फोटो फ्रेम….
मानवी मन खुप विचित्र आहे. त्यात निर्माण होणाऱ्या भावना मानवी मेंदूला आज्ञा देतात आणि त्यानुसार मेंदू जी क्रिया करतो त्याला माणसाची वागणूक म्हणतात. त्यामुळेच मन चांगलं आणि कणखर राहावं म्हणून मनाचे श्लोक लिहिणारे रामदास स्वामी किती द्रष्टे होते हे लक्षात येईल. माणसाच्या चांगल्या आणि वाईट वागणुकीच्या मुळाशी असलेल्या मनावर संस्कार करणारे श्लोक लिहिणाऱ्या रामदास स्वामींनी म्हणूनच साष्टांग नमस्कार!
पण खरंच मन ही गोष्ट अगम्य आहे. चंचल आहे. एखादी वस्तू, व्यक्ती, घटना ह्याबद्दल आज जी भावना मनात आहे तीच उद्या असेल आणि कायम टिकेल असं नाही. काही भावना अनुभवातून बदलतात तर काही अंदाजातून. म्हणजे साडी नेसणारी बाई सोज्वळ असते ही भावना हा आपल्या आईमुळे आलेला अनुभव असतो तर शॉर्ट कपडे घालणारी मुलगी चालू असते हा निव्वळ अंदाज. मग त्या भावनेनुसार त्या त्या व्यक्ती, वस्तू आणि प्रसंगा बाबत आपली वागणूक असते किंवा बदलते.
सर्वात वाईट भावना जिने जगात अनेक नाती, संबंध बिघडवले ती भावना म्हणजे असुरक्षितता! किंवा इंग्रजीत ज्याला insecurity म्हणतात ती भावना! अगदी रामायणात कैकेयीच्या मनात निर्माण झालेल्या ह्या भावनेने रामाला वनवास घडवला आणि आज देखील आपण बघतो की एखाद्या नटाच्या संशयास्पद मृत्यूच्या मागे दुसऱ्या नटाच्या मनात आलेली असुरक्षितता असू शकते!आणि सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे ही असुरक्षितेची भावना हा बहुतांश वेळेला अंदाज असतो अनुभव किंवा सत्य नाही!
बर ही भावना अयशस्वी लोकांच्या मनातच निर्माण होते का? तर असं अजिबात नाही. तसेच असुरक्षितता ही भावना आपल्याहून जास्त यशस्वी लोकांबद्दलच निर्माण होते असंही नाही. गंमत म्हणजे ही भावना प्रचंड यशस्वी व्यक्तीला तिच्या समोर अत्यंत किरकोळ असणाऱ्या व्यक्तीबद्दल देखील वाटू शकते! ही भावना बापाला मुलाबद्दल, नवऱ्याला बायको बद्दल, मित्राला मित्राबद्दल देखील निर्माण होऊ शकते. बहुतांश वेळा निरर्थक असलेली ही भावना नात्यांची मात्र माती करून टाकते कारण माणसं त्या भावनेने मेंदूला दिलेल्या सुचनेबरहुकूम वागू लागतात जे वागणं अत्यंत डिस्ट्रक्टिव्ह आणि क्लेशकारक असू शकतं!
ह्या भावनेने ग्रासलेले लोक अनेक वेळा मागे बोलू लागतात. ज्याला इंग्रजीत बिचिंग म्हणतात. आणि गंमत म्हणजे मुळात ज्या व्यक्ती, वस्तू किंवा घटनेबद्दल असुरक्षितता वाटून तिच्या मागे हे असुरक्षित वाटत असलेले लोक वाईट बोलत असतात त्या व्यक्ती, वस्तू आणि घटनेला ह्याची खबरच नसते. त्यातून त्या व्यक्ती नातेवाईक, कलीग किंवा मित्र मैत्रीण असतील तर ते ह्याची कल्पना नसल्याने अगदी नॉर्मल वागत असतात आणि ही भावना निर्माण झालेली व्यक्ती मात्र ती भावना जाहीरपणे दाखवता येत नसल्याने त्या व्यक्तीच्या मागे आपल्या असुरक्षित भावनांना वाट करून देऊ लागते! खरं तर हे चूक आहे. विशेषतः जर अशी असुरक्षितता जवळचे नातेवाईक, कलीग किंवा मित्र मैत्रिणीबद्दल निर्माण झाली तर. अश्या वेळी जे आहे ते स्पष्ट बोलून ह्या असुरक्षिततेची मुळं मनात खोल रुजायच्या आधी ती भावना उखडून फेकून द्यावी, पण अनेकदा तसं होत नाही. मनात असुरक्षिततेच तण माजत जातं आणि तेच वाळवी बनून नातं हळूहळू पोखरत जातं! मग वरकरणी चांगली दिसणारी नाती वाळवीने आतून पोखरलेल्या फर्निचर सारखी बनतात. एखादा लहान धक्का जसं ते फर्निचर उध्वस्त करू शकतो तशी नाती लहानश्या घटनेने नष्ट होतात! संपतात!
