Locked Down संसार – शेवटचा भाग

भाग १ ची लिंक- Locked Down संसार – १

या सार्‍याचा काही अंदाज न लागलेली मनवा आपली गोड स्वप्नात हरवून गेली. आता तीला चिन्मयपेक्षा शशांक जवळचा वाटू लागला होता. अशातच त्यांची भांडणं टोकाला जावू लागली. शब्दाला शब्द वाढत गेले आणि तीने वेगळे होण्यासाठी सांगितले. मनवा रागाच्या भरात बोलली असेल असे समजून चिन्मयने काही मनावर घेतले नाही. अशातच कोरोनाने जगावर थैमान घालायला सुरुवात केली. अन लॉकडाऊनची घोषणा झाली. त्याहीपेक्षा मोठा आघात चिन्मयला बसला तो म्हणजे लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी त्याला मनवा कडून मिळालेली डिव्होर्स नोटीस.

पहिल्यांदा त्याला काही कळेचना की मनवा असे का वागते आहे. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती नीट बोलायला तयार नव्हती. साहजिकच आहे, जेव्हा जेव्हा तिला बोलायची, सहवासाची किंवा फक्त सोबत असण्याची गरज होती तेव्हा तो अव्हेलेबल नव्हता. आता लॉकडाऊनमुळे दोघेही घरात अडकून पडले. वेळ होता पण कोंडी सूटत नव्हती. चिन्मयने काही निर्णय घेतले. जास्तीच्या कामाला रामराम केला. आता घरात तो काय हवे नको पाहू लागला. कामवाल्या मावशी नसल्याने मनवावर पडलेल्या कामाचा ताण कमी करु लागला. तीला स्वयंपाकात मदत करु लागला. घर आवरायला मदत करु लागला. आता मानवाच्या मनात द्वंद्व सुरु झाले होते. ज्या गोष्टी तीला अपेक्षित होत्या त्या आता चिन्मय करत होता आणि तीला काय करायचे कळत नव्हते. अशातच आज लॉकडाऊन वाढल्याने ती अपसेट होती.

आज सकाळी सगळे आवरुन चिन्मयनी कॉफी करुन आणल्यावर तीला पहिला चिन्मय आठवत होता. तोच चिन्मय तिच्या समोर बसला आणि म्हणाला मला थोडे बोलायचे आहे ऐकशील का?

आजच्या दिवसाची झालेली प्रसन्न सुरवात तीला चिडचिड करुन खराब करायची नव्हती. त्यामुळे ती गप्प बसली. तीचा होकार समजून चिन्मयने बोलायला सुरुवात केली.

चिन्मय – मनवा आपल्या इतक्या वर्षांच्या सहवासात एक गोष्ट जाणवती आहे की मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय.

मनवा – अरे कितीवेळा दूर राहिलोय आपण विसरलास का?

चिन्मय – तसे नाही गं. पण मला माहीत आहे मी खुप चूका केल्या. केवळ करिअरच्या मागे लागून आणि मोठा होण्याच्या नादात मी तुलाच हरवून बसलो. या लॉकडाऊनच्या काळात मी विचार केला मी का करतोय हे सगळे? कोणासाठी? हे मोठं घर, पैसा, बॅंकबॅलन्स हे सगळे कोणासाठी? कशासाठी? मला माझ्या यशाची नशा चढत गेली अन मला काय हवे तेच विसरून गेलो. आजचं जगणं मी उद्याच्या यशासाठी पुढे ढकलत राहिलो आणि जगणंच विसरुन गेलो. तुला आठवतं मनू… पहिली पाच वर्षे आपली करिअर सांभाळण्यासाठी आपण फॅमिली प्लॅनिंग केले अन त्यानंतर तर आपण विसरुनच गेलो की फॅमिली म्हणजे काय. अरे कशासाठी हे सगळे? या सगळ्याला मी एवढे महत्व देत होतो की आपली इतकी भांडणं झाली तरी मला कळले नाही. पण जेव्हा ती डिव्होर्स नोटीस हातात पडली तेव्हा मी कोलॅप्स झालो. मग मला माझ्या एक एक चुका उमगत गेल्या. मला तुला दूर करायचे नव्हते मनू पण मी तो गाढवपणा वारंवार केला. मी तुला दोष देणार नाही. माझ्याच चुकांची शिक्षा मला मिळत आहे.

