आवाज- भाग दोन
आधीच्या भागाची लिंक- आवाज- भाग एक
श्रेणीक, ……. तिच्या पपांकडेच तर तो काम करायचा. सिव्हिल इंजिनिअर होता. स्मार्ट हसतमुख व्यक्तिमत्व, बोलणं चालणं सगळं अगदी मराठमोळं…… पण मुळचा मारवाडी.
बडोद्याहून मराठ्यांचा इतिहास आणि गुजरातमधली मराठी संस्कृती मनात घेऊन आलेला. पपांचा लाडका इंजिनिअर. बऱ्याचदा घरी यायचा, चेकवर , कागदपत्रांवर सही घ्यायला. लीनाला पाहिलं अन ऑफिसमध्ये पपांच्या सह्या घेणं त्यानं जवळजवळ बंदच केलं. घरी यायला निमित्त हवं होतं.
पाणीदार डोळ्यांच्या स्वप्नाळू लीनानं त्याच्या मनाचा पुरता ताबा घेतला. अगदी तिच्याही नकळत. हे तिला सांगायचं होतं. तो संधीची वाट पहात होता.
रविवार होता. तो सकाळीच, ऑफिसच्या फाईल्स घेऊन घरी धडकला. लिनाची धांदल चालली होती. कसलासा सेमिनार होता दिल्लीत. फ्लाईट पकडण्यासाठी भराभर आटपत होती. तिच्या दोन्ही वहीन्या अन मम्मी पप्पा तिच्या राहिलेल्या गोष्टींची आठवण करून देत होत्या. नेहमीच्या टॅक्सीवाल्याचा फोन लागेना.
“मी बाईकवर सोडू का?”
श्रेणीक ही संधी सोडणं शक्य नव्हतं. पप्पाही लगेच तयार झाले. फ्लाईट पकडण्याच्या घाईत, तीही अगदी टूणकन बसली बाईकवर, …… रोजची सवय असल्यासारखी. श्रेणीकची कॉलर पकडून. तो खूप सुखद क्षण होता, श्रेणीकसाठी. आयुष्यभर पुरेल एवढा मोठा.
एअरपोर्टच्या गेटवर तिला ड्रॉप केल्यावर, तो थोडा घुटमळला. ती मागे न बघताच निघून गेली होती. पोलिसांच्या शिट्ट्यामध्ये त्याला जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं. त्याने किक मारली, अन मागून आवाज आला,
“बाय …..”
त्याने वळून पाहिलं, ती थोडं माघारी येऊन, प्रसन्न चेहऱ्याने बाय करत होती.
तिथल्या गोंधळातही तिला त्याचे शब्द अगदी स्पष्ट ऐकू आले,
“वाट बघतोय……”
…………………………………………………..
विचार करता करता अखेर आजही, चहाचं आधण उतू गेलं होतं …….. ती खिन्नपणे हसली. आणि गॅस बंद करून, चहाचा प्लॅन कॅन्सल करून बाल्कनीत येऊन बसली.
खाली जग प्रचंड वेगाने धावत होतं. ती पुन्हा खिन्न हसली. धावता धावता माणसं हात कसा सोडतात, हे त्या क्षणी तरी, तिच्याइतकं स्पष्ट कुणालाच आठवत नव्हतं. समोर अस्ताला चाललेला सूर्य क्षितिजाचा हात सोडताना अगदी स्पष्ट दिसत होता.
संध्याछाया घरभर दाटल्या होत्या. खरंतर मनावर कुठलंच मळभ शिल्लक नव्हतं. आयुष्यानं द्यायची ती उत्तरं वेळोवेळी सांकेतिक स्वरूपात का होईना दिली होती. आणि ती तिने स्वीकारली देखील होती.
येऊन जाऊन ती चहा मिस करत होती. भिंतीवरच्या घड्याळात साताचे टोले पडले….. अन तिचं काळीज जरा हललंच.
चहा आणि सातची वेळ हे समीकरण भूतकाळाच्या काही पानांवर अगदी घट्ट कोरलं होतं. गोरागांधीच्या पहिल्या मजल्यावरचा कोपऱ्यातला टेबल जवळजवळ रोजच रिजर्व होऊ लागला होता…… त्या दोघांसाठी. एसी मधल्या मंदधुंद संगीतात, बाहेरच्या कर्कश्श ट्रॅफीकचा आवाज ऐकू येणं शक्य नव्हतंच. प्रेमाच्या लाटांवर आरूढ झालेल्या त्या दोन जीवांना, वास्तवाच्या खडकांची जाणीव होणं शक्य नव्हतंच. त्या खडकांवर, आपटी खाणार हे जवळजवळ निश्चित होतं.
(क्रमशः)
©बी आर पवार
पुढील भागाची लिंक- आवाज भाग तीन
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Pingback: आवाज भाग तीन – LekhakOnline – Excellent Marathi Articles