ओढ वेल्हाळ- शेवटचा भाग

आधीच्या भागाची लिंक- ओढ वेल्हाळ- भाग2
शामली ला खूप धक्का बसला होता . शुभम धावत गेला आणि ग्लासभर पाणी आणले .
” तो आत्ता येऊ शकत नाहीये इतकंच आहे शामली , इतकं काहीच झालं नाहीये . तू काकूंना फोन कर न .” शुभम म्हणाला .
तिचे बाबा पुढे आले . ” बेटा , खरच इतकं काही झालेलं नाहीये , उद्या किंवा नंतर येतील ते .”
” तसं नाही बाबा , मला त्याने आधी थोडी कल्पना द्यायला हवी होती न .”
सगळ्यांनी तिची समजूत तर काढली , पण प्रत्येकालाच ते खटकलं होतं . तिच्या आईने दवे काकूंना फोन लावला . त्यांनी सांगितले की ते दोघे निघणार इतक्यात मानसला  मेल आली , आणि बॅग उचलून तो निघाला . जाताजाताच त्याने शामली ला फोन करून सांगितले होते . काकूंनी आईची माफी मागितली , उद्या शामलीशी बोलते म्हणाल्या .
शामली आणि शुभम बिल्डिंगच्या वर टेरेस मध्ये बसले होते .
” सॉरी शुभम , मी तुझ्याशी आधी बोलले नाही . ”
” अग , मानस फक्त आज नाही ,नंतर येतो म्हणालाय इतकंच .”
” नाही !! तसं नाहीये . इतकी काय घाई ? मला फोन पण नाही केला त्याने ! ”
” एक मिनिट ! तू त्याला कधी भेटलीस ? दोन आठवड्या पूर्वी ? आणि लगेच आज लग्नाचा विषय ? त्याला श्वास तर घेऊ देत . ”
” पाच मिनिटाच्या ‘ दाखवणे ‘ कार्यक्रमात लग्न ठरतात त्यापेक्षा तर चांगलच आहे .” ती फणकाऱ्याने। म्हणाली .…
” मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं पण .
मानस तुला भेटतो काय , तू लगेच फिदा होतेस काय आणि विषय लग्नापर्यंत जातो काय . इतक्या चटकन तुला मानस कसा आहे हे कसं समजलं ?”
” हो , काही माणसं , त्यांची मनं हे लगेच वाचता येतात .”
” आणि काहींची वीस वर्षे जाऊनही कळत नाहीत .”
तिने एकदम त्याच्याकडे पाहिलं , तो शून्यात नजर लावून बसला होता .
” शुभम ? ”
“……”
” तू स्वतःबद्दल बोलतोएस ? …..बोल न , तू कधीपासून कोड्यात बोलायला लागलास ? ”
” माझ्यासमोर सगळं स्वच्छ चित्र आहे ग , धुकं तुझ्या डोळ्यात दाटलंय .”
” म्हणजे ? ….समजेल असे
बोल रे s !! ”
” तू मानस वर आणि तो तुझ्यावर प्रेम करतो ,राईट ? ”
” शंभर टक्के !!”
” मग संपला विषय . एकमेकांच्या सोयीने लग्न करा , आत्ता त्याला वेळ नाहीये , इतकंच !!”
” किती निवलं माझं मन !! बघ , ह्यासाठी मला तू हवा असतोस . कसा मलम लावतोस बरोबर !! जखमा नाही करत .”
” चल , ते एव्हढं मोठ्ठ खायचं करून ठेवलंय ते खाऊ की आपण !!” तो उठून खाली जायला निघाला आणि शामली त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विचार करत होती .
रात्री उशिरा मानसचा फोन आला .
” शामली  , …प्लिज ऐकून घे ”
” मी रागावले नाहीए मानस , काळजीत आहे . तू कुठाय ? ”
” दुबई एअरपोर्टवर . …ऐक ! मी जास्त बोलू शकत नाही . पण विश्वास ठेव , मी
तुला फसवत नाहीये , मुद्दाम नाही केलं हे असं .”
” तू सुखरूप आहेस न , बस !! तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही . ”
” मला वेळ लागू शकतो ..”
” मी वाट पाहीन मानस  .”
” करतो फोन जमेल तेव्हा . काळजी घे .लव यु , बाय .”
तिला खूप रडायला आलं . मानस मला फसवणार नाही याची मला खात्री आहे न , मग मी तीतक्याच ठामपणे सगळ्यांना का नाही सांगितलं ? तिला स्वतःचाच राग आला .
दुसऱ्या दिवशी दवे काकूंचा फोन आला .
” हॅलो शामली , मन दुखलं न
तुझं ? ”
” नाही काकू , आधी वाटलं ,पण नंतर आलं माझ्या लक्षात .”
” त्याचं काम तसंच आहे बेटा . मानस एक न्यूक्लिअर शास्त्रज्ञ आहे . त्याला कुठल्यातरी देशात पाठवलंय . तुमच्या नात्याला फार दिवस नाही झाले ,त्यामुळे त्याच्या अनिश्चीततेची तुला कल्पनाच नाही बेटा . ”
” मी समजू शकते काकू .”
” मी येईन तुझ्या आईवडिलांना भेटायला ओके ? ”

