ओढ वेल्हाळ-भाग1
श्यामली पळतच सुटली होती कारण 9:35 ची गाठायची होती . पास होता तिच्याजवळ , त्यामुळे तिकिटाची चिंता नव्ह्ती . ती प्लॅटफॉर्म वर आली आणि ट्रेन निघाली . ती धावत होती ….जो मिळेल तो डबा चालणार होता . इतक्यात तिच्या दिशेने हात आणि आवाज आला …पकड ….तिने पकडले ,आणि त्याने ओढून तिला वर घेतले . ट्रेनने वेग घेतला होता .
तिला पळून धाप लागली होती . गर्दी इतकी होती की बॅगमधून बाटली काढून पाणी पिणेही शक्य नव्हते .
आता तिने त्याच्याकडे बघितले .
” थँक्स .”
” खूप महत्त्वाचे काम आहे का ? ”
” नाही , म्हणजे , तसं ..हो .”
” इतका जीव धोक्यात घालण्याइतकं ?”
आता ती विचार करू लागली . खरच …आपण पुढच्या लोकलने गेलो असतो तरी चाललं असतं . दवे काकू थांबल्या असत्या .
” मी हात दिला नसता तर ?”
” दुसऱ्या कुणीतरी दिला असता .” ती सहज बोलून गेली .
” म्हणजे ती वेळ येते वाटतं नेहेमी .” तो म्हणाला.
त्याच्या ह्या वाक्याने तिने त्याच्याकडे नीट बघितलं . खूपच परफेक्ट . निशा म्हणते तसा होता तो ‘ कातील ‘. काही क्षण ती बघतच होती .
” हॅलो !! ”
ती भानावर आली . ” नाही , अगदीच तसं नाही , वेळेवर पकडते मी ट्रेन . ”
त्या गर्दीतही त्याने पाण्याची बाटली समोर केली . तिने आधाशासारखी ती बाटली संपवली .
” थँक्स ”
ती V. T ला उतरली . मागोमाग तोही उतरला . तिला कामावर उशीर होत होता म्हणून ती जवळपास पळतच चालली होती . तोही मागे मागे येत होता .
आधी तिला काही वाटले नाही पण जेव्हा ती कोपऱ्यावरून वळली आणि तोही मागे आला तेव्हा मात्र तिला संशय आला . ती भरकन इमारतीत शिरली . तिच्या केबिन मध्ये गेली .आणि पडदा बाजूला करून बाहेर बघू लागली . तो सिक्युरिटी पास मधून आत आला .
” योगी , बघ ग हा मुलगा दिसायला तर एकदम सभ्य वाटतोय ,पण किती वेळापासून माझा पाठलाग करत इथपर्यंत आलाय बघ ! ”
” कुठे ,कुठे ?” करत योगिता पण खिडकीपाशी आली , तर तो नव्हता बाहेर .” गेला वाटतं ग तुझा ‘ सभ्य ‘ . ती खिदळत म्हणाली .
” मी जाते ग . दवे काकू वाट बघत असतील .” फिजिओथेरपी विभाग तिसऱ्या मजल्यावर होता .
हॉल मध्ये दवे काकू होत्याच .
” हॅलो काकू !! काय म्हणतोय पाय ? ” शामली ने विचारले .
” तू येई पर्यंत आपली नेहमीची एक्सरसाईझ केली बरं का . ” काकू म्हणाल्या .
” व्हेरी गुड ! मी आज अर्धा किलो वजन वाढवते , आलेच एक मिनिटात !
असे म्हणून ती बाहेर पडली आणि लगेच आत आली . कॅरिडॉर मधून ‘तो ‘
येत होता . ती आत लपली …तो आता आला ……. “मावशी s ” म्हणून त्याने काकूंना प्रेमाने जवळ घेतले .
म्हणजे हा काकूंचा भाचा आहे तर !! आपण काय तिसरेच समजलो .
” अरे मानस , ही माझी रिंग मास्टर बरं का ? …ये न शामली ! ” काकूंनी तिला हाक मारली .