मानवाच्या डोळ्यात आसवं जमू लागली होती.

चिन्मय – हे बघ जर माझ्याकडे टाईममशीन असते ना तर मला पाच वर्षे परत जायची इच्छा आहे आणि ते हरवलेले, निसटून गेलेले ते सगळे क्षण तुझ्यासोबत जगण्याची इच्छा आहे. पण आता ते शक्य नाही. पण मी आता ठरवले आहे. मी माझा हा जॉब सोडून देणार. हे घर मी तुझ्या नावावर करून देतो. मी एक कंसलटन्सी उघडायच्या विचारात आहे. भले पैसे कमी मिळतील पण जगणं हरवणार नाही. अर्थात हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. तूला माहिती आहे मनू… मला आजकाल आपण आपल्या मुलांसोबत खेळत आहेत अशी स्वप्नं पडतात. पण… पण…

एवढे बोलून चिन्मय शांत झाला. घरात नीरव शांतता झाली. ज्या गोष्टीची मनवा आस धरून होती ती गोष्ट आता घडत होती पण एवढ्या उशीराने? तीला आता काय बोलावे तेच सुचत नव्हते. पण तीने धीर एकवटून शशांक बद्दल सांगितले. चिन्मयला काय बोलावे कळत नव्हते.

चिन्मय – तू तुला हवा तो निर्णय घे मनू पण तू आनंदी रहा एवढीच माझी इच्छा आहे. तुला जर वाटत असेल तू त्याच्यासोबत जास्त खुश राहशील तर मी आनंदाने ते पेपर्स साईन करेन. असे म्हणून तो त्याच्या कपाटातील पेपर्स आणण्यासाठी गेला. माघारी आला तर मनवा कोणाशीतरी फोनवर बोलत होती. शेवटची वाक्ये त्याच्या कानावर पडली.

मनवा -… आय नो तुला हे पटत नाही आणि आय एम सो सॉरी… पण मला आता काय हवंय ते कळलय. तेव्हा तू मला विसरून जा प्लीज. आय एम सो सॉरी.

चिन्मयला काय बोलावे कळेना. त्याच्या हातातील डिव्होर्स पेपर्स मनवाने ओढून घेतले आणि फाडून टाकले आणि चिन्मयला घट्ट मिठी मारली. त्याच्यावर होणार्‍या चुंबनांच्या वर्षावाने चिन्मय गांगरून गेला आणि तेवढाच सुखावला.

मनवा – बच्चमजी अशी बरी सोडेन तुला? आणि काय रे मुलांशी काय स्वप्नातच खेळणार का स्वप्नं प्रत्यक्षात येण्यासाठी काही प्रयत्न करणार? एक डोळा किलकिला करुन खट्याळपणे हसणार्‍या मानवाच्या या वाक्यावर  हसून चिन्मय म्हणाला – आता बोलण्यात वेळ नाही घालवणार.

निर्जीव झालेलं, तूटून पडण्याच्या काठावर आलेलं नातं आता सावरलं होतं. बेडरुम मधे फुललेला शृंगार एक नवीन नातं फुलवत होता. एक नवीन प्रवास सुरु करत होता. नात्यांमधे दाटून आलेल मळभ आता दूर झालं होतं.

चिन्मय आणि मनवाचा Locked down झालेला संसार आता पुन्हा नव्याने सुरू झाला होता.

– अभिजीत इनामदार

Image by Bing N. from Pixabay 

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!