दिवाळी २०२० स्पेशल- १४
सुरकुत्या लेखक- बीआरपवार
एकेक अनुभवाच्या घड्या.
एखाद्या थोराड झाडाच्या खोडावर चढत जाणारी पुटं जशी त्याच्या सौंदर्यात भर घालतात, तशा सुरकुत्या या जुन्या खोडांच्या चेहर्यावर सुंदर जाळं विणत राहतात. ही त्यांची वृद्धिवलयं त्यांचा जीवनानुभव किती सांगतात माहीत नाही, पण जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मात्र नक्की देउन जातात.
एखाद्या अशा जाळीदार आजीला तुम्ही कधी भेटलात का? अशा ढाक्याच्या मलमलीसारख्या तलम झालेल्या चेहर्यामधली सुंदर दंतपंक्ती पुढच्या धामाला निघुन गेलेली असते. मागे उरलेली मायाभरली जिवणी त्या सुरकुत्यांच्या पार्श्वभुमीवर अधिकच खुलून दिसत राहते.
अशी एखादी ऐंशी नव्वद वर्ष जगलेली आज्जी……. अर्धी वर्ष इंग्रजकाळात अन अर्धी वर्ष स्वतंत्र भारतात घालवलेली म्हातारी. खरंतर ही आजी, ……. सगळ्यांची असते. पण प्रत्येकाला वाटत राहतं, कि ती फक्त आपलीच आहे. घरातल्या लहानाना, गोठ्यातल्या जनावराना, खुराड्यातल्या कोंबड्यांना ती एखाद्या मोठ्या गोधडी सारखी भासत राहते. सर्वांना सामावून घेणारी.
तिच्या सर्वात जिहाळ्याचा विषय म्हणजे तिची शालेय वयातली नातवंडं, परतवंडं. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास वाचता वाचता, त्यांच्या डोक्या्त, ब्रिटिश अगदी खलनायक म्हणुन डोक्यात फिट्ट बसलेला असतो.
कधीतरी रात्री झोपताना, आजीच्या गोष्टींचा खजिना निघतो. अन एखादं तिचं नातवंड, हळुच विेचारतं,
“आज्जी, तु कधी इंग्रज पाहिलेस का गं ?”
“नाही रे बाबा, तुझा तो इंग्रज काळा कि गोरा हे ही मी कशाला पाहिलंय.”
“अगं आज्जी, इंग्रज तुझ्यासारखेच गोरे होते.”
“आसंल बाबा, असू दे, पण तू आता झोप. ते इंग्रज कधी आले अन कधी गेले हे मला मेलीला वाड्यात बसुन कसं कळणार रे बाबा.”
“आज्जी त्यांनी आपला देश लुबाडला. मला खूप राग येतो त्या इंग्रजांचा.”
“असू दे बाबा, पण तु डोकं नको तापवू. आता गेले ना ते, ……. मग गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये.”
अन मग तिचा सुरकुतला हात फिरला कि जादू झाल्यासारखी नातवंडं झोपी जातात. गेलेल्या माणसांविषयी का वाईट बोलायचं नाही, हा पुढचा प्रश्नही तिच्या सुरकुतल्या मायेत विरघळून जातो. अन् मग अनुभवांच्या शाळेत शिकता शिकता कधी तरी, असे अनुत्तरीत प्रश्न उत्तराच्या हातात हात घालून येतात. वरवर पाहता चुकीचं वाटणारं तिचं स्टेटमेंट अन ‘गेलेल्या’ माणसांच्या तिच्या व्याख्येची व्याप्ती, माणूस म्हणुन विकसीत होण्याच्या प्रवासात, त्या नातवंडाला अधुनमधुन भेटत राहते.
वाचनाची सवय कधीही चांगलीच. पण त्यातल्या त्यात, पुस्तकापेक्षा माणूसरुपी पुस्तकं वाचण्याची सवय जास्त आनंददायी. त्यातही एखादं जुनं पुस्तक, काढुन वाचण्यातला आनंद विरळाच.
एखाद्या जुन्या वडाच्या पारावर, एखाद्या मंदिरात खाम्बाशी टेकून बसलेलं, एखाद्या नाना नानी पार्कमध्ये शुन्यात दृष्टी लावून बसलेलं, एखाद्या बॅंकेत हयातीचा पुरावा देउन पेंशन काढायला आलेलं, …… असं एखादं जुनं पुस्तक वाचायला मिळालं तर नक्की वाचा. एकेक पान उलटत जातं, तसं तसं तुमचं कुतूहल वाढत जातं.प्रत्येक वाचल्या जाणार्या पुस्तकासोबत, माणूस म्हणून तुमची वृत्ती अन आवृत्ती दोन्हीही समृध्द होत जातात.
