सासू खट्याळ, जावई नाठाळ (शेवटचा भाग)
आधीच्या भागाची लिंक- सासू खट्याळ, जावई नाठाळ (भाग २/३)
” ए सोफिया , तुला कुणी बनवले , कुणी इथे पाठवले मला काही देणं घेणं नाही . पण तू आता जा . तुमची काय फिस असते ? मी देतो , पण तू जा बाई . ”
” योगासनं शिकायचे राहिलेत ना ! ”
त्याच्या म्हणण्याला बिलकुल भीक न घालता ती त्याचे पाय ओढू लागली
तसा त्याने चंदा च्या नावाचा धावा सुरू केला .
” चंदा s , चंदा s , मला वाचव ग !!”
आणि काय आश्चर्य ! मागून चंदा तर नाही पण दिवाकर आला होता .
काय तरतरी आली सदाला ! ,
धप्पकन कपाटावरून खाली उडी मारून तो त्याच्या मागे लपला .
” अरे , असा लपटपटतोय काय ? ती बिचारी योगा शिकवते म्हणतेय ”
” तूला काय जातंय म्हणायला ! ह्या तुझ्या बिचारीने माझे सगळे पुर्जे ढिल्ले केलेत . मी केव्हाच तिची बॅटरी काढून तिची हवा फुस्स केली असती . पण सासूबाईंनी खास माझ्या सेवेसाठी हिला पाठवलिये . सासर च्या कुत्र्याला देखील ‘ अहो हाड ! ‘ म्हणावे लागते न . मग ही तर ….”
हे बघा ताई , तुम्ही तुमचे आजचे कामाचे पैसे घेऊन जाऊ शकता . ”
सोफियाने कपड्यातून स्वाईप मशीन काढले . सदा ने कार्ड वापरून तिचे पैसे दिले . ठुमकत ठुमकत सोफिया गेली . जाताना एक उडते चुंबन फेकून गेली .
” काय येडा आहेस रे सदा ! ही काय खरच रोबोट वाटली का तुला ? म्हणे सासूबाईंनी पाठवलीये ! ”
” अरे , आधी मी खरंच फसलो होतो . कारण असे रोबोट्स बनले आहेत हे तर खरच न? ..पण जेव्हा ती सेल्फी चा आग्रह करत होती , तेव्हा शंका आली आणि मग योगासनाबद्दल बोलली तेव्हा मात्र खात्रीच पटली की ही आमच्या खट्याळ सासूबाईंची चाल आहे . ”
” वहिनी कधी येणार आहेत ? ”
” अजून पाच दिवसांनी . ….दिव्या , ऐक! ” ….सदाच्या कुरापती डोक्यात काहीतरी शिजत होते .
********* ” त्या हरिद्वारला नुसता उकडलेला पाला खाऊन जीव वैतागला ग बाई ! ” निर्मला गणपुले , म्हणजे सासूबाई म्हणाल्या .
” आई , मी आज जाते ग घरी . बिचारा माझा नवरा ….तू पण काय भन्नाट डोकं लढवलंस ग ! पद्मिनी राव ने काय जबरदस्त वठवला रोबोट चा रोल ! ती काय हुशार , फिट आणि ताकदवान आहे , खरच ! आमच्या साहेबांची कशी घाबरगुंडी उडाली असेल ना? ”
” हो ना ग . मला न , ह्या पुरुष जातीवर बिलकुल विश्वास नाही . दिसली सुंदर बाई , की पाघळले लगेच . आणि हे जावई लोक तर फार स्मार्ट असल्याचा आव आणतात . ही सासू पण काही कमी नाही म्हणावं . ”
” कमी नाहीच मुळी . मला विचारा न ! ” …श्री गणपुले.
