राधा

दुपार टळली होती, ….. टीव्ही बंद करून ती सोफ्यातून उठली. रात्रीच्या भाजीसाठी गवार निवडू लागली…..
छान लुसलुशीत, ताजी गवार, तिच्या सासरच्या शेतातली…… पाच एकर ऊस, एकर भर भाजीपाला, दोन एकरात गहू नाहीतर ज्वारी, ….. सासरचा मोठा बारदाना. तिच्या बावधनच्या फ्लॅटवर दर आठवड्याला भाजी पोहोच व्हायची.
इथे …… बावधनमध्ये, ऐसपैस फ्लॅट, अन तशीच नवऱ्याची ऐसपैस पगाराची नोकरी. समाधानाच्या लाटा,…… घर शांत असलं की , मन अगदी भिजवून टाकतात.
तिनं आता चहा टाकला, …… उठतीलच मंडळी इतक्यात. तिच्या चहातल्या वेलची अन आल्याच्या वासानं अख्ख घर वामकुक्षीतुन जागं झालं. सासूबाईंनी खाकरून आवाज दिला….. पहिला चहा तिकडे गेला.
“देव तुझं कल्याण करील पोरी…” प्रत्येक आवडलेल्या कृतीला भरभरून आशीर्वाद देणारी सासू, म्हणजे तिच्या वैभव कथेतलं महत्वाचं पान होतं.
“शिकलेली हायेस ….. पायजे ती नोकरी कर…” असं ठासून सांगणारी सासू असूनही तिनं मुलांसाठी घरी राहणं स्वतःहून निवडलं होतं. मुलंही शाळेत चमकत होती,….. मोठ्यानं सातवीत येईपर्यंतच मेडल्सचा ढीग लावला होता. तिनं सहज विचार केला, …..
आज तिला शिकवणारे अमनापुरे गुरुजी असते तर, ….. म्हणाले असते,
“देशाला तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांवर अभिमान आहे…. देशाला तुझी गरज आहे.”
ते शाळा लेव्हलचं काही बोलायचेच नाहीत, ….. सरळ देशच. मनातल्या मनात खुदकन हसली.
“काय झालं हसायला, आज खुश दिसतेय बेगम…..” तो लाडीकपणे म्हणाला.
“काही नाही, तुमच्या दुपारच्या घोरण्याला हसत होते.”
तो ही खळखळून हसला, अन अलगद तिचा हात हातात घेऊन स्वतःची फर्माईश ठेवली,
“आज जेवणात कुरकुरीत कांदाभजी कर ना….”
” हं ….” म्हणत ती किचनच्या तयारीला लागली. किचनची खिडकी उघडली अन गवारीची भाजी टाकली……….. कांदा चिरायला घेतला, ….. लहानपणीच्या आठवणी कधी भजाच्या पीठात मिसळून गेल्या, तिचं तिलाच समजलं नाही.

तेल तापायला ठेवलं, ……..अन पुन्हा शून्यात ……
चर्र चर्रर्र चर्र …….. असा आवाज करत, अचानक तेल उडालं अन तिची तंद्री भंगली. कुठून तरी तेलात पाणी उडालं होतं….. आणि आता तिच्या चेहऱ्यावरही उडत होतं. समोरच्या खिडकीतून आडवातिडवा  पाऊस घुसखोरी करू पहात होता…….. ही कसली वेळ पावसाची, भर उन्हाळ्यात …… तिचा मुडच गेला, ……. तिनं खिडकी बंद केली, ……. गॅस बंद केला.
संध्याकाळ गाठून आलेला, वावटळीचा पाऊस, त्याचा आगाऊपणा तिला अजिबात आवडला नाही, ती टेरेसच्या दारात आली,……. वरच्या छताला न जुमानता अर्धी अधिक टेरेस ओली झाली होती……. नकळत उदास वाटू लागलं, तिनं नवऱ्याकडं पाहिलं, …… साहेब बातम्यांमध्ये गुंग होते.
आता तिनं देवासमोर दिवा लावला. … हात जोडले, पुन्हा कामाला लागली……..
पुन्हा किचनमधून कांदा भजी दरवळली….. गरमागरम जेवण, घरातल्या सर्वांना समाधान देऊन गेलं……. घरानं तृप्तीचा ढेकर दिला, अन तिनं भांडी विसळून, पदराला हात पुसला ……
आता घर शांत झोपलं, …… सोसायटीही शांत झाली, ……. अन हळूहळू रस्तेदेखील ………
तिचं मन मात्र अजून शांत नव्हतंच, …… तसं नवऱ्याचं घोरणं तिला रोजचंच होतं …… तिनं कूस बदलून पाहिली, खिडकीतून चंद्राचं डोकावणं तिला रुचलं नाही, उठून पडदे घट्ट लावून घेतले, लहान मुलीसारखे डोळेही घट्ट मिटून पाहिले, पण ……. व्यर्थ.
ती उठली, पुन्हा टेरेस मध्ये आली, …… थोडी अलीकडेच खुर्ची टाकून बसली, ……. चंद्राला न दिसेल अशी.
चंद्राची भीती ?, …… असं कधी होत नाही, नेहमीचा गप्पीष्ट मित्र तो ……. मग आज काय झालं होतं.
कुठूनतरी भजनी मंडळींचे सूर ऐकू येत होते, …….. बहुतेक बावधन गावठाणातल्या विठ्ठल मंदिरातून…….

