सासू खट्याळ, जावई नाठाळ (भाग २/३)
तो आतुटेने तिच्या येण्याची वाट बघत होता . इतक्यात भरा भरा गादी गुंडाळल्या गेली . सदा आतून ओरडत होता , ” सोफिया , मी आहे आत , मी आहे s ” बघता बघता गादी उचलल्या गेली . सोफियाने भर भर पायऱ्या चढायला सुरुवात केली . सदा आदळत होता , डोके भिंतीवर आपटत होते , पाउले रेलिंगला घासत होते , हात पाय मात्र गच्च गादीत गुंडाळलेले .
तिने गादी गच्चीत आणून उन्हात भिंतीशी उभी लावली ….सदाचे डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत !
सदाचा पार खुळखुळा झाला होता . पाचच मिनिटात त्याचा श्वास गुदमरायला लागला .
खाली सदा नाही म्हटल्यावर त्याला बघत सोफिया पुन्हा वर आली आणि “उपस्स !” म्हणत तिने गादी उचलली .
” अग माझे आई , आधी मला बाहेर काढ ना ! ” हे सदा बोलला , पण बाहेर आवाजच आला नाही . पुन्हा तोच अत्याचार . डोके आपटत , पाय घासत त्याची वरात खाली आली .
तिने पलंगावर आणून गादी उकलली , तसा सदाने भरभरून श्वास घेतला . चादर घालून उश्या नीट लावून झाल्यावर तिनेही पलंगावर अंग टाकले . सदा ह्या क्षणाची जिवाच्या आतून वाट बघत होता . ही मावशींची भाची फारच जास्त ‘स्मार्ट’ होती बुवा .
अंगातील सगळी गेलेली ताकद एकवटून सदा उठला , त्याने आधी भरपूर पाणी ढोसले , मग अंगावर मादक सुगंध फवारला आणि कॉट वर बसणार इतक्यात बघतो तर काय , सोफिया एका बाजूला निपचित पडली होती . इतक्यात कशी झोपली असा विचार करत त्याने घाबरतच तिला हात लावला , आणि दचकून मागे सरकला ….तिच्या पोटाजवळ कापड्यातून लाल लाईट दिसत होता . ही काय भानगड आहे बुवा म्हणत त्याने हात लावताच आवाज आला
” बॅटरी रिचार्ज करा ….बॅटरी रिचार्ज करा …” …हे भलतच काय ह्याचा विचार करत असतानाच बेल वाजली .
आता मात्र सदाची कढी पातळ !!
आपल्या बेडरूम मध्ये एक मादक तरुणी अशी झोपलेली !!! कुणी पाहिलं तर! मग सोसायटीच्या सगळ्या बायका आपल्याला दोन्ही पाय पकडून दगडावर आपटून आपटून मारताएत असे चित्र त्याला दिसले ,आणि थरथर कापतच त्याने दार उघडले .
” अय्या भाऊजी तुम्ही घरी ? चंदा कुठाय ? ” असे म्हणत शेजारच्या फ्लॅट मधील राधा वहिनी आत घुसणार इतक्यात सदा मध्ये आला . ….
..” व व वहिनी , ती आईकडे गेलीये , तुम्हाला काय हवंय , साखर ? ”
” ईश्श !! साखर नाही काई , थोडंसं विरजण द्या मला ..मी घेऊ का ..”
” न ..न .. नको , मी देतो न आणून ”
ती अजून चार पाऊल पुढे आली तरी आतली “” सोफिया “” तिला दिसणार होती .
विजेच्या वेगाने जाऊन त्याने विरजण आणून दिले …वहिनी गेल्या आणि सदा ने सोफ्यात अंग टाकले . सगळे जेवण उतरले होते. घशाला कोरड पडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव तो घेत होता . शिवाय सगळे अंग ठणकत होते .
आत बेडरूम मध्ये आल्यावर तो भानावर आला .
“”बॅटरी रिचार्ज करा “” म्हणजे …ही …
ही एक रोबोट आहे ? ह्युमनोईड रोबोट ? म्हणजे ही कामवाल्या मावशीची मुलगी नाही !
हिला कोणी पाठवले ? आणि कीती पटापट काम करते ही . त्याच्या अपेक्षांना जरी सुरुंग लागला तरी इतकी सुंदर रोबोट आता आपल्या सेवेत असेल ह्या विचाराने खूष झाला तो . बॅटरी रिचार्ज झाली की सोफिया उठली . पुन्हा कामाला जाणार इतक्यात सदा ने तिचा हात पकडला .
