जिगसॉ जिंदगी- पत्र क्रमांक ५

आधीच्या भागाची लिंक- जिगसॉ जिंदगी- पत्र क्रमांक ४

प्रिय आई
दसरा होऊन गेला. दिवाळी जवळ आलीय. कामं निघाली आहेत खूप. हल्ली कामं करून करून दमायला होतं गं.
लहानपणी वाटायचं सण म्हणजे मज्जा. आता त्यातली सगळी मजाच निघून गेली आहे बघ. नुसती लगबग आणि काम एके काम. घरातल्या कर्त्या बाईला तर दिवस लहान पडावा इतकं काम ! तरी बरं मुलांची शाळा नाहीये सद्ध्या. त्यामुळे त्या आघाडीवर जरा स्वस्थ राहता येतंय. अं हं… खरंतर स्वस्थ राहता येतं म्हणण्यापेक्षा ती एनर्जी इतर ठिकाणी वापरता येतेय असं म्हणणं अधिक योग्य ठरेल.
दादूकडे जाऊन आलेय इतक्यात. अधिक महिन्यात मानाने बोलावलं त्याने. ह्यांना, सासूबाईना आणि मुलाबाळांसह मला आहेर केला त्याने. चांदीचा दिवा दिलाय एक. दररोज माझ्या देवघरात मिणमिणतोय तो. तू गेलीस तेव्हा फक्त आठ वर्षांचा असलेला दादू केवढा मोठा झाला आई ! तू असतीस ना तर अभिमानाने फुलून आलं असतं तुझं मन. त्याचं वैभव डोळ्यात भरून घ्यावंसं वाटतं. तू आहेस तिथून बघत असशीलच याची खात्री आहे मला.
असो… तर काय सांगत होते, की दिवाळीच्या कामाकामांमध्ये ना सद्ध्या तुला पत्र लिहायचं राहूनच जातंय. आत्ता हे पत्र वेळात वेळ काढून लिहितेय. तेवढंच तुझ्याशी बोलल्याचं समाधान !
सद्ध्या करोनाच्या संकटामुळे शाळा वगैरे बंदच आहेत. त्यामुळे पूर्णवेळ गृहिणीच्या भूमिकेत वावरायला मिळालं काही दिवस. किती कठीण असतो ना पूर्णवेळ गृहिणीचा थॅंकलेस जॉब ! जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे असं म्हणतात ते काही  खोटं नाही आई.
किती किती मन लावून घर आवरतात बायका. अगदी हँडल तुटलेल्या धुंडक्या चमच्यात सुद्धा जीव अडकवतात. पण घरकामाचं कुणाला कसलं आलंय कौतुक?
माझ्या भाचीला पहायला पाहुणे आले होते बघ. मुलाच्या आईजवळ मी भाचीचं कौतुक केलं-“आमची मिता इंजिनिअर आहे, मोठ्या पदावर आहे आणि तरीही सगळं घरकाम येतं तिला !… स्वयंपाक तर अगदी उत्तम करते.” हे कौतुक ऐकून मुलाच्या आईनं काय म्हणावं?… तर म्हणे ” घरकाम, स्वयंपाक ही सगळी कामं म्हणजे डॉंकी वर्क आहे. आजकाल कमावता आलं पाहिजे. मितुने कुठलंही घरकाम केलं नाही तरी चालेल.”
हे सगळं ऐकून तर मी थक्क झाले. काय एकेक विचारसरणी असते ना आई. घरकाम म्हणजे म्हणे डॉंकी वर्क ! वाईट वाटलं हे ऐकून.  घरकाम मनस्वीपणे गुंतून करण्यामागे केवढी ऊर्जा लागते हे ह्या बाईला कुणी सांगावं?
असो… कोणतंही काम हलकं नसतं इतकंच मला वाटतं. आणि कुणी कुणालाही त्याच्या कामावरून कमी लेखू नये असंही वाटतंच. पण आपल्याला वाटतं तसंच लोकांनी वागावं असं घडत नाही. तरीही आपण आपल्यापासून सुरुवात करावी नाही का?
आज स्वयंपाकघर आवरायला घेतेय. जोशी काकूंच्या घरात आपण भाड्याने रहायचो ना ते घर आणि त्यात काम करणारी तू आठवते आहेस. तुला आठवत आठवत सगळं घर आवरणार मी. त्यानिमित्ताने तुझी माया माझ्या स्वयंपाकघरात वास करेल.
पुढचेही पत्र लवकरच लिहीन गं.
तुझीच
छबी
Image by Free-Photos from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!