ओढ वेल्हाळ- भाग2

आधीच्या भागाची लिंक- ओढ वेल्हाळ-भाग1

सकाळी उठून पुन्हा लोकल पकडायची , हॉस्पिटलला जायचं …आज तिला रोजचा उत्साह नव्हता . दोनच दिवसात इतका बदल ? का शामली ? तिने स्वतःला विचारले .
मला तर प्रत्येक दिवस एक चॅलेंज वाटते . मग आज ..
” शामली , टिफीन ला आज कोबी चालेल का ग ? दवे काकूंना आवडते का ? ”
” भाजी कुठलीही दे ग , तुझ्या हाताची चव  …बोटं चाटते मी . तुला सांगायचं राहीलं , काकूंना डिस्चार्ज मिळाला परवा . तूझी तारीफ करत होत्या निघतांना .”
आज तिचं नीट लक्ष नाही , असं वाटलं आईला .
शामली निघाली . आज मानस राहिला असता तर सुटी काढून एलिफंटा ला गेलो असतो .
थोडं त्याला आणखी जवळून समजून घेता आलं असतं . मला वाटतिये तशी पोकळी त्याला वाटत नसेल , तो सरळ प्रोजेक्ट वर काम करायला गेलाय …बिझी  असणार ..
त्या विचारातच ती हॉस्पिटलला पोहोचली . आणि
फोन आला . ती वाटच पहात होती .
” शामली ? ,..”
” बोल न मानस . पोहोचलास ? ”
” हो . कैगा ला डायरेक्ट फ्लाईट नसते ना , म्हणून वेळ लागतो . Dabolim ला  एअरपोर्ट वर उतरून बस पकडावी लागते . …पण मी लवकरच मुंबईला यायचा प्रयत्न करीन . ….शामली …”
” मी ऐकतेय मानस ,
” काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय ग ..
” ……हं ..”
” तुला पण वाटतंय ? ”
” …..मला …..” तिचा गळा दाटला होता .
” तू रडतेय ? ..सॉरी ग .”
” फक्त दोन दिवस झाले मानस आपण भेटलो . दोनच दिवसात मला …
” मी कॉल करतो तुला ..मला जावं लागेल ..बाय . ”
फोन बंद झाला . ती उठून बाहेर गेली .
मोकळ्या हवेत श्वास घेतला . फ्रेश वाटले तिला .
” आज तिसरी  मंझील नाही का ?” पाठीमागे उभा असलेला शुभम विचारत होता . ”
“तिसऱ्या मजल्यावर ?  जायचंय ना . आहेत न पेशंट्स .  आलास का सोलापूरहून ? ”
” हो , आजच आलो . आज मला लोड नाहीये , मी येतो सोबत . तुला बरं नाहीये का ? ” त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला . ” ताप नाहीये , काय होतंय ?” तिचा चेहेरा बघून म्हणाला , ” ओके , ओके . मी नाही बोलणार जास्त . चल .”
ते दोघे तिसऱ्या मजल्यावर गेले .
एरवी बडबडणारी आज एक शब्द बोलत नाहीये हे जाणवलं त्याला .
जोग काकांचं फिजिओ त्याच्याकडे होतं . पलीकडे यंत्रवत काम करणारी शामली दिसत होती त्याला . “विकास , काकांना गुढग्याला IR मसाज दे आणि TRX वर ने , दमानं बरं .”   आणि तो शामली कडे गेला . ती एका पेशंटला एक्सरसाईझ बॉल वर ट्रीटमेंट देत होती .
” काय झालंय शामली ?”
” काही नाही रे .”
” चल , कॉफी घेऊया ….विद्या ,प्लिज हे सांभाळ ,आम्ही आलोच .”
” नको , मला काम करू दे शुभम !!”
” चल ग!!” त्याने तिचा दंड पकडून जवळजवळ ओढतच नेले .
” आता बोल . आणि स्ट्रेस मधून मोकळी हो .”
” …………” तिचे डोळे भरले होते .
त्याने तिचे डोळे पुसले . ” ए चड्डी बड्डी , तू रोयेगी तो आपण भी रोयेगा । ये हॉस्पिटल तो डूब जायेगा । ” आणि ती एकदम हसली .
” तू न !! किती चेहेरा वाचतोस रे . म्हणजे मी कधी माझ्या स्वतःच्या मूड मध्ये रहायचंच नाही का ? ”
” जरूर रहा न बाई , पण डोळ्यात कातरपाणी आणेल तो मूड नको .”
” आज मस्तं कोबी आणलीय डब्यात .”
तो एकटक नजर रोखून  बघत होता , चेहेरा कोरा .
” झाली कॉफी , जाऊया ?”
तो मात्र नजर लावून तिच्याकडेच …
ती ओरडली , ” नाऊ व्हॉट ?” त्याची प्रतिक्रिया तिला कळाली होती , पण बोलायचं नव्हतं .
” हे बघ , असा मारका लुक देऊ नकोस .”
” कामाचं बोलणार असशील तर बोल . नाहीतर काकूंकडे जातो .”
” माझा तो पेशंट होता न , छोटा पिल्लू , त्याच्या वेदना कमी व्हायच्या ऐवजी खूपच वाढल्यात . बघवत नव्हतं . ते मी बरं नाही करू शकले , खूप लागलं मनाला .”
” त्यात तुझी चूक नाही ग . त्याची मुख्य लाईन ऑफ ट्रीटमेंट च बदलावी लागेल . असं मनाला लावून घेतलंस तर कशी काम करणार तू ? ….चल मोकळी हो त्यातून . ..हस बरं आता .”
” ती हसली .”
दोघेही पुन्हा कामाला लागले . तिचे विचार सुरूच होते …..आपण चक्क खोटे बोललो शुभमशी . का ? ….इतकं वेड लावलंय मानस नि ? फोन करू का त्याला ? ….हे प्रेम आहे का? की नुसतेच आकर्षण ?  ….
शुभमला कळाले होते की ती खोटे बोलतेय . पण तिला खरे सांगायचे नाहीये तर आत्ता ताणू नये म्हणून त्याने विषय वाढवला नव्हता .

