दिवाळी २०२० स्पेशल- २५

उशीर                          

लेखिका- प्राजक्ता रुद्रवार

हातातली गवताची काडी फिरवत तो सगळ्या झुडपांना मारत चालला होता. पांढरा हाफशर्ट व खाकी चड्डी, पायात चप्पल नाही, चांगले केस विंचरलेले अश्या नेहमीच्याच अवतारात तो नदीच्या कडेनी चालत जात होता.

रोज उठुन असं बाहेर फिरायचं म्हणजे काही चांगलं नाहीये. पण शाळेत नवीन मास्तर आलेत ना…ते म्हणतात फीस आणत नाहीस आणि वर तोंड उचलुन येतोस रोज शाळेत. बापुस सांगितले तर बापुचे नवीनच, तुझ्या मास्तरला माझ्या समोर आण, बघतोच मी कसा पैका मागतो माझ्या पोरास…”

आता मास्तरना सांगु का,” चला मास्तर…आमचे वडील  तुम्हाला ओरडा खायला बोलावत आहेत. असे म्हणले तर मला हाणणार नाहीत काय मास्तर. त्यापेक्षा शाळाच नको…”अश्या विचारात गंपु शाळेत न जाता बांधावरुन चालत होता.

रस्त्यात कुठेतरी पाण्याचा खड्डा दिसला तसा त्याने पाण्यात उडी मारुन पाणी उडवले. पाणी बाजुला पडले तसा तो मनातच हसला. अजुन एकदा त्याने पाण्यात उडी मारली व पाणी उडवले. सकाळी शाळेत जायचं म्हणुन घातलेला त्याचा गणवेष खराब झाला. आता घरी गेल्यावर नक्कीच ओरडा बसणार आहे, हे आठवुन त्याला हसुच आले. आई म्हणती,”शाळा पण साफ करतोस की काय र…” तिला कुठे माहित हाय की शाळेत न जाता आपण असाच फिरत असतो.

ती सगळ्यांना सांगती की आमचा गंप्या कलेक्टर व्हणार हाय. कलेक्टरास्नी सगळे कसे घाबरतात, त्यांचा रुबाब तो कसला हे आठवताना गंप्याच्या चेहरयावर तेज आले होते.

गणितात आपला नंबर पहिला असतोच. आपल्याला कोण नाही मागे पाडणार, कलेक्टर होण्यासाठी परिक्षेत गणितच यावं लागत म्हणत होते मास्तर…पण या नव्या मास्तरांचे करायचे काय…बापु पैका देईना अन ते रोज इचारताय…”असा विचार करत गेले चार दिवस सुरु असलेला दिनक्रम तसाच राबवित गंपु बांधाच्या बाजुने जात होता.

डोक्यावर उन्हं आले म्हणजे दुपारचे बारा वाजले हे ओळखुन तो अजुन तीन तास काय करावे या विचारात चाललेला थांबला. सकाळी निघताना आईने त्याला भाजी भाकर दिली होती याची त्याला आठवण आली. त्याने चांगली जागा शोधुन आईने बांधुन दिलेला डब्बा उघडला. मेथीची सुकी भाजी, भाकरी व ठेचा….त्याला सुमीची आठवण आली, तिला ही भाजी खुप आवडते. सुमी आठवण काढत असेल नक्की. तिला गणित आडलं की ती रडती सरळं, वेडी आहे. गणित किती सोपं असतं हे तिला कळतंच नाही.

