आवाज- भाग एक
“हॅलो….”
“हॅलो…. बोला…”
“हॅलो, डॉक्टर लिनाच बोलत आहेत ना? “
“येस्स, ………. काय काम आहे तुमचं ?”
“अं,…. मला अपॉइंट्मेंट हवी होती.”
“काय प्रॉब्लेम आहे …. आपला ?”
“पण, ……. नक्की, डॉक्टर लिनाच बोलत आहेत ना ?”
यावेळी मात्र लीना वैतागली. तरीही शक्य तितका पेशन्स ठेवत बोलत राहीली.
“हो, ……. मी लिनाच बोलतेय. प्रॉब्लेम सांगा तुमचा. ”
“माझ्या उजव्या हातातुन सेन्स जातो,………. अचानक होतं असं …….. हातातली वस्तु सुटते अचानक. मला डॉक्टर घाडगेनी तुमचा रेफरन्स दिला…..”
“ओके,……. या हाताशी संबंधी काही ऑपरेशन वगैरे केलं होतं का ?”
“नाही…”
“हरकत नाही, तुम्ही उद्या संध्याकाळी सात वाजता या क्लिनिकवर.”
“ओके, …….”
अजुनही पेशंटने फोन ठेवलाच नव्हता. शेवटी न राहवुन ती बोलली,
“आणि हो, मी डॉक्टर लीनाच बोलतेय.”
तसा पटकन फोन कट झाला.
काय कट्कट आहे, लीनाच बोलतेय ना, लीनाच बोलतेय ना, …….अपॉइंटमेंट घेईपर्यंत इतकं डोकं खाल्लं, प्रत्यक्ष भेट्ल्यावर काय दिवे लावेल हा माणुस. किती शंकेखोर असतात ही माणसं…. असं बोलत होता जसा काही मला फोनमधुन पहात होता. नुसता आवाज ऐकुन इतक्या शंका………. असो.
नाही म्हणायला आज आवाज जरा बसलाच होता. आज सुट्टीचा दिवस. ती सकाळी आत्याशी बोलली ती थेट आताच तोंड उघडलं होतं बोलायला. नेहमी ऐकणाऱ्याला आज वेगळंच कुणीतरी बोलतंय असं वाटु शकत होतं. पण हा कोण कुठला पेशंट…….. जाऊ दे.
तसंही कोण आहे घरात बोलायला. येऊन जाऊन तो गबाळा टेडी…… त्याच्याशी गप्पा मारण्याइतकं स्वप्नाळूपण आता तिच्यात उरलं नव्हतं. चाळीशी कधीच उलटली होती. तरीही आयुष्याची सोबत करायला कुणी नाही, या गोष्टीचं शल्य बोचण्याइतकी संवेदनशीलता उरली नव्हती. तिची संवेदनशीलता, पेशंटची दुखरी नस पकडण्याइतपतच शिल्लक होती. फिजिओथेरपीचं काम करता करता तिच्या बोटांनी ऍक्यूप्रेशर थेरपी देखील अवगत करून घेतली होती. ऍक्युप्रेशरिस्ट म्हणून तिचं नाव बोरिवलीतल्या गुजराती सिनिअर सिटीजन्समध्ये भलतंच नावाजलेलं होतं.
अर्थात या कौतुकानेही मोहरून जावं असंही तिला कधी वाटलं नाही. पण हे काम करता करता त्या म्हाताऱ्या जीवांमध्ये मन रमवण्याची संधी मात्र ती कधी सोडत नव्हती. त्यांची बोचणारी सुखं, अंगावरच्या दुखण्याच्या स्वरूपात घेऊन ते तिच्याकडे येत. आणि परदेशी स्थिर झालेल्या त्यांच्या पुढच्या पिढीच्या तक्रारी , तिला ऐकवत राहात.
या मागल्या पिढीशी कसं कोण जाणे, पण तिचं पटकन जमायचं. भूतकाळाकडे यशापयशाच्या चष्म्यातून न पाहता , फक्त आणि फक्त, प्रेमाने पाहण्याची तिची क्षमता अचाट होती. आई वडिलांच्या जपून ठेवलेल्या तसबिरी आणि सोबतच्या आठवणी एवढीच काय ती तिची दुनिया, आणि तिची संपत्ती. बांधकाम व्यावसायिक असलेल्या वडीलांनी भरपूर माया जमवलीही आणि घालवलीही. तरीही लीना आणि तिच्या दोन भावांसाठी बोरीवलीच्या उच्चभ्रू परिसरात तीन फ्लॅट मागे ठेवून ते गेले. त्यातला सर्वात लहान फ्लॅट, अर्थातच या एकट्या जिवाच्या वाटणीला आला. आणि आईवडिलांनी सर्वात जास्त काळ तिथे काढला, म्हणून तिने तो आनंदाने स्वीकारला देखील……. भूतकाळाशी कनेक्टेड राहण्यातच तिला जास्त सार्थकता वाटायची.
तसाही तिच्याकडे भविष्यकाळ होता कुठे?…… तो निर्माण करण्याची संधी तिने कधीच गमावली होती.
वडिलांनी सुचवलेलं एकूणएक स्थळ रिजेक्ट करून, तिने भविष्यकाळाकडे जातानाची सोबत आणि रस्ता, कधीच हरवला होता.
खरंतर, इतक्या वर्षात मनासारखं स्थळ आलंच नाही, …….. त्या श्रेणीक सारखं.
(क्रमशः)
पुढील भागाची लिंक- आवाज- भाग दोन
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
छान सुरुवात
Pingback: आवाज- भाग दोन – LekhakOnline – Excellent Marathi Articles