******* अचानक बोलावणे आल्याने मानस  मध्यरात्रभर प्रवास करून सकाळी दहा पर्यंत कैगा ( KAIGA) ला पोहोचला . अणू चाचणी ची तारीख अलीकडे आली होती . टीम लीडर गणेशन यांना असिस्ट करायचे होते .
वीस वीस फूट खोल जमिनी खाली
शीसं वापरून  चाचण्या करायच्या होत्या . रेडियोऍक्टिव्ह पदार्थ हवेत मिसळू नये म्हणून खूप जास्त खबरदारी घ्यावी लागत असे .
फ्रेश होऊन मानस गणेशन साहेबांना भेटला .
” गुड आफ्टरनुन ज्युनिअर !! आलास वेळेवर , गुड ! आपली ही तयारी गुप्त ठेवायची आहे . कुठेही उल्लेख करायचा नाही . वर्कर्स ला सांगा की नवी स्टोअर रूम बांधतोय . तू स्वतः लिकेजेस चेक कर .”
सर गेले आणि मानस थोडा विसावला . ” कैलास , एक चहा पाठव .”
पूर्ण रस्ताभर एक विचित्र बेचैनी होती मनात . कशाचा त्रास होतोय , कळत नव्हतं . शामली ला फोन करावा म्हणून त्याने कॉल केला होता . तिच्याशी नीट बोलताही आले नाही . मलाही सारखे बोलावणे येत होते ……..तिचा गळा दाटून आला होता …काय आहे  ही भावना ? आतापर्यंत इतक्या मुलींशी आपली मैत्री झाली , इथेही बऱ्याच जणी आहेत , मग शामली ला भेटून आल्यावर करमत का नाहीये ? …
” सर , वो साईड पॅनल देखीये जरा ..” कुणीतरी बोलावले आणि तो कामात गढून गेला .