त्याने डब्बा ठेवुन वही पुस्तक काढलं. काही गणित सोडवली. घरी जायला अजुन तासभर तरी आहे म्हणुन तिथेच आडवा पडत त्याने इतिहासाचे पुस्तक वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता त्याला कधी डोळा लागला हे त्यालाही कळले नाही. पुस्तकं पोटावर ठेवुन गंपु स्वप्नांच्या विश्वात रममाण झाला. त्याला जाग आली तर संध्याकाळ झाली होती. जरासा अंधार झाला होता. तो एकदम उठला. चालत घरी जायला उशीर होणार होता. घरात सगळे काळजी करत असतील. आईचा जीव थारयावर नसलं. ती कुठं कुठं शोधत फिरत असलं काय माहीती. रस्त्यात कोणी आपल्याला पळवुन नेलं तर याची पण त्याला भिती वाटतं होती. गावात सगळे म्हणतात की मुलांना पकडुन नेणारा कोण तरी माणुस फिरतोय. गंपुने झपाझप पावलं टाकली व तो घराच्या दिशेने निघाला. तो आला तेव्हा चांगलाच अंधार पडलेला होता.

गंपुने आपल्या झोपडीत पाय ठेवला तशी आई म्हणाली,”कुठं व्हतास रे…उशीरा सुटली का रं शाळा? चल हातपाय धुवुन ये जेवाया…” बापु बाहेर बिडी ओढत बसला होता. गंगी खेळत होती.

म्हणजे आपण वेळेवर घरी नाही आलो याची कोणालाच काळजी वाटली नाही…”याचं कुठेतरी गंपुला वाईट वाटलं.

आईला आपल्याशिवाय चैन पडत नाही पण आजकाल तिला पण आपली काळजी वाटत नाही…म्हणजे आपल्याशिवाय कोणाचंच अडत नाही…” तो स्वत:शीच म्हणाला व त्याचे डोळे भरुन आले. तो बाहेर बसुन रडु लागला.

गंपु…”आईने हाक मारली तरी त्याने दुर्लक्ष केलं. त्याला जेवायला पण नको वाटतं होतं. पण आईने पुन्हा हाक मारली म्हणुन तो डोळे पुसुन आत गेला. कशीबशी चतकोर भाकर खाऊन तो उठला.

काय रं गंपु…बरं वाटत नाय का…”आईने विचारलेच.

त्याने आईकडे न बघताच “नाय…असचं…” म्हणुन उत्तर देण्याचे टाळले.

आय ला माझी कशी काळजी वाटतं नाय…”गंपुला झोपेपर्यंत हेच खटकत होतं. त्यामुळे छोटासा चेहरा करुन तो झोपुन पण गेला.

सकाळी उठल्यावर आज त्याने डब्बा न घेताच लवकर बाहेर पडायचे ठरवले. आपण कोणाला नकोय तर जाऊ दे, लवकरच बाहेरच जाऊ म्हणत रागाने तो सकाळीच बाहेर पडला. तो बाहेर पडला अन गल्लीबाहेरच त्याला सुमी गाठ पडली. सुमीला पाहुन त्याला जरा बरं वाटलं. तिला आपलं दु:ख सांगाव का हा विचार करेपर्यंत सुमी बोलु लागली.

अरे गंपु…बरं झालं तु भेटलास…” ती म्हणाली.

काय ग सुमे…सकाळीच इकडे कुठे निघाली?” गंपुने विचारले.

अरे तुलाच शोधत आले होते…”सुमी म्हणाली. सुमीचे हे वाक्य त्याला एकदम भारी वाटलं. तो जाम खुष झाला.

कालपण तुझ्या घरी आले व्हते, तुझी चौकशी कराया…पण तु घरी नव्हता. तुझ्या आयने सांगितले की तु शाळेत गेला हायसं…”

गंपुने घाबरत विचारले,”मंग तु काय म्हणालीस…मी शाळेत नव्हतो सांगितले नाहीस ना? “

सुमीने नकारार्थी मान हलवतं सांगितले,”मी हुशार हाय…चार दिस तु शाळेत आला नाहीस कळले तर तुला मार पडेल म्हणुन म्हणलं की तु गणिताच्या सरांकडे असशील, तु गणितात हुशार हायसं म्हणुन सर तुझा जास्त अभ्यास घेतात. तुझी आय लई खुष झाली…म्हणाली,”होऊ दे होऊ दे उशीर.. कलेक्टर होण्यासाठी अभ्यास महत्वाचा हाय…”

पण तु का र येत नाहीस शाळेत हे विचाराया लवकर आले मी, काय झालया?”

