हॅपी वाला 85th पा जी!
तेव्हा टीव्ही भारतात नवीनच आला होता. ईसी, क्राऊन, डायनोरा अश्या कंपन्या होत्या. फक्त दूरदर्शन हे एक चॅनल होतं. त्या काळात माझ्या एका मावशीच्या घरी नॅशनलचा टीव्ही होता! ती खूप सधन होती म्हणून. ती उपनगरात राहायची. आम्हाला मुंबईकरांना उपनगर म्हणजे दुसरा देश वाटे. ट्रेन मधून प्रवास आणि मग दिसणारी रिक्षा ह्याच फार अप्रूप होत तेव्हा. तर अश्याच एका रविवारी संध्याकाळी आम्ही त्या मावशीच्या घरी गेलो होतो. तेव्हा टीव्हीवर जीवन मृत्यू सिनेमा लागला होता. त्यातील “झिलमिल सीतारों का आंगन होगा” हे गाणं समहाऊ डोक्यात बसलं ते आज तागायत. त्यातील सरदारजीच्या गेट अप मधील हिरो म्हणजे धर्मेंद्र आहे हे देखील तेव्हा पाहिल्यांदा कळलं.
मग शोले, राम बलराम, चाचा भतीजा, माँ, कर्तव्य असे अनेक सिनेमे पाहिले धर्मेंद्रचे. त्याच बरोबर त्याची आणि हेमा मालिनीची जोडी, त्यांच्या बद्दल आख्यायिका ऐकत असताना एक दिवस त्यांच्या लग्नाची बातमी आली तेव्हा उगाच बर वाटलं. खरं तर आमचा काही संबंध नाही. लग्न म्हणजे जाय असतं, हे धर्मेंद्रचं दुसरं लग्न आहे म्हणजे काय हे काहीच कळायचं वय देखील नव्हतं. पण बरं वाटलं. आपल्या धरमला हेमा मिळाली ह्याचा आनंद वाटला. कदाचित धर्मेंद्र हिरो म्हणून तेव्हापासून आवडला असावा.
पुढे थोडी अक्कल आल्यावर देखणं रूप ह्या पलीकडे त्याच्याकडे फार काही नाहीये हे लक्षात आलं. तरीही सध्या अक्षय आवडतो तसा तो आवडत राहिला. तो रागाने नाक फुगवून “कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाऊंगा” म्हणल्यावर तो खरच व्हीलनला फाडून त्याचं ऊन ऊन रक्त पीत असल्याचे फ्लॅश डोळ्यासमोर येत! त्याने केलेल्या फुटकळ सिनेमांची यादी मोठी की मिथुनच्या फुटकळ सिनेमांची ह्यावर गोलमेज परिषद होऊ शकेल. पण त्याने सिनेमा मधून प्रचंड पैसा कमावला आणि तो वाढवला देखील. त्या काळातील राजेंद्रकुमार, धर्मेंद्र आणि जितेंद्र ह्या लोकांनी पैसा सॉलिड इन्व्हेस्ट केला आहे असं ऐकिवात आहे. धर्मेंद्रचे फक्त मुंबईत म्हणे पंचाहत्तर फ्लॅट आहेत असं मी ऐंशीच्या दशकात ऐकलं होतं. खरं खोटं तोच जाणे. पण त्याचा बंगला, सनी सुपर साऊंड स्टुडिओ ज्यांनी पाहिले आहेत त्यांना त्याच्या वैभवाची सहज कल्पना येईल!
अभिनयात तो अमिताभ नव्हता, नाचत तो जितेंद्र नव्हता, संवाद फेकीत तो राजकुमार नव्हता, स्टाईल मारण्यात तो काका नव्हता पण ऍक्षन मध्ये तो धर्मेंद्र होता, त्याच्या कॉमेडी ने गुदगुल्या होत नसल्या तरी चेहऱ्यावर स्मित येत असे. आणि दिसायला तो फक्त आणि फक्त राजबिंडा होता! त्या बाबतीत विनोद खन्ना सोडल्यास त्याचे समकालीन हिरो कित्येक मैल मागे होते त्याच्या! माझ्या फिल्म इंडस्ट्री मध्ये कार्यरत मित्रांकडून धर्मेंद्र बद्दल अनेक गुलाबी किस्से ऐकले आहेत. खरे खोटे माहीत नाही पण त्यात धर्मेंद्र असल्याने ते खरे वाटतात!
पुढे सनी साठी बेताब काढून त्याने नव्या पिढीला लॉन्च केलं तेव्हा त्याला इतका मोठा मुलगा आहे ह्यावर त्याच्या अनेक फॅन्सचा विश्वास बसला नाही! पण काळ कोणासाठी थांबत नसतो. धर्मेंद्र निर्माता म्हणून पडद्यामागे काम करू लागला. बॉबी सिनेमात येऊन जवळ जवळ दोन दशकांहून जास्त काळ लोटला आहे! आता तर सनीचा मुलगा देखील लॉन्च झाला! गरम धरम थोडा थंड झाला आहे! जीवन गौरव पुरस्कारात त्याने अमिताभ आणि शत्रूच्या साक्षीने केलेलं इमोशनल भाषण तो ते करताना कितीही टाईट असला तरी खरं वाटलं होतं!
धर्मेंद्र तसाच आहे असं वाटतं. शहळ्यासारखा. बाहेरून कडक आणि आतून नरम. मला कधीतरी त्याचा तो पंजा हातात घ्यायची प्रचंड इच्छा आहे. सिंहाचा पंजा आठवतो मला धर्मेंद्रचा पंजा बघून. मला खात्री आहे तो पंजा मऊ गादीसारखा मऊ मऊ असेल. सिनेमातील गुंडांच्या अंगावर पडून त्यांना भुई सपाट करणाऱ्या सनीच्या ढाई किलो हाताच्या दुप्पट दणकट असलेला त्याच्या बापाचा पाच किलोचा हात खरं तर खूप कोमल असेल!
ब्लॅक अँड व्हाइट सिनेमात फॉर्मल कपडे घालणारा धरम मला वाटत मेरा गांव मेरा देश पासून कॅज्युअल कपड्यात आला आणि पूढे बहुतांश सिनेमात जीन्स तब्बेत दाखवणारे टी शर्ट आणि जॅकेट ह्यात रमला. पुढे पुढे तर त्याने भांग पाडणं जवळ जवळ बंद केलं होतं!
देखणेपणा हाच asset असलेल्या देव आनंदला सिनेमात उत्तमोत्तम गाणी मिळाली. धर्मेंद्रच्या वाट्याला ती देखील फार आली नाही. तरीही तो टिकून राहिला. मला वाटतं वय बघता त्याच्या काळातील किंवा कोणत्याही काळातील वयाने त्याच्याहुन मोठे आणि नाव कमावलेले फक्त लता आणि दिलीप कुमार सध्या हयात आहेत! त्या दृष्टीने तो सिनेसृष्टीचा पितामह आहे!
पण आजही त्याला सिनेमा ऑफर केला तर तो घोड्यावर बसून डाकूचा पाठलाग करत “कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाऊंगा” म्हणत त्याला लोळवून हेमाच्या मागे बटा उडवत “कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है” म्हणत लोफरगिरी करेल ह्याची खात्री आहे! हॅपी वाला 85th पा जी! Love you!
picture courtesy- bollywood bubble
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023