ती कसली लाजली .
” रोबोट्स लाजतात ? ”
” मी मानवी रोबोट आहे . ” किंचित मेटॅलिक आवाज आणि काही हालचाली सोडल्या तर ती पूर्ण मानवच होती .
” माझे आजचे मुख्य काम तुम्हाला योगासनं शिकवणे हे आहे . तुमची सुस्ती घालवायची आहे न ? ”
……सुस्ती घालवायचिये ? हे तर आपल्या पूज्य सासूबाईचे वाक्य !! हिला कसं माहीत ?….
” मला आधी सांग , तुला इथे कुणी पाठवलं ? ”
” निर्मला गणपुले ” तिने खरखरीत मेटॅलिक आवाजात सांगितले ,आणि सदा चे कान उभे राहिले .
….नि . ग , म्हणजे आपल्या सासूबाई ? त्यांनी हा रोबोट इथे पाठवला ? इतकी
सुबुद्धी त्यांना कुणी दिली ? जगातील समस्त सासु जमातीला त्याने मनापासून धन्यवाद दिले .
अचानक सोफियाने आपला पवित्रा बदलला आणि सदा ला आपल्याजवळ ओढले . त्या अचानक पुढाकाराने सदा गांगरला .
त ..त ..प्प ..हे s …आ s ..अहो …
त्याला घाम फुटला . तिने लगेच रुमालाने त्याचा घाम पुसायला हात पुढे केला तसा सदा पट्कन उठला ..
” मी पुसतो …मी पुसतो न ”
काही तरी वाजत होते . त्याने इकडे तिकडे पाहिलं , त्याचा मोबाईल वाजत होता .
” हॅलो !! ” फोनवर आवाज ऐकूनच तो उभा राहिला . सोफिया त्याच्याकडे बघत , आपले डोळे उघडझाप करत कान देऊन ऐकत होती .
” येस सर ! …हो सर … देतो सर ! ”
” बॉस चा फोन होता ? ”
” हो , त्यांनी मला एक रिपोर्ट पाठवायला सांगितला होता . तुझ्यामुळे सगळंच राहिलं . आता मला ताबडतोब
कामाला लागलं पाहिजे .
” कसला रिपोर्ट ? ”
सदाने काय ते सांगितले .
” मला गरम गरम कॉफी मिळेल ? ….प्लिज ? ” आपले रेखीव डोळे रोखून तिने विचारले .
किती हिम्मत हिची ! कामवाली रोबोट असून मला कॉफी मागते ? असा विचार करतच चडफडत तो आत गेला .
कॉफी घेऊन येतो तर रिपोर्ट तय्यार !!!
अख्खा क्रिकेटचा बॉल बसेल इतका तोंडाचा मोठ्ठा आ करत तो बघताच राहिला .
” तू हे कसे केलेस ?”
” मी प्रोग्रॅम्ड आहे न ” ओठांची कातील हालचाल करत ती म्हणाली .
” आपण एक सेल्फी घेऊया ? आमच्या मालकाच्या करारानुसार आपली वेगवेगळ्या पोझ मध्ये सेल्फी घेतली पाहिजे , म्हणजे डिजिटल मीडिया कडून आम्हाला खूप रोबोट्स च्या ऑर्डर्स मिळतील , आणि मला काम . ”
” ..पोझ …..म …म्हणजे ?”
” म्हणजे ‘हग’ करतांना , ‘ किस ‘ करतांना , खास फोटो ”
” हे फोटो तू इन्स्टाग्राम , फेसबुक वर टाकणार ?” घामाघूम सदा बोलला .
” हो s s !! नाय टाकायचे ? ” तिने गळ्याभोवती हात टाकले तास टुणकन उडी मारून सदा सोफ्यातून बाहेर आला .
” असं काय करता गडे !! ” म्हणत ती मागे लागली . लहानपणी सुध्दा कधी पळापळी न जमलेला सदा वेडा वाकडा वाट मिळेल तसा पळू लागला . काहीच सुचेना म्हणून शेवटी अलमारीवर चढून बसला.
क्रमश:
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Pingback: सासू खट्याळ, जावई नाठाळ (शेवटचा भाग) – LekhakOnline – Excellent Marathi Articles