चिर निद्रा…
मध्यरात्री अचानक माधवीला दचकून जाग आली . घड्याळात अडीच वाजले होते . तिने डोळ्यावर पाणी मारले , आणि ऍप्रन चढवला . आपल्या रेस्ट रुम मधून बाहेर येऊन सिस्टर च्या टेबल वरील रजिस्टर मध्ये वेळेची नोंद केली , आणि वॉर्ड क्र .3 कडे गेली . डॉ . विश्वास नुकतेच राउंड घेऊन गेले होते . आज हॉस्पिटलमध्ये जरा शांत वाटत होतं . कुणी इमर्जन्सी पेशंट दाखल झालेला नव्हता . अन्यथा डुलकी घेणे काय , खुर्चीत बसणे पण शक्य नसते . स्टोअर रूम मध्ये स्टॉक बघायला म्हणून ती आत गेली , आणि मागून कुणीतरी येतंय असा भास झाल्याने झट्कन वळून बघितलं . मागे तर कुणीच नव्हतं , पण तिला भास झाला होता नक्की ! स्टोअर मध्ये आत अजून एक छोटी खोली होती , जिथे नामदेव ची ड्युटी असते . आज मात्र स्टोअर रिकामं होतं .तिला आश्चर्य वाटलं . तिने नामदेव , इंगळे , यांना हाका मारल्या . उत्तरादाखल आतून खोल खोल यावा तसा आवाज आला . कुठून आला आवाज म्हणून ती पुढे गेली . इतक्यात लाईट्स ऑफ होऊन अचानक काळोख झाला , आणि धाडकन आवाज होऊन स्टोअर चं दार लागल्या गेलं . आता मात्र माधवी चा थरकाप झाला . आपल्याला झालेला भास खोटा नव्हता ह्याची जाणीव झाली . तिच्या कपाळावर घाम जमा झाला . पटकन एका टेबलाचा आधार घेऊन ती आधी खाली बसली . धडधडत्या हृदयाला शांत होऊ दिलं . तिने कान एकवटून कानोसा घेतला , पण तिथे कुणी असल्याची कोणतीच चाहुल नव्हती . गुढग्यावर सरकत सरकत पुढे गेल्यावर तिथे खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या .
” मॅडम , तुम्ही स्टॉक चेक करायला येता न , तेव्हढ्या पूरतच ठेवा . इकडच्या दरवाज्यापाशी नका जात जाऊ ” तिला आठवलं ..नामदेव म्हणाला होता एकदा . काय आहे तिकडे ? असं का म्हणाला नामदेव ? म्हणत तिच्याही नकळत तिने ते दार ढकललं . आत खाली जाणाऱ्या पायऱ्या होत्या बहुतेक . तिने आपला मोबाईल चा लाईट ऑन केला , आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली . खालून कुठूनसा मंद उजेड येत होता . शेवटच्या पायरीवर ती आली , आणि मोबाईल लाईट आपोआप बंद झाला . वातावरण अतिशय गूढ…कमालिव्हि शांतता ….एक विचित्र दर्प सगळीकडे भरलेला …अशा अवस्थेतही ती न घाबरता पुढे सरकत होती . ह्या प्रकरणाचा छडा लावायचाच ह्या निर्धाराने . चाचपडत गेल्यावर तिच्या हाताला काहीतरी ओलसर लागलं . मोबाईल ऑन करावा की नाही हा विचार ती करत असतानाच खुसफुसल्या सारखा आवाज झाला . तीने पडद्यामागे स्वतःला लपवलं . कुणीतरी नक्कीच होतं तिथे . तिने कान एकवटले ..
“कुणी बघितलं तर नाही न ?” एक आवाज.” नाही , हा रस्ता कुणाला माहिती नाहीये .” हा दुसरा आवाज ओळखीचा वाटला .”किती मुडदे आणलेस ?”” दोन मुडदे आणि एक जिवंत आहे . लवकर करावं लागेल .” हा आवाज ऐकूनती अंदाज लावत होती . हा आवाज …डॉ.विश्वास ?…नो !! डॉ.विश्वास हे असं काम ??? इतक्या थंडीतही तिला घाम फुटला . आता आपण बाहेर यावे की पोलिसांना फोन करावा ..ह्या विचारात असतांनाच अचानक लाईट लागले . सगळं लख्ख दिसू लागलं …मोठं ऑपरेशन थिएटर… तीन टेबलावर तीन देह ..डॉ .विश्वास , आणि सोबत इंगळे , स्टोअर किपर ! ती पुढे सरकली ..आत्ताच काय ते करणं आवश्यक होतं …झटापट… गळा आवळल्याचा आवाज ..जीव गुदमरला … आणखी दोन मृतदेह तिथे निपचित पडले होते . चिर निद्रा घेत . आता पुन्हा कोणाच्या देहाची चिरफाड तिथे होणार नव्हती !ती शांत आणि निर्विकार पणे पुन्हा पायऱ्या चढत होती . आपले उलटे झालेले पाय नीट सरळ करून , डॉ. च्या वेशात !
Image by Pete Linforth from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
thrilling !
Thank you
Jabardast
jabardast
Thank you
बापरे! एकदम ३६० चा turn. जबरदस्त. एक नंबर…
धन्यवाद
डेंजर!
Thank you
👌👌