हळहळ दीडशेची
“डबलबेडशीट घ्या , सिंगल बेडशीट घ्या, सोबत पिलो फ्री” असं ओरडत एक राजस्थानी दिसणारी , पण मराठीत ओरडणारी बाई सकाळ सकाळ किचनच्या खिडकीतून मला दिसली. फार लांब नाही आणि फार जवळ नाही अश्या अंतरावर असलेल्या त्या बाईच्या डोक्यावर बऱ्याच रंगाच्या बेडशीट दिसत होत्या. लॉकडाऊनच्या काळात माझं शॉपिंग फारच कमी झालं होतं. मला शॉपिंग साठी ठराविकच वस्तू हवी असं काही नसायचे. अगदी पिनांचे पाकीट जरी आणले तरी मी त्या दिवशी खुश असायचे. आणि ह्यावेळी चक्क सहा महिने मी काहीच नवीन आनंद देईल अशी खरेदी केलीच नव्हती. म्हणजे तसं घरातील समान , भाजी , दुध हे ठीक आहे , पण त्यात आनंद कुठे मिळतो नाही का ?
तशी घरातली सकाळची सगळी कामे आटोपलेली होती , वेळही होता जवळ . मार्च मध्ये नोकरी सोडल्यावर घरात वेळ जाईल का आपला ? आणि करणार काय दिवसभर ? pc आहे ना घरात , घरातूनच करत जा काहीतरी ! अश्या अनेक सूचना बाजूला ठेऊन मी घर सांभाळणे हे इतकंच आवडीने आणि मन लावून करत होते.
तर त्या बाईला वर बोलावून जरा काहीतरी बघितल्याचा आनंद , आणि सहज एखादी आवडली तर घेऊन टाकू बेडशीट असा विचार करून तिला “ए मावशी” म्हणून जोरात हाक मारली. आपलं एक बरं असतं म्हणजे काहीही विकणाऱ्या बाईला आपण मावशीच आणि विकणाऱ्याला आपण मामा म्हणूनच हाक मारतो नाही का ?
पण तेवढ्यात तिला बाजूच्या बिल्डींग मधील साने वहिनींनी बोलावले . चला म्हणजे आता तासाची निश्चिंती म्हणून मी उरलेली कामे आवरून घेऊ म्हणून कपड्यांची मशीन लावायला गेले. सारखे कान मात्र तिच्या आवाजाकडेच होते ,आणि मधून मधून खिडकीत जाऊन मागोवाही घेतच होते तसा , हो नाहीतर दुसऱ्या रस्त्याने निघून जायची !
आमच्या अहोंना मात्र ह्या दारावरच्या गोष्टी मुळीच आवडत नाहीत खरेदी करायला. तो नेहमी म्हणतो की “किंमत कमी सांगितली की तुम्ही बायका हुरळून जाता आणि खराब , डीफेक्टवाला माल ते बरोबर तुमच्या गळ्यात मारतात” तसं मी नेहमी असं काही घेतच नव्हते पण आज मात्र मस्त मूड होता. आणि मग हळूहळू बेडशीट कुठल्या रंगाची घेऊया ? निळा? का लाल ? ह्या दिवाळीत आपल्या hall मधल्या सेटीवर घालायला एखादी डार्क मिळाली तरी चालेल म्हणून मनातच शॉपिंगची स्वप्ने बघू लागले , हो सहा महिन्यानंतर आनंद देणारे शॉपिंग होते हे.
आणि पाउण एक तासाने तिचा एकदाचा आवाज आला कानावर . तिच्याही बहुदा लक्षात असावे कारण मला बघताच ती “ आले आले” असं दुरूनच हात करून मला बोलली. मशीन लावून , कपडे वगैरे वाळत घालून झाले होते. नवऱ्याची सुद्धा इतकी वाट नसेल बघितली ऑफिस वरून यायच्यावेळी तेवढी त्या बाईची मी बघू लागले.
“ताई” करून शेवटी तिचा आवाज जिन्यावरून आला. मी तिला “वर ये गं…. दुसरा मजला” असं ओरडून दरवाज्यातूनच सांगितलं. “हाश हुष” करत तिने आमच्या दिवाणखान्यातच आपलं फतकल मारलं. “आधी तांब्याभर पाणी द्या ताई , जाम मचमच झाली त्या बाई सोबत , डोकच फिरलंय” तोंडावरचा मास्क काढून ती बोलायला लागली.
