सुजाता- २
आधीच्या भागाची लिंक- सुजाता- १
हैवानाला सुद्धा लाजवेल अशा रीतीने सुजाताच्या देहाचा दोन ते तीन दिवस पुरेपूर वापर करून झाल्यावर असह्य वेदनांनी आणि जखमांनी भरलेल्या तिच्या अस्ताव्यस्त देहाला त्या लांडग्यांनी रस्त्याच्या एका बाजूला फेकून दिले होते . शुद्धीत आल्यावर क्षणभर सुजाताला आपण कुठे आहोत हे उमगलेच नाही . पहाटेचे पाच वाजले होते . रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने तिच्या अगदी जवळून जात होती, पण एकही वाहन तिला ह्या अवस्थेमध्ये बघून थांबत नव्हते .
सगळे शरीर जखमांनी भरलेले , ड्रेसचा चोळामोळा झालेला , चेहऱ्याची पार दैना झालेली आणि ह्या दोन दिवसात पुरेसे अन्नही पोटात न गेल्यामुळे ती पूर्ण कोमेजून गेली होती . सुजाताला थोड्यावेळाने परिस्थितीचे भान आल्यावर कशी बशी अडखळत सावरत उभी राहिली आणि हात दाखवून एखादी गाडी थांबते का ह्यासाठी प्रयत्न करू लागली . अखेर एक taxi तिच्या बाजूला येऊन उभी राहिली . त्याला बहुदा ह्या अश्या प्रसंगांची जणू सवय असल्यासारखा त्याने “बाई कुठे जायचे आहे ?” असे तिला विचारले आणि मीटर पाडले . सुजाताने सुद्धा त्याच्याशी अधिक काही न बोलता त्याला आपल्या घरचा पत्ता सांगितला आणि आपले दुखरे शरीर आत झोकून देऊन ती सीट वर आडवी झाली . जवळ जवळ दहा मिनिटांनी “ओ बाई , ओ बाई करत ड्रायव्हरने तिला उठवले , उतरा आपल ठिकाण आल !” . सुजाता दचकून उठली , आपले घर आल्याचे पहिले आणि खाली उतरली “ भाऊ माझ्या कडे पैसे नाहीत हो द्यायला” “राहू द्यात , नको आहेत मला , सांभाळा स्वतःला असे म्हणून तो तिथून निघूनही गेला . ह्या एवढ्या मोठ्या दु:खाच्या प्रसंगात सुद्धा हा एक क्षण खूप धीर देऊन गेला .
सकाळची वेळ असल्यामुळे बिल्डिंग मध्ये अजून जाग आली नव्हती . अंगात त्राण नसूनही सुजाता कशीबशी दोन जिने चढून वर गेली आणि तिने घराची बेल वाजवली . कधी एकदा शेखरच्या मिठीत स्वतःला झोकून देऊन आपल्या अश्रूंना वाट करून देते असे सुजाताला वाटत होते. शेखरने आत्तापर्यंत नक्कीच पोलीस तक्रार नोंदवली असणार . मला खूप ठिकाणी शोधून बिचारा ह्या तीन दिवसांत काळजीने हैराण झाला असेल असे कैक विचार तिच्या मनात येत होते . बराच वेळा झाला सुजाता बेल वाजवत होती पण आतमध्ये तिला कोणत्याही प्रकारची हालचाल जाणवली नाही . शेखर अजून घरीच नसेल का आला ? , कुठे फिरत असेल ? मला शोधण्यासाठी कुठे वणवण करत असेल ? बराच वेळ बेल वाजवून सुद्धा आतून कोणताही प्रतिसाद आला नाही तेव्हा अखेरीस तिने शेखर…. शेखर…. करून हाका मारायला सुरुवात केली . तिला आत थोडी हालचाल जाणवली .