” अरे ! तू ? …मावशी आम्ही एकाच लोकल ने आलो आत्ता . माझी पाण्याची बाटली हिच्याकडेच आहे . ”
” ओहह , खरच की . पण ती आमच्या केबिन मध्ये आहे , मी आणून देते . ती ओशाळून म्हणाली .
” राहू देत उद्या येणारच आहे मी , तेव्हा बघू . .. त्याचं काय एवढं . मावशी , उद्या डिस्चार्ज मिळणार म्हणाले डॉक्टर . मी आज जाऊन घर स्वच्छ करून घेतो , आणि उद्या येतो अकरा वाजेपर्यंत . ..चल येतो मी . ..ओके , बाय मिस .?..”
” शामली !..” तिने उत्तर दिले .बाय मानस ! ” तो गेला .
” दवे काकू , हा तुमचा भाचा इतके दिवस कुठे होता ? ”
” अग , तो कारवार , कैगाला असतो .
न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये M.SC आहे , डॉक्टरेट करतोय . आत्ता मुद्दाम सुट्टी घेऊन आलाय . मित्रांकडे सामान ठेऊन तडक इकडे आलाय . त्याची आई म्हणजे माझी लहान बहीण चार वर्षांपूर्वी वारली . मागच्याच आठवड्यात यायचा होता , पण ते न्यूक्लिअर टेस्ट प्रोग्राम होता न , म्हणून त्याला येता नाही आले . ”
दवे काकू स्वतः केमिस्ट्री च्या प्रोफेसर होत्या . एक वर्षापूर्वी रिटायर झाल्या आणि एका गंभीर अपघातात पाय मोडला . शेजारच्या काकांनी ऍडमिट केले होते . आता ऑपरेशन नंतरची फिजिओथेरपी सुरू होती . बोलक्या , विद्वान काकूंशी शामलीची चांगलीच गट्टी जमली होती .
” काकू , आता व्यायाम बास . आज आईने तुमच्यासाठी सुरळीच्या वड्या पाठवल्यात . खाऊन बघा बरं .”
” काय ऋणानुबंध असतील ग माझे तुझ्याशी , आईशी …किती जीव जडला लगेच . ”
” जिव्हाळ्याची नाती अनेकदा रक्ताच्या नात्यापेक्षा दृढ होतात काकू . तसेच आहे हे .”
” तुमच्या व्यवसायात असा जीव गुंतणं
योग्य नाही शामली . ट्रीटमेंट देऊन लगेच मोकळं होत जा . नात्यातील ठेच फार घाव देते ग .”
” पुढच्या वेळेला लक्षात ठेविन काकू , नका काळजी करू .”
दुसऱ्या दिवशी ती आधी दवे काकूंच्या रूम मध्ये गेली . मानस तिथे बसलेला होता . त्याने काकूंचे सगळे सामान अगदी व्यवस्थित पॅक केले होते . शामली ला रुम मध्ये गेल्यागेल्या लक्षात आले की सगळं सामान अगदी काळजीपूर्वक भरलंय .
” गुड मॉर्निंग काकू , गुड मॉर्निंग मिस्टर मानस ! ….ही तुझी पाण्याची बाटली . काकू , घरी सुध्दा असाच व्यायाम करत रहा बरं ! मी येईन एक आठवड्याने तुमची प्रगती बघायला .”
त्याच्याकडे बघून म्हणाली , ” तू अजून किती दिवस आहेस ? ”
” अजून दोन दिवस , मिस शामली . मावशीला सेटल करून वेळ उरला तर तुमची मुंबई बघायची इच्छा आहे . कमी वेळात काय बघून घेऊ ते सांग . ”
” शूअर !! आता डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण करून घे , आणि बिल किती होतंय ते आधी मला सांग . मी बघते .कारण वर्षातुन तीनदा आम्हाला रिलेटिव्ह कन्सेशन मिळतं . ते मी मिळवून देईन .”
” सो स्वीट .”
तिच्यामुळे काकूंना बिलात बरेच कन्सेशन मिळाले . शिवाय हॉस्पिटल ची गाडी मिळाली . सगळे बिल मानस नि भरले . निघतांना तो म्हणाला , ” तुमच्या देणगी विभागात जायचंय जरा . कोण देईल माहिती ?”