आता बेडशीट बघण्याहूनही मचमच काय झाली साने बाईसोबत ह्यात मला जास्त रस वाटू लागला.
“का गं, घेतलंच नाही का काही इतका वेळ मोडून?” हे असं मी बोलले आणि वाटलं आपणही काही घेतलं नाही तर हि अशीच कावणार
“कसंल काय ताई , एकतर काही आवडत नव्हतं, त्यात एक आवडली तर त्यावरच हुज्जत घालत बसलेली , मी लॉस मध्ये जाऊन तिला एक देणार होते बेडशीट तर नकोच म्हणली. निघाले मग तिकडून रागवून”
सानेबाई तशी हुशार , म्हणजे कधीही न फसणारी अशी होती , नक्कीच ह्या बाईच्या मालातच काहीतरी falt असणार असेच मनात आले,पण आता बोलावून बसले होते , आणि तिच्या बोचक्यातून डोकावणाऱ्या रंगीबेरंगी चादरी मला खुणावू लागल्या. मी तो विषय बाजूला ठेऊन तिला म्हणलं “ चल दाखव तुझ्याकडे काय काय आहे”
तिने एक एक बोचकं उघडायला सुरवात केली. निळ्या ,लाल , केशरी , पिवळ्या सगळ्याच डार्क कलरच्या त्या बेडशीट बघून मला एकतरी पसंत पडेल का ? असा विचार मनात आला, कारण मला सगळ्या पांढऱ्या आणि नाजूक फुलांच्या बेडशीटच आवडतात, हे खरंतर माहित होतं मलाच आणि तरीही मी हिला का बोलावलं? कळलंच नाही , कारण लांबूनच मला रंग दिसले होते तिच्या बोचक्यातले.
ती मात्र एकएक उघडून “हि बघा…. हिचा कलर किती मस्त आहे … हि बघा एका सीरिअल मध्ये हिरो हिरोईनच्या बेडवर होती तशी आहे” . मला उगाचच मी satin चा गाऊन घालून आणि आमचे हे नाईट ड्रेस घालून तिने दाखवलेल्या बेडशीटवर रोमान्स करताना दिसलो . मुळात हे सीरिअल वाले भडक रंग का वापरतात भिंतीना , फर्निचरला कळतच नाही.
असो , तर अचानक माझे त्यातल्या त्यात बऱ्या दिसणाऱ्या पण तरीही एका डार्क निळ्या बेडशीटवर गेले . त्यावर बारीक बारीक अशी गुलाबी रंगाची फुलं आणि त्या बेडशीटचा लुक अगदी satin टाईप वाटत होता
“ती दाखव , ती” असं म्हणून मी तिला ती बेडशीट दाखवायला सांगितली
“ती नको , ह्या इतक्या आहेत की समोर , ह्यातली बघा ना”असं म्हणून ती बेडशीट ती तिच्या मागे दडवायला लागली.
“अगं दाखव तरी , मला तिच आवडली आहे आणि , नाही काय म्हणतेस?”
शेवटी तोंड कसंनुसं करत तिने ती बेडशीट माझ्या हातात दिली. खूपच सुंदर होती ती आणि मला ही एकच खूप आवडली होती.
“चल आता उघडून दाखव बघू” माझ्यातली दक्ष गृहिणी जागी झाली म्हणूया किंवा अहोंचा चेहरा समोर आला म्हणा.
“ताई कशाला उघडून वगैरे , दुसरी घ्या ना कोणतीही , हीच कशाला हवी आहे”?
“ मला कळत नाहीये , तू नाही का म्हणते आहेस?” असं म्हणत म्हणत मीच ती उघडून बघता बघता एक बारीक , म्हणजे न कळण्या इतपत भोक मला त्या चादरीला दिसलं. “अरे देवा अगं ह्याला भोक आहे की गं, अच्छा म्हणून तू दाखवत नव्हतीस काय ?”
“तुम्ही ती ठेवा बाजूला आणि दुसऱ्या बघा की हो ताई”
मी ती बाजूला ठेवली आणि दुसऱ्या बघू लागले , पण छे…. तिच्या समोर मला दुसरी कुठलीच पसंत पडत नव्हती , मुळात सगळे भडक रंग , त्यात डिझाईन बटबटीत आणि ती बाजूला ठेवलेली चादर नाजूक फुलांची , उठावदार रंगाची अशी सारखी माझ्या नजरेत येत होती.
