सुजाता- शेवटचा भाग

“”ताई तुम्ही का तयार झालात , का ऐकलेत ह्या लांडग्यांचे ?, अहो तुम्हाला माहित नाही किती त्रास असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये !” मी हवे तर तुम्हाला मदत करते  इथून बाहेर पडण्यास ,पण प्लीज तुम्ही सटका इथून !” मला इतक्या वर्षात जमले नाही , आणि आता सवयही  झाली सगळ्याची , पण तुम्ही इतक्या शिकलेल्या , सुंदर ,कृपया बाहेर पडा इथून” . रेखा सुजाताला एकीकडे तयार करत होती आणि एकीकडे समजावून सांगत होती.  “रेखा कंटाळले ग मी ह्या सगळ्या अत्याचाराला !! , विचार करून डोक फुटायची वेळ आली , जाच्याबरोबर जन्मोजन्मीच्या गाठी बांधल्या गेल्या , त्या नवऱ्याने हाकलून दिले , नंतर इथे ह्या नरकात आले .

कुठवर मी तग धरणार तूच सांग ? , शेवटी जे पुढ्यात येईल ते सर्व सहन करायचे असे ठरवले आहे मी आता  .” जाऊदे ग , तू हि विचार करू नकोस . असे म्हणून डोळ्यात आलेले अखेरचे दोन अश्रू  पुसून ती बाहेर आली आणि कोचावर लाली बाईच्या बाजूला जाऊन बसली .

सुजाताला हे सर्व आत्ता आत्ताच घडले आहे असे वाटत होते. शेखरचे नाव जरी आठवले तरी तिच्या डोळ्यात अंगार पेटत होते . किती विश्वास , किती प्रेम , किती समर्पण करून आपण पूर्ण झोकून दिले होते स्वतःला संसारात . पण एक वाईट घडले आणि सर्व सर्व विरून गेले , नाहीसे झाले. आपल्या हातात काहीच उरले नाही , ना संसार ना सुखी जीवन . जे काही झाले त्यात आपली काय चूक होती ?, उलटपक्षी नवरा म्हणून तोच ‘षंढ’ ठरला आपले रक्षण करण्याच्या बाबतीत . पण तो मात्र नामानिराळा राहिला , मला अगदी अलगद स्वतः च्या जीवनातून बाजूला सारले , कोणतेही दु:ख, कोणत्याही प्रकारची काळजी दिसली नाही त्या दिवशी त्याच्या डोळ्यात . जस जसे शेखरचे विचार मनात येत होते तस तसे तिच्या हाताच्या मुठी वळल्या जात होत्या , ह्याक्षणी तिच्या डोळ्यात एक प्रकारची सुडाची भावना जाणवत होती .

“आज लाली बाईने त्या दोन गुंडांना सुट्टी दिली होती . आज सुजाता स्वतःहून तयार झाली असल्यामुळे त्यांची आज काही गरज पडणार नाही असे तिला वाटत होते  . “काय ग घाबरली  आहेस कि काय ?” अज्जिबात घाबरू नकोस  , मस्त मज्जा कर” आणि पैसे कमव , आता एकदा हे सुंदर शरीर बाटलेले आहेच तर ह्यापुढे लाज न बाळगता , त्याचा उपयोग करून घे”” लाली बाईचे हे बोलणे तीरासारखे तिच्या काळजाला चिरून जात होते . किती निर्लज्ज बाई  आहे ही . स्वतः एक स्त्री असून , दुसऱ्या स्त्रीच्या अब्रूचे  एवढे धिंडवडे काढताना हिला लाज कशी नाही वाटत ? अर्थात ती अब्रू वैगरे च्या खूप पुढे गेली आहे म्हणून इथे शरीराचा व्यापार मांडून बसली आहे . “आणि हे रडण बिडण सोडून दे एक फक्कड स्माईल दे  !, गिऱ्हाईक एकदम खुश व्हायला पाहिजे,  आता हा पदर,  एवढा मोठा काढून काय सभेला चालली आहेस का , असा वर घे” , असे म्हणून संपूर्ण शरीर दिसेल अश्या पद्धतीने लाली बाईने तिचा पदर वर केला . आता मात्र सुजाता चवताळली , तिला ह्या सगळ्या प्रकारची आता किळस वाटायला लागली होती . “बाई बस झाले आता !,  ह्यापुढे माझ्या अब्रू बाबत एक चकार शब्द बोलाल तर याद राखा” मी कलंकित , बेअब्रू झाली असले तरीही अजून तुमच्यासारखा शरीराचा व्यापार मांडून बसणार नाहीये  , नवऱ्याने  सोडली  म्हणजे जीवनातून उठले असे जर वाटत असेल तर ते चूक आहे”. लाली बाई अनपेक्षितपणे झालेल्या सुजाताच्या ह्या अवेगामुळे एकदम दचकली. ह्या क्षणी तिला सुजाताचा अवतार रणचंडिकेसमान भासत होता . अचानक सुजाताने आपल्या कमरेत खोचलेला धारदार सुरा बाहेर काढला आणि लाली बाईला काय होत आहे हे कळायच्या आतच जोरात तिच्या पोटात खूपसाला. “अरे वाचवा , मेले मेले , असे बोले बोले पर्यंत , लाली बाई ह्या जगातून हद्दपार झाली होती .

रेखा आतून धावत आली , “ताई लई झ्याक काम केलेस , मी इतकी वर्ष ह्या संधीची वाट बघत होते , पण आज तुझ्या डोळ्यातील सुडाची भावना मला दिसली आणि म्हंटले हे काम तुझ्याच हातून होणार आणि तू केलेस “ “रेखा , पण आपल्याला लग्गेच इथून बाहेर पडायला हवे , ते दोघे कधीही येऊ शकतील इथे” दोघी ताबडतोब तिथून बाहेर पडल्या .