“शेखर , शेखर तू आहेस ना रे आत ?, , प्लीज उघड ना रे दार !” सुजाताला आता रडायला येत होते . दिवस हळू हळू वर यायला लागल्याने बिल्डींग मध्ये ऑफिसला जाणाऱ्यांची , दुधवाल्यांची वर्दळ सुरु झाली होती , जिन्याने येणारे , जाणारे ह्या अशा विचित्र अवस्थेमुळे तिच्याकडे साशंक नजरेने बघत होते . शेवटी आतून आवाज आला “सुजाता प्लीज तू जा इथून , मला काहीच बोलायचे नाहीये तुझ्याशी”,
“ शेखर !!!! काय बोलत आहेस तू , अरे दार तर उघड आधी , इथे मी काय अवस्थेत उभी आहे , माझ्यावर काय प्रसंग उद्भवला होता आणि तू हे काय बोलत आहेस ?? ” तेवढ्यात शेखरने दार उघडून सुजाताच्या हाताला धरून झटकन आत ओढून घेतले आणि दार लावले . शेखरच्या ह्या अश्या वागाण्याने सुजाता चक्रावून गेली होती . आपल्या काळजीने शेखर वेडापिसा झाला असेल असे विचार करणारे तिचे मन शेखरचा हा अवतार आणि बोलणे बघून कोड्यात पडले “हे बघ सुजाता, बाहेर तमाशा नको म्हणून केवळ तुला मी आत घेतले आहे , जो काही प्रकार तुझ्या बाबतीत घडला , जे दोन तिन दिवस तू गायब होतीस , त्या प्रकारामुळे ह्यापुढे आपले नवरा बायकोचे नाते टिकेल असे मला आता वाटत नाहीये !
शेखरचे असे बोलणे ऐकून सुजाता तिथेच धाडकन जमिनीवर कोसळली आणि जोरजोरात रडायला लागली “ अरे मी तुझी लग्नाची बायको आहे रे ! विसरलास का तू ?, आणि मी काय स्वखुशीने का केले हे सगळे , तू होतास ना रे तिथे ?, तू का काही केले नाहीस माझ्यासाठी ? नवरा ना तू माझा ! , तू तर हात झटकून मोकळा होत आहेस !! , सुजाता खूप खूप उद्विग्न होऊन बोलत होती आणि ढसाढसा रडत होती .” हे बघ आता सगळे घडून गेले आहे , कोण कुठली ती मवाली गुंड माणसे , आणि त्यांनी तीन चार दिवस काय काय केले आहे तुझ्या बरोबर देव जाणे?” बाटली गेली आहेस तू आता , अपवित्र झाली आहेस !! , आणि आता तुझ्याबरोबर संसार करणे मला तरी शक्य नाही” .”आणि मी काही पोलीस कम्प्लेंट वैगरे केलेली नाहीये , उगाचच बदनामी , पेपरला बातमी आपली नावे सगळीकडे बदनाम होणार , ह्यात माझे किती नुकसान होईल हा सगळा विचार करून मी हा निर्णय घेतला आहे , आणि माझ्या दृष्टीने मी बरोबर आहे , तेव्हा तू आता इथून निघून जावेस असे मला वाटते”.“ सुजाताला हा मोठा धक्काच होता “ शेखर …म्हणजे वर्षभर आपण जो सुखाचा संसार केला , एकमेकांचा जो विश्वास संपादन केला , जे एक नाते निर्माण होऊन एकमेकांवर प्रेम केले , हे त्या एका वाईट घटनेमुळे नाहीसे , नष्ट झाले का रे ?” “सुजाता प्लीज , वाद नको , हे तुझे सर्व सामान आहे , ते घे आणि बाहेर हो इथून , मला माफ कर ह्यापुढे आपले नवरा बायको हे नाते संपले” . “कुठे जाणार मी ? , तूच सांग , सहा महिन्यांपूर्वीच आई बाबा ही गेले माझे , ना मला बहिण ना भाऊ ,आणि जिथे लग्नाचा हक्काचा नवरा मला घरातून हाकलून देत आहे तिथे कोणता नातेवाईक मला आता ह्या अवस्थेत जवळ करेल ?” “ हे बघ ते तुझे काय ते तू बघ , पण आता तुझी घाण मला ह्या घरात नको आहे”
सुजाता एकदम ताडकन उठली , डोळे पुसले ,आपले सामान घेतले आणि मागे वळूनही न बघता तडक तिथून बाहेर पडली . खाली उतरून वाट फुटेल , रस्ता नेईल तिथे ती जात होती . तीन चार दिवस झालेला शारीरिक , मानसिक त्रास , अपुरी झोप , अपुरे जेवण त्यात दुपारहि झाली होती , मे महिना असल्यामुळे बाहेर कडक ऊन पडले होते , आणि त्याच थकलेल्या अवस्थेत सुजाताला चक्कर आली आणि ती धडकन रस्त्यावर कोसळली .
क्रमश:
पुढील भागाची लिंक- सुजाता- ३
Image by Efes Kitap from Pixabay
- शर्वरी…(कथा संग्रह) - September 12, 2022
- निसरडी वाट- 1 - September 17, 2021
- फिरुनी नवी जन्मेन मी ….२ - July 27, 2021
Pingback: सुजाता- ३ – LekhakOnline – Excellent Marathi Articles