तिने स्वतःला तिच्या कामात गुंतून टाकले . आठवड्यात एखादाच फोन येई मानसचा तो तिला पुरेसा असे . पण त्याचे काम आटोपण्याची चिन्ह दिसत नव्हती , त्यामुळे तिचे आईवडील अस्वस्थ झाले होते .
” शामली , मान्य आहे की मानस तुझ्यासाठी योग्य आहे , पण त्याच्याकडून लग्नाचा विषय च नाही .
आम्हाला तुझ्या इच्छेचा मान
ठेवायचाय , पण बी प्रॅक्टिकल ! त्याला म्हणावं ,आठ दिवसासाठी ये , लग्न कर आणि तुला सोबत घेऊन जा . वय , काळ आणि समाज ह्याचाही विचार व्हायला हवा न .” बाबा म्हणाले .
” मी बोलते त्याच्याशी .”
हॉस्पिटलमध्ये शुभम तर नेहेमीसारखाच होता , पण त्याच्या दोनतीन सूचक वाक्यामुळे ती विचारात पडली होती . त्याचं वाक्य …….’काहींची मनं वीस वर्षातही कळत नाहीत .’ …..म्हणजे ? म्हणजे शुभम  माझ्यावर…. ? आणि मला कळालेच नाही ? त्याला बोलू का ? का त्याला वाईट वाटेल ?