“ ताई आता कुठ जायच ?” “एक काम अजून बाकी आहे रेखा,  ते निपटून घेते आणि मग आपण दोघीही हे शहर सोडून दूर कुठेतरी निघून जाऊ” असे म्हणून खाली आल्यावर एका taxi  मध्ये बसल्यावर ड्रायव्हरला  आपल्या घराचा पत्ता सांगून त्या दोघी तिथून निघाल्या  . बिल्डिंग जवळ आल्यावर सुजाता साडी निट करत खाली उतरली आणि तोच धारदार चाकू आपल्या कमरेत नीट खोचलालेला आहे की नाही ते पहिले  . “रेखा तू इथेच थांब , अजिबात इथून हलू नकोस , मी आलेच दहा मिनिटात “ असे म्हणून ती ताडताड चालायला लागली .

रात्रीचे जवळ जवळ अकरा वाजले होते . शेखर नुकताच झोपलेला होता . दारावरची बेल ऐकून तो दचकून उठला आणि बाहेर येऊन दार उघडले . अचानक सुजाताला समोर बघून राग , आश्चर्य असे संमिश्र भाव त्याच्या चेहरयावर बघून सुजाता हसत म्हणाली “ घाबरू नकोस , परत तुझ्याकडे कसलीही भिक मागायला आलेली नाहीये . तुझ्या सारख्या नामर्द माणसाकडे भिक मागण्यापेक्षा मी जीव देण पत्करेन !”. ती तडक आतच घुसली . दरवाजा बंद केला . “मजेत आनंदात दिसत आहेस , झोप वैगरे पण लागत असेल नाही छान , खरच मी तुला समजूच  शकले नाही रे , आयुष्याचे एक वर्ष तुझ्या बरोबर वायाच गेले समजायचे , काय तर म्हणे मी कलंकित , मी बाटलेली !!, अरे तुमच्यासारखे पुरुष जेव्हा पूर्ण वस्त्रातील बाईला सुद्धा आरपार डोळे फाडून बघत असतात ना , तेव्हा होतो तो बलात्कार !!, ट्रेन , बस किवा इतर गर्दीच्या ठिकाणी वासनेने बरबटलेले तुम्ही एखाद्या बाईच्या पुसट स्पर्शासाठी हपापलेले असता ना , त्या हपापलेपणाला  म्हणतात बलात्कार !!, अरे तुम्ही काय समजणार एखाद्या स्त्रीच्या समर्पणाला , प्रेमाला , तुमची लायकीच नाहीये रे ! आणि तू तर बोलूच नकोस , त्या घटनेने मी एवढी कलंकित झाले नाही जेवढी तुझ्या अविश्वासाने , तुझ्या नाकारण्याने पूर्णपणे तुटून गेले” . “तुला काय वाटल,  मी एका कोपऱ्यात  जाऊन मुळू मुळू रडत बसेन , अरे हट् !!!” आत्ताच एका ‘वाईटाचा’ अंत करून आले आहे , आणि अजून एका वाईटाचा अंत करायला इथे आले आहे ,तेव्हा तयार राहा आणि…… शेखरला ती काय बोलत आहे , करत आहे हे आकलन व्हायच्या आत कमरेतील धारधार चाकू काढून तिने शेखरच्या पोटात खुपसला .

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेखरला पाहून तिचे मन , चेहरा सगळे काही शांत झाले . ती तिथून निघाली ,  खाली उतरून ““पोलीस स्टेशन”” असे ड्रायव्हरला सांगताच रेखा दचकलीच  “ताई अग आपण इथून खूप  दूर जाणार होतो ना ?” “रेखा मी तुला अज्जिबात ह्यात गोवत नाहीये , तू तुला हवे तर कुठेही जाऊ शकतेस , पण आता मी माझ्या जीवनातील दोन चुकांचा माझ्या स्वतःच्या हाताने अंत केल्यामुळे माझ्या मनाला खूप शांती मिळाली आहे , मी केलेल्या चुकांचे  प्रायश्चित  तर मला घ्यायलाच हवे , मी समाजाचे जे काही नियम आहेत , ते मुळीच तोडणार नाही , जी काही शिक्षा मला कायदा सुनावेल ती मी भोगायला तयार आहे “ “ ताई मी पण तुझ्या बरोबर येणार , तुला आता मी एकटीला नाही सोडणार अशी” असे म्हणून त्या दोघी पोलीस स्टेशन पाशी उतरल्या

कोर्टाने सर्व काही पुरावे बघून , सुजाताची बाजू  पूर्णपणे निट ऐकून घेतली आणि तिला वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा  , आणि रेखाला महिला सुधारगृहात पाठवले .

आज “’सुजाता गारमेंट्स’” चे ओपेनिंग होते . सुजाताला जेलमध्ये चांगल्या वागणुकीमुळे सजेतून पाच वर्षांची सूट मिळाली होती . सरकारने तिला जेल मध्ये केलेल्या कामाचा मोबदलाही दिला होता . सुजाता आणि रेखाने मिळून एक छोटीशी जागा भाड्याने घेऊन हे दुकान उघडले होते . आता पुढील आयुष्य त्या एकमेकिंसोबत कोणत्याही पुरुषाचा आधार न घेता आनंदाने व्यतीत करणार होत्या .

समाप्त ………..

Image by Efes Kitap from Pixabay

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!