असुरक्षितता ही भावना ज्यांच्या मनात निर्माण होते ते लोक ह्याच भावनेने ग्रासलेले असतात. फक्त काही व्यक्ती, वस्तू आणि प्रसंगांच्या बाबतीत त्यांची ती भावना उफाळून येते….दिसून येते इतकच. हे लोक अपयशी वगैरे असतात असंही नाही. हे लोक प्रचंड यशस्वी असू शकतात. अगदी मोठमोठे राजकारणी, नट, अधिकारी आणि व्यापारी असू शकतात. पण अनेकदा असे लोक self obsessed असतात आणि त्यांना त्यांची असुरक्षितता झोप लागू देत नाही, शांत राहू देत नाही. सतत त्यांना एका जनरल भीतीने ग्रासलेल असतं. वरकरणी अत्यंत कॉन्फिडंट, मनमिळावू, आनंदी वाटणारे हे लोक आत उगाचच कुठेतरी प्रचंड घाबरलेले असतात. अनेकदा त्यांच्या मनात सतत, असलेलं हरवायची भीती असते आणि त्या भीतीचा त्यांच्यावरील पगडा अचंबित करणारा असतो. आणि त्यामागे असते ती जनरल असुरक्षितता किंवा insecurity! त्यातून मग इतरांबद्दल विनाकारण असुरक्षितता किंवा इर्षा निर्माण होते.
ही माणसं मनाने वाईट असतात का? तर अजिबात नाही. उलट काही वेळा ही माणसं अत्यंत दिलदार, वेळेला मदतीला धावून येणारी, ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी अंगावरचे कपडे काढून देतील इतकी प्रेमळ आणि छान असू शकतात. ती माणसं उत्तम मित्र, भाऊ, बहीण, बायको, नवरा, पुत्र किंवा कन्या किंवा आदर्श भागीदार असू शकतात. पण ज्या क्षणी त्यांच्या मनात ह्यातील कोणत्याही नात्या किंवा व्यक्ती बाबत असुरक्षितता आणि त्यातून दुस्वास निर्माण होतो तेव्हापासून त्यांच्या वागणुकीत बदल होतो. अनेकदा हा बदल त्या ज्या व्यक्तीबद्दल अशी भावना आहे त्या व्यक्तीला दाखवला जात नाही पण तिच्या मागे तिच्याबद्दल वाईट बोलणे, त्या व्यक्तीवर खोटेनाटे आरोप करणे हे सुरू होतं. अनेकदा त्या व्यक्तीला आपल्या कंट्रोल मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातो. बरं ह्यातून त्या व्यक्तीचं नुकसान व्हावं ही भावना असते का? तर अजिबात नाही. हेतू इतकाच असतो की त्या व्यक्तीपेक्षा आपण कसे श्रेष्ठ हे लोकांवर आणि त्या व्यक्तीवर बिंबवणे. खरं तर ह्याची काहीच गरज नसते. पण असुरक्षिततेची भावना त्या व्यक्तींच्या सद्सद्विवेक बुद्धीवर कुरघोडी करते.
अश्या असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेल्या व्यक्ती बहुतांश वेळा “मी अमुक व्यक्तीसाठी काय केलं!” ह्याचे हिशोब जगाला सांगत असतात. पक्ष सोडून गेलेले राजकारणी अनेकदा “मी पक्षासाठी रक्त सांडलं, लाठ्याकाठ्या खाल्ल्या” वगैरे सांगतात ना तसं! ही मुळात आणखी एक विचित्र मानसिकता आहे. परंतु ही मानसिकता काही लोकांत आढळून येते. आणि असुरक्षितता असलेल्या लोकांमध्ये तर प्रकर्षाने जाणवते! खरं तर स्वतःच्या उपकाराची किंवा चांगल्या कृत्याची स्वतः केलेली वाच्यता त्या उपकार किंवा चांगल्या कृतीला हलकी करत असते!
एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या नात्यात, ओळखीत असे असुरक्षिततेने ग्रासलेले लोक असतील तर त्यांना वेळीच ओळखून त्यांच्याशी आपण योग्य प्रकारे वागणे, तसेच त्यांच्या विचित्र वागण्याला समजून घेणे हे आपले काम आहे. ही त्यांची वृत्ती नाही तर मानसिक स्थिती आहे हे समजून घेणे आपले काम नाही तर कर्तव्य आहे. कारण ही आपली माणसं खरच खूप सुस्वभावी, लाघवी आणि प्रेमळ असू शकतात. त्यांच्या वागणुकीत आलेला बदल हा ह्या एका मानसिकतेचा परिणाम असू शकतो. म्हणूनच आपण अशी माणसं आधीच ओळखून, त्यांना समजून घेऊन आपल्या त्यांच्याशी असलेल्या वागण्यात आणि आपल्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षात आपण वेळीच बदल करून आपले त्यांच्या बरोबर असलेले नाते टिकवायचा प्रयत्न केला पाहिजे.
परंतु आपल्याला ते न जमल्यास पुढे जाऊन त्यांच्या टोकाच्या वागण्यातून आपले मन दुखावल्यास त्या व्यक्तीला दोष न देता त्यामागे असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेला समजून घेऊन त्या व्यक्तीबद्दल राग न बाळगता नाते संपवून, शांतपणे लांब होऊन आपण त्या व्यक्तीसाठी नेहमीच चांगलं चिंतल पाहिजे. त्या व्यक्तीसाठी आणि आपण तिला वेळीच ओळखून नातं न टिकऊ शकल्याच्या चुकीची आपल्याला शिक्षा म्हणून काहीतरी त्याग केला पाहिजे. पण त्या नंतर भविष्यात मात्र त्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवून आपल्या नात्याची सुंदर फ्रेम मनात लावून ठेवली पाहिजे. जशी घरातील भिंतीवर एखाद्या दुर्धर आजाराने गेलेल्या प्रेमळ नातेवाईकाच्या हसऱ्या फोटोची लावतो तशी!
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
perfect