तिने आवश्यक ती माहिती सांगितली .
‘एक पेशंट दत्तक ‘ योजनेत त्याने वीस हजार दान दिले होते . तिला त्याचे खूप कौतुक वाटले .
काकूंना घेऊन तो गेला . ती बघत उभी होती .
” हा s य , काय स्मार्ट आहे ग !! ” तिच्या कानात योगी कुजबुजली .
” ए बाई !! मी दवे काकूंना बघत होते . जवळपास एक महिना त्या इथे होत्या ग .”
” पण मी मात्र त्या ‘ सभ्य ‘ कडेच बघत होते हं . चालेल न तुला ? ” योगिनी तिची चेष्टा करत होती .
” माझा काय संबंध ?? तू कुठेही बघ !!” शामली तिला चिडवत म्हणाली .
संध्याकाळी ती घरी निघाली तर निशा पळत आली .
” थांब ..थांब ..शामली . ही ..ही पावती त्या मानस ला देशील का ? टॅक्स बेनिफिट मिळेल त्याला . विसरून गेलाय तो . ” ती अकाउंट सेक्शन मध्ये काम करत होती .
” त्यांनी होम थेरपी साठी बोलावलं ,तर नक्की देईन . ”
जाताना ट्रेन मध्ये तिचं लक्ष बॅगमधल्या पावतीकडे गेलं . वीस हजार …एक पेशंट दत्तक घेतलाय त्याने …हाऊ स्वीट . आजच्या तरुणांमध्ये किती जण असे पुढे येऊन मदत करत असतील …
निशाच्या रेकॉर्ड मध्ये असणार त्याचा नंबर . …ती असा विचार करत असतानाच कॉल आला .
” हाय ! मी मानस ! ”
” अरे ! मी आत्ताच ….
” आत्ताच काय , कॉल करणार होतीस ?”
” तसे अजिबात नाही ! ही पावती द्यायचीये वीस हजाराची , म्हणून !! ”
ती जरा ठसक्यात म्हणाली .
” ओहह !! मावशी म्हणतेय , तू होम व्हीझिट करशील का ?”
” तसे हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगून दे , मी येईन सकाळी .”
दुसऱ्या दिवशी ती दवे काकूंकडे गेली . त्यांना आवश्यक तेवढी एक्सरसाईझ सांगितली , इतक्यात मानस तीन प्लेट उपमा घेऊन आला .
” घे शामली . आमचा मानस खूप छान नाश्त्याचे पदार्थ बनवतो बरं .”
ते ऐकून ती हसत सुटली …
“काकू , त्याचा ‘मुलगा दाखवणे ‘ कार्यक्रम असल्यासारखे बोलताय
तुम्ही ” ती हसत म्हणाली .
कोपऱ्यात उभा मानस गालातल्या गालात हसत होता . तिने खालपासून वरपर्यंत त्याला बघितले . स्लीपर्स , ट्रेकपॅन्ट आणि वरती एक लूज टीशर्ट साधा घरातील वेष पण खूप आकर्षक दिसत होता तो . त्याच्या डोळ्यात एक घारी , भुरी अशी झाक होती .
” ऐकलस का मानस ? ती काय म्हणतेय ?” काकू म्हणाल्या तशी ती दचकली ….
काय वेड्यासारखे बघतेय मी ! त्या दोघानीही नोटीस केलं असेल का ?
” दाखवून घ्यायला कसं वाटत असेल ग मुलींना ? कशी विचित्र पध्दत आहे ही .” तो म्हणाला .
” आता नाही काही . आजकाल मुलगा मुलगी भेटतात बाहेर . ”
” किती टक्के ? फारच थोडे ! तेही शहरात . बाकी सगळीकडे हेच आहे .
मुलीचे मत खरंच किती ग्राह्य धरतात , आय वंडर ! ” तो म्हणाला तसे तिला अजूनच कौतुक वाटले त्याचे .
