणंद खिदळत होती. तिला पटकन हसू आलं. किती छान असतात हे दिवस ! कौतुक करून घेण्याचे! आपलं झालं होतं का असं कौतुक ? त्या मानाने झालंच होतं कि! आईने तिचा एक गोठ दिला होता , पेढीवाल्याकडे! शिवाय , आपल्यालाच नको होता हा खर्च. धाकट्याची फी भरायची होती. तरीही ३ तोळ्यांच्या बांगड्या हातात  आल्याच! त्यातच किती दडपून गेलो होतो आपण.

ऐंशी हजारांचं बिल देऊन तो बाहेर आला. बाहेर दोघी त्याची वाट बघत होत्या. तिघेही बस ची वाट बघत उभे राहिले. घरी आल्या आल्या देवासमोर बांगड्या ठेवल्या. नवीन बांगड्या सासूबाईंना दाखवून झाल्या. हिने पटकन आत जाऊन पोळीभाजी रांधली आणि सगळ्यांची जेवणे पटापट उरकली.

“झाली सगळी खरेदी. आता ते ब्लाउज वगैरे काय ते बघून घे ग वहिनी बरोबर जाऊन . परत उशीर नका करू. आणि त्या बांगड्या नीट ठेवा जरा. सगळंच नीट ठेवा. महागामोलाचं आहे सगळं. ” तो बडीशेप तोंडात टाकत म्हणाला.

ती सगळी झाकपाक करून आत आली तेव्हा तो पेपर वाचत बसला होता. “छान झाली नाही खरेदी! पण दमायला झालं बाई फार. झालंच म्हणा आता. खरेदी झाली सगळी. आता उद्याच जाऊन ब्लाउज टाकून येते शिवायला. एकीकडे मला रूखवताच पण बघायला हवं. नाण्यांचा बंगला करते माझी एक मैत्रीण! ती करून देईन. नाणी आहेत बरीच. बाकी मी रविवार पेठेतून कापड आणून घरीच त्यावर एम्ब्रॉयडरी करते. ते कधी कामाला येणार शिकलेलं ? त्याचे छान पडदे होतील… ” ती बोलत राहिली. त्याला मात्र झोप लागली होती. ती हि मग पहुडली शेजारी, लाईट बंद करून.

“साहेब , पन्नास हजार लोन वाढवता येईल का pf फंडातून ?” त्याने विचारले. “नाही जमणार देशपांडे. अहो बरीच रक्कम काढली आहे तुम्ही” साहेब म्हणाले तसा तो उठला. “देशपांडे , तुम्हाला हवं असेल तर मी माझ्याकडून काही .. ” साहेब म्हणाले. “नाही साहेब , तसं काही नाही, होईल सगळं मॅनेज!” तो पटकन म्हणाला.

“पासष्ट हजार” त्याच्या कानात आवाज घुमत होता. हाराची किंमत पासष्ट हजार होती. अगदी डोळ्यात जीव ओतून त्या हाराकडे बघणाऱ्या बायकोला बघून त्याला पोटात अगदी कालवले होते. तो आठवू लागला. काय काय बरं दिलं आपण हिला गेल्या दहा वर्षात , भेट म्हणून ? दिवाळीला एक साडी, पाडव्याला एक साडी. ती सुद्धा चार वर्ष. इतर वेळी सण करायचा नव्हता, आणि एक दोनदा बोनस उशिरा झाला तर “पुढच्या वेळी चांगली भारीतली साडी घेऊन, रांगोळी मधून” असं म्हंटली आणि घेतली नाहीच! बिचारी! गरीब म्हणून हिला आईने करून आणली. सासरी पण कुठे काय वेगळं मिळालं तिला. माझा हा असा घुमेपणा. आधी अण्णा असताना बोलायला लाज वाटायची , आता न बोलायची सवय झालीये. बिचारी घेते पण समजून. स्वतः च्या वाटेचं बोलते पण माझ्या वाटेचं हि घेते बोलून! आता तिला या लग्नाच्या वाढदिवसाला हा हार घेतोच!

त्याच्या मनाने उचल खाल्ली. हिला हार घ्यायचाच ! पण पासष्ट हजार ? आत्ताच चार लाख खर्च झाला होता बहिणीच्या लग्नाच्या खरेदीत आणि तयारीत. अजून लाखभर रुपये येत जात लागतील म्हणून त्याने हाताशी ठेवले होत.

दुसऱ्या दिवशी तो बँकेत गेला. “fd मोडायची आहे” तो म्हणाला. “अहो कशाला मोडताय ? चार महिन्यात मॅच्युअर होईल ती !” काउंटर पलीकडून आवाज आला. “नाही, जरा नड आहे. लग्न काढलंय बहिणीचं” तो म्हणाला.

