वॅक्सिन ……

कोविड 19 च्या वॅक्सिनची अत्यंत कळकळीने वाट पाहणारी आजची ही कर्ती सवरती माणसं, एकेकाळी, त्यांच्या लहानपणी, किमान वर्षातून एकदातरी आपल्याच शाळेच्या व्हरांड्यात, इंजेक्शनला नंबर कधी लागणार, या टेन्शनमध्ये थरथरत उभी असायची. आपला नंबर येण्याआधी डॉक्टरकडची इंजेकशन्स संपावे म्हणून प्रार्थना करत असायची. समोर बसलेला डॉक्टर किंवा आरोग्यसेवक कितीही सौम्य बोलणारा असला तरी, तो कालदैत्य वाटत राहायचा. आणि हे कमी की काय म्हणून, प्रत्यक्ष कालदैत्याला भीती वाटेल असे पीटी किंवा गणिताचे शिक्षक तिथं मुलांचे दंड दाबून धरायला बसवले जायचे.

मुलांची नावं लिहून घेणाऱ्या आरोग्यसेविका, कठोर हृदयाच्या काही शिक्षिका अशोकवाटिकेत उभ्या असल्या सारख्या असा काही तारस्वरातला कोलाहल माजवायच्या की वातावरण एकदम भयावह होऊन जायचं. त्यात मधून मधून मुख्याध्यापकांची गर्जना. एमपीएससी मध्ये पीएसआयची पोस्ट मिळाली नसल्याचा सगळा वचपा अशा सामुदायिक इंजेक्शन सोहळ्यात ते पोरांवर काढत.

कसायासमोर एखाद्या कोकरानं किंकाळी फोडावी, तशी एखाद्यानं इंजेक्शनला पाहून फोडलीच तर, त्याला इंजेक्शन झाल्यावर दोन धपाटेही मिळायचे. त्याचा तो “नको देवराया”च्या टिपेला पोचलेला स्वर ऐकून सुपात म्हणजे रांगेत उभे असलेल्यांना घाम फुटायचा. काही जण तर सद्गदीत होऊन हुंदके देऊ लागायचे. त्यावर सांत्वन म्हणून,

“का रे तुझा बाप मेला का रे ?”

असा जनरल डायर टाईपचा दम मिळायचा.

त्यामुळं काहींनी तोंड दाबून मनातच भावना दाबल्या तरी, एखादा भगतसिंग शहीद होण्याच्या तयारीत असायचाच. मास्तरसमोरच तो लाईन सोडून गेटच्या दिशेने धावायचा. …… अन मग ,

“पकडा रे त्याला…” असं मुख्याध्यापकी वॉरंट निघायचं. एरव्हीचा प्रसंग असता तर अख्खी शाळा पळाली असती त्याला पकडायला. पण अशावेळी पोरं जागची न हलता असहकार दाखवायची. पण मग शिपायांनी अन इतर सरांनी पकडलेल्या त्या शहिदाला सर्वात आधी फाशीच्या तख्ताकडे नेलं जायचं.

या जगात सहनशील नावाची एक जमात असते. आणि बहुतांशकरून देशात होणाऱ्या सर्व राजकीय, सामाजिक , आर्थिक प्रयोगांच्या यशस्वितेची जबाबदारी या समुदायाची असते. पाण्यात उकळणाऱ्या सुईची लांबी, आणि आपल्या एवढूशा दंडावरचं मांस यांच्या व्यस्तानुपाती प्रमाणाचा विचार करत, सुईतून उडणाऱ्या कारंजाची मनातल्या मनात उंची मोजत, आणि एकवेळ गाठ आली तरी चालेल पण इंजेक्शन हाडामध्ये घुसू देऊ नको अशी अल्पसंतुष्ट प्रार्थना करत, नंबर जवळ येईल तसे डोळे गच्च मिटून घेत, रांगेत उभी राहणारी ही जमात, भविष्यात आयुष्यावर घडणाऱ्या सर्व प्रयोगांना सामोरं जायला तयार होत असते. ही तीच माणसं आहेत, ज्यांनी लॉक डाऊनमध्ये थोडासा मास्क खाली केल्याबद्दल , पार्श्वभागावर आजही फटके खाल्ले आहेत.

ही माणसं आहेत म्हणून देश चाललाय असं म्हटलं तरी चालेल. ही तीच माणसं आहेत,  ज्यांनी सर्वात प्रथम आधारकार्डच्या रांगेत उभे राहून, पाय तुटेस्तोवर उभं राहण्याचे जागतिक विक्रम केले.

पण त्यातूनही समोरच्या मुलींच्या वर्गासमोर सुई उकळण्याचा कार्यक्रम सुरू होताच, वर्गाच्या खिडकीतून गायब होणाऱ्यांचं पत्री सरकार काही वेगळंच होतं. मास्तरांना अन पालकांना थांगपत्ता न लागण्या इतपत , यांनी दंड चोळून लाल केलेले असायचे. त्यांचा दंड दुखण्याचा मुखाभिनय एखाद्या नटसम्राटाला लाजवेल इतका बेमालूम असायचा.

काहीही असो, मुलामुलींच्या एकत्र इंजेक्शन कार्यक्रमात मात्र, क्रांतीच्या व्याख्या काही वेगळ्या असायच्या.