सुमीचे हे बोलणे ऐकुन तो एकदम रडायला लागला,” आपण  आईवर उगाच रागावुन रुसलो. तिला आपली काळजी नाय म्हणालो.”

सुमीने त्याला विचारले,”काय झालं रे गंपु…तु काऊन रडत आहेस? सांग ना मला…”

गंपुने तिला म्हणले,”काय नाय…असंच…आधीच उशीर झालाय, जातो मी घरला…”

सुमीला कळत नव्हते आता तर सकाळ झालीये, उशीर कसा काय झाला. ती गंपु गंपु आवाज देईपर्यंत गंपु झपाझप पावलं टाकत घराच्या दिशेने गेला पण.

गंपु घराच्या दारात आल्याबरोबर आईने त्याला आवाज दिला,”कुठे गेला होतास रे बाळा सकाळी सकाळी? किती आवाज दिला तुला सगळीकडे. चल, तयार हो शाळेची वेळ व्हतीया, मी डब्बा भरते…”

हे ऐकुन गंपुने आईला मिठी मारली व तो रडु लागला. आईला काही कळले नाही. त्यांनी गंपुला जवळ घेतले व पाठीवर हात फिरवत काळजीने विचारले,”काय झालं रे बाळा…काही त्रास होतोय का?”

गंपुने डोळे पुसत म्हंटलं,”चुकलो आय मी…तुला माझी काळजी वाटत नाय म्हणुन रुसुन बसलो होतो. कोणालाच मी नकोय वाटले होते मला…”

हे ऐकुन तो काय बोलतोय हे आईला कळत नव्हते. गंपुनेच घाबरतच गेले चार दिवस शाळा बुडवुन कसा फिरतोय व काल काय झाले ते सांगितले.

आईने त्याला जवळ घेत म्हणले,”खरंच उशीर झाला रे बाळा मला पण हे समजायला…पण बरं झालं कळलं. आईपासुन काहीच लपवायचे नसते रे. मी बापुस सांगुन आजच शाळेची फी देते. तु शाळा बुडवायची नाय हे नक्की. असा वागलास तर कलेक्टर कसा व्हशील?”

गंपुने आईला मिठी मारली व दोघेही रडत होते.

आजही हे सांगताना कलेक्टर साहेबांच्या डोळ्यातुन पाण्याचा धारा वहात होत्या. पहिल्यांदाच शाळेतला माजी विद्यार्थी कलेक्टर झाल्याबद्दल शाळेमधे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी भाषण करताना गंपुने सगळ्या विद्यार्थ्यांना आपली कहानी सांगितली म्हणले,”त्यामुळे आयुष्यात कधीही उशीर होऊ देऊ नका मित्रांनो. आज माझ्या या यशात माझ्या आईचा खुप मोठा जरा आहे. तिचे स्वप्न मी पुर्ण करु शकलो याचा आनंद आहे. त्यामुळे आईने स्टेजवर येऊन माझ्यासोबत हा सत्कार स्विकारावा अशी मी विनंती करतोय.”

इतके बोलुन गंपुने स्टेजवरुन खाली उतरुन येत आईला हात दिला व तो तिला घेऊन स्टेजवर आला. त्या दोघांनी मिळुन तो सत्कार स्विकारला. ठेवणीतली छान साडी नेसुन आलेल्या आईच्या चेहरयावर खुप आनंद व डोळ्यात अश्रु जमा होते.

rudrawar praajaktaaa

rudrawar praajaktaaa

प्राजक्ता राहुल रुद्रवार उद्योजिक, शिक्षिका, समाजसेविका, ब्लाँगर, कंटेन्ट राईटर...सकारात्मकता व आयुष्य यांची सांगड घालताना लाभलेलं हे हळवं मन जपत मनातले भाव लेखणीच्या साथीने तुमच्यापर्यंत पोहचवावं हाच एक धागा पुरेल आपल्या ओळखीला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!