कॉफी…
हलली कधी रात्री जागून लिहिलं जात. आणि मग असं लिहिता लिहिता कॉफी प्यायची तल्लफ येते. हलकी कडवट, फेसाळ, भरपूर दूध घातलेली दाट, नेसकॉफी…. ह्या कॉफी बरोबर काय काय केलं नाही. अभ्यास केला. गप्पा मारल्या. पुस्तकं वाचली. चित्रपट पाहिले. कविता लिहिल्या. फोनवर बोलले. कधी हसले खळखळून. अनेकदा एकटीनं घरात कोणी नसतांना मी कॉफी करून पीत असे. आज ती मी पीत नाही म्हणून काय झालं. आठवतं जातंच. राहून गेलेलं काही. कधी काही करायचं. भेटायचं कोणाला. वाचायचं पुस्तकं. राहून गेलेला निरोप एखादा. एक कॉफी पण किती आठवणी सोबत… Coffee is royal असं म्हणतात ते उगीच नाही.
ते थंडीचे दिवस होते. अनोळखी शहरातले अजूनच अनोळखी विमानतळ. माणसांच्या गर्दीत राहून एकट्यानं केलेला प्रवास खूप काही देऊन जातो. जवळपास अर्धी रात्रंच काढायची होती तिथे. मग कॉफीच आली धावून मदतीला. मैत्रीण आहेच ती माझी अगदी सख्खी. कॉफीचा मग घेऊन बसलं की वेळेचं भान रहातं नाही हेच खरंय. चहाचे बापडे तसे नाही. चहा म्हणजे काम. येता जाता पितो आपण. घाईघाईत.. एका हाताने करत काम.पोळ्या लाटत, कधी अभ्यास घेतं मुलांचा. थकून दमून भागून आल्यावर. कॉफीचं तसं नाही. कॉफी म्हणजे निवांतपणा. कॉफी म्हणजे पुस्तकं आवडीचं. कॉफी म्हणजे कथेमधले जी.ए. आणि कवितेतला ग्रेस. कॉफी म्हणजे मौनराग. कॉफी म्हणजे निव्वळ शांतता. कॉफी म्हणजे me time. खरंच Coffee is royal असं म्हणतात ते उगीच नाही.
किती प्रकार त्या कॉफीचे. जसे माणसांचे असतात. गरम गरम मऊसूत उप्पीटासोबत घेतली जाणारी फिल्टर कॉफी.नाही नाही ती तर कापीच. फिल्टर कॉफी पिणं म्हणजे अनुभव असतो. मुळात ती कधी घरी प्यायचीच नसते. फिल्टर कॉफी म्हटलं की दोनच जागा आठवतात. मुंबईतल्याच. एक म्हणजे रुईया कॉलेजच्या जवळचा मणी आणि दुसरं मद्रास कॅफे. आणि मग त्या आठवणीने पण अहाहा!! होऊन जातं. किती वेळा कॉलेज संपलं की प्यायली आहे ह्याची तर गणतीच नाही. कधी एकटीनं कधी मैत्रिणीच्या सोबत. कधी आत बसून. कधी बाहेरच्या स्टुलावर. हमखास डुगडुगणाऱ्या. छोट्याशा. आमच्या रुईया कॉलेजचं आणि मणीचं नातं बनारस आणि गंगेचं आहे. कुठेही जा दुसरा चुकत नाही. त्याला भेट दिलीच जाते. पाय घेऊनच जातात तिथे. कॉफीच्या वासानं ओढून तुम्हांला कारण खरंच Coffee is royal असं म्हणतात ते उगीच नाही.
कॉफीचा आपला क्लास आहे. कॉफीचे आपले रसिक आहे. तिचे चाहते आहेत. ते तिचे असतात आणि ती त्यांची. चुकला फकीर कसा नेमका मशिदीत सापडतो तसा कॉफीचा दर्दीपण सापडेलच एखाद्या कॉफीशॉपमध्येच. माझा एक मित्र आहे. अगदी अबोल. अंतर्मुख. चित्रं काढणारा. आपल्याच विचारात गुरफटलेला. थोडा तुसडा. पण कॉफी पिणारा. अगदी जवळचा मित्र आहे. कारण स्वभाव पूर्ण भिन्न असले तरी एकच समान दुवा आहे. कॉफी. तुमचाही असेल कदाचित. आठवला? म्हणूनच म्हणते खरंच Coffee is royal असं म्हणतात ते उगीच नाही.
इतकी ही माझी आवडती कॉफी पण ती आता मला प्यायची नाही. किती माझा जीव तिच्या आठवणीनं तळमळतो. कितीदा ती चव अजून रेंगाळते. कितीदा मी एखादया कॉफीच्या दुकानासमोर उभं राहून तो वास माझ्यात भरून घेते. तोच ताज्या, दळलेलया कॉफीचा कडवट वास. वेगवेगळया प्रकारची कॉफी भरून ठेवलेल्या त्या लाल झाकणांच्या बरण्या. कितीदा मी इथे आले. कितीदा वेगवेगळ्या प्रकारची कॉफी घेऊन गेले इथून. मग पाय रेंगाळतात तिथे अजून. मालक त्या दुकानाचे. किती जुने ओळखीचे. “ये ना, ताजीच आलेय दळून. घेऊन जा ग थोडी. प्यावी कधीतरी काही होतं नाही”. म्हणून आग्रह करकरून बोलावणारे मला. पण मी जात नाही. काही वाटा बंदच होत जातात. पण त्याला इलाज नाही. तिची सय मात्र येतेच. प्रेम आहेच माझं तिच्यावर जरी आमची भेट नाही. कारण खरंच Coffee is royal असं म्हणतात ते उगीच नाही.
Image by StockSnap from Pixabay
- सुशीच्या पल्याड….. - August 6, 2021
- स्पर्शाचं देणं - July 14, 2021
- तुकड्या तुकड्याने जगतांना…. - June 8, 2021