******   ” योगीता ? शुभम कुठाय ? दोन दिवस झाले , नीट भेटलाच नाही . फोनही उचलत नाही , बंद ठेवतोय . ” तीने योगीताला विचारले .
” अग , दोन दिवस झाले , तो बाहेर व्हिजिटच करतोय .” योगिता म्हणाली .
…….हा टाळतोय का मला ? शुभम , किती मुग्ध प्रेम रे तुझं ? मला कसं समजलं नाही ? मला माफ कर रे ….शामलीचं मन जळत होतं . मला आठवतं तेव्हापासून आपण सोबत वाढलो , खेळलो ,सोबत परीक्षा , अभ्यास  आणि आता नोकरी .
माझ्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी तू होतास ….मग …मला …..
” हे , बड्डी !!! क्या हाल है ? ” शुभम आला होता .
” तू  असा न सांगता कसा गायब होतोस रे? ”
” अरे !  बाहेरचे कॉल्स घेतले होते न !  मग ऑफिस मधून पत्ते घेतले ,आणि चल पडे !! ”
” तू ठीक आहेस ना शुभम ? ” तिने काळजीने विचारले .
” ओ s य !! मला काय झालं ? तूच सांग ,तुझा तो शास्त्रज्ञ काय
म्हणतोय ? ”
” माहीत नाही .”
” हे s ?? कॉल करतो की नाही ? ”
” …नाही . आणि माझाही कॉल लागत नाहीये . दोन महिने झालेत .पण करेल तो कॉन्टॅक्ट . …चल , येते मी .”
अस्वस्थ अवस्थेतच ती घरी आली .
मानस वर पूर्ण विश्वास होता , पण हे सगळं आईबाबांना कसं समजून सांगायचं ह्याचा ताण होता .
” आलीस शामली ? फ्रेश हो , मी मटारच्या करंज्या केल्यात .” आई उत्साहात म्हणाली .
“मस्त झाल्यात ग ! ” ती खात खात  म्हणाली . बाबा पण येऊन बसले होते . ते म्हणाले ,
” बेटा , आज मला मानस चा फोन आला  होता  .”
तिचे ठोके वाढले …
” त्याचं म्हणणं असं की …म्हणजे ..तो ..”
” स्पष्टपणे सांगा बाबा , माझी तयारी आहे . तुम्ही आमच्या नात्याचं दडपण अजिबात घेऊ नका .”
आई पुढे म्हणाली ” मानस म्हणाला……
……काका , तुम्हा दोघांना माझा नमस्कार . मी  एक न्यूक्लिअर
साइनटिस्ट आहे . मला एका अतिशय गुप्त मिशन साठी युरोप ला यावं लागलंय . सिक्युरिटी कारणांसाठी आम्हाला फोन करण्याचेही नियम आहेत . आमचे हँडसेट्स जमा करावे लागतात . माझ्याशी संपर्क न होऊ शकल्याने तुम्ही सगळेच अतिशय काळजीत असणार . मला याची पूर्ण कल्पना आहे .
शामली ला मी लग्नासाठी विचारले त्या क्षणापर्यंत मला माहिती नव्हते की माझी या अत्यंत सन्माननीय कामगिरीसाठी निवड झाली आहे . पण मेल आल्याक्षणी मला निघावे लागले .
हा फोन मी तुम्हाला न करता शामलीला करू शकलो असतो , पण ती वेडी कधी मान्यच करणार नाही , जे मी सुचवू इच्छितो . मला किमान दोन वर्षे इथेच रहावे लागणार आहे . त्यानंतर मी भारतात येईनही कदाचित पण त्यानंतर मी WNPC ( वर्ल्ड न्यूक्लिअर पॉवर कमिटी ) चा सभासद असेन . जगभर फिरावे लागेल . माझ्या करिअर चे माझे स्वप्ने मी पूर्ण करणार . मग असेच स्वप्न शामलीची पण तर आहेत ..तिने माझ्यासाठी आपली स्वप्ने बाजूला सारणे मला योग्य वाटत नाही . हे मी तिला बोलू शकत नाही ,पण तुम्ही समजू शकता . तिच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही तिच्याशी बोलून ठरवा .
माझ्यासाठी तिने आपले करिअर सोडणे हे मला आयुष्यभर त्रास देईल .