“ए पण मला नाहीच आवडत आहे कोणतीच , हि एकच सुंदर आहे , आणि नेमकं हिला भोक”
“अहो ते इतकंसं भोक आहे ताई , कोणाला कळणार पण नाही , हवी आहे का तुम्हाला हीच ? चला कमी करते किंमत ….असं करा चारशे द्या हिचे”
“ वाह गं भोक पडलेल्या चादरीचे चारशे?”
“अहो ह्या अश्याच वेगवेगळ्या रंगातल्या मी सहाशे , साडे पाचशे अश्या विकल्या , ह्याला अगदी मामुली भोक आहे , तुम्हाला म्हणून चारशे”
हे अगदी प्रत्येक विक्रेत्याचे टेकनिक असते बरं का की “तुमच्यासाठी म्हणून” असं बोलून ग्राहकाला उगाच “आपण म्हणजे कोण” ! असं फील द्यायचं
“अजिबात नाही , मी तीनेशेच्या वर एकही पैसा देणार नाही , एकतर भोक आहे ह्याला आणि जात पण नाहीये ना हि चादर कुठे , देऊन टाक की”
आल्यावर नवरा ओरडणार हे पक्कं ठाऊक होतं, की कळून सुद्धा तू चुकीचा माल कसा घेतलास ,? पण ते भोक खरंच फार लहान होतं, आणि मला तिच चादर हवी होती. त्यामुळे मला काही करून घ्यायचीच होती.
नाही , हो करता करता मला ती चादर तीनशेला तिने दिली आणि मी लढाई जिंकल्याचा भास झाला.
सगळा बाड बिस्तारा आवरून ती गेली आणि ती चादर मी सारखी सारखी निरखून बघू लागले, आणि ‘भोक काही इतकं मोठं नाहीच मुळी , म्हणजे मला हि स्वस्तातच मिळाली’ असं स्व:ताच्या मनाशी म्हणत बाकीच्या कामाला लागले.
संध्याकाळी अहोंनी कटकट केलीच “की तुला फसवलं तिने , अशी भोक असलेली चादर मुद्दाम कोणी घेतं का ? गळ्यातच मारली चादर तिने तुझ्या” वगैरे. पण मी दुर्लक्ष केलं आणि दिवाळीच्या दिवशी हि चादर hall मधल्या सेटीवर घातल्यानंतर सुंदर दिसणारा माझा hall मी नजरेसमोर आणू लागले.
दुसऱ्या दिवशी मी भाजी आणयला बाहेर पडले आणि साने बाईच समोर. “काय गं घेतलं का काही त्या भवानीकडून ?”
“ तुम्ही काहीच घेतलं नाही म्हणून तुमच्या नावाने खडे फोडत होती” मला कोण आनंद झाला तिला हे सांगताना , फक्त हे चेहऱ्यावर अजिबात दर्शवले नाही उलट मला आवडलं नाही असेच दाखवले.
“ मेली खडे फोडते आहे , भोकवाली चादर एकतर गळ्यात मारत होती , नशीब मुलीचे लक्ष गेले म्हणून , आणि म्हणे माझी बोहनी आहे , कमी करून देते हिचे पण घ्या तुम्हीं , अगं दीडशेला द्यायला तयार झालेली , पण तेवढ्यात हे आले बाजारातून आणि नाही घ्यायची भोकवाली चादर म्हणून शेवटी नाहीच घेतली , तर काय कटकट करायला लागली सांगू”
मला पुढचे शब्द ऐकूच आले नाहीत , आणि मी दीडशे रुपायला कशी फसले म्हणून हळहळत स्व:ताला दोष देऊ लागले. कधीकधी पैसे नसतात महत्वाचे पण आपण गंडलो , फसलो , बावळट ठरलो म्हणून जास्त वाईट वाटते . आता देवाजवळ एकच प्रार्थना करत होते की सानेबाई कधी ह्यांना भेटल्या तर हा विषय नको काढायला.
मानसी चापेकर
- शर्वरी…(कथा संग्रह) - September 12, 2022
- निसरडी वाट- 1 - September 17, 2021
- फिरुनी नवी जन्मेन मी ….२ - July 27, 2021
Chhan
🤣🤣 bharich…
खरंच हळहळत मन…..
hahaha, masta ch…
अशा व्यवहारात ही खरी गम्मत असते कि आपल्याला कोणी बनवले