********शामली घरी जायच्या आत शुभम तिच्या घरी  पोहोचला .
” हॅलो काकू !”
” आलात आपण ? कुठे गायब झाला होतास रे ? आणि तुझी चड्डी बड्डी कुठाय ?”
” मी सोलापूरला गेलो होतो . म्हणून आलो नाही .” त्याने इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या ,आणि म्हणाला ,
” जरा इथे बसा न  काकू ……शामली चा कशामुळे मूड गेला असे काही वाटले का तुम्हाला ? ”
” थोडंस काहीतरी जाणवलं , पण इतकं नाही  …..का रे , काही …”
” अजिबात नाही हो . मागच्या काही दिवसात कुणाशी भांडण ..वगैरे ..? ”
” काल दिवसभर ती एका पेशंट च्या नातेवाईका बरोबर गेली होती . काही सिरीयस आहे का शुभम ? ”
” नाही हो , तिची मजा करायचीये . तुमची पोरगी फार परफेक्ट समजते न स्वतः ला , जर टांग खेचतो तिची .”
” असं होय , मग ठीक आहे . ….शुभम , एक विचारू ? ”
” ..?..”
” तुम्ही एकमेकांना वीस वर्षा पासून ओळखता . फिल्ड पण एकच आहे , तर …तुमच्यात काही …”
” नाही ना . आम्हाला एकमेकांची सवय झालीये काकू ,  ‘ते ‘ प्रेम नाही . आम्ही एकमेकांना पुरेपूर ओळखतो . बारीक सारीक गोष्टी शेअर करतो . बस तिची गम्मत करायचीये .  येतो मी .”
शामली ची आई मनात म्हणाली , …..
हे बोलण्यासाठी तू नाही आलाय इथे शुभम , तेव्हढं कळतं मला .
शुभम पुन्हा हॉस्पिटल ला गेला .
योगिता होती तिच्या केबिन मध्ये .
” योगिता , शामलीच्या एक पेशंट होत्या न ग , पाय मोडलेल्या ..”
” हो , दवे काकू . त्यांचा डिस्चार्ज झाला  न . त्यांचा भाचा येऊन घेऊन गेला …काय नाव .. हा ,   मानस . हाय  काय स्मार्ट होता !! ”
” त्या दिसल्या नाहीत न , म्हणून विचारलं . चल बाय .”
कुठेतरी ह्या विषयातच शामलीच्या नाराजीचे उत्तर आहे , हे त्याच्या लक्षात आले . तो वर गेला .
” कुठे होतास रे ? टिफीन टाइम मध्ये किती शोधलं , फोन पण बंद करून ठेवलास .” शामली थोडी नॉर्मल वाटली .
” अग , शोधायला गेलो होतो .”
“??????”
” तुझं नेहमीचं हसू ग .”
ती पुन्हा शांत झाली .
” आज पहिल्यांदा तू माझ्याशी खोटं बोललीस शामली . का ? ”
” नाही शुभम , मी ..”
” तुला विश्वास नाही वाटला की मी कशी प्रतिक्रिया देईन ..हो न ?”
इतक्यात फोन आला …मानसचा होता … तिला कळेना कसा घेऊ …तिने फोन हातात घेतला आणि शुभम उठून दुसरीकडे गेला .
” हॅलो मानस .”
” हाय शामली . सॉरी , माझे कामच असे आहे ग , बरेच नियम आहेत आम्हाला . काय करतेय ?”
” काम करतेय , पण त्यात लक्ष नाहीये .”
” कामाशी तर प्रामाणिक रहायलाच हवं .”
” आणखी बऱ्याच गोष्टी आहेत आयुष्यात . त्याचं काय ? ”
” त्या गोष्टींना म्हणावं , थोडी कळ काढा . ”
” किती ? ”
” माझं काम हे देशाचं काम आहे शामली .”
” आणि आम्ही अतिरेकीच जसे .”
” ओह ! रागावलीस ? ”
” नाही रे , चल उद्या बोलू . बाय .” तिने लगेच मागे बघितले . शुभम गॅलरीत उभा होता .
” शुभम ? ”
” बड्डी , बात हजम नही हुवी .”
” अरे , मी ..” तिला थांबवत तो म्हणाला ,
” मला वाटायचं की आपल्यामध्ये कुठलाच आडपडदा नाहीये .  पण तू खोटं बोललीस माझ्याशी .”
” अरे , हा एक मित्र आहे , मानस नावाचा  .तुझी भेट करून देईन मी त्याच्याशी .”
” जरूर , नक्की !!  . पण  आता मला एक व्हीझिट आहे , येतो मी .”
त्याच्या वागण्याचं तिला आश्चर्य वाटलं .
रविवारचा दिवस होता म्हणून शामलीने कपाट आवरायला काढले होते तर दवे काकूंचा फोन आला .
” आज उठतांना पायात खूप कळ आली ग , जरा येतेस का ? ”
” लगेच येते काकू .”