मी जबाबदारी झटकत नाहीये ,प्लिज तसे समजू नये . आईवडिलांना आम्ही मुले नेहेमी गृहीतच धरतो . त्यांच्या इतकं जगात कुणीही आपल्यावर प्रेम करू शकत नाही याचा आम्हाला विसर पडतो . माझे आईवडील नाहीत , पण शामलीचे तर आहेत !! मला तुमचा मुलगाच  समजा . तुमचा निर्णय हा तिच्या साठी आणि जो तिच्या संमतीनेच होणार , तो मला मान्य असेल . सध्यातरी तिच्याशी बोलणे योग्य नाही . ती इतकी जास्त लव्हिंग ,समजूतदार आहे , की तिला माझ्यापेक्षा कितीतरी चांगला जीवनसाथी मिळू शकतो ………
…………..
शामली चे डोळे भरभरून वाहात होते . ती काहीही न बोलता उठली आणि आतल्या खोलीत जाऊन दार बंद केले . आई बाबा तिच्यामागे धावत गेले …दरवाजा ठोठावला …” शामली ? दार उघड बेटा ! ”
तिने दार उघडले . ” मी लगेच आत्महत्या वगैरे करणार नाहीये , मला फक्त शांत एकटं रहायचे आहे ,बस !! ” पुन्हा दार लावून ती आत गेली .
” काय करायचं हो आता ? ”
” अग , आपण कायम तिच्या मताचा आदर केलाय . तिला तिचं निर्णय स्वातंत्र्य आहे न ? तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे .”
” काहीही काय ?  दोन वर्षांनी हा पोरगा  लग्न करेलच कशावरून ? तो आता एक जागतिक पातळीवर काम करणारा शास्त्रज्ञ होणार . अतिबुद्धीवान लोकं विक्षिप्त असतात बाई . त्यापेक्षा सामान्य लोक उत्तम संसार करतात . ”
” …….हा , अगदीच चूक नाहीये तुझं . पण आत्ताच काही नको बोलायला . तिला शांत होऊ दे आधी .”
दुसऱ्या दिवशी अतिशय नॉर्मल अवस्थेत शामली तयार झाली .
” मम्मो , डब्बा भर प्लिज , आज जर लवकर जायचंय …..अशी काय बघतेय ? मी नॉर्मल आहे .सिरियसली !!
आणि तुम्ही दोघे अतिशय निवांत राहा . मी पूर्णपणे तयार आहे .
‘फिट टू फाईट !!! ‘ तुम्हीच घडवलंय न मला !! सो , डोन्ट वरी मॉम !! ”
ती बाहेर पडली .
लगेच तिच्या आईने शुभम ला फोन लावला  आणि घरी बोलावून घेतले .
शुभम आला .
” ये . बस . ”
” काय खास काकू ? शामली गेली ?”
” हो , म्हणूनच तुला बोलावलंय . शुभम , तुला शामली आवडते न ? ”
” तुम्हाला पण माहितेय काकू , बड्डी आणि मी कधी वेगळे राहिलोच नाही . अवडतेच न ती मला . ”
” तुला कळालेय मला काय म्हणायचे आहे ते . ”
” अशा चर्चेला काही अर्थ नाही
काकू . ”
” आहे !! नक्कीच आहे !! त्या मानसचं काही खरं नाही . आणि ही मूर्ख नीट निर्णय घेऊ शकणार नाही .”
” नाही काकू . ती फार जास्त म्याचौर आहे . तुम्ही विचार करा काकू ,  वीस वर्षाच्या सहवासा नंतरही तिला जे क्लिक झालं नाही , ते मानस सोबतच्या केवळ काही दिवसात झालंय . मी तिचा अतिशय जिवलग मित्र आहे , मित्र !!! आणि मानस तिचा जिव आहे . ह्यात फरक आहे न ? ”
” पण …
” नाही काकू . आज मी जर तिला लग्नासाठी विचारलं तर ती तिचा
‘ बड्डी ‘ घालवून बसेल .”
” घालवू दे !! नवरा पण बड्डी होऊ शकतो न ? ”
” मी तिला पूर्ण ओळखून आहे काकू . तिची निवड परफेक्ट आहे .”
” हा मानस तिच्या आयुष्यात का आला रे ? मी जीव ओवाळून तुला जावई मुलगा म्हणून माया दिली असती .”
” येतो मी काकू , तिला माझी गरज आहे .”