दारावर कुणी आले होते . त्याने एक चिठ्ठी दिली ,आणि काही न बोलता लगेच गेला . श्री गणपुल्यांनी बघितले…… “अग, जावई बापूंची चिठ्ठी आहे . स्वतः न येता चिठ्ठी पाठवली ? आश्चर्य आहे ! ”
” बडबड न करता वाचा की . ”
प .पु . सासूबाईस ,
सा . न
आपण जगातील सर्वोत्कृष्ट सासू आहात . जावयाची किती काळजी!! आपल्या मुलीच्या अनुपस्थितीत त्यांना कुठलीच कमतरता जाणवू नये म्हणून एव्हढा परफेक्ट , तीव्र बुद्धिचा मानवी रोबोट पाठवलात. मी आणि “””सोफिया “” नि कसली धमाल केली पाच सहा दिवस . स्वर्गीय …अनु..अनुभव . ” गणपुल्यांनी नंदा कडे पाहिले . पाणी काठा पर्यंत आलेच होते . बस बांध फुटायचा बाकी होता .
” अहो वाचा की पुढे !! ” सासूबाई कडाडल्या.
ते वाचू लागले…..
” इतकी सर्वगुणसंपन्न स्त्री ,म्हणजे रोबोट असल्यावर आयुष्यात आणखी काय हवं ? आता मला दुसऱ्या कुण्णा कुण्णाचीही गरज नाही. मी आणि माझी सोफु डार्लिंग ..बस! तुमचे कित्ती कित्तीआभार मानू ?
तुमचा जावई , ( पूर्वाश्रमीचा )
सदानंद “”
गणपुल्यांनी चमकून नंदाकडे पाहिलं . तिचे नाक , कान लाल झाले होते.
सासूबाई सुन्न होऊन स्थिर बसल्या होत्या . आणि अचानाक उठल्या .
” वा रे वा ! असे कसे !! मी आत्ता पद्मिनी ला फोन लावते . काय खरं काय खोटं ता आत्ता कळेल. तू रडू नकोस ग नंदा! सारखं आपलं मुळूमुळू.”
त्यांनी पद्मिनीला फोन लावला …..हा नंबर अस्तित्वात नाही…असे उत्तर आले , आणि नंदा ने मोठ्याने गळा काढला .
” काय गरज होती त्यांची परीक्षा घ्यायची ? किती चांगला गुणी माझा नवरा , उगाच खोडी काढलीस त्याची !!! आता त्या सोफु बरोबर बसला असेल गुलगलू करत !! तीही पाघळली लगेच !!! आ s हा s s ….” तिने भोकाडच पसरले .
******** बेल वाजली आणि सदाने दार उघडले .दारात सासूबाई , सासरे आणि चंदा राणी उभ्या होत्या . चंदा तिरासारखी आत घुसली . सासूबाई
आपले फुगलेले तोंड घेऊन धप्पकन सोफ्यात बसल्या . सासरेबुवा शांतपणे तिथला पेपर तोंडासमोर घरून बसले .
” कुठाय ती सटवी ? ” घरभर फिरून येऊन चंदाने विचारले .
” सोफु का ? माझी सोफु जरा बाहेर गेलीये . बॉडी रिचार्ज करायला . दमली ना बिचारी ! ” सदा ने लाडिक आवाजात म्हटले .
” माझी सोफु ? माझी सोफु ? आणि रिचार्ज व्हायला ती रोबोट फिबोट काही नाहीये . माणूस आहे माणूस !! ”
” ती कशीही असली तरीही मस्तं आहे . किरकिर नाही , आरडाओरडा नाही , आणि आता तर सासू माँ देखील नसतील मध्ये मध्ये करायला ….आहाहा !!! काय सुंदर आयुष्य आहे हे !! धन्यवाद सासू मा!! ”
” मला ही अशीच एखादी “”सोफु”” द्यायला पाहिजे होती आमच्या सासूबाईंनी . ” गणपूले म्हणाले आणि सदा ने त्यांना जोरात टाळी दिली.
तसे दोघेही हसायला लागले …सदा तर हसता हसता आडवाच पडला .
मायलेकी गोंधळात पडून एकमेकीकडे बघू लागल्या .
” मानलं तुम्हाला जावाईबापू ! मला वाटलं आमचं खटलंच फक्त खट्याळ आहे . तुम्ही तेव्हढेच नाठाळ निघालात . अगदी पद्मिनीलाही सामील करून घेतला प्लॅन मध्ये !!! सासू खट्याळ तर जावई नाठाळ !!!! ”
© अपर्णा देशपांडे
समाप्त
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
zakas
Ohhh
Thanks
एकदम भारी….मजा आ गया ! !
Thank you!!!
भन्नाट
भारी 👌