मुली मुलांपेक्षा जास्त सहनशील असतात हे त्याकाळी एकत्र रांगेत उभा असलेला प्रत्येकजण गीतेवर हात ठेवून सांगेल. आणि   या अशा शपथवीरांचेच संसार आज साठा  उत्तरी का होईना यशस्वी झालेले दिसतात. एरव्ही खेळात मुलींना कमी लेखणाऱ्यांची तिथे पार बोबडी वळलेली असायची. पण मुलींसमोर मात्र तोंडातून निघणारे चित्कार दातांच्या कवळीत दाबून धरावे लागायचे. अशी ही इंजेक्शन घेताना दातखिळी बसलेली पिढी, मनातसुद्धा बायकोचा निषेध करायला धजावत असेल असं वाटत नाही.

इंजेक्शनच्या या क्रूर सोहळ्यात, इंजेक्शन घेताना दिसणारे ते  नाजूक दंड , एवढीच काय ती या एकत्र धिंडवड्यातली हिरवळ. पण हिरवळ नको पण इंजेक्शन आवरा अशीच प्रत्येक कोकराची अवस्था असायची. परवाच दिवाळीत गावी गेलो तेव्हा वर्गातली माहेरी आलेली बाबी भेटली होती. संसाराचा भार उचलून, आर्मस्ट्राँग झालेल्या तिच्या स्लिवलेस बाहुंवर त्या इंजेक्शनच्या खुणा अजूनही स्पष्ट दिसल्या अन ती शाळेत इंजेक्शन घेताना आपण उगाच डोळे मिटले असं वाटुन गेलं.

आसपासच्या खेड्यातली मुलं, इंजेक्शनच्या दिवशी, घरातून वेळेत निघून, शाळेत न येता, मध्येच कुठेतरी टाईमपास करून, परस्पर घरी निघून जायची. अगदी आमच्या वारकरी संप्रदायातल्या सरांची, “एक इंजेक्शन, एक साखरगोळी” ही स्कीमदेखील त्यांना आकर्षित करू शकत नव्हती. पण मग अशा मुलांसाठी, जेवणाच्या सुटीनंतर, शाळेत, अचानक आरोग्य विभागाचे कर्मचारी उगवायचे अन गनिमी कावा साधायचे. एक दोन दिवसांपूर्वी आपल्यावर गुदरलेला अतिप्रसंग, त्यांच्यावर ओढवताना पाहून जो निखळ आनंद मिळायचा, तो नंतर बॅचलर मित्राच्या लग्नात, त्याचं स्वातंत्र्य हरवतानाही झाला नाही.

अशा शालेय इंजेक्शन सोहळ्यात, दंडावर इंजेक्शनने कितीही अत्याचार केले असले तरी, एरव्हीच्या थंडीतापामध्ये मात्र, डॉक्टर शरीरातला जास्तीत जास्त मांसल भाग उघडा करायला लावायचेच. हा प्रकार तितका सुखावह नसला तरी डोळ्याआड घडायचा. पण मग कमरेवरची हाफ पॅन्ट जास्त खाली न सरकता डॉक्टरांना अपेक्षित मांसल भाग मिळू दे, एवढीच माफक , मध्यमवर्गीय अपेक्षा करण्याचं शहाणपण त्या बालवयातही आलं होतं.

असं शाळेत रांगेत उभे राहून घेतलेल्या इंजेक्शनविषयी कितीही घृणा असली तरी ते अमृतच असल्याची बतावणी करण्यासाठी मात्र अहमहमिका लागायची. त्यात मग,

“इंजेक्शन घेतलेल्या माणसाला काही होत नाही….. साप चावत नाहीत…… विंचवाचं विष चढत नाही…..” ते थेट , “इंजेक्शन घेतलेल्याच मिलीटरीत घेतायत..” इथपर्यंत अंधश्रद्धा पसरवल्या जायच्या.

……………………….

अशाच एका धामधुमीत, डोळे गच्च मिटून सगळं सहन केल्यावर, दंड चोळत शाळेच्या झेंड्यांच्या पायथ्याला गोल कट्ट्यावर बसलो होतो.

सगळीच बालके इंजेक्शन ग्रस्त असतानाही, मला खूप एकटं वाटत होतं.

हल्ली अशा वॅक्सीनेशनच्या वेळी मुलांसोबत, त्यांच्या उत्साही आया असतात. जवानाला ओवळणाऱ्या आईचा जोश असतो. आणि इंजेक्शन झालं की लगेच किमान चॉकलेट तरी, बक्षीस असतं.

त्यावेळी , मलाही खूप आईची आठवण येत होती. नकळत डोळ्यातून टचकन पाणी आलं. ते पाहून माझ्यासारख्याच लहान पण आईला मिस करणाऱ्या बॉबकट, गोबऱ्या गालाच्या सशानं माझ्या दंडाला हात लावत विचारलं,

” खुप दुखतंय का रे……”

त्या निष्पाप स्वप्नील डोळ्यात माझी वेदना कुठल्या कुठं विरघळून गेली होती. तो ससा मोठा झाल्यावर कुठल्या तारांगणात सेटल झाला माहीत नाही. पण आजही कधी माझ्या दंडावरच्या खुणा मी कुरवाळतो, तेव्हा आयुष्यातल्या समस्त दुःखावर लागू पडणारं , एक अनोखं वॅक्सीनेशन मनाला मिळाल्याशिवाय रहात नाही.

©बीआरपवार

Image by Gerhard G. from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

2 thoughts on “वॅक्सिन ……

  • December 13, 2020 at 9:10 am
    Permalink

    Khup chan… Ho.. Aamchyahi lahanpani shalet injections dile jayache.. Gavatil saglech olkhiche aaslymule, je vidhyreti gairhajar tyanchi uchlbangdi karun tyanna shalet aanal jaych 😂😂

    Reply
  • December 30, 2020 at 7:05 pm
    Permalink

    Ho… Shaletlya athvani saglya parat ekda

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!