” ही पावती . आणि हे हॉस्पिटल कडून धन्यवाद देणारे पत्र ……येते मी काकू .आणि छान आवरलंय घर बरं का तुमच्या भाच्याचे .” त्याच्याकडे बघत ती काकूंना म्हणाली .
” मी येतो बस स्टॉप पर्यंत . ”
” माझं रोजचंच आहे , जाईन मी .”
” मला सांगितले नाही की काय फेमस आहे मुंबईत बघण्यासारखं ? ”
चालत चालत तीने काही ठिकाणांची नावं सांगितले .
” तू येऊ शकतेस का सोबत ?…म्हणजे पॉसीबल असेल तर..”
” अं s , मग थोडावेळ थांब . मला हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट करावे लागेल .
एक केस करते , आणि …आपण पाच पर्यंत दुर्गा कॅफे मध्ये भेटूया . चालेल ?”
” चालून घ्यावे लागेल ”
हसला की चक्क डाव्या गालावर खाली पडते ह्याच्या . तिने चोरून पुन्हा बघितले .
ती दुर्गा ला पोहोचली . तो एक मोठ्या मॉल च्या ग्राउंड फ्लोअर वरच होता . मानस मधल्या मोकळ्या जागेत होता आणि समोर दहा पंधरा मुलं घोळका करून उभी होती . तिथे खूप मोठ्या प्रमाणात लोक येत असत .
मॉल , कॅफे , थिएटर ह्यामुळे लहान मुलांची संख्या पण खूप असायची .
ती उत्सुकतेने पुढे गेली ….
तो मुलांना लिफ्ट ची कार्यप्रणाली समजावून सांगत होता . मुलंही अतिशय मन लावून ऐकत होते , प्रश्न विचारत होते .
” बच्चा कंपनी , आपल्या आजूबाजूला सगळीकडे विज्ञान ,तंत्रज्ञान आहे . तुम्हाला प्रश्न पडू द्या . चौकस रहा . आता समजलं , लिफ्ट कशी काम करते ? ” सगळे एकसुरात ओरडले
” हो s s .”
चला तर मग आता एस्कलेटर्स ची माहिती घेऊ . ते सगळं सांगतांना तो आजूबाजूचं जग विसरला होता . आता तर मुलांचे पालकपण गोळा झाले होते .
त्याने अतिशय सोप्या भाषेत सगळी कार्यप्रणाली समजावून सांगितली .
” मुलांनो , सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही असंख्य ग्याजेट्स , वस्तू , छोटे यंत्र वापरता . हे कसं चालतं ? त्यामागे काय विज्ञान आहे असे स्वतः ला विचारत जा . माहिती मिळवत रहा . मग , आज पासून प्रयत्न करणार ?”
” हो s ”
” चलो , ताली बजावो ” सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . तो मोकळा झाला .
” खूप छान मानस .” आवडलं मला .
” सॉरी , तुला वाट पहायला लावली मी . पण सांगू , आपण भारतीय लोक आपली पन्नास टक्के बुद्धधी ही वापरत नाही , असं मला वाटतं . संशोधनच नाही !! आणी कुणी वेडा निघाला जरी , तरी बाहेरचे लोक त्याला पटकन उचलतात . आपल्याकडे लवकर दखलच नाही घेतल्याजात . ”
” तुझा PHD चा विषय काय आहे ? ”
” क्वांटम ग्रेव्हीटी आणि इनरशिया .
मला क्वांटम मेकॅनिक्स मध्ये संशोधन करायचंय , बघू !! ” त्याची नजर शून्यात गेली होती , जणू तो तिथे एकटाच उभा आहे .
” मला भूक लागलीये मानस ! क्वांटम एनेरजि कमी झालीये .” यावर तो हसला .
त्याचं व्यक्तिमत्त्व खूपच भारावून टाकणारं होतं . ते दोघे एक टेबल पकडून बसले . खाताना ती सारखं त्याच्याकडे बघत होती . न्याहाळत …
साधा शर्ट आणि मॅचिंग पॅन्ट . पण त्या साधेपणात ज्ञानाचे तेज होते .
शामलीला खूपच आवडला मानस .
