चक्रीवादळ…
निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकणार…
NDRF ची तुकडी अलिबागला तैनात..
आधल्या दिवशी रात्रीच्या बातम्या…
आम्हाला धडकी भरली…
एकदा वाटायचं..आपल्याकडे कसलं येतंय वादळ..सरकेल पुढे…
उद्या रात्री याच वेळेला बातमी येईल, निसर्ग चक्रीवादळ अलिबागहुन पुढे सरकले, कोकण किनारपट्टीचा धोका टळला…
पण परत वाटायचं..नाही सरकलं पुढे तर? खरंच आपल्याकडे आलं तर……
अशा मनाच्या द्विधा अवस्थेतच पुढला दिवस उजाडला…
लाईट तर गेलेलेच होते पहाटे पाच वाजताच…
त्यामुळे दिवसाची नकारात्मक सुरवात झालेलीच होती…
पाऊस रिपरिप चालू…
सकाळचं सगळं आवरून अकरा वाजता मोबाईलवर लाईव्ह बातम्या बघितल्या…
निसर्ग चक्रीवादळाचा श्रीवर्धनमध्ये शिरकाव…
घरात आमच्या सगळ्यांचा एकच सूर..म्हणजे हे रायगडात आलं म्हणायचं…
बरोब्बर अकरा वाजून वीस मिनिटांनी आमच्याकडे हळूहळू प्रमाणात वारा यायला सुरवात झाली…
आणि त्या वाऱ्याचं वादळात रूपांतर कधी झालं आम्हांला समजलंच नाही…
मिनिटभर वारा यायचा परत थोडा शांत व्हायचा…
मग पाचेक मिनिट काही नाही…
मग परत वारा यायचा…परत शांत…
हळूहळू या दोन वाऱ्यांमधलं अंतर कमी व्हायला लागलं आणि खरोखरचं वादळ घोंगावायला लागलं…
वादळ घोंगावणे हा काही शब्दप्रयोग असतो ना, त्या घोंगवण्याचा खरा अनुभव त्या दिवशी घेतला…
सुरवातीला तगर,जास्वंदीच्या फांद्या आकाशाकडे बघू लागल्या…
कुठूनतरी पत्रे वाजल्याचे आवाज ऐकू यायला लागले…
उंबराची, चिंचेची, आंब्याची फांदी गळून पडली…
वाऱ्याचा जोर जसजसा वाढत गेला तसतसे अनेक घरांवरचे पत्रे उडू लागले…कौलं उडायला सुरवात झाली,
माड, पोफळी बुंध्यातून उन्मळल्या…
जमिनीतून बुंध्यातून झाड कसं उन्मळतं ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं…
अरे अरे बघ ,त्याच्या घरावरचं पाखं उडालं….तिकडे काय बघतोस, तो बघ आपला माड पडला, एका माडामुळे चार पोफळ्या पडल्या…
आत्ता होतं आत्ता पडलं असं प्रत्येक झाडाचं व्हायला लागलं…
घड्याळात वाजलेल्या अकरा वीसचे तीन कधी वाजले समजलंच नाही…
आता मात्र वाऱ्याचा जोर कमी व्हायला लागला…
आता वादळाचा शेवट आहे असं वाटत असतानाच परत एक वाऱ्याची झोड अशी आली की थोडं फार उरलेलं जे काही होतं त्यातलं पण बरंच काही घेऊन गेली…
मग परत सगळं शांत झालं…
हळुहळू वारा यायचा बंद झाला…
आणि सगळीकडे पसरली जीवघेणी शांतता…
उरली होती फक्त आपली जमीन…
माड, पोफळी, आंबा, फणस, चिंच, उंबर, जायफळ, जांभूळ सगळे एकमेकांवर निपचिक पडले होते…
गणितात भौमितिक रचनेमध्ये एक त्रिकोणात अनेक त्रिकोण काढले जातात ना तसंच या सगळ्या झाडांचं झालं होतं…
माड, पोफळीबरोबर प्रत्येक बागायतदार उन्मळून पडला होता…
कैकजणांच्या बागेचं अक्षरशः मैदान झालंय…
पूर्ण बाग झोपल्ये…
उभं काही नाहीच, सगळी झाडं आडवी…
या सगळ्याची आवराआवर करताना हातात घ्यायची ती फक्त आणि फक्त कुऱ्हाड…………….
© Ashwini R. Athavale
Image by Barroa_Artworks from Pixabay
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021