पन्नास हजारांची कॅश घेऊन तो घरी आला. दारातच व्याही दिसले. तो आत आला आणि बसला. “काय म्हणता, कशी चालू आहे तयारी ? आमची तर फार धावपळ सुरु आहे!” तो म्हणाला.

“हो सुरु आहे तर! एक बोलायचं होतं जरा” व्याही म्हणाले. “बोला कि मग!” हा म्हणाला. “मानपान आपला आपला करायचं ठरलं खरं , पण आमच्या बहिणी जरा जुन्या वळणाच्या आहेत. आहेत तिघीच, पण त्यांना तुमच्याकडूनही साडी हवी आहे. तर मग तुम्ही म्हणाल तेव्हा आपण जाऊया खरेदीला. पुन्हा तुम्ही घेतल्या आणि त्यांना पटल्या नाहीत तर काय करता! एवढ्या तेवढ्यासाठी उगाच रुसवे फुगवे!” ते म्हणाले आणि उठले. त्याचा हात नकळत खिशाकडे गेला.

यथावकाश साड्यांची खरेदी झाली. आत्याबाईंनी वीस हजारांचा बट्ट्याबोळ केला. बहिणीच्या “फॅशन डिझायनर” ब्लाउजवल्याचे सहा हजार रुपये झाले. एकेक खर्च वाढत होते. लग्नाची तारीख जवळ येत होती. बायकोचा हार मात्र मागे राहिला होता.

लग्नाचा वाढदिवस अगदी तीन दिवसांवर आला. कुठे पासष्ट हजार आणि कुठे जेमतेम उरलेले वीस बावीस हजार. तशातच आज ऑफिस मध्ये त्याला साहेबांनी बोलावलं. “लक्ष्मी अगदी प्रसन्न झालीये तुमच्यावर!” साहेब म्हणाले. “तुमच्या प्रामाणिक आणि उत्तम कामाबद्दम, कंपनीकडून काही ठराविक जणांना दिला जाणारा बोनस तुम्हाला दिला जाणार आहे. मी मुद्दाम च नाही सांगितलं तुम्हाला, म्हंटल खुश करून टाकू एकदम देशपांड्यांना!” साहेब म्हणाले! त्याचा विश्वास च बसेना!

त्याने पाकीट हातात घेतले. फारसे जाड लागत नव्हते. किती असतील ? पाच-दहा हजार? तेवढे तर तेवढे! तो बाहेर गेला आणि आजूबाजूला बघत हळूच पैसे काढून मोजू लागला.

चाळीस हजार! तब्बल चाळीस हजारांचा बोनस मिळाला होता त्याला!

त्याने ठरवलं , काहीही करून आज हार घ्यायचाच! खरंतर त्याच्याजवळ आता जेमतेम वीस , बावीस हजार उरले होते. तो पटकन बँकेत गेला. तिथून सहा हजार काढले आणि तडक दुकानात गेला. गेल्या गेल्या त्याने आधी हार बघितला. हार होता तसाच त्याच जागी होता!

“तो हार हवाय मला!” चॉकलेट मागावं तसं तो म्हणाला. हार काऊंटर वर आला. तो कानात प्राण आणून वाट बघत होता कि कधी हा माणूस म्हणेल “पासष्ट हजार” आणि कधी मी पैसे देऊन तो हार ताब्यात घेईन!

माणसाने फटाफट आकडे दाबले आणि म्हणाला .. “अट्ठ्याहत्तर हजार साहेब .. “

हा बधिरपणे बघत बसला.

“अहो पण मी मागे आलो तर हाच हार पासष्ट हजारांना होता!” तो उसळून म्हणाला! “लग्नसराई सुरु होतीये साहेब, भाव वाढले सोन्याचे .. ” काउंटर वरचा माणूस म्हणाला. “करायचा का प्याक साहेब ?” त्याने काही वेळ वाट बघून विचारले. “नाही .. ” अस्फुट शब्दात तो म्हणाला. हार पुन्हा जागेवर गेला.

त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. एक साधा हार घेता येऊ नये आपल्याला बायकोसाठी ? दहा हजारांची इतकी जीवघेणी किंमत असते हे आजच कळलं त्याला.

आणि तो डोळ्यात प्राण आणून त्या हाराकडे बघू लागला. अगदी बायको बघत होती, तसंच .. बघण्याशिवाय तो दुसरं काहीच करू शकत नव्हता …

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

One thought on “दिवाळी २०२० स्पेशल- १२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!