तिने आढेवेढे न घेता सरळ विचारले
” मानस , तुला गर्लफ्रेंड आहे ?”
” माझ्याकडे पाहून काय वाटतं ? ”
” ……बहुतेक ….नाही . नाहीतर एकदातरी तुमचे फोनवर बोलणे झाले असते न .”
” सारखा फोन कशाला करायचा ? पैशाचा आणि वेळेचा अपव्यय ! ”
” जे दोन व्यक्ती प्रेमात असतात , त्यांना नाही रहावत एकमेकांशिवाय . मग फोन तर करावाच लागतो न ! ”
” तुला आहे वाटतं अनुभव ? आहे का कुणी बॉयफ्रेंड ? ” त्याने विचारले .
तिनेही तसाच प्रश्न केला ,” तुला काय वाटतं ? ”
” अजिबात नाहीये .”
” अय्यो !! तू कसं ओळखलं ?”
” तू जे मला सारखं न्याहाळत असतेस . ट्रेनमध्ये पहिल्यांदा भेटलो , तेव्हापासून .”
तिला कोण लाजल्या सारखं झालं .
” नाही , तसं नाही …म्हणजे ..मी …”
” chill !! गम्मत केली मी ! ” आता मात्र त्याची नजर पूर्ण तिच्यावर रोखलेली होती . ” मावशी खूप तारीफ करत होती तुझी . खूप मन लावून काम करते , प्रेमाने करवून घेते , वगैरे .”
” आणखी काय म्हणाली ?….मावशी !!!” तिने सुचकपणे विचारले .
” लगेच नवीन माणसावर विश्वास ठेवते ..असंही म्हणाली .”
” चल !! हे तुझ्या मनाचं आहे .” …..त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या . तिने त्याला मरीन ड्राईव्ह , गेट वे दाखवला .
बाहेरच जेवण करून रात्री ती वापस घरी गेली .
तिचे कशातच लक्ष लागत नव्हते . ..असं का होतंय आपल्याला ? …असं हवेत असल्यासारखं वाटतंय …. मानस मूळे ?…छे ! ..मग असं सगळ्या अंगावर मोरपीस फिरल्यासारखं का वाटतंय ?.
इतक्यात फोन वाजला …मानस चा होता …
” माझाच विचार करतियेस ना ?”
” का म्हणून ? मला खूप कामं आहेत . अभ्यास करतेय ! ”
” कशाचा ?”
” ते s ..मी एक . कोर्स करतीये त्याचा . ”
” कॉटवर लोळत ?”
तिने दचकून इकडेतिकडे बघितलं . ह्याला कसं कळालं ? ..
” निळ्या नाईटड्रेस मध्ये ,तेही दचकलेल्या अवस्थेत खूप छान दिसतीयेस .” तो म्हणाला.
” शीट ! तू इथेच आहेस ! …कुठे आहेस मानस ? ”
” तुझ्या बेडरूमच्या ग्यालरीत ये . ….हां… आता समोरच्या फ्लॅट कडे
बघ. ”
” ओहहह ! बायनाक्युलर्स ? इतके छोटे ? ..तू बनवलेस ? व्वा !!”
” हो. ते बनवणे फार मामुली आहे ग . ”
” ए फिजिक्स च्या किड्या !! ठेव ते बाजूला . गैरसमज होतील लोकांचे .”
” मी जातोय उद्या शामली . म्हणून आलोय इथे मित्राकडे . तू इथे राहातेस , माहिती होतं मला . ”
” पण तू दोन दिवस राहणार होतास न ? ”
” प्रोजेक्ट साठी बोलावलंय , जावं लागेल . मी फोन करेन तुला . बाय , खूप रात्र झालीये , झोप आता .”
( क्रमशः )
©अपर्णा देशपांडे
पुढील भागाची लिंक- ओढ वेल्हाळ- भाग2
Image by StockSnap from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
खूप छान
उत्सुकता लागली आता पुढे काय होणार ह्याची
धन्यवाद
Pingback: ओढ वेल्हाळ- भाग2 – LekhakOnline – Excellent Marathi Articles