हातावर पडलेले घट्टे पाहताना, जुन्या जखमेची खुण पाहताना, हसताना, बोलताना, प्रत्येक वेळी बदलत जाणारी सुरकुत्यांची नक्षी पाह्ताना, बोळक्यातुन ऐकु येणारी एखादी घोगरी झालेली वेदना ऐकताना, तुमचं मन एखाद्या निरांजनाच्या प्रकाशात उजळुन निघाल्याचा अनुभव नक्की येईल.
गळ्यातली तुळशीची माळ काढुन, वेळ मिळेल तिथे, पुण्याची गणना करणारी मंडळी, कधीकधी माणसांची जुळणी करताना चुकतही असतील. हातावर तंबाखु मळता मळता मोठमोठे सिद्धांतही, चिमुटभरच घेउन बाकी ज्ञान खकाण्यासारखं हवेत झटकलंही जात असेल. लेकाने घेउन दिलेल्या दातांच्या कवळीवरही मिश्री लावताना, वास्तवाकडे सोयीस्कर दुर्लक्षही केलं जात असेल. या सुरकुत्यांच्या वयात, एखादा प्रकांड पंडीत, स्वतःभोवतीची सगळी ज्ञानवलयं गुंडाळुन ठेवून, लहान मुलांसोबत, कॅंडीक्रशची स्पर्धाही लावत असेल. क्वचित एखाद्या नातवात अन आज्जी आजोबात, कोणतं कार्टुन पहायचं यावरुन वादही होत असेल. एखाद्या नाना-नानी पार्क मध्ये, एखाद्या फिटनेस सुंदरीला पाहण्यासाठी, काही साठीतल्या सुरकुत्या वॉकिंग करुन घामाघुम होत असतील ……… पण म्हणुन त्या सुरकुत्यांचं महत्व तसुभरही कमी होत नाही.
आयुष्यभराचा टवटवीतपणा , पुढच्या पिढ्यांसाठी सोडून जाताना, येणार्या या सुरकुत्या जगातलं सर्वात मोहक सौंदर्य स्थळ आहे असं मला वाटतं.
आणि या सुरकुत्या एकट्या येत नाहीत बरं का ! त्यांच्या सोबत, अनुभवाची गणती दाखवणारी पांढर्या केसांची फौज, …… कधी जीवनातल्या अनेक लढायांचं द्योतक असलेला सपाट मैदानी प्रदेश, ……
माणसं आतुन बाहेरुन परिपूर्ण वाचू शकणारा जाड भिंगाचा चष्मा, ……
बाहेरच्यांशी कमी अन् आतल्या आत जास्त बोलणारा घोगरा आवाज, ……
नजर काढण्यासाठी जॉइंट लुब्रिकेशन गेलेली, कडकडा आखावर मोडणारी बोटं, ……
लेवून किंवा कधीही न मिरवताच, कुठल्याही दागिन्याचा सोस उरलेला नसताना, दैवी योजनेनं मिळालेला डोळ्यातला मोती, ……
बसल्या जाग्यावरुन लांब भुतकाळात चक्कर मारुन येताना, होणारी दमछाक अन् अलार्म लावल्यासारखे कुरकुरणारे गुडघे,……
आणि पाहणार्याला संयम शिकवणारी सावकाश हालचाल, …… सगळं कसं एकटेपणात सोबत करायला आल्यासारखं उश्या पायथ्याशी येऊन बसतं.
इतक्या सगळ्यांना सोबत घेवुन जगणारी ही पुस्तकं प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी असतातच. आणि नसलंच ते भाग्य तर, आजुबाजुला नीट पाहिलंत तर अशा समृद्ध पुस्तकांची अख्खी लायब्ररीच सापडू शकते,….एखाद्या वृद्धाश्रमाच्या रुपात. पण असे ग्रंथ कितीही समृद्ध असले तरी, शेल्फवरुन काढून वाचण्याएवढी हिंमत आणि वेळ सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावणार्या जगाकडे नसतो. अगदी हाताशी असलेली पुस्तकं वाचण्याइतका संयमही बर्याचदा अभावानंच आढळतो. या जुन्या पानांवरचे आयुष्य समृद्ध करु शकणारे रंगतदार उतारे क्वचितच वाचले जातात. अगदी प्रत्येकाला आयुष्य घडवण्यासाठी “भावार्थदिपीका” वाचण्याचं भाग्य आणि वेळ मिळेलच असं नाही. पण आपल्या जवळचे हे चालते बोलते ग्रंथ जरी वाचले तरी आयुष्य समृद्ध होईल यात शंका नाही.
तसंही इतका संयम यायला, सुरकुत्या ल्यायल्या शिवाय गत्यंतर नाही. अन अशाच सुरकुतल्या हातांनी दिलेल्या,
’म्हातारा हो !’ या आशीर्वादातला मतितार्थ समजल्याशिवाय स्थित्यंतर नाही हेच खरं.
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Khup chan