” शामली ? ” शुभम ने तिला हाक मारली . शामली धावत आली आणि तिने केबिनमध्ये त्याला घट्ट मिठी मारली . ” बड्डी , तू आलास !! मला माहिती होतं ,तू येणार .”
” ए s , तू कधी पासून हे रडणं सुरू केलं ग ?  ती फायटर शामली
कुठाय ? ”
तिने मानस चा निरोप सांगितला .
तो म्हणाला त्यात काय अवघड आहे शामली ?
” तुला काय हवंय ते विचार स्वतःला .
मानस सोबत आयुष्य की मानस विना दुसरं काही ..बस !! सोप्पं !! ”
” माझा निर्णय झालाय . तू माझी साथ देणार ? ”
” कोई शक ? ”
” मला खात्री होती  शुभम , मला तुझी पूर्ण खात्री होतीच .”

शुभम ची लगबग चालू होती . आई बाबा ही जय्यत तयारीत होते . सहा महिन्यानंतर आईला मनासारखे उत्तर मिळाले म्हणून आई जाम खुश होती . शामली तयार होती . दवे काकूंना खास आमंत्रण होते .
” कशी दिसतेय मी ?” शामली ने विचारले . शुभम नुसता बघतच राहिला . ” नवरी च्या रुपात तू वेगळीच कुणी वाटतेय ग .”
” चल !! खोटारडा ! ”
गाडी तयार होती . सगळे निघाले . विनायक मंदिरात पोहोचले .
तिने दवे काकूंना वाकून नमस्कार केला .
”  आम्ही तुला खुप त्रास दिला न ? आता सगळं नीट होईल बघ ” त्या म्हणाल्या .
मंदिराजवळ टॅक्सी येऊन थांबली .
मानस उतरला . बूट काढून मंदिरात आला . त्याने आल्याबरोबर
शुभमला मिठी मारली .  ” यु डिड इट बडी !! ” तो म्हणाला .
शुभम शामली ला घेऊन आला .
शामली नि फक्त डोळे भरून मानस कडे बघितले . त्याच्या घाऱ्या डोळ्यात पाणी जमले होते .
पण घाई करणे आवश्यक होते .
” चला , लवकर हार घाला , गुरुजी , म्हणा मंत्र .” बाबा म्हणाले .
गुरुजींनी मंत्र म्हटले आणि  शामलीने मानसच्या गळ्यात वरमाला घातली . मानस ने ही हात उचलला ….तीने हसून मान झुकवली आणि त्याने वरमाला तिच्या गळ्यात टाकल्याबरोबर सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या .
मानसला त्याच दिवशी कॅनडा ला जायचे होते . तो शामलीला घेऊन जाणार होता . सगळे आटोपून दोघे निघाले .
” मानस , ही बड्डी सोपी नाही बरं सांभाळायला . जरा सांभाळून .! ”
” ए बाबा , हिचं जर बिनसलं तर जगाच्या कोपऱ्यात जिथे असू तिथे तुला यावे लागेल बरं! .” सगळे हसले .
सगळ्या मोठ्यांना नमस्कार करून दोघे गाडीत बसले .
शामली ने निघतांना शुभम कडे नुसतं बघितलं ,आणि त्याने नजरेनेच ‘ मी आहे कायम तुझ्यासोबत ‘ ह्याची पुन्हा जाणीव दिली .
आईबाबा अतिशय खुश होते . त्यांनी प्रेमाने निरोप दिला . ते ही मागून जाणारच होते
एअरपोर्टवर .
” शुभम , हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले .”
” नाही काका , हे शामलीच्या ठाम निर्णयामुळे झाले . जमेल तिथे जमेल तसे काम करिन पण आयुष्य मानस बरोबरच काढीन हे तिचे म्हणणे एकदम पटले मला . म्हणून मानसचा तुम्हाला फोन आला तेव्हा त्याला कसंही करून सहा दिवसाकरता येण्याची विनंती केली , आणि चक्क त्याची सुटी मंजूर पण झाली . ”
बाबांनी शुभमला घट्ट मिठी मारली . ” चल ,आपल्यालाही जायचंय ना एअरपोर्ट वर . ”
शामली विमानात शांत बसली होती . मानस ला टेन्शन आले होते . हा ज्वालामुखी फुटणार आणि मग … तो हळूच म्हणाला ,
“शामली ? ..आता बोलणार नाहीस का माझ्याशी ? …..विश्वासच नाही बसत की आपलं लग्न झालंय …ए , बोल न काहीतरी . ”
” तू तर महान बनून मोकळा झालास !! तिच्यासाठी योग्य तो निर्णय घ्या म्हणे !!! काय अपेक्षित होतं तुला ? की मी दुसऱ्या कुणाबरोबर संसार करिन आणी मग तू मोकळा फिरशील ? जगविख्यात शास्त्रज्ञ म्हणून? ….,काय म्हणायचं काय होतं तुला ?”
” अरे बापरे ! ज्वालामुखी फुटला , ह्या शास्त्रज्ञाला माहितेय त्याला कसं शांत करायचं ते “….त्याने तिचा चेहेरा आपल्या ओंजळीत घेतला . ” शामली , मला तुझी स्वतःची आयडेंटिटी घालवून तुला माझी अर्धांगिनी नव्हती बनवायची  ग .”
” मी केलाय कॅनडा हॉस्पिटल ला अर्ज , होऊन जाईल .”
” खरं ? ”
” हो , नाही जमलं तर मिळेल तसे काम करिन , आनंदाने ,
तुझ्याचसाठी !! ”
तिने आपला हात त्याच्या भोवती घालून त्याला प्रेमाने जवळ घेतले .
( समाप्त )
©अपर्णा देशपांडे

Image by StockSnap from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

6 thoughts on “ओढ वेल्हाळ- शेवटचा भाग

    • January 20, 2021 at 6:50 pm
      Permalink

      थँक्स

      Reply
    • February 4, 2021 at 8:25 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • January 19, 2021 at 3:41 pm
    Permalink

    mastach katha

    Reply
  • January 20, 2021 at 6:50 pm
    Permalink

    धन्यवाद

    Reply
  • February 10, 2021 at 4:55 pm
    Permalink

    अतिशय सुरेख कथा .👌👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!