पेटी अन तबल्याच्या साथीत सूर कानात घुमु लागले,

“मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिकागौळणी । जवळीं जाऊनियां धरिली तिची वेणी ।।

सोडीं सोडीं कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातिलें पाणी ।
नांव रूप माझे बुडविलें जनीं । राधा म्हणे येथुनियां बहु चाट होसी ।
“राजेहो , ………. गोकुळीच्या गौळणी दूध विकण्यासाठी मथुरेला जाण्यासाठी निघाल्या………….. गवळणी निघाल्या महाराज …… निघाल्या, …… “
निरूपण रंगाला आलेलं,
“अन कान्हाने राधिकेला पाहिले……….. जवळ जाऊन तिची वेणी धरली. ………. त्याला नव्हती भीती कुणाचीच, ……. शुद्ध , सरळ , साधं, जनमानसाला न लाजणारं, प्रेम होतं माऊली ……..
राधा रागावली, रुसली, …….. तिनं सरळ धमकीच दिली कान्ह्याला,

घरीं चोरीबकरूनिया वाट आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ।।……..

धरिलीं पदरीं राधा न सोडीच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी ।

भोवतालीं हांसती व्रज सुंदरीं ।।…….

धमकीच दिली, …. राधेने, ….. घरांत चोरी करून वाट आडवणाऱ्या, …….  भर रस्त्यात, चार माणसात, हृदय चोरणाऱ्या शारंगपाणीला यशोदे कडेच घेऊन जाते ……..
तर हा कान्हा निलाजरा, ……… साडीचा पदर पकडून आपले गोरसाचे दान मागू लागला. …….. बाकीच्या गौळणीही हसू लागल्या………………
निरूपण ऐकण्यात ती अगदी गुंगून गेली होती…..
खरंय, असाच होता कान्हा, बेधडक प्रेम व्यक्त करणारा, राधेवर लाजून चुर व्हायची वेळ आली की गालातल्या गालात गोड हसणारा, ………. कुणी त्याला रागावायचं नाही, त्याच्यावर रुसणं तर शक्यच नव्हतं. ……….. सर्वांचा लाडका, अगदी अमनापुरे गुरुजींपासून ते थेट शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाडका,…… बारावी झाली अन थेट परदेशी पाठवलं त्याला…….. रशियाची कसलीशी स्कॉलरशिप मिळाली होती त्यावेळी……… मागच्या वेळच्या माहेर भेटीत शेजारची सुशी सांगत होती, …….. लंडनमध्ये असतो हल्ली……
त्या रात्रीच्या निरोपाच्या भेटीनंतर मात्र, स्वतः होऊन कधीच त्याची चौकशी केली नाही, त्यानंही तिची …….. …………………………………………………………………………
माऊली, ……..माऊली ……. हे प्रेम वेगळंच होतं, एकदा उद्धव … श्रीकृष्णाचा जवळचा मित्र,…. गेला होता गोकुळात, राधेला भेटायला, ना श्रीकृष्णाने त्याच्याजवळ काही निरोप दिला ना राधेने माघारी निरोप दिला, थेट या अंतरीचे त्या अंतरी, ……
महाराज असं होतं प्रेम, अन असा होता कान्हा, ……….
अशा या नटखट कान्ह्याची बासरी ऐकायला आतुर, सारं गोकुळ, ……. साऱ्या गायी, ……. सर्व गवळणी, ……. अन राधा, ती तर तहानभूक विसरून जायची ते सूर कानी पडले की, …. त्या सुरांवरच जगायची जणू ती……..
माऊली, ….. असा हा श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेला तेव्हा, यमुना तीरावर भेटला राधेला, …….. स्वतःची बासरी, ……. आत्म्याचे सूर, राधिकेच्या हाती सोपवून गेला, …… अन म्हणाला,
“राधे, जेव्हा कधी हे सूर तू आळवशील, मी तिथेच तुझ्या सोबत असेन ……”
…………………………………………………………………….
ती आता किंचित स्वतःशीच हसली, ……… त्या रात्रीही, महादेवाच्या मंदिराशी, तो वाट पहात उभा होता, …….. दुसऱ्या दिवशीची फ्लाईट होती त्याची, रात्रीच निघायचं होतं,  तिन्हीसांज उलटून गेली होती.
ती आली, …….. डोळ्यात खूप सारे प्रश्न घेऊन, ……. सारे प्रश्न एका क्षणात विरघळले, अन डोळ्यातून वाहू लागले……. समोर त्याचं नेहमीचं, जग जिंकणारं गोड हास्य …… तेही अश्रुत भिजून गेलेलं ……….. दोघांचे अश्रू लपवायला जणू, अनाहूत पाऊसही आला, ……… हातात हात ……… डोळ्यात डोळे, एकमेकांना जणू सांगत राहिले,
“नाही होणार भेट जरी, …………

आठवणींचा पूर येईल तरी,

असाच अनाहूत पाऊस कधीतरी, …..

हृदयातून उतरेल हृदयांतरी.”
……………………………………………………………………
ती आता प्रसन्न हसली, …… उठून खुर्ची पुढे ठेवली ……

अन पुन्हा गवळण ऐकत बसली, …….

अगदी चंद्राला दिसेल अशी, ……

त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती आता तिच्याकडे…… त्याच्याकडे पहात तिने डोळे मिचकावले, अन स्वतःशीच हसत पुटपुटली,

“तिकडे लंडनमध्ये डोकावून तर पहा, फक्त पाऊस पडतोय की थेट बर्फवृष्टी……”

आणि इकडे भजनी मंडळींचा सूर टिपेला पोचला, …….

“भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली । एका जनार्दनी राधा शेजें पहुडली ।।”
©बीआरपवार

Image by Enrique Meseguer from Pixabay

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

7 thoughts on “राधा

  • January 11, 2021 at 3:33 pm
    Permalink

    sunder katha

    Reply
  • January 12, 2021 at 2:35 am
    Permalink

    सुरेख लिहीता ….

    Reply
  • January 13, 2021 at 9:59 am
    Permalink

    मस्त 👌

    Reply
    • January 13, 2021 at 6:56 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!