ती गेली तर काकू घरात नव्हत्या . कोपऱ्यात निशिगंधाच्या फुलांचा गुच्छ होता . ती थोडी आणखी पुढे गेली . मंद सुगंध आला …आणि आनंदाने ओरडली
” मानस !! कुठे आहेस ?”
तो आतून बाहेर आला . …तीच  घारी , मिश्किल  नजर …पुढे येऊन त्याने  हातातील गुलाबांचा बुके तिला दिला .
त्यात एक चिठ्ठी होती . लिहिलं होतं ,
‘ तुझ्याचसाठी ‘
” आधी सांगायचं न येणार म्हणून  .”
” मला तुझ्या चेहेऱ्यावरचा हा आनंद पहायचा होता  .”
ती लाजली . मान वर करून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली , ” थिसिस मधून बरा वेळ मिळाला ?”
” म्हटलं , आधी हा थिसिस पूर्ण करूया . .तो तिच्या जवळ सरकला ….जवळून खूपच सुंदर दिसतेस ग . ”  त्याने तिच्या हातातील बुके काढून बाजूला ठेवला . तिचे दोन्ही हात हातात घेतले . ” शामली , अग किती लाजतेस , वर बघ न . ”
तिने वर बघितले .. तिचे डोळे डबडबले होते …त्याने अलगद हाताने ते पुसले .
” मला ही असाच त्रास झाला . मागचा पूर्ण आठवडा रात्रभर तुझेच स्वप्न बघत होतो . आता हा त्रास संपवूनच टाकू .”
…त्याने तिच्या खांद्यावर दोन्ही  हात टाकून तिला जवळ ओढले  आणि म्हणाला ” आय लव यु शामली .”
तिने  मान वर करून बघीतले आणि आवेगाने त्याला मिठी मारली …  तिचा बांध फुटला …गदगदून रडायला लागली …इतक्या दिवसांच्या दाबलेल्या भावना होत्या ….” आय लव यु टू मानस ! ”
किती वाट बघत होती ती ह्या क्षणाची !
” तोंड पहा रडून कसं करून घेतलय .
माझं येडं रे येडं .” असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर अलगदओठ टेकवले .
ती एकदम दूर होत म्हणाली , ” दवे काकू ? ”
” मावशी गेलीये बाहेर . फार हुशार आहे मावशी . ”
” आता तू संध्याकाळी घरी ये . आई बाबांशी तुझी ओळख करून देते . ते नाही म्हणणार नाहीत .”
” कशाला ? ”
”  आपल्या लग्नाला !!! ”
”  आपण लग्न करणार ?”
तिने जोरात सोफ्यातील उशी फेकून मारली .
” चांगलीच मारकुटी आहेस ग ! ” आणि ती पुन्हा त्याला बिलगली .
” ओके मॅडम !! संध्याकाळी मावशी आणि मी तुमच्या कडे येतो . पण …पण …तुझा हात नाही मागणार .”
” का ? ”
” अख्खी तुलाच मागणार न !! .”
” मानस !!!! ” ती ओरडली .
तिने घरी जाताना आधी शुभम ला फोन केला ..सगळं सांगितलं .. ” शुभम , सॉरी तुला आधी नाही सांगितलं . तू  ये न घरी . मला तू लागतो रे प्रत्येक प्रसंगाला . तुझी ओळख देते  मानसशी ”
तिने आई बाबांना आधीच मानस बद्दल  कल्पना दीली होती . त्यांची तयारी होती . एका सुज्ञ , प्रगल्भ मुलीचा निर्णय योग्यच असणार याची त्यांना खात्री होती .
शामली ने सगळं घर स्वच्छ केलं . काय काय पदार्थ बनवून ठेवले . पाच वाजले तशी ती दारात येऊन थांबली . शुभम आला .आज तिने  सुंदर सिल्क चा ड्रेस घातला होता . ” अरे वाह !! आज तर बाईसाहेब एकदम . तो तुझा मानस एकदम लट्टू !! ”
” गप रे !! जा डिश भरू लाग आईला .”
” तू बस नुसती महाराणी , मला कामं सांग !” तो हसत म्हणाला . सहा वाजता मानस चा फोन आला , ” शामली , प्लिज रागावू नकोस . मी नाही येऊ शकत . काही कारण आहे , ते नंतर सांगेनच . आईबाबांना माझा नमस्कार सांग . ”
तिच्या हातून फोन गळून पडला . तीचा तोल जाणार की मागून शुभम ने सावरले .
(क्रमशः)

पुढील भागाची लिंक- ओढ वेल्हाळ- शेवटचा भाग

Image by StockSnap from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

4 thoughts on “ओढ